29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरधर्म संस्कृती'अथर्वशीर्षा'तून गणपतीचे विश्वरूप

‘अथर्वशीर्षा’तून गणपतीचे विश्वरूप

Google News Follow

श्रीगणपती अथर्वशीर्ष हे गणक ऋषींनी रचलेले अथर्ववेदाशी संबंधित एक उपनिषद मानले जाते. ‘अथर्वशीर्ष’ या जोडशब्दात ‘अथर्व’ म्हणजे शांती आणि ‘शीर्ष’ अर्थात मस्तक. याचाच अर्थ ज्याच्या पठणामुळे मन, बुद्धी स्थिर राहून शांती लाभते. भारतीय परंपरेनुसार ज्या स्तोत्रांचे घरोघरी नियमित पठण होते. त्यात ‘अथर्वशीर्ष’ अग्रक्रमाने येते. मात्र, बहुतांशी पाठांतरीत. अधिक खोलात जाता वाटलं की, या मंत्र स्तोत्रांत असं काय विशेष आहे तर ते म्हणजे एरवी मूर्ती स्वरुप दिसणाऱ्या गणपतीला इथे परब्रह्म मानून त्याच्या स्तुतीसाठी हे रचलं व म्हटले जाते. गणपती ही केवळ पूजनीय देवता नसून त्याचे सर्वव्यापीरुप या स्तोत्राच्या प्रत्येक मंत्रातून स्पष्ट होते. “

ओम नमस्ते गणपतये | म्हणत अर्थात हे देवा तुला माझा नमस्कार अशी सुरुवात होते. पुढे “त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि” — तूच प्रत्यक्ष तत्त्व आहेस हे सांगत गणपती हाच एकमेव सृष्टीचा कर्ता किंवा निर्माता, पालक किंवा धर्ता आणि संहारक या अर्थी हर्ता हे पुढील श्लोकातून दिसते. त्वमेव केवलं कर्ताsसि | त्वमेव केवलं धर्ताsसि | त्वमेव केवलं हर्ताsसि |

पुराणे, तत्त्वज्ञानानुसार पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पाचांचा ‘पंचमहाभूतं’ असा उल्लेख होतो. हे स्तोत्र गणपतीची ओळख याच तत्वांशी जोडून देते. यासाठी या ओळी पाहा. “त्वं भूमिरापोsनलोsनिलो नभः |” यातून पंचमहाभूतं म्हणजेच गणपती अशी व्यापक कल्पना डोळ्यांसमोर येते. इथे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच तत्व ज्या क्रमाने आहेत तो क्रम महत्वाचा.

या पाच शब्दात खरे पाहता संपूर्ण विश्व सामावले आहे. (१) पृथ्वी — ज्यावर आपण उभे आहोत. (२) जल — जे जीवनासाठी अत्यावश्यक. (३) अग्नी — ऊर्जेचे व त्याबरोबर येणाऱ्या परिवर्तनाचे प्रतिक. (४) वायू — हे तर आयुष्यातील प्रत्येक श्वासाशी जोडलेले तत्व. (५) आकाश — म्हणजे सारे काही सामावून घेणारे. यावरुन अथर्वशीर्ष पंचमहाभूतांसह संपूर्ण विश्वव्यापी तत्व या रुपात मांडले आहे.

आता तूच ब्रह्म आहेस यासाठीचे विधान “त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |” मग हीच ओळख “त्वं साक्षादात्मासि नित्यमं |” तूच नित्य आत्मतत्त्व हे दाखवते. म्हणजे गणेशरुपाची व्याप्ती एका साकारुपापुरती मर्यादित न राहता तत्त्व, ब्रह्म आणि आत्मा या संकल्पनांशी येऊन पोचते. हा विश्वाचा संदर्भ “सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति | सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |” विधानातून समोर येताना तुझ्यामुळे उत्पन्न झालेले जग तुझ्यामुळे टिकतं. तुझ्यातच लय पावून पुन्हा तुझ्याकडेच येते हे निश्चित सांगते. सृष्टीचा हाच क्रम तैत्तिरीय उपनिषदातील या श्लोकातून दिसतो. आत्मन आकाशः संभूतः | आकाशाद्वायुः |वायोरग्निः |अग्नेरापः |अद्भ्यः पृथिवी| इथे मांडला आहे.

गणपती हा वाणीचे स्वरुप किंवा वाङ्मय, चैतन्यमय, आनंदमय, ब्रह्ममय आहे.एकमेवाद्वितीय असा सच्चिदानंद असणारा, प्रत्यक्ष ब्रह्म, ज्ञान, विज्ञानमय असणं हा सारा गणपतीचा महिमा गायत्रीछंदात रचलेल्या गणपती अथर्वशीर्षामुळे कळतो. हीच या ग्रंथरचनेला असलेली खोली, उंची देते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा