अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या तक्रारीवर नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित बुधवार, २१ मे रोजी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांची नावे आहेत. यावेळी ईडीकडून नायायालयात धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
ईडीने बुधवारी दिल्लीच्या न्यायालयात सांगितले की, नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना गुन्ह्यातून १४२ कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले. न्यायालयाने एजन्सीच्या आरोपपत्राची दखल घ्यावी की नाही यावरील प्राथमिक सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी हे विधान केले. एसव्ही राजू म्हणाले की, नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीने नॅशनल हेराल्डशी संबंधित ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करेपर्यंत आरोपी गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा आनंद घेत होते.
२६ जून २०१४ रोजी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सुरू झालेल्या दीर्घकाळाच्या चौकशीनंतर न्यायालयीन कामकाज सुरू झाले. मॅजिस्ट्रेट कोर्टाने स्वामींच्या आरोपांची दखल घेतल्यानंतर २०२१ मध्ये ईडीने औपचारिकपणे चौकशी सुरू केली. बुधवारच्या सुनावणीत, न्यायाधीश गोग्ने यांनी ईडीला आरोपपत्राची प्रत स्वामी यांना देण्याचे निर्देश दिले, जे या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार आहेत. दरम्यान, सोनिया आणि राहुल गांधी यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी न्यायालयाला विनंती केली की, ईडीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांना त्यांचे म्हणणे तयार करण्यासाठी पुढील महिन्यासाठी प्रकरण सूचीबद्ध करावे. नॅशनल हेराल्डशी संबंधित गांधी कुटुंब, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला असल्याचे ईडीने निदर्शनास आणून दिले.
हे ही वाचा..
खर्गेंवर सुधांशू त्रिवेदी का संतापले ?
बोनी कपूर यांनी आई आणि रेखा यांचा फोटो केला शेअर
छत्तीसगडमध्ये १ कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यासह ३० जणांचा खात्मा
प्रकरण काय?
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची स्थापना १९३८ मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती आणि याला ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ म्हणजेच ‘एजेएल’मार्फत प्रकाशित केले जात होते. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर हे वृत्तपत्र बंद झाले आणि येथूनच हा वाद सुरू झाला. यानंतर, २०१० मध्ये, यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (YIL) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा ३८-३८ टक्के हिस्सा आहे. या प्रकरणात, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये आरोप केला होता की YIL ने AJL च्या २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता फक्त ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतल्या आहेत आणि हा फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा खटला आहे.
