छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ३० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे समोर आले आहे. चकमकीत काही बडे नक्षलवादी मारले गेल्याचीही माहिती आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या चकमकीची पुष्टी केली आहे.
बुधवारी नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता नंबला केशव राव उर्फ बसव राजसह ३० नक्षलवादी ठार झाले आहेत. बसव राज हा नक्षलवाद्यांचा सरचिटणीस देखील होता. देशभरातील सुरक्षा एजन्सी ज्याचा शोध घेत होत्या.
नारायणपूर जिल्ह्यातील जंगली अबुझमद भागात नक्षलविरोधी एक मोठी मोहीम सुरू होती, जिथे नक्षलवादी आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवानांमध्ये चकमक झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. बुधवारी सकाळी जंगली अबुझमद भागात सुरू झालेल्या या कारवाईत नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातील डीआरजी जवानांचा समावेश होता. गुप्तचर माहितीच्या आधारे चार जिल्ह्यांतील जिल्हा राखीव गार्ड पथकांनी या भागात कारवाई सुरू केली तेव्हा नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अबुझदमदचा मोठा भाग नारायणपूरमध्ये असून त्याचा काही भाग विजापूर, दंतेवाडा, कांकेर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातही पसरलेला आहे. तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांजवळ, छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
रान्या राव प्रकरणी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी संबंधित मेडिकल कॉलेजवर ईडीचे छापे
मुर्शिदाबादेत हिंदूचं लक्ष्य, तृणमूल नेत्याचा सहभाग, पोलिस निष्क्रिय; अहवालातून धक्कादायक बाबी उघड
अमेरिकेची नवीन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ‘गोल्डन डोम’ काय आहे?
लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक हमजाला गोळ्या घातल्या की दुखापतग्रस्त?
काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले होते. मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील लाल दहशतवाद संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादनही अमित शाह यांनी केले होते.
