कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी नातू, कोणाचा तरी भाचा म्हणून जे राजकारणात येतात ते परप्रकाशित असतात. लायकी नसताना त्यांना सत्ता मिळालेली असते. हे नेते सत्ताकाळात जमेल तेवढे चमकून घेतात, बेटकुळ्या काढून दाखवतात आणि विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सत्ता हातून निसटते, खुर्ची बुडाखालून हलते, तेव्हा हे किती सामान्य कुवतीचे आहेत, हे स्पष्ट होते.
सत्ताकाळात गुंडापुंडांना सोबत घेऊन सर्व प्रकारची हिरोगिरी करणारे ममता बॅनर्जी यांचे भाचे, अभिषेक बॅनर्जी उर्फ भाईपो हे सध्या भिगी बिल्ली बनले आहेत. ममता यांच्या डोक्याला दुहेरी ताप झाला आहे. त्यांना फक्त पक्ष वाचवण्याची चिंता नाही, तर अभिषेक बॅनर्जीला तुरुंगात जाण्यापासून कसे वाचवायचे हाही सवाल त्यांच्यासमोर आहे. जहांगीर खानला अटक करून शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने अभिषेक बॅनर्जीच्या अटकेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
नेपाळ सीमेजवळ जहांगीर खान याला प. बंगालच्या विशेष टास्क फोर्सने अटक केली आहे. निवडणुकीच्या काळात ‘पुष्पा है झुकेगा नही साला, पिक्चर अभी बाकी है…’ अशी बकवास करणारा हा तृणमूल काँग्रेसचा गुंड ४ मे पासून गायब आहे. त्याचे दर्शन कुणालाच झाले नाही. २१ मे रोजी फालता मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, तेव्हा याने निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली. तो पुष्पा नसून फुसका आहे हे सिद्ध केले. तेव्हाही त्याने फक्त व्हिडिओ जारी केला होता. आज त्याच्या अटकेची बातमी आली आहे. निवडणुकीत पराभव झालेले बरेच नेते देशात आहेत, कोणी देश सोडून पळून जाण्याचा विचार केला नाही. जहांगीरला पळ काढण्याची गरज का भासली? कारण ममतांच्या मोगलाईत केले त्याचे भोग आता शुभेंदु यांच्या राज्यात भोगावे लागणार आहेत, हे त्याच्या लक्षात आले.
हे ही वाचा:
होर्मुझ सामुद्रधुनीत ओमानजवळ २४ भारतीयांना घेऊन जाणाऱ्या टँकरवर हल्ला
भारत-अमेरिका संरक्षण संबंध बळकटीकरण; आर्मी-टू-आर्मी स्टाफ चर्चा
तृणमूलचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांचा राजीनामा
दादरच्या प्लाझा जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू
४ मे रोजी जेव्हा भाजपाला छप्परफाड बहुमत मिळाले, त्यानंतर आपले काय होणार हे जहांगीरच्या लक्षात आले असावे. तेव्हापासून तो दिसेनासा झाला. अटक अटळ आहे, उरलेले आयुष्य तुरुंगात घालवावे लागणार हे त्याच्या लक्षात आले.
तृणमूल काँग्रेसच्या काळात देशाची सीमा फक्त बांगलादेशींच्या घुसखोरीसाठी मोकळी सोडलेली नव्हती, तर या सीमेतून गोवंशाची, शस्त्रांची, ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी चालायची. जहांगीरसारखे गुंड यात थेट सामील होते. अभिषेक बॅनर्जीचा याला आशीर्वाद होता. प. बंगालमध्ये एक समांतर अर्थव्यवस्था सुरू होती.
जहांगीरला नेपाळ सीमेजवळ अटक झाली याचा अर्थ तो देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. नेपाळमधून कदाचित बांगलादेश किंवा पाकिस्तानात पळ काढणार होता. बेकायदा शस्त्र बाळगणे, जमिनी कब्जा करणे, खंडणी, मारहाण अशा सात प्रकरणांत त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. अभिषेक बॅनर्जी ज्या डायमंड हार्बर मॉडेलचा उदोउदो करायचा, त्याचा आधार हा जहांगीर खान होता. हे मॉडेल होते विरोधकांना, मतदारांना धमकावण्याचे, चिरडण्याचे. त्यासाठी दहशत माजवण्याचे काम जहांगीरवर सोपवण्यात आले होते.
१८ मे रोजी अटक टाळण्यासाठी त्याने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याला २६ मे पर्यंत दिलासा दिला होता आणि तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मात्र त्याला कोणतेही संरक्षण देणे न्यायालयाने टाळले, कारण जहांगीरच्या विरोधात सात गुन्हे दाखल होते. जहांगीर खानची अटक ही अभिषेक बॅनर्जी याच्यासाठी धोक्याची घंटा अशासाठी आहे कारण, जहांगीरचे गुन्हे अभिषेकच्या इशाऱ्यावरून आणि आशीर्वादाने सुरू होते.
