25 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरधर्म संस्कृतीमहाशिवरात्री पूजेचे महत्त्व; काय असतात विधी?

महाशिवरात्री पूजेचे महत्त्व; काय असतात विधी?

Google News Follow

Related

महाशिवरात्र म्हणजे काय?

ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत असते त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याच्या एक दिवस अगोदर कृष्ण चतुर्दशी या तिथीला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यातील शिवरात्र ही महाशिवरात्र असते. या दिवशी शिव परिवाराचे पूजन आणि अर्चन हे अत्यंत फल देणारे ठरते. कारण हा दिवस शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा महा पर्वकाळ आहे. ईशान संहितेनुसार हा दिवस शिवलिंगाच्या उत्पत्तीचाही दिवस मानला जातो. शिवपार्वती विवाह दिन म्हणून या दिवसाचे महत्त्व अत्यंत विशेष आहे.

या दिवशी शिवपूजन, बेल अर्पण, लघुरुद्र, महापूजा अभिषेक, महामृत्युंजय हवन आदी पूजन विधि योग्य पुरोहितांच्या द्वारे विधियुक्त केल्यास सर्व प्रकारच्या व्याधींचे निवारण होऊन शिवभक्तीचा लाभ भक्तांना घेता येतो.

२०२२ मध्ये दिनांक १ मार्च रोजी अर्थात मंगळवारी महाशिवरात्र पर्वकाळ आहे. हे व्रत माघ व चतुर्दशीला करतात. हे व्रत प्रतिवार्षिक म्हणून केले जाते. त्या दृष्टीने हे ‘नित्यव्रत’ आहे. तसेच मनात काही हेतू बाळगून त्याच्या पूर्तीसाठीही केले जाते व त्या दृष्टीने हे ‘काम्यव्रत’ आहे. प्रतिपदादी तिथीचे अग्नीआदी स्वामी आहेत. ज्या तिथीचा जो स्वामी असेल त्या तिथीस त्याचे पूजन करणे अधिक चांगले. चतुर्दशीचा स्वामी शिव होय. या दिवशीच्या रात्री हे व्रत करतात म्हणून याला ‘शिवरात्री व्रत’ म्हणतात ते योग्यच होय.

महाशिवरात्र का महत्त्वाची आहे?

प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्रच असते आणि शिवभक्‍त प्रत्येक वद्य चतुर्दशीला हे व्रत करतात. माघ व चतुर्दशी मध्यरात्री ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे त्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटले जाते आणि
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अस्पृश्य, स्त्री, पुरुष आणि बाल, तरुण, वृद्ध हे सारेही हे व्रत करू शकतात आणि बहुधा ते करतातही.

हे व्रत केल्याने पुण्य तर लागतेच परंतु सर्व प्रकारच्या पापांचा क्षय होतो राम, कृष्ण, वामन व नृसिंह यांचे जयंती दिवस, तसेच एकदशी हे सर्व दिवस उपवासाचे होत. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा दिवस उपवासाचा असून त्याच्या व्रतकालादिकाचा निर्णयही इतर उपवासाच्या दिवसांसारखाच आहे. तशात प्रदोष कालास व मध्यरात्रिसमयास लिहिले आहे की, माघ व चतुर्दशीला रात्रीच्या समयी भूत, प्रेत, पिशाच, शक्‍ती आणि स्वत: शिव भ्रमण करीत असतात. अतएव, अशा वेळी त्यांचे पूजन केल्याने मनुष्य पापमुक्‍त होतो.

शिवभक्तांनी पूजना पूर्वी काय करावे?

हे व्रत करणाऱ्याने माघ व चतुर्दशीच्या दिवशी सकाळी संध्यादी विधी पार पाडून मस्तकी भस्माचा त्रिपुंड्र तिलक धारण करावा, गळ्यात रुद्राक्षाची माला धारण करावी.

असे करावे महाशिवरात्रीला शिवलिंग पूजन

संपूर्ण दिवस मौन पाळून शिवचिंतनात घालवावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे, शिवालयात जाऊन सोयीप्रमाणे पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख होऊन बसावे आणि तिलक व रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन आचा मनातल्या मनामध्ये संकल्प अर्थात मानस संकल्प करावा. गंधपुष्प, बिल्वपत्र, धोतर्‍याची फूले, घृतमिश्रित गुग्गुळाचा धूपदीप, नैवेद्य आणि नीरांजनादी आवश्यक साहित्य घेऊन रात्रीच्या पहिल्या प्रहरी ‘पहिली पूजा’, दुसर्‍या प्रहरी ‘दुसरी पूजा’ याप्रमाणे चार पूजाविधी पंचोपचार, षोडशोपचार अथवा राजोपचार जसे शक्य होतील तसे परंतु सर्व एकाच पद्धतीने पार पाडावे आणि त्याचबरोबर रुद्राचा पाठ म्हणावा. असे केल्याने एकाच वेळी पाठ, पूजा, जागरण, आणि उपवास या चारही गोष्टी साधतात. पूजेनंतर नीरांजन, मंत्रपुष्पांजली, अर्घ्यप्रदान आणि प्रदक्षिणा करावी. जर आपल्याला कोणताही मंत्र येत नसेल तर काही हरकत नाही सांबा सदाशिवाचा सर्वश्रेष्ठ आणि सिद्ध मंत्र आपण ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्राचा यथाशक्ती जप निश्चित करावा. या सिद्ध मंत्र प्रमाणेच श्रीमत् शंकराचार्य यांनी लिहिलेले शिवपंचाक्षरस्तोत्र जरूर पठण करावे. (या लेखाच्या शेवटी शिवपंचाक्षरस्तोत्र संपूर्णपणे दिले आहे.)

शिवाची प्रार्थना करावी. स्कंद पुराणात सांगितले आहे की, माघ व चतुर्दशीला शिवाचे पूजन, जागरण आणि उपवास केल्याने मनुष्य मातेचे दुग्ध कधीही प्राशन करू शकत नाही, म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पुनर्जन्मापासून मुक्‍ती मिळते.

– महाजन गुरूजी

श्री शिवपंचाक्षरस्तोत्र

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे “न” काराय नमः शिवायः॥१।।
मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मे “म” काराय नमः शिवायः॥२।।
शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै “शि” काराय नमः शिवायः॥3।।
वषिष्ठ कुम्भोद्भव गौतमाय मुनींद्र देवार्चित शेखराय।
चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै “व” काराय नमः शिवायः॥४।।
यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै “य” काराय नमः शिवायः॥५।।
पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिव सन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥

॥ इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं श्रीशिवपञ्चाक्षरस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा