बंगळूरू विमानतळावरून सोने तस्करी प्रकरणात कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला अटक करण्यात आली होती. १४.८ किलो सोन्यासह तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यानंतर या प्रकरणात तपासादरम्यान अनेक वेगवेगळ्या बाबी उघडकीस आल्या होत्या. दरम्यान, सोन्याच्या तस्करीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत.
रान्या राव सोने तस्करी प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. तपास यंत्रणेच्या पथकाने कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांच्याशी संबंधित रुग्णालयाची झडती घेतली आहे. तपासादरम्यान, ईडीला जी परमेश्वर यांच्याशी संबंधित रान्या राव आणि सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये काही पैशाचे व्यवहार आढळले. ईडीचे पथक रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींची चौकशी करत आहे. परमेश्वर हे श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आहेत.
अलीकडेच, सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी रान्या राव आणि सह- आरोपी तरुण कोंडारू राजू यांना विशेष न्यायालयाने (आर्थिक गुन्हे) जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती विश्वनाथ सी. गौडर यांनी दोघांनाही जामीन मंजूर करताना दोन अटीही घातल्या आहेत. यानुसार, दोघेही देश सोडून जाऊ शकत नाहीत आणि पुन्हा असा गुन्हा करू शकत नाहीत. या अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही रान्या रावची सुटका झालेली नाही. तिच्याविरुद्ध परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळेपर्यंत तिची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट आहे.
हे ही वाचा:
मुर्शिदाबादेत हिंदूचं लक्ष्य, तृणमूल नेत्याचा सहभाग, पोलिस निष्क्रिय; अहवालातून धक्कादायक बाबी उघड
अमेरिकेची नवीन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ‘गोल्डन डोम’ काय आहे?
लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक हमजाला गोळ्या घातल्या की दुखापतग्रस्त?
‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार
प्रकरण काय?
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला ३ मार्च रोजी बंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह अटक करण्यात आली. रान्यासोबतच सोने व्यापारी साहिल जैन आणि तरुण राजू यांनाही बेंगळुरू येथून अटक करण्यात आली. साहिलने तस्करी केलेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यास मदत केली होती. रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ पोलिस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. चौकशीनंतर, निवासस्थानी छापा टाकण्यात आला ज्यातून २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणात, हॉटेल व्यावसायिक तरुण राजूवर सोन्याच्या तस्करीत रान्या रावला मदत केल्याचा आरोप आहे. रान्या राव हिने सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याचीही कबुली दिली होती.
