किरीट सोमय्यांना धमकी देणारा युसुफ अन्सारी तडीपार

पोलिसांनी जारी केला आदेश

किरीट सोमय्यांना धमकी देणारा युसुफ अन्सारी तडीपार

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील गोवंडी परिसरातील ७२ मशिदींमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून त्यांना धमकी देण्यात आली होती. फेसबुकवरून ही धमकी देण्यात आली होती. यानंतर आता युसुफ अन्सारी याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांना धमकी देणारा हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचा सचिव युसुफ अन्सारी याच्यावर मुंबई पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी गोवंडी परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. या कारवाईला युसुफ अन्सारीने विरोध करत किरीट सोमय्या यांना धमकी दिली होती. अन्सारी याने त्यांच्या घरी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर किरीट सोमय्या यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत म्हटले होते की, अशा गुंडांना ते घाबरत नाहीत. अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाई होणारचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. तसेच युसुफ अन्सारी विरोधात शिवाजी नगर गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा..

ज्योती मल्होत्राने तोंड उघडले; पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्यक्तीशी होता संपर्क

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगाल पोलिसांवर गंभीर आरोप

अमृत भारत स्टेशन योजनेची बघा कमाल !

नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल, सोनिया गांधींना १४२ कोटींचा फायदा

दरम्यान, या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी युसुफ अन्सारीविरुध्द तडीपारचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, अन्सारी याला पुढील १५ महिन्यांकरिता मुंबई, ठाण्यात प्रवेश करता येणार नाही. सोमय्यांना मिळालेल्या धमकीनंतर ईशान्य मुंबई भाजपचे प्रमुख दिपक दळवी यांनी मुलुंड पोलीस स्टेशन अधीक्षकांना पत्र लिहित अन्सारीवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या युसूफ अन्सारीला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत १५ महिन्यांकरिता मुंबई, ठाण्यातून तडीपार केले आहे.

Exit mobile version