नव विक्रम संवत्सराच्या दिवशी आदित्य धर यांच्या धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित होतो आहे. बऱ्याच काळाने असे घडते आहे की प्रेक्षक एखाद्या सिनेमाची इतकी आतुरतेने वाट पाहातायत. सिनेमागृहात दाखल होण्याच्या आधीच सिनेमा सुपर हिट झाला आहे. हेही पहिल्यांदा घडते आहे की, एक गट सिनेमाला लाखोली वाहतोय, हा सिनेमा समाजात द्वेष निर्माण करतो आहे, इस्लामोफोबिया पसरवतो आहे, हा सिनेमा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रपोगंडा आहे. सिनेमा रंजक असेलच, परंतु देशातील पुरोगामी, लिब्रांडूच्या बुरख्या आड दडलेल्या हिरवट मानसिकतेची ही जळजळ त्याही पेक्षा जास्त मनोरंजक आहे.
गेल्या काही वर्षात भारतात दीड दोन तासांच्या सिनेमाचा ट्रेण्ड दिसत होता. पहिल्यांदा तो बाहुबलीने तोडला. धुरंधरने तर आजवरच्या सर्व सिनेमांवर कडी केलेली दिसते. पहिला भाग साडे तीन तासांचा, दुसरा भाग ३ तास ५० मिनिटांचा. पहिल्या भागातही प्रेक्षक खुर्चीला खिळून होते. दुसरा भाग पहिल्या पेक्षा जास्त थरारक असल्याची चर्चा आहे. पहिल्या भागात ज्याची सर्वाधिक चर्चा होती, तो अक्षय खन्ना अर्थात सिनेमातला शेर ए बलोच, रहेमान डकैत या सिनेमात फ्लॅशबॅक पुरता दिसणार आहे.
काँग्रेस आणि काँग्रेसच्या इको सिस्टीमची धुरंधरचा पहीला भाग प्रदर्शित झाल्यापासून जळजळ सुरू आहे. त्यांना या सिनेमाचे इतके वावडे का आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. या सिनेमामुळे भाजपाचा फायदा होणार असा त्यांचा दावा आहे. परंतु फक्त तेवढेच नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात देश कसा तुकड्या तुकड्याने विकला जात होता. पाकिस्तान कसा शिरजोर झाला होता. पाकिस्तानात बसलेले दहशतवादी, माफीया भारतातील काही गद्दारांच्या गळ्यात गळे घालून देशाला कसे पोखरत होते याचे विश्वरूप दर्शन या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळते. हे सत्य काँग्रेसवाल्यांना सहन होईल कसे?
हे ही वाचा:
‘पॅनिक’ होऊ नका, गॅस पुरवठा सुरळीत होणार
हॉर्मुझ संकटाचा मुंबईच्या घरांवर परिणाम; दक्षिण मुंबईत फ्लॅट्स होणार महाग
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २ द रिव्हेन्ज’ने प्रीमियर शोमधून कमावले ५२ कोटी
चक्रवर्तींच्या राजीनाम्यानंतर केकी मिस्त्री अंतरिम अध्यक्ष
जे काही या सिनेमात दाखवले आहे, त्याचा शोध आदित्य धर आणि त्यांच्या टीमने लावलाय असेही अजिबात नाही. आर.व्ही.एस.मणि यांच्या ‘हिंदू टेरर: इनसायडर अकाऊंट ऑफ मिनिस्टरी ऑफ होम अफेअर्स’ या पुस्तकात हे तपशीलात आले आहे. रॉच्या काऊंटर टेररीझम विभागाचे निवृत्त प्रमुख बी. रामन, आयबीचे माजी अधिकारी प्रभाकर अलोक यांचीही पुस्तके वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारी आहेत. निवृत्त गृहसचिव राम प्रधान यांनी तर एका मुलाखतीत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांवर ठपका ठेवला. दहशतवाद्यांचा एक हस्तक मुंबईत कार्यरत होता, अशी नोट त्यांनी पी.चिदंबरम यांना पाठवली होती. ज्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले.
