22 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरधर्म संस्कृतीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांत महिलांचे महत्त्वाचे योगदान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांत महिलांचे महत्त्वाचे योगदान

महिलांचा सहभाग संघाच्या कार्यपद्धतीला गती देतो, शाखा आणि अन्य कामांत सुसंगती साधतो.

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमध्ये समाजपरिवर्तनाचा प्रत्येक भाग महत्त्वाचा मानला जातो. त्यात स्त्रियांची भूमिकाही तितकीच आवश्यक आणि महत्त्वाची आहे. संघाची स्त्रीविषयक भूमिका त्याच्या कामातून आणि स्वयंसेवकांच्या वागणुकीतून स्पष्ट दिसते. समाजाच्या घडणीत महिलांच्या योगदानाकडे संघ नेहमीच सकारात्मक नजरेने पाहतो. संघाचा विचार सर्वसमावेशक आहे. शिक्षण, नोकरी, आरोग्य, आत्मसन्मान आणि सामाजिक कार्य या सगळ्या क्षेत्रांत महिलांना समान संधी मिळावी असा संघाचा ठाम विचार आहे.संघात महिलांना स्थान नाही; अशी टीका प्रामुख्याने हिंदुत्वाबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे केली जाते. काहींच्या मते संघ हिंदुत्वाचा पुरस्कार करतो म्हणजे तो अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी यांना पाठिंबा देतो. त्यामुळे संघविषयीच्या गैरसमजातून संघ स्त्रीविरोधी आहे असा प्रचार केला जातो. प्रत्यक्षात संघ या टीकांना फारसे उत्तर देत नाही. ज्यांनी संघाचे कार्य नीट पाहिले आणि अनुभवले आहे त्यांना संघाचा खरा आणि सकारात्मक दृष्टिकोन समजतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासात संघाने समाजातल्या सर्व घटकांसाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यक्तिनिर्माणातून एकात्म समाज उभारणी आणि त्या एकात्म समाजाच्या संघटन शक्तीच्या आधारावर राष्ट्राचे परमवैभव हे संघाचे मुख्य ध्येय आहे. त्याचा आधार सांस्कृतिक मूल्यांवर आहे. चारित्र्यसंपन्न समाजनिर्मिती आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे ही संघाची कार्यपद्धती आहे. या कार्यामुळे हिंदू समाज संघटित होऊन सर्वांगीण परिवर्तन साध्य करू शकतो, असा संघाचा ठाम विश्वास आहे. संघकार्य समाजाच्या सर्व स्तरांना सामावून घेणारे आहे. त्यामुळेच ते सतत वाढणारे आहे.
संघाच्या कार्यपद्धतीत शाखेला मध्यवर्ती स्थान आहे.
 

शाखेचे कार्यक्रम मुख्यतः शारीरिक स्वरूपाचे असल्यामुळे त्यात स्त्रिया सहभागी होत नाहीत. परंतु याचा अर्थ संघात स्त्रियांना स्थान नाही असा होत नाही. या उलट शाखेशी निगडित असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये स्त्रियांचा सक्रिय सहभाग असतो. संघ उत्सव, अभ्यासवर्ग, प्रबोधनवर्ग, कौटुंबिक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांत स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे असते. शाखेत प्रत्यक्ष न दिसणाऱ्या पण वेगळ्या भूमिकेतून संघकामाशी जोडलेल्या महिला संघाच्या वाढीतला अंगभूत घटक आहेत. स्त्रियांच्या शिक्षण, आरोग्य, आत्मसन्मान आणि सामाजिक कार्याशी निगडित मुद्यांवर संघाची भूमिका समाजहिताशी जोडलेली आहे. त्यामुळे केवळ शाखेच्या स्वरूपावरून संघ स्त्रियांचा विचार करत नाही असे ठरवणे अयोग्य आहे. स्त्रियांच्या सहभागाला पूरक असे वातावरण निर्माण करण्याचा संघाचा स्पष्ट प्रयत्न आहे.

हे ही वाचा:

मोहम्मद साहेबांच्या नावावर वाद पसरवणे चुकीचे

जीएसटी कपातीचा परिणाम!

१७ विद्यार्थ्यांशी विनयभंग करणाऱ्या बाबा चैतन्यनंद सरस्वतीला आग्रा येथून अटक!

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा: एनडीआरएफ सज्ज!

संघाचे जेष्ठ प्रचारक नानासाहेब ढोबळे यांनी ‘एक देशव्याप्त शक्ती वाहिनी’ या लेखात स्वयंसेवकांच्या कुटुंबातील स्त्रियांची भूमिका अधोरेखित केली आहे. संघकार्यकर्त्यांच्या मागे उभ्या राहून त्यांना बळ देण्याचे मोठे कार्य या ‘वाहिनी’ अर्थात स्त्रीशक्ती करत आहेत. घरातील जबाबदाऱ्या, संसार आणि कौटुंबिक अडचणी सांभाळूनही त्यांनी संघ कार्यासाठी स्वयंसेवकांना मुभा दिली आहे. त्यांच्यामुळे स्वयंसेवक समाजकार्याला वेळ आणि ऊर्जा देऊ शकले आहेत आणि भविष्यातही देणार आहेत.

वाहिनींची अर्थात स्त्री शक्तीची कार्यपद्धती ही केवळ घरापुरती मर्यादित नाही. अनेकदा त्यांनी संघशाखांशी संबंधित कार्यक्रम, कौटुंबिक मेळावे, प्रबोधनवर्ग, अभ्यासवर्ग यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची संयमशक्ती, त्याग आणि स्वयंसेवकांच्या मागे उभे राहून दिलेला मानसिक आधार हे संघाच्या कार्याला बळकटी देणारे ठरले आहे . त्यांचा त्याग आणि सहकार्यामुळे संघशक्ती अधिक मजबूत झाली आहे.

थोडक्यात सांगायचे तर वाहिनींची भूमिका ही ‘अदृश्य परंतु प्रभावी’ अशी आहे. त्यांनी घराघरांतून संघकार्याचा पाया मजबूत केला. स्वयंसेवकांचे चारित्र्य, समाजकारण तसेच राष्ट्रभक्तीची भावना टिकवून ठेवण्यासाठी वहिनींचा त्याग, समर्पण आणि प्रेरणा या मोलाच्या ठरल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध संघटना कार्यरत आहेत ज्यांना एकत्रितपणे संघसृष्टी म्हणून ओळखले जाते. या संघटनांमध्ये समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संस्था समाविष्ट आहेत. ज्या शिक्षण, सामाजिक सेवा, सांस्कृतिक उपक्रम आणि श्रम व उद्योग अशा विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. एकूण ३३ प्रमुख संघटना या संघसृष्टीचा भाग आहेत.

यापैकी काही संघटना विशेषतः महिलांसाठी कार्यरत आहेत ज्या महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित करतात. तर काही संघटनांमध्ये महिला व पुरुष दोघेही एकत्रितपणे कार्य करतात. या संघटनांच्या माध्यमातून संघाची कार्यपद्धती आणि आदर्श समाजाच्या प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचे उद्दीष्ट साधले जात आहे.

राष्ट्र सेविका समिती ही संघ परिवारातील एक महत्त्वाची संघटना आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग नाही तर स्वतंत्र संस्था आहे. ही समिती १९३६ साली मावशीबाई केळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेच्या उद्देशाने स्थापन केली. समिती स्थापन करताना डॉ. हेडगेवार यांनी मावशीबाई केळकर यांना सल्ला दिला की महिलांनी केवळ स्वयंसेवी म्हणून काम न करता समाजातील प्रत्येक स्तरावर सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच त्यांनी संस्कार, शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे मूल्य समाजात प्रसारित करावे असेही सांगितले. समितीला संघाचे आवश्यक तिथे मार्गदर्शन मिळते, पण तिची स्वतःची कार्यपद्धती, निर्णयप्रक्रिया आणि कार्यक्रम स्वतंत्रपणे चालतात.

