अमरावतीच्या परतवाडा येथे अयान अहमदने केलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडविली असताना आता कोल्हापूरमध्येही असाच प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याने मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हीडिओ शेअर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा १५ मुलींना त्याने धमकी दिली होती. त्यांना लॉजवर नेऊन त्यांचे अश्लिल व्हीडिओ त्याने व्हायरल केले. या प्रकरणात आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून आरोपीला अटक केली आहे. गावानेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात राहणाऱ्या शाहिद सनदे हा तरुण या व्हीडिओंच्या सहाय्याने तरुणींना ब्लॅकमेल करत असे. या प्रकरणात त्याचा साथीदार शाहरुख देसाई याचाही शोध सुरू आहे. या दोघांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
युवकांसाठी ‘महाचतुर एआय’चा शुभारंभ
नन्ह्या मित्रांसोबत फुटबॉलचा आनंद; गंगटोकमध्ये पंतप्रधान मोदींचा खास क्षण
एकसंध हिंदू समाज हीच सशक्त भारताची ओळख
तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब
या घटनेनंतर पुलाची शिरोली गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून गाव बंद ठेवून संबंधित तरुणाच्या कुटुंबावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरोली गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा काढू दिला नाही, कारण त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यात आली नव्हती. पण याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. शिरोली ग्रामपंचायत बाहेर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी व महिला सदस्यांनी जोरदार निदर्शने करण्यात आली आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील झाली. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आंदोलकांना नोटीसी बजावली आहे.
भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात शाहिद सनदे याच्या वडिलांनी माफी मागितली असून त्यांनी एका व्हीडिओद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. ते या व्हीडिओत म्हणतात की, मी माता भगिनींची माफी मागतो. आमचे संदे कुटुंबीय मुलाला पाठिंबा देणार नाही. पोलिस प्रशासनाने कशाचाही विचार न करता त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे. आमचा याला विरोध नाही. मी शिरोली गावातील हिंदू भाऊ बहिणींची माफी मागतो. पीडित तरुणींचीही माफी मागतो. आम्ही सर्वप्रकारची मदत करू. आम्ही संदे परिवार आमच्या मुलाच्या या कृत्याचे अजिबात समर्थन करत नाही.