२०१४ ते २०२१ या काळात झालेला शिक्षक भरती घोटाळा, कोळशाची तस्करी आदी प्रकरणांत अभिषेक बॅनर्जी अडचणीत आला आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून त्याची चौकशी सुरू आहे. जहांगीर खानच्या अटकेमुळे अभिषेकची सगळी कुंडली पोलिसांसमोर उघड होणार आहे.
पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज ममता बॅनर्जी यांना आला आहे. गेली १५ वर्षे ‘अल्ला अल्ला’ करणाऱ्या ममता बॅनर्जी दोन दिवसांपूर्वी कालीमातेचे भैरव असलेल्या नकुलेश्वर बाबांच्या मंदिरात गेल्या होत्या. त्यांची अवस्था इतकी वाईट होती की मंदिरात आलेले भक्तगण त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. ममता यांच्या चेहऱ्याची तर पार रया गेली होती. सोबत दोनेक लोक असतील. हा जनतेचा सूड आहे. सत्ता डोक्यात शिरलेल्यांची अवस्था अशीच होते.
दोन महिन्यांपूर्वी ममता इथे आल्या होत्या, तेव्हा भक्तीपेक्षा अहंकाराचे प्रदर्शन त्यांनी केले होते. दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी मंदिरातील संन्याशांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले आणि त्यानंतर दर्शन घेतले. कठीण काळात नास्तिकालाही देवाची आठवण येते. दोन महिन्यांपूर्वी ममतांच्या लक्षात आले होते की, सत्ता जाते आहे, म्हणून त्यांना देव आठवला. दोन दिवसांपूर्वी ममता इथे पुन्हा आल्या, त्याचे कारण मात्र वेगळे होते. पक्ष हातून जातो आहे आणि अभिषेक बॅनर्जी तुरुंगात जात आहेत, हे त्यांना आता स्पष्ट दिसू लागले आहे. जहांगीरच्या अटकेमुळे त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये पळापळ सुरू आहे. ८० पैकी ६१ आमदार बाजूला झालेले आहेत. राज्यसभेचे खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मिळून ३० खासदार पक्षाला रामराम ठोकताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी लोकसभेतील २० खासदार बाजूला होतील असे भाकीत ४ मे नंतर लगेचच केले होते. टीव्ही चॅनेलवर तृणमूलची बाजू मांडणारे ॲड. सुदीप्त सरकार यांनीही हेच भाकीत केले आहे. ভাইপো (भाईपो) रिझिम संपलीच पाहिजे, असा आवाज तृणमूलमधून मोठ्या प्रमाणात उठताना दिसतो आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची झालेली परिस्थिती बरी म्हणावी अशी वेळ ममतांवर येताना दिसते आहे. आमदार-खासदार भाईपोवर नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु ममतांना क्लीन चिट देता येत नाही. पापांचा घडा भरला होता, आता हिशोब सुरू झाला आहे.
पक्षातून मोठ्या संख्येने आमदार-खासदार बाजूला होण्याच्या तयारीत आहेत. जनतेत सुद्धा अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात मोठा असंतोष आहे. सुरक्षेशिवाय बाहेर फिरला तर लोक याला तुडवतील अशी शक्यता आहे. त्याची झलक सोनारपूरमध्ये एकदा मिळालीच आहे. लोकांनी सडलेली अंडी फेकून मारली. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असताना चापटवून काढले. पक्षातही भाईपोच्या विरोधात असाच असंतोष आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून ७ लाख मतांनी जिंकला होता. या विजयाचे श्रेय पूर्णपणे जहांगीर खानला जाते. मतदारांना धमकावण्याचा प्रयोग २०२४ पर्यंत यशस्वी झाला होता. ज्यांनी हा प्रयोग केला त्यांना तुडवण्यासाठी आता जनता प्रचंड उत्सुक आहे.
पक्षातून बाहेर पडणारे गद्दार आहेत, कचरा जातोय तर जाऊ दे, असे उद्गार तृणमूलचे खासदार कीर्ति आझाद यांनी काढले आहेत. शत्रूघ्न सिन्हा, कीर्ति आझाद यांच्यासारखे नेते ममता बॅनर्जी यांच्यासोबत आज आहेत, कारण हे मूळात भाजपांमधूनच फुटून बाहेर पडले होते. त्यांना आता परतीचा मार्ग उरलेला नाही. त्यांच्या पाठीशी जनाधारही नाही. परंतु सध्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि आधी झालेला अभूतपूर्व हिंसाचार अभिषेक बॅनर्जी याच्या इशाऱ्यावरून झाला होता. भाजपा कार्यकर्त्यांवर वरवंटा चालवण्यात आला होता. हत्या, बलात्कार, जाळपोळ अशी सगळी हत्यारे वापरण्यात आली होती. या हिंसाचारात जहांगीरसारखे गुंडच सक्रिय असणार. संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी तुरुंगात आहे. शहाजहान काय किंवा जहांगीर काय, नावे मुघलांची आणि कृत्ये पण तशीच, हिंदूंना चिरडण्याची. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी फालता पोटनिवडणुकीच्या प्रचारात असे ठणकावून सांगितले होते की, जहांगीर खानचे काय करायचे ही आता माझी जबाबदारी. त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







