देशविरोधी कारवाया आणि आयएसआय एजंटशी असलेल्या संबंधांप्रकरणात हरियाणामधील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच ज्योती ही नवी दिल्लीमधील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्लीमधील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली युट्यूबर ज्योती मल्होत्राने दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे. हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ज्योती हिने चौकशीदरम्यान कबूल केले की, ती नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत पाकिस्तानी नागरिक आणि उच्चायोगातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात होती. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की दानिश हा ज्योती हिला आयएसआय एजंट म्हणून विकसित करण्यासाठी सक्रियपणे काम करत होता. या काळात तिने दानिशशी थेट संवाद साधल्याची कबुली दिली आहे. ज्योतीची पहिली भेट २०२३ मध्ये दानिश उर्फ एहसर दारशी झाली होती. त्या काळात ती पाकिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालयात गेली होती. पुढे पाकिस्तान भेटीनंतर भारतात परतल्यानंतरही ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहिली.
हे ही वाचा..
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगाल पोलिसांवर गंभीर आरोप
अमृत भारत स्टेशन योजनेची बघा कमाल !
नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल, सोनिया गांधींना १४२ कोटींचा फायदा
खर्गेंवर सुधांशू त्रिवेदी का संतापले ?
ज्योती हिला अटक केल्यानंतर तिचे तीन मोबाईल फोन आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच तिची अनेक बँक खाती असून त्यात अनेक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे आर्थिक डेटाचे विश्लेषण करण्यास वेळ लागत असल्याचेही समोर आले आहे. ज्योती हिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या इतिहासाची देखील तपासणी करण्यात येत आहे. नोंदींवरून असे दिसून येते की तिने २०१८ मध्ये तिचा पासपोर्ट मिळवला होता, जो २०२८ पर्यंत वैध होता आणि तिने पाकिस्तान, चीन, दुबई, थायलंड, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. दरम्यान ज्योती मल्होत्राची डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत तिने पाकिस्तानला जाऊन आल्यानंतरचे काही उल्लेख केले आहेत. पाकिस्तानच्या चांगल्या सकारात्मक छबीचे वर्णन तिने डायरीत केल्याचे समोर आले आहे.
