देशभरात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा सोहळा अनेक ठिकाणी आयोजित केला जातो. शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय… सज्जनशक्तीचा दुर्जनशक्तीवर विजय… असा या रावण दहनामागचा भाव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून रावण दहनाच्या या प्रथेला काही जनजातीय संघटना व बांधवांकडून विरोध केला जात आहे.
रावण दहनाच्या प्रथेचा इतिहास…
रावण दहनाच्या परंपरेच्या उत्पत्तीची निश्चित तारीख नसली तरी, ती प्राचीन काळापासून चालत आली असे मानले जाते. रामायणानुसार, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी लंकेचा राजा रावणाचा वध केला तेव्हा लोकांनी या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रावणाचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली. ही आख्यायिका मानवी इतिहासातील प्राचीन काळातील त्रेता युगातील आहे. आधुनिक काळात १९२० साली … त्यावेळच्या अखंड भारतात आणि आजच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये असलेल्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा येथे रावण दहनाच्या कार्यक्रमाची बातमी फोटोसकट उपलब्ध आहे.
त्यानंतर रांचीमध्ये रावण दहन समारंभ १९४८ मध्ये सुरू झाला. आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनानंतर पश्चिम पाकिस्तानमधील वायव्य सीमेवरील बन्नू या जनजातीय भागातून शरणार्थी म्हणून रांचीमध्ये आलेल्या १० ते १२ हिंदू कुटुंबांनी त्यांचा सर्वात मोठा सण, दसरा, रावण दहन समारंभाने साजरा केला. रावण दहनाच्या दिवशी संध्याकाळी तीनशे चारशे लोकांनी पंजाबी आणि जनजातीय ढोल-ताशांच्या तालावर रावणाचे दहन केले.
याचा अर्थ अखंड भारताच्या वायव्य प्रांतात रावण दहनाची प्रथा १९ व्या शतकापासून अस्तित्वात असली पाहिजे. रांचीसह पंजाबमधील सर्व शहरांमध्ये रावणाचा मुखवटा गाढवाचा असायचा, परंतु १९५३ नंतर रावणाच्या पुतळ्याचा मुख्य मुखवटा मानवी चेहऱ्याचा बनवला जाऊ लागला, असा उल्लेख आढळतो. रांची नंतर सबंध देशात हळूहळू रावण दहनाची प्रथा सुरू झाली असे सांगितले जाते.
दिल्लीला १७ ऑक्टोबर१९५३ साली सर्वप्रथम रामलीला मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशी नोंद आढळते. नागपूरमध्ये मात्र १८३८ सालापासून तथाकथित “सवर्ण समाजा”कडून रावण दहन होत असल्याचे गोंड समाजाकडून सांगितले जाते. तर राजस्थानातील रेनवाल येथे साधारण इसवी सन १८६९ पासून रावण दहनाची प्रथा सुरू असल्याचे निदर्शनास येते. वरील सर्व तथ्ये ध्यानात घेतली तर आपल्या देशामध्ये रावण दहनाची परंपरा किमान दोन शतके तरी जुनी असल्याचे मान्य करावे लागेल.
राजा रावण
मात्र काही जनजातीय बांधवांमध्ये रावणाला आपला पूर्वज मानला जातो. रावणाला वनवासी संस्कृतीचा नायक म्हणत ‘राजा’ मानलं जातं. रावण हा आदिवासी जननायक असल्याचे संदर्भ अनेक ग्रंथात सापडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रावण दहन निषिद्ध किंवा अपमानास्पद मानले जाते. उदाहरणार्थ, गोंड जनजाती रावणाला “राजा रावण” मानतात.
मध्य प्रदेशातील मंदसौरजवळ रावणाचं मंदिर असून तेथील शिंपी समाज बांधवही रावणाची पूजा करतात. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट भागात कोरकू जनजातीचे बांधव रावण आणि मेघनादाची पूजा करतात. त्यांच्या लोकगीतांमध्ये रावणाच्या पराक्रमाचा उल्लेख केला जातो.
काही वेळा वनवासी संघटनांचा रावण दहनाला इतका तीव्र विरोध होतो की, रावण दहनाचे कार्यक्रम कायमस्वरूपी बंद व्हावेत अशी मागणी केली जाते. तसेच ते कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी देखील केली जाते. महाराष्ट्राच्या आदिवासी बचाव अभियान आणि सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येतात सटाणा पोलीस निरीक्षकांना तसे निवेदन दिले आहे.
हे ही वाचा:
चिराग पासवान यांनी प्रशांत किशोर यांची केली केजरीवाल यांच्याशी तुलना
उत्तराखंड ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक दोषी
पंतप्रधान मोदी संघ शताब्दी समारंभात होणार सहभागी!
खान नगर पूजामंडपात ‘ऑपरेशन सिंदूर’ आधारित दुर्गापूजा; भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन!
