अमेरिकेतल्या बोस्टन इथून भारतात आल्यानंतर अभिजित दीपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केले. जंतर मंतरमधील त्या आंदोलनातून धर्मेंद्र प्रधान यांच्य़ा राजीनाम्याची मागणी केली. तो राजीनामा घेतलाही गेला. पण त्या आंदोलनापासून दीपकेच्या अहंकारात दिवसेंदिवस वाढ होत गेली. कर्तृत्व असेल तर अहंकार एकवेळ पटण्यासारखाही असतो. पण लंगोट बांधली म्हणजे पैलवान झालो असा अनेकांचा समज असतो. त्यातूनच अपुनीच भगवान है, अशा अविर्भावात त्याने भाषणे आणि वक्तव्ये ठोकायला सुरुवात केली. झुरळांना पंख फुटले, त्यांचे पाय आभाळाला लागले, असे म्हणूनच म्हणावेसे वाटते.
या आंदोलनातच दीपकेने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आता मोदींचा, अमित शहांचा राजीनामा हवा असेल तर तोही घेऊ अशी भाषा त्याने वापरायला सुरुवात केली. आता जणू देशच आपल्या पाठीशी आहे, आपण ज्याचा राजीनामा मागू त्याला तो द्यावाच लागेल, अशा एका भ्रमात दीपके राहू लागलेला आहे.
जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान तो म्हणाला होता की, मोदी, शहांचे आपण राजीनामे घेऊन आणि त्यांना चहा समोसे विकायला बसवू. त्याची ही भाषा अतिउत्साहातून, मिळालेल्या तुटपुंज्या यशातून आलेली नाही, तर अहंकारातून या भाषेचा जन्म झाला आहे. आता आपण देशाची सत्ता उपटून फेकू शकतो, आपल्याला हवे तसे राजकारण बदलू शकतो, सगळे राजकारण आपल्यासमोर नतमस्तक आहेत, न्यायालये, पोलीस हे आपल्या तालावर नाचू लागतील असे या झुरळ पार्टीला वाटू लागले आहे. बरे, केवळ दीपकेचीच भाषा अशी आहे असे नव्हे त्याचे सगळे सहकारीच आपणच सरकार असल्यासारखी भाषा वापरू लागले आहेत.
पुराणकथांमध्ये अनेक अशी पात्रे आपण पाहिली आहेत की ज्यांना अचाट शक्ती प्राप्त झाल्यानंतर अवघ्या विश्वावर आपल्याशिवाय आता कुणीच नाही असा समज करून घेतला पण त्यांचे गर्वहरण झाले. कॉक्रोच हे अशाच पात्रांपैकी एक आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दासनेही म्हटले आहे की, सरकारपेक्षा सर्वोच्च न्यायालय जर वरचढ असेल तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाशीच बोलू. आशुतोष रांका नावाचा सहकारी म्हणतो की, आता आम्ही शेतकरी संघटनेच्या सोबतीने मोदी सरकारची मिळेल तिकडून कोंडी करू. दीपकेने तर या सगळ्या वक्तव्यांची पातळीच ओलांडली आहे.
मुळात दीपके हा कट्टर भाजपद्वेष्टा आहे. हे त्याने स्वतःच म्हटले आहे. त्याने एका मुलाखतीत हे स्पष्ट केले होते की, तो भाजपाचा विरोधक आहे. यावरून हे स्पष्ट होते की, दीपके हा विद्यार्थ्यांच्या हिताच्या विचाराने चिंतित असल्यामुळे भाजपावर टीका करत आहे असे म्हणण्याची गरज नाही. तर त्याला भाजपाचे सरकारच नकोय. आपल्याला हिरो बनवू नका, असे म्हणणाऱ्या दीपकेला कोणत्याही परिस्थितीत हिरो बनायचे आहे.
हे ही वाचा:
गाझा शांतता आराखड्याला यश; हमास निशस्त्रीकरणास तयार
भिवंडीत चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू
पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; तरुणीविरोधात एफआयआर
सध्या नरेंद्र मोदी यांना शिव्या देणे, त्यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्याबद्दल ओकाऱ्या काढणे हा प्रसिद्धी, लोकप्रियतेचा सर्वात सोपा मार्ग आहे, असे अनेकांना वाटते. तसे प्रयत्न अनेक लोक करत असतात. देशातील विरोधी पक्षही याच मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकवेळेला त्यांच्या पदरी घनघोर निराशाच येते. दीपके हा या सगळ्यांच्या पंक्तीत आलेला नवा गडी आहे.
दीपकेने मध्यंतरी म्हटले होते की, मोदींना इन्स्टाग्रामवर राहायचे असेल तर त्यांनी इन्फ्लुएन्सर बनावे, पंतप्रधानपद सोडून द्यावे. नंतर तो म्हणाला की, मोदींच्या चेहऱ्यावरची लकाकी ही देशाच्या भविष्यापेक्षा जास्त आहे. ही भाषा हेच दर्शवते की, दीपकेला आता हवा लागली आहे. पतंगाला जशी हवा मिळते आणि तो हवेत कुणीही नियंत्रित न करताही उडत राहतो, तसेच काहीसे त्याच्याबाबतीत झाले आहे. आपण थेट मोदींनाच आव्हान देऊ शकतो, बाकी इतर नेते वगैरे आपल्यासमोर कस्पटासमान आहेत, असे दीपकेला वाटू लागले असावे.
दीपकेचे आईवडील त्याचे लग्न व्हावे, त्याने करिअर करावे या छोट्या छोट्या स्वप्नात दंग असले तरी अभिजित दीपकेने मात्र थेट मोदींनाच आव्हान देण्याचे ठरवले आहे. तुम्हाला मोदीद्वेषाने पछाडले की, तुम्ही भारतातील राजकारणात येण्यास पूर्ण सज्ज आहात, असा एक ट्रेन्ड बनला आहे. जो तो येतो आणि मोदीविरोध करून स्वतःवरच खुश होतो.
दीपके हा मुळात पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी भारतात आला, पण केव्हा तो राजकारणात येण्याचे स्वप्न पाहू लागला हे त्यालाही कळले नाही. अजून त्याने राजकारणात येण्याची भाषा केली नसली तरी शेवटी तो अरविंद केजरीवाल यांचा चेला आहे. ओठात एक पोटात एक ही केजरीवाल यांची तऱ्हा आहे. दीपकेने ती आत्मसात केली नसेल असे अजिबात म्हणता येणार नाही. अण्णा हजारेंसोबत लोकपाल आंदोलनात असताना केजरीवालही राजकारणात पडणार नसल्याचे सांगत असत. पण नंतर काय झाले हे आपण जाणतोच. त्यामुळेच तो नरेंद्र मोदींना आपला शत्रू मानू लागला आहे. कारण राजकारणात सध्या मोदींना शिव्या देणे म्हणजे आपले राजकारणात बस्तान बसणे असा अर्थ काढला जाऊ लागला आहे.
अर्थात, अशा शिव्या देणाऱ्यांची राजकारणात काय गत झाली हे आपण पाहतोच आहोत. पण दीपकेला याचा अनुभव अद्याप यायचा आहे. आंदोलनामुळे आलेल्या नवचैतन्यामुळे त्याने मोदींना शिव्या देणाऱ्यांना क्लिन चीट दिली आहे. चेष्टेने काही लोक बोलत असतील तर त्याचे एवढे काय, अशी भाषा ही कॉक्रोच गँग करू लागली आहे. पोलिसांवर दगड फेकणारेही त्याच्या दृष्टीने निर्दोष आहेत. कारण आंदोलनातून पोलिसांसारख्या व्यवस्थेलाच ठेचायचे, हा मनसुबा असणार.
दीपकेने थेट राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदापासून हटविण्याचे ठरविलेले असावे, असे दिसते. सरकारचे सर्वात प्रमुख विरोधक आपणच असा दीपकेचा अविर्भाव आहे.
पहिल्यापासूनच शिक्षणाच्या प्रश्नांपेक्षा राजकारण हाच झुरळ गँगचा विषय राहिलेला आहे. नीट परीक्षा पेपरफुटी हा केवळ एक दिखावा होता हे आतासे स्पष्ट झाले आहे. पण त्यामुळे मोदींचे कट्टर विरोधक कोण यासाठी राहुल गांधी आणि कॉक्रोच यांच्यात प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. पण या दोघांमध्ये मूलभूत फरक हा आहे की, निदान राहुल गांधी हे खासदार आहेत, ते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत. गेली २२ वर्षे राजकारणात असतानाही त्यांना फारसे काही पक्षासाठी करता आले नसले तरी भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात ते आहेत. दीपकेचे तसे नाही. आता कुठे झुरळांचा जन्म झाला आणि त्यांना पंखही फुटले. लगेच त्यांना गरुडभरारी मारण्याची इच्छा झाली आहे अशी दीपकेची अवस्था आहे.
नरेंद्र मोदी, अमित शहा हे अनेक वर्षे राजकारणात आहेत आणि ते राजकारण कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केले आहे, हे दीपकेला कळणे कठीण आहे. राजकारण कोळून प्यायलेल्या या दोघांना आपणच हटवू असा गर्व त्याला या जंतरमंतर आंदोलनामुळे झाला असला तर त्यात चूक काही नाही. भलेभले लोक अहंकारामुळे भलतीसलती स्वप्ने पाहू लागले आणि नंतर मातीमोल झाले, हे आपण पाहिलेले आहे. दीपकेची तर तेवढीही कुवत नाही. कुणाच्या तरी पाठिंब्याच्या जोरावर आपण सगळ्या देशात अराजक माजवू, पोलिसांना झोडून काढू, नेत्यांना पळवून लावू, वाटेल त्या शिव्या देऊ, त्यालाच जेन झीची भाषा असा मुलामा लावू अशा भ्रमात कॉक्रोच जमात आहे.
पोलिसांवर जंतर मंतर आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने एका जखमी पोलिसाच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन त्या पोलिसाची कशी वाईट अवस्था आहे हे सांगितले तर त्यावर दीपके म्हणतो की, अशा पत्रकार परिषदा घेण्यासाठी पोलीस कुटुंबाला भाजपाने पुढे केले आहे. यावरून दीपकेची मानसिकता लक्षात येते. खरे तर एक आंदोलक या नात्याने त्याने जखमी झालेल्या पोलिसांची भेट घ्यायला, त्यांच्या नातेवाईकांना दिलासा द्यायला हरकत नव्हती. पण त्याचा मूळचा पिंड हा संवेदनशील आंदोलक असा नाही तर जंतर मंतरवर जसे यश मिळाले त्याच पद्धतीने आता देशातील विविध भागात गोंधळ माजवून आपण सगळीकडे दहशत निर्माण करू शकू, सरकारला गुडघ्यावर आणू शकू असा त्याला गर्व त्याला झाला आहे.
अर्थात, हे मोदी शहा यांना ठाऊक नसेल असे अजिबात नाही. असे अनेक राजकारणी आज देशाच्या राजकारणात सरपटताना दिसत आहेत. उडणाऱ्या पतंगाची दोरी कुठे कापायची, कधी कापायची, हे त्यांना पक्के ठाऊक आहे. एकदा दोरी कापली की, पतंग तारेत अडकतो, किंवा झाडाला लटकतो, तो कायमचा. त्याला सोडविण्याचा प्रयत्न फारसे कुणी करत नाही, हेच वास्तव आहे.