आणीबाणीच्या काळात देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर घाला घातला जात असताना राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी धाडसाने कार्य केले. त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला, जेलमधील पुरुष कार्यकर्त्यांना मदत केली, भूमिगत प्रचारकांना आश्रय दिला, आवश्यक वस्तू व पत्रके पोहोचवली. समितीचे कार्य आणि शाखा प्रांतांमध्ये वाढल्या. अनेक सेविकांनी व्यक्तिगत जीवनाचा विचार न करता, महिलांना संघटित व सक्रिय करून समाजकार्य आणि राष्ट्रहितात योगदान दिले. त्यांचे धैर्य, शौर्य, देशभक्ती आणि निर्लोभी समर्पण समितीच्या कार्याचा पाया मजबूत करणारे ठरले, ज्यामुळे समितीचे कार्य देशभर पसरले आहे.

राष्ट्र सेविका समिती ग्रामीण आणि शहरी भागांत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. समिती महिला सक्षमीकरणावर भर देते, विद्यार्थिनींमध्ये अभ्यास आणि संस्कार यांचे बीजारोपण करते. आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती करते. गरजू महिलांना मदत पोहोचवते. समिती विविध शिबिरे, प्रशिक्षण वर्ग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्त्रियांना नेतृत्व व समाजसेवा यामध्ये सक्रिय बनवते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संघाच्या विविध संघटनांमध्ये महिला पूर्णकालिक प्रचारिका सक्रिय आहेत.

संघटनांनुसार पूर्णवेळ महिला कार्यकर्त्यांची संख्या पाहता अ. भा. वनवासी कल्याण आश्रमात २१० महिला पूर्णवेळ कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ५५ , विश्व हिंदू परिषदेत ४४ , राष्ट्र सेविका समितीत ४७ , रा. सेवा भारतीमध्ये ३०, दीनदयाल शोध संस्थानात २३, विद्याभारती अ. भा. शिक्षण संस्थानात १४, अ. भा. राष्ट्रीय शैक्षिक महासंघात ११, संस्कृत भारतीत ५ , सहकार भारतीत १, अखिल भारतीय मजदूर संघात २ आणि हिंदू जागरण मंचात १ महिला पूर्णवेळ कार्यरत आहे. एकूण या सर्व संस्थांमध्ये पूर्णवेळ महिला कार्यकर्त्यांची संख्या ४४३ इतकी आहे. या आकडेवारीतून स्पष्ट होते की संघाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.

महिलांचा सहभाग संघाच्या कार्यपद्धतीला गती देतो, शाखा आणि अन्य कामांत सुसंगती साधतो. समाजात नैतिकता, संस्कृती आणि सामाजिक सुधारणा या मूल्यांचा प्रसार करण्यास मदत करतो.

कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्यात महिलांचा सक्रिय सहभाग ठळकपणे दिसून आला. एकूण ६७,३७४ महिला कार्यकर्त्यानी भोजन पॅकेट्स, रेशन किट्स, मास्क, सॅनिटायझर, साबण, औषधे आणि सॅनिटरी नॅपकिन्स गरजू लोकांपर्यंत वितरित करण्यात मदत केली. त्याचबरोबर त्यांनी समुपदेशन(counseling), जागरण अभियान, हेल्पलाइन सेवा आणि ऑनलाइन/ऑफलाइन प्रशिक्षण उपक्रम चालवून समाजातील लोकांना आरोग्य, स्वच्छता आणि कोरोना प्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन केले. या महिला कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महामारीच्या कठीण काळात समाजातील दुर्बल घटकांना सुरक्षित ठेवण्यात आणि गरजू कुटुंबांना आवश्यक मदत पोहोचवण्यात यश आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघसृष्टीतील महिला कार्यकर्त्यांचे योगदान समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. संघाचे कार्य स्त्रियांशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. त्यांच्या संयम, त्याग आणि नेतृत्वामुळे संघाची कार्यशक्ती अधिक दृढ झाली आहे. महिला कार्यकर्त्यांचा सहभाग संघाच्या उद्दिष्टांना गती देतो, समाजातील नैतिकता, संस्कृती आणि सुधारणा यांचे मूल्य प्रसारित करतो तसेच राष्ट्रभक्तीची भावना टिकवून ठेवतो. त्यामुळे संघाची कार्यपद्धती केवळ पुरुषकेंद्रित नसून, स्त्रियांच्या योगदानामुळे अधिक समावेशक, सशक्त आणि परिणामकारक बनते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा