मुंबई महानगरपालिकेकडून “स्पेलिंग दुरुस्ती” च्या नावाखाली जारी करण्यात आलेल्या तब्बल १९,७३४ जन्म प्रमाणपत्रांवर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाने मुंबई महापालिकेला संबंधित जन्मनोंदींची तपासणी करून त्या रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील सरकारी पत्र सार्वजनिक करत ही माहिती दिली.
आरोग्य सेवा संचालनालयाने ९ जून रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, २०२४, २०२५ आणि २०२६ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या SAP प्रणालीमध्ये “दुरुस्ती”च्या माध्यमातून करण्यात आलेल्या १९,७३४ जन्मनोंदींची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित नोंदी रद्द करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पत्रात जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९, महाराष्ट्र जन्म-मृत्यू नियम २००० आणि RBD Amendment Act 2023 चा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच जन्म आणि मृत्यू नोंदींमधील बदल केवळ निर्धारित कायदेशीर प्रक्रियेनुसारच करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वीही मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बनावट किंवा संशयित जन्मदाखले जारी झाल्याच्या आरोपांवरून वाद निर्माण झाला होता. महापालिकेच्या अंतर्गत चौकशीत २०२४ ते २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात संशयास्पद जन्म प्रमाणपत्रे जारी झाल्याचे समोर आले असून त्याबाबत स्वतंत्र तपास सुरू आहे.
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला “जन्मदाखला घोटाळा” असे संबोधत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील जन्मदाखला गैरव्यवहारांचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला असून अनेक ठिकाणी चौकशी आणि गुन्हे नोंदविण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
घसरणीनंतर बाजाराचा दमदार पलटवार!
दक्षिण लेबनानमधील टायर शहरावर इस्रायलचा हवाई हल्ला
इस्रायलमध्ये उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले
राज्य सरकारच्या निर्देशानंतर आता मुंबई महानगरपालिका प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी करणार असून, नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अंतिम निष्कर्ष आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.







