पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये गेल्या महिन्यात हिंसा उसळली होती. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारावर आपला अहवाल सादर केला आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तसेच या हिंसक घटनांमध्ये पोलिसांची निष्क्रियता आणि अनुपस्थिती असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा एक नेता सहभागी होता, असे कोलकाता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होत असताना झालेल्या आणि मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटलेल्या या हल्ल्यांचे लक्ष्य हे हिंदूंवर होते. तसेच अडचणीत असलेल्या लोकांनी पोलिसांना मदतीचे आवाहन केले तेव्हा पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही, असे अहवालात म्हटले आहे. याशिवाय अहवालात जाळपोळीच्या घटना, लूटमार आणि दुकाने, मॉल्सची नासधूस या घटनांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
अहवालात हे ही म्हटले आहे की, “हल्ले स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम यांनी निर्देशित केले होते. तसेच स्थानिक पोलिस पूर्णपणे निष्क्रिय आणि अनुपस्थित होते,” असे अहवालात म्हटले आहे. मुख्य हल्ला शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी दुपारी २.३० नंतर झाला, जेव्हा स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम हे काही गुंडांसह आले. समसेरगंज, हिजलतला, शिउलीतला, दिगरी येथील रहिवासी तोंडावर मास्क घालून आले, असे अहवालात म्हटले आहे. कोणत्या घरांवर हल्ला झाला नाही ते पाहिले आणि नंतर हल्लेखोरांनी ती जाळून टाकली. बेतबोनाच्या ग्रामस्थांनी फोन केला, पण पश्चिम बंगाल पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. आमदार देखील तिथे होते. त्यांनी तोडफोड पाहिली आणि तेथून निघून गेले, असे अहवालात म्हटले आहे.
हल्लेखोरांनी पाण्याचे कनेक्शन तोडले होते त्यामुळे आग विझवता आली नाही. बेतबोना गावात ११३ घरांचे सर्वाधिक नुकसान झाले, असेही अहवालात म्हटले आहे. घरे उध्वस्त झाली आहेत आणि पूर्ण पुनर्बांधणीशिवाय ती राहण्यायोग्य राहणार नाहीत. गावातील महिला घाबरल्या असून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेची नवीन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ‘गोल्डन डोम’ काय आहे?
लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक हमजाला गोळ्या घातल्या की दुखापतग्रस्त?
‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
१२ एप्रिल रोजी हिंदू कुटुंबातील एका पुरूषाची आणि त्यांच्या मुलाची त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी हत्या केली, असे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात परिसरातील दुकाने आणि बाजारपेठा उध्वस्त झाल्या. किराणा दुकाने, हार्डवेअर दुकाने, इलेक्ट्रिकल आणि कापड दुकाने उध्वस्त करण्यात आली. मंदिरांमध्येही तोडफोड झाली आणि हे सर्व स्थानिक पोलिस ठाण्यापासून ३०० मीटरच्या परिसरात घडले.
तपास पथकात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण आणि न्यायिक सेवांचे सदस्य होते. हा अहवाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. या पॅनेलने गावांना भेट दिली होती आणि हिंसाचार पीडितांशी त्यांनी संवाद साधला होता.