म्हणजे यूपीए सरकार, तत्कालीन पतंप्रधान डॉ.मनमोहन सिंह, हल्ला झाला तेव्हा गृहमंत्री पदी असलेले शिवराज पाटील, त्यांच्या हकालपट्टीनंतर त्या पदावर आलेले पी. चिदंबरम यांच्या अपयशाची लक्तरे या पुस्तकांच्या, मुलाखतींच्या माध्यमातून आधीच वेशीवर टांगण्यात आली आहे. मग तेच या सिनेमातून दाखवले तर इतका हो हल्ला कशासाठी? त्याचे कारण सरळ सोपे आहे. पुस्तकांमध्ये आपण जे वाचतो ते सिनेमाच्या पडद्यावर दिसले की त्याचा त्याचा परिणाम शंभरपट वाढतो.
धुरंधरमध्ये फक्त सरकारचे अपयश ठसठशीतपणे पुढे येत नाही. त्या काळात पाकिस्तान जे शिजत होते, त्यात भारतातील मीर जाफर आणि जयचंदांचा सहभाग कसा होता, हेही या सिनेमातून दाखवण्यात आले आहे. मग त्यात यूपीए सरकारमध्ये सामील असलेले नेते असोत वा अतीक अहमद याच्यासारखा माफिया राजकारणी.
सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यात सगळ्यात जास्त महत्वाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांची आहे. हा माणूस सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट टाकतो, त्या अनेकदा प्रचंड वादग्रस्त अशा प्रकारच्या असतात. परंतु सिनेमाच्या तंत्रावर पकड असलेले सध्याच्या काळातील जे काही मोजके लोक आहेत, त्यात राम गोपाल वर्मा यांचा क्रमांक खूप वरचा आहे. त्यामुळे तो जे काही म्हणाला ते महत्वाचे आहे. ‘धुरंधर २’ हा सिनेमा ‘शोले’ या ऑल टाईम ग्रेट सिनेमाच्या शंभर पट परिणामकारक असून ‘मुघल ए आजम’ तर या सिनेमासमोर एखाद्या टीव्ही सिरियल सारखा वाटू लागतो. यात किंचित अतिशयोक्ती आहे, असे मानले तरी किती मोठे कौतूक राम गोपाल याने केले आहे हे लक्षात घ्या. बरं राम गोपाल वर्मा हा कौतूक वाटणारा माणूस नाही. प्रत्येक दुसऱ्या सिनेमाबाबत तो स्तुतीसुमने उधळतो असे नाही.
सिनेमाचा पहिला भाग रिलिज झाल्यानंतर अरफा खानम शेरवानी, ध्रुव राठी, रवीश कुमार या काँग्रेसी इकोसिस्टीम सह पवन खेरा, सुप्रिया श्रीनेत आदी काँग्रेसची अधिकृत गॅंग तुटून पडली होती. अर्थात त्याचा सिनेमाच्या लोकप्रियतेवर काही परीणाम झाला नाही. उलट या मंडळींनी ओकाऱ्या काढल्यानंतर जनतेला खात्री झाली, की सिनेमा नंबर वन असणार.
हा मोदींचा प्रपोगंडा आहे का, या प्रश्नावर मात्र चर्चा झाली पाहिजे. मोदींनी गेल्या दहा वर्षात जे काही केले ते सांगावे लागत नाही. डोळे उघडे ठेवणाऱ्या प्रत्येकाला ते दिसू शकते. मेट्रो, वंदेभारत, रस्ते, पूल, शस्त्रास्त्र निर्मिती, स्टार्ट अप्सचा वाढलेला पसारा, सरकारी कंपन्यांचा वाढलेला तजेला, बुडीत गेलेल्या बँकांचा वाढता नफा, रुळावर आलेली अर्थकारणाची गाडी असे बरेच काही. ज्यांना पाहायचे नाही, त्यांच्याबद्दल बोलून उपयोग नाही. नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी प्रचंड टीका केली. खरे तर त्याला आकांड तांडव म्हटले पाहिजे. नोटबंदीनंतर पाकिस्तानी तस्कर जावेद खनानी याने आत्महत्या केली. ती नोटबंदीमुळेच केली, असा पुरावा कोणालाही देता येणार नाही. परंतु बनावट नोटांच्या धंद्यातील पाकिस्तानमधील सर्वात प्रभावी माफीया काय बायकोच्या लफड्यांना कंटाळून आत्महत्या करणार की, डान्सबारमधील गर्ल्फ्रेंडने प्रेमभंग केला म्हणून आत्महत्या करणार? खनानीवर आत्महत्या करण्याची वेळ मोदीनीतीने आणली. मोदी देशाच्या सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तान भिकेला लागला ही गोष्ट कोण नाकारू शकेल? मोदी हे काही संन्याशी नाहीत. जे काही त्यांनी केले आहे, त्याचा ते जर प्रपोगंडा करत असतील त्यात चूक काय? हा प्रपोगंडा काँग्रेसच्या बुडाशी येणार म्हणून काँग्रेसवाल्यांचे चित्कार सुरू आहेत.
