यूट्युबर ज्योती मलहोत्रा हिला अटक करण्यात आल्यानंतर देशभरात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जाळ्याचा उलगडा झाला. सुरक्षा यंत्रणांनी धडक कारवाई करत हे जाळे उद्ध्वस्त केले. अनेकांना अटक झाली. या कारवाईत पानिपत येथून नोमान इलाही या तरुणाला अटक केली. त्याच्या चौकशीत पाकिस्तानातील एक मोठे नाव समोर आले. हे नाव भारतीय सुरक्षा यंत्रणांना सुपरिचित होते. हे नाव होते इक्बाल काणा. नोमान इलाही थेट त्याच्या संपर्कात होता. त्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत होता. काणासोबत त्याचे वेगवेगळ्या एपवरचे चॅटही तपास यंत्रणांच्या हाती आले. पाकिस्तानमध्ये बसून भारताचे बनावट चलन छापणारे जे रॅकेट आहे, त्याच्या प्रमुख म्होरक्यांपैकी तो एक आहे. नोटबंदी नंतर जावेद खनानी या पाकिस्तानी तस्कराने आत्महत्या केली. बनावट चलनाच्या धंद्यातील हा शार्क होता. तो गेला तरी धंदा सुरू राहिला कारण तो प्यादा होता. गादी इक्बाल काणा चालवत होता. आदित्य धरच्या धुरंदर सिनेमात हा जावेद खनानी आपण पाहिला. इक्बाल काणाच्या कारवाया उघड झाल्या असल्या तरी त्याचा चेहरा अजून अंधारात आहे. तो अद्याप भारताच्या टप्प्यात आलेला नाही.
२०१३ मध्ये भारत नेपाळ सीमेवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एका बड्या दहशतवाद्याला अटक केली. त्याचे नाव अब्दुल करीम टुंडा. उत्तराखंड येथील बनवसा गावात त्याला अटक झाली असे सांगण्यात आले असले तरी आयबीने त्याला नेपाळमधून उचलले होते. हा खतरनाक होता. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तो वॉण्टेड होता. त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आणि काही कागदपत्रे सापडली. चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. त्यात बरीच माहिती बनावट चलनाच्या रॅकेटबाबत होती. इक्बाल काणाचे नाव याच संदर्भात समोर आले होते. हा इसम आयएसआय़चा अधिकारी असून तो बनावट चलनाचे रॅकेट चालवतो अशी माहिती टुंडाने दिली. त्यानंतर सुमारे १२ वर्षांनी नोमान इलाही याच्या तोंडून पुन्हा इक्बाल काणाचे नाव सुरक्षा यंत्रणांच्या कानावर पडले. ३२ वर्षे तो बनावट नोटांच्या धंद्यात आहे. काणाचे लक्ष उत्तर प्रदेशवर होते. भारताच्या सगळ्यात मोठ्या राज्यात त्याने भरपूर पैसा फेकून हेरांचे जाळे निर्माण केले होते. त्यांच्या माध्यमातून भारतातील लष्करी तळांची बित्तंबातमी तो काढत होता.
२०१३ मध्ये जेव्हा टुंडाला अटक झाली. तेव्हा देशात यूपीएचे सरकार होते. भारतात बनावट नोटांचा धंदा जोरात होता. नरेंद्र मोदी तोपर्यंत देशाचे पंतप्रधान झाले नव्हते. नोटबंदी झालेली नव्हती. बनावट चलन छापणारा जावेद खनानी पाकिस्तानात जिवंत होता. पाकिस्तानात बनावट नोटांचा धंदा माफीया दाऊद इब्राहीम, इक्बाल काणा, जावेद खनानी हे तिघे मिळून चालवत होते. दाऊदसाठी जावेद चिकना आणि आफताब बटकी या धंद्यात सक्रीय आहेत. दाऊदचा मुंबईतील प्रभाव कमी झाला असेल, परंतु तो संपलेला नाही. त्याचे भारतातील जाळे अजून मजबूत आहे. पोलीस असो वा सरकारी अधिकारी त्याच्या तुकड्यावर पोसलेले अधिकारी आजही आहेत. बनावट चलन, ड्रग्जच्या धंद्यातून आजही बक्कळ पैसा कमावतो. महिन्याभरापूर्वी नार्कोटीक्स कण्ट्रोल ब्युरोने गोव्यात दानिश चिकना या दाऊदच्या हस्तकाला अटक केली. तो डोंगरीमध्ये ड्रग्जची फॅक्ट्ररी चालवायचा. तो थेट दाऊदच्या संपर्कात होता. यावरून स्पष्ट आहे, दाऊदबाबत चर्चा कमी झाली असली तरी त्याच्या कारवाया संपलेल्या नाहीत. बॉलिवूडवरील त्याचा प्रभाव मात्र फिका पडतो आहे, अन्यथा आदित्य धर सारख्यांना उरी, धुरंधर सारखे सिनेमे काढण्याची हिंमतच झाली नसती. बॉलिवूडची खानावळ भारत-पाकिस्तानच्या प्रेमाचे चाटण भारतीयांना चाटवत राहीली असती.
काळ हा सगळ्यात शक्तीशाली असतो. जेव्हा काळ बदलतो, तेव्हा सगळं काही बदलते. भारत आणि पाकिस्तानातील सद्यस्थिती पाहीली तर ही बाब चटकन लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू असलेले बनावट चलनाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी २०१६ मध्ये नोटबंदी केली. त्यानंतर जावेद खनानी याने आत्महत्या केली. त्याचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. तो यातून सावरण्याची शक्यता शून्य होती. परंतु नोटबंदी आणि खनानी याच्या मृत्यूनंतर बनावट नोटांच्या धंद्याला चाप बसला खरा, परंतु तो धंदा बंद झालेला नाही. इक्बाल काणा हा त्याचा नवा चेहरा आहे. ड्रग्जच्या धंद्यातही त्याचा सहभाग आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या बर्बाद झालेला असतानाही त्याच्या भारतविरोधी कारवायांमध्ये अजिबात कमतरता आलेली नाही, त्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे ड्रग्ज आणि बनावट चलन. पाकिस्तानच्या आयएसआयला या दोन माध्यमातून प्रचंड पैसा मिळत असतो.
नोटबंदी केल्यानंतर २०१९ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात बनावट नोटांप्रकरणी देशभरात २६ गुन्हे दाखल झाले. पोलिसांच्या कारवाई पेक्षा बनावट चलनाला सगळ्यात मोठा धक्का दिला तो डीजिटल पेमेंटमुळे. भारताचे यूपीआय ही जगातील सर्वात मोठी डिजिल पेमेंट प्रणाली आहे, हे आयएमएफच्या ताज्या अहवालातूनच स्पष्ट झालेले आहे. जगातील ऑनलाईन पेमेंटपैकी ४९ टक्के वाटा एकट्या यूपीआयचा आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून १९ अब्ज व्यवहार झाले. याचे व्यवहार मूल्य २४.५८ ट्रिलियन रुपये इतके आहे. रोख रकमेच्या वापरावर याचा थेट परीणाम झालेला आहे. २०२१ मध्ये एकूण व्यवहारात रोख रकमेचा वापर ८१ ते ८६ टक्के होता. तो २०२३-२४ मध्ये ५२ ते ६० टक्क्यांपर्यंत खाली आला.
२००४ ते २०२४ या दोन दशकांचा विचार केल्यास नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत चलनात असलेल्या नोटांची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी झाले. १९९४ ते २००४ या काळात आधीच्या दशकाच्या तुलनेत नोटांचा वापर १७.५ टक्के वाढला. २००४ ते २०१४ या काळात १६.५ टक्के वाढला. परंतु मोदींच्या सत्ता काळात २०१४ ते २०२४ या काळात ही वाढ साधारण ९.५ टक्के आहे. म्हणजे आधीच्या तुलनेत निम्मी.
बनावट चलनाचे प्रस्थ डीजिटल पेमेंटमुळे कमी झाले आहे, ही बाब निर्विवाद आहे. परंतु हे षडयंत्र पूर्ण उद्ध्वस्त झालेले नाही. हजार आणि दोन हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता ५०० च्या सर्वाधिक बनावट नोटा पाकिस्तानात छापल्या जात आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पाचशेच्या २,१७,३९६ नोटा पकडल्या गेल्या. हा आकडा फार मोठा नाही. पूर्वीच्या तुलनेत फुटकळ म्हणावा असा आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट करणारा आहे की पाकिस्तानमध्ये अजूनही भारतीय चलन छापले जात आहे. दाऊद इब्राहीम, इक्बाल काणा ही जोडगोळी हा धंदा चालवते आहे. याच धंद्यातून दहशतवाद पोसण्यासाठी आयएसआय़ला रसद मिळते आहे. मोदींच्या जालीम उपायांमुळे याचे प्रमाण कमी झाले असले तरी संपलेले नाही. हे बंद करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे चलनातून पाचशेच्या नोटा काढून घेणे. न रहेगा बास, न बजेगी बासूरी.
डीजिटल पेमेंटचा आज असलेला टक्का वाढवणे हा त्यावर दूरगामी उपाय आहे. भारतातील जे अज्ञात धुरंधर पाकिस्तानच्या जमीनीवर, म्हणजे एकेकाळी अखंड असलेल्या आपल्याच भूभागावर कार्यरत आहेत. इक्बाल काणा आणि दाऊदचा पत्ताही त्यांना ठाऊक असेल. भारतातील गद्दारांनीच हे दाऊद आणि इक्बाल काणा जन्माला घातले. भारतातून तिथे गेलेले अज्ञात देशभक्त त्यांना कबरीत गाडतील.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