काही ठिकाणी वनवासी संघटनांच्या तीव्र विरोधामुळे… कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रावण दहनाचे कार्यक्रम रद्द करावे लागतात. २०१८ साली पालघर जिल्ह्यात रावण दहनाला काही वनवासी संघटनांनी इतका तीव्र विरोध केला की, प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे आयोजकांना रावण दहनाचे कार्यक्रम रद्द करावे लागले.
१९६० च्या दशकात तामिळ नेते रामस्वामी नायकर पेरियार यांनी “द रामायण : अ ट्रू रीडिंग” हे पुस्तक लिहून राम हा उत्तरेतील आर्यांचा आणि रावण हा दक्षिणेतील दक्षिणेतील द्रविड संस्कृतीचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यानंतर बराच काळ तामिळनाडूत ठिकठिकाणी ” रावण लीला” आयोजीत करून त्यात रामाचे पुतळे जाळण्यात येत असत. आजमितीस तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरं आहेत.
आपल्या काही जनजातीय बांधवांप्रमाणेच मध्यप्रदेश मधील महाकाल सेना आणि अखिल भारतीय युवा ब्राह्मण समाज यांनी देखील रावण दहनच्या परंपरेला विरोध करत या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रावण एक महाविद्वान, शिव भक्त अनेक ग्रंथांचे रचनाकार आणि त्रिकालदर्शी होते तसेच इतिहासात किंवा रामायणात रावण दहनाचा उल्लेख नाही. त्यामुळे ब्राह्मण असलेल्या रावणाचे दहन हा ब्राह्मण समाजाचा अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, काही वनवासी नेते रावणाला वनवासी मानत नाहीत. गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या प्रवक्त्यांनी वनवासी संघटनेच्या दाव्याचे खंडन केले असून म्हटले आहे की, रावण नावाचा कोणताही व्यक्ती कधीही वनवासी समुदायाचा राजा किंवा देव नव्हता. ते म्हणतात की, काही लोक वनवासी मतपेढी मिळविण्यासाठी गोंधळ पसरवत आहेत; रावण आणि रावन यांच्यात लोकांमध्ये गैरसमज आहे. रावण हा रामायणातील एक पात्र आहे, तर रावन हा गोंडी व्यवस्थेचा एक भाग आहे. या गैरसमजामुळे, वनवासी गोंड समुदायाचे लोक अनेकदा रावणाला आपला असल्याचा दावा करतात. (अर्थात तो चुकीचा आहे).
वनवासी समाजातील काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गोंडी भाषेत “रावेन” असा शब्द असून त्याच्याशी रामायण कालीन रावणाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनावरून पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकता परिषदेकडून आदिवासी राजा रावण यांच्या दहनाला विरोध दर्शवत रावण पुजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आदिवासी एकता मित्र मंडळाने पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज रामाला दैवत मानत असून काही आदिवासी संघटना आदिवासींची दिशाभूल करीत असल्याचे सांगत रावण पुजेला विरोध करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे.
मात्र ज्या पालघर जिल्ह्यातून “विष्णू सावरा” हे वनवासी समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ निवडून गेले होते. त्या पालघर जिल्ह्यातील वनवासी समाज हा रावणाशी नाते सांगणारा कसा होऊ शकेल? असा प्रश्न पडतो. अनेक जनजातिय बांधवांची गीतं व लोककथांमध्ये रामाचा गौरवच केलेला आढळतो. पण तुम्ही कदाचित रामासाठी इतका वेडापणा पाहिला नसेल. हे आहेत मध्य प्रदेश व छत्तीसगड मधील रामनामी वनवासी बांधव. संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवलेले… रामनामी पोशाख घातलेले आणि डोक्यावर रामाचे नाव असलेला मुकुट असलेले हे रामनामी वनवासी बांधव. २ वर्षांपूर्वी ते रामलल्लाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अयोध्येत पोहोचले होते. ते राम नवमीपर्यंत भजन-कीर्तनाचे कार्यक्रम करत अयोध्येत राहिले होते.
वरील सर्व तथ्ये लक्षात घेतली तर… विविधतेने नटलेल्या या भारत वर्षात अनेक मतमतांतरे असू शकतात. मात्र रावण दहन हा दुष्ट प्रवृत्तीवर सुष्ट प्रवृत्तीने, असुरावर सुराने, दुर्जन शक्तीवर सज्जनशक्तीने मिळवलेल्या निर्णायक विजयाचा आनंदोत्सव आहे अशीच बहुसंख्य जनसामान्यांची भावना आहे. रावण दहनामागचा हा भाव एकदा ध्यानात घेतला आणि मान्य केला की, रावणाची जात पात, त्याचे ज्ञानी व त्रिकालदर्शी असणे हे सगळे दुय्यम ठरते.