सिनेमातून आलेला प्रपोगंडा या देशाला नवा नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून जे सिनेमे आले ते आठवून पाहा. ‘देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल…’ हा प्रपोगंडा नाही तर दुसरे काय होते? देशासाठी रक्त सांडणारे, हजारो क्रांतिकारक आणि आझाद हिंद फौजेची स्थापना करून भारताच्या भूमीवर प्रथम स्वतंत्र भारताचा ध्वज फडकवणारे नेताजी सुभाषचंत्र बोस यांचा हा अपमान नव्हता? ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा…’ हा प्रपोगंडा नाही तर काय होते? आमीर खानचा ‘रंग दे बसंती’ हा प्रपोगंडा नव्हता? असे सिनेमे खोऱ्याने सांगता येतील, त्याचा एक स्वतंत्र विषय करावा लागेल.
काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टीमची समस्या अशी आहे की त्यांना सत्य सहन होत नाही. कारण सत्तेच्या काळात यांनी सतत सत्य लपवण्याचे काम केले. यांनीच लाखो हिंदूंची हत्याकांडे करणाऱ्या अकबराला, टिपूला मोठे केले. देशाच्या इतिहासावर उण्यापुऱ्या १५० वर्षांच्या मुघली इतिहासाची हिरवी पुटं चढवली. ज्या पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना काँग्रेसी पंतप्रधान मिठ्या मारत होते, त्यांना आज ठोकले जात आहे, त्यांना जीवाची शाश्वती राहिलेली नाही, मौलाना मसूद अजहर पासून हाफीज सईदपर्यंत सगळ्यांच्या कपाळात गेल्या आहेत. २०२० पासून अज्ञात ज्यांना ठोकतायत त्यांचा आकडा छोटामोठा नाही, दोन डझन इतका आहे. उत्तर प्रदेशात माफिया राज मोडून काढण्यात आले आहे. हे जे काही घडते आहे, ते लोकांना दिलासा देणारे आहे. बॉम्बस्फोट आणि घातपातामुळे भेदरलेला भारतीय या दहशतवादाच्या कर्त्या करवित्यांना कुत्र्याच्या मौतीने मरताना पाहून सुखावतो आहे. त्याला सूडाचे समाधान मिळते आहे. त्यामुळे पाकिस्तान खवळणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काँग्रेस खवळणार याबाबतही आश्चर्य मानण्याचे कारण नाहीत. कारण पाकिस्तान आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे.
हीच मंडळी इस्लामोफोबियाची ओरड करतायत. पाकिस्तानची लक्तरे काढली जात असताना त्याचा भारतातील मुस्लीमांना त्रास होण्याचे कारण नाही. काँग्रेसवाले मात्र तसाच दावा करतायत, ईदच्या आधी देशातील वातावरण खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसवाले करतायत. असा दावा आधीच करून ठेवला मग काही ठराविक पॉकेटमध्ये भावना दुखावल्याच्या नावाखाली इकोसिस्टीमवाले दंगा करायला मोकळी होतात. ‘धुरंधर’ सारख्या सिनेमातून पाकिस्तानचा बुरखा फाडल्यामुळे काँग्रेसला त्रास होतो आहे, हा विचित्र प्रकार जनता पाहते आहे. ज्यांनी १९९३ पासून या देशात दहशतवादाचा नंगा नाच पाहिला. कानठळ्या बसवणारे बॉम्बस्फोट पाहिले, अनुभवले, त्यांच्या अंगावर शहारा आणण्याऱ्या भयकथा ऐकल्या त्यांच्यासाठी ‘धुरंधर’सारखा सिनेमा शीतल चंदनासारखा आहे. काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टीमची मात्र आग आग होणार आहे. ही आदित्य धर यांची कमाल आहे.







