नवी दिल्ली येथे बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आणि या संघटनेने कशी अनेक आव्हानांचा सामना करत शतकमहोत्सवी वाटचाल केली त्याचा परामर्श घेतला. संघाचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, संघाने नेहमीच राष्ट्र प्रथम हा मार्ग स्वीकारला असून, अनेक आरोप-आघात सहन करूनही कटुता कधीच प्रकट केली नाही.
संघाची राष्ट्रनिर्मितीतली भूमिका
पंतप्रधान म्हणाले, “संघाने ब्रिटिशांच्या अत्याचारांविरुद्ध लढा दिला. संघाचा एकमेव हेतू नेहमीच राष्ट्रप्रेम हाच राहिला. स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यसैनिकांना आश्रय दिला, संघ नेत्यांनाही तुरुंगात जावे लागले. जात-धर्माचे भेद दूर करून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचे काम संघाने देशाच्या प्रत्येक दिशेला पोहोचून केले, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पीओकेमध्ये पाक सैन्याच्या गोळीबारात १० निदर्शकांचा मृत्यू
मोहसिन नक्वी नरमले, आशिया कप ट्रॉफी यूएई बोर्डाकडे सुपूर्द!
मेहकरमध्ये १.४३ कोटींचा गुटखा जप्त
लढाऊ विमानांसाठी एचएएलला जीई-४०४ जेट इंजिन
आव्हानांमध्येही संयम
महात्मा गांधींच्या हत्येनंतर घालण्यात आलेल्या बंदीसह अनेकवेळा संघावर खोटे खटले दाखल केले गेले, पण संघाने कटुता दाखवली नाही. तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना खोट्या प्रकरणात अटक झाली होती. मात्र सुटल्यानंतर त्यांनी शांतपणे सांगितले, कधी कधी जीभ दातांमध्ये अडकते, पण आपण दात तोडत नाही’.
आणीबाणीच्या काळातही स्वयंसेवकांनी लोकशाही आणि संविधानिक संस्थांवर ठेवलेल्या विश्वासाच्या बळावर संघर्षाचा सामना केला, असे मोदी म्हणाले.
संघाची पायाभरणी व विचार
मोदींनी सांगितले की विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेला संघ ही योगायोगाने नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे पुनरुत्थान होते. संघ म्हणजे देशभक्ती आणि सेवा. ‘एक भारत, महान भारत’ हाच संघाचा विश्वास आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर त्याला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले. तरीही संघाने राष्ट्रसेवेची अखंड वाट चालू ठेवली आहे.
शताब्दी उत्सव
या उत्सवाचे आयोजन केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने केले. रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत यांची उपस्थिती होती.







