वंदेमातरम हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा महामंत्र बनला होता. शेकडो क्रांतिकारक वंदेमातरम् चा उद्घोष करत फासावर गेले. मुस्लीम कट्टरवाद्यांच्या नादी लागून जवाहरलाल नेहरु यांनी वंदे मातरम् खंडीत केले. सहापैकी दोनच कडवी वापरावी असा निर्णय काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात घेण्यात आला. ही ऐतिहासिक घोडचूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुधारली असून शासकीय कार्यक्रम आणि शिक्षणसंस्थांमध्ये वगळलेल्या चार कडव्यांसह संपूर्ण वंदेमातरम म्हणावे असा आदेश काढला. हा देश कट्टरवाद्यांच्या अजेंड्यावर चालणार नाही, यदी इस देश मे रहना होगा संपूर्ण वंदेमातरम कहना होगा, असा स्पष्ट संकेत मोदी सरकारने.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू आणि मुस्लीमांची एकजूट हे धोरण होते, देशाचे स्वातंत्र्य हे लक्ष्य होते. पुढे पुढे स्वातंत्र्य बाजूला पडले आणि हिंदू मुस्लीम एकजूट हेच लक्ष्य बनले. त्यामुळे १९३७ मध्ये आधी वंदेमातरम खंडीत झाले. त्यानंतर फक्त १० वर्षात देश खंडीत झाला.
पाकिस्तानचे निर्माते जिना यांना म्हटले जाते, वास्तविक ज्यांनी वंदेमातरम खंडीत केले, त्यांनी देशाच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू केली. १५ ऑक्टोबर १९३७ रोजी लखनऊमधून जिना यांनी वंदेमातरमच्या विरोधात बांग दिली. नेहरुंना ही मुस्लीम तुष्टीकरणाची सुवर्णसंधी वाटली. त्यांनी २० ऑक्टोबर १९३७ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहिले की वंदेमातरम मध्ये देवी दुर्गा आणि सरस्वती यांचे वर्णन असल्यामुळे हे गीत मुस्लीमांकडून स्वीकारले जाणार नाही. राष्ट्रगीत सर्वसमावेशक हवे, त्यामुळे त्यातील पहिली दोन कडवी ठेवली पाहिजेत. २६ ऑक्टोबर १९३७ मध्ये फैजपूर अधिवेशनात चार कडवी वगळण्याचा निर्णय झाला.
वंदेमातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संसदेत या संदर्भात झालेल्या चर्चेत नेहरुंची पापे बाहेर आली तेव्हा प्रियांका वाड्रा, सोनिया गांधी या काँग्रेस नेत्यांनी सारवासारव केली की हा निर्णय महात्मा गांधी, गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर, डॉ.राजेंद्र प्रसाद आणि मौलाना आझाद यांचा होता.
हे ही वाचा:
लंडनमध्ये “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत विद्यार्थ्याने चालवला चाकू
टी२० विश्वचषकात थराराचा कळस! दोन सुपर ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा ४ धावांनी विजय
सरकारी कार्यक्रमांमध्ये आता सहा कडव्यांचे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गावेच लागेल!
ISRO कडून भारताच्या पहिल्या अंतराळ स्थानकाच्या तयारीला वेग; ८० उपग्रहांवर काम सुरू
काँग्रेसमध्ये महत्वाचे निर्णय कसे घेतले जात असत, निर्णय प्रक्रियेत गांधी आणि नेहरु वगळता अन्य नेत्यांना किती महत्व होते हे काँग्रेस अध्यक्ष पदावर जेव्हा सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली तेव्हाच स्पष्ट झाले होते. १९४६ मध्ये १५ पैकी १२ प्रदेश काँग्रेस कमिट्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी एकमुखाने सरदार पटेलांचे नाव सुचवले असताना एकानेही नाव न घेतलेल्या जवाहरलाल नेहरुंना अध्यक्ष का बनवण्यात आले हा इतिहासही आता लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे.
लोकशाही प्रक्रिया गुंडाळून पटेलांच्या ऐवजी नेहरुंना अध्यक्षपदाच्या मुंडावळ्या बांधण्यात आल्या कारण १९४६ मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदी बसणारा नेता देशाचा पंतप्रधान होणार ही बाब निश्चित होती. काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रिया लोकशाही पद्धतीने कधीच होत नव्हती. त्यामुळे सगळ्यांचा वंदेमातरमचे विभाजन करण्यासाठी पाठिंबा होता, हा दावा लोकांच्या फार गळी उतरण्याची शक्यता नाही.
इस्लाममध्ये मूर्तिपूजा मान्य नाही पासून सुरू झालेला हा युक्तिवाद हिंदू आणि मुस्लीम ही दोन राष्ट्रे आहेत, हे दोन्ही समुदाय एकत्रितपणे नांदू शकत नाहीत इथपर्यंत गेला. देशाची फाळणी झाली. एक तुकडा मुस्लीमांच्या वाट्याला आला, एक हिंदूंच्या वाट्याला. त्यामुळे स्वतंत्र भारतात तरी संपूर्ण वंदेमातरम म्हणायला काही हरकत नव्हती. कारण वंदेमातरम मध्ये देवी दुर्गा, सरस्वती यांचे वर्णन गायला हिंदूंची हरकत असण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु स्वतंत्र भारतातही संपूर्ण वंदेमातरमचा स्वीकार झाला नाही. बहुसंख्यकांच्या आस्था, श्रद्धांना कवडीची किंमत देण्यात आली नाही. स्वतंत्र भारतात सुद्धा वंदेमातरम खंडीत राहिले. आजही अबू आजमी, असदुद्दीन ओवेसी सारखे लोक जिना यांचीच भाषा बोलताना दिसतात. आमच्या धर्माला हे मान्य नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. हा युक्तिवाद मुळात बोगस आहे, इंडोनेशिया या मुस्लीमबहुल देशाच्या चलनावर जर गणपतीचा फोटो चालू शकतो, तर भारतातील धर्मांतरीत मुस्लीमांचे पित्त दुर्गा आणि सरस्वतीच्या स्तवनाने उसळण्याचे काहीच कारण नाही.
एकदा मुस्लिमांना त्यांच्या श्रद्धांप्रमाणे त्यांच्या धार्मिक रिवाजांचे पालन करण्यासाठी त्यांची हक्काची भूमी दिल्यानंतर उर्वरीत भूभागावर काय आणि कसे करायचे हा विषय हिंदूंवर सोडला पाहिजे होता. ही भूमिका काँग्रेसला घेता आली नाही. कारण त्यांना मुस्लिमांची एकगठ्ठा मते हवी होती. हा देश आमची मातृभूमी आहे, त्या मातृभूमीचे स्तवन करण्याचा मंत्र म्हणजे वंदे मातरम. हे भूमी तूच दहा हातात शस्त्र घेतलेली देवी भगवती दुर्गा आहेस, कमळावर बसलेली सरस्वतीही तूच आहेस, ही किती पवित्र भावना आहे. जो देश तुम्हाला अन्न, पाणी, निवारा देतो त्या देशाला, त्या मातृभूमीला ईश्वराचे स्थान देणारे हे गीत आहे.
मोदी सरकारने काढलेल्या जीआरमध्ये प्रत्येक शासकीय कार्यक्रमात जन गण मन या राष्ट्रगीताच्या आधी हे संपूर्ण वंदेमातरम झाले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. शिक्षण संस्थांनाही हा नियम लागू आहे. त्यामुळे उर्दू शाळांनाही हा नियम लागू आहे. अबू आझमी यांच्यासारख्या टुच्च्या नेत्यांनाही आता आमच्या धर्मात हे मान्य नाही ही पळ वाट काढता येणार नाही.
स्वतंत्र भारतात काँग्रेसने कायम हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्याचे धोरण स्वीकारले. म्हणून काँग्रेसच्या काळात राम मंदीर कधी बनू शकले नाही, हिंदूंची धार्मिक स्थळे कायम उपेक्षित राहीली. मंदीरांच्या पैशाची मात्र सरकारच्या मनमर्जीनुसार उधळपट्टी होत राहिली. घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीत झाला. हिंदुस्थानात हिंदूंना किंमत राहणार नाही, याची पुरेपूर काळजी काँग्रेसचे नेते घेत होते. या देशावर असलेला हिंदू संस्कृतीचा शिक्का साफ पुसला जाऊन या देशाचे बाबरीकरण कसे होईल, हाच त्यांचा अजेंडा होता. हे चित्र नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात बदलले. हिंदूनी त्यांच्या भावनांची, श्रद्धांची कदर करणारा नेता या देशाला पाहायला मिळाला. वंदेमातरम बाबतचा जो निर्णय तो त्याच परंपरेतील निर्णय आहे. या देशाला मातृभूमी मानणाऱ्या, भगवती दूर्गेचे रुप मानणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा सन्मान कऱण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
काँग्रेस नेते या निर्णयाचा स्पष्ट किंवा आडून आडून विरोध करतील किंवा कपिल सिब्बल आणि अभिषेक मून सिंघवी यांच्या मार्फत कोर्टबाजी करून या निर्णयात मोडता घालतील. त्यांची तैनाती फौज असलेले इंडी आघाडीतील पक्षही यात सहभागी होतील. प्रश्न तो नाही. या देशातील मुस्लीम समाज, ज्यापैकी बहुतेकांचे पूर्वज कधी काळी हिंदू होते, तो मुस्लीम समाज या निर्णयाकडे कसा पाहातो हे महत्वाचे आहे. या देशातील हिंदू इतका सहिष्णू आहे की अनेक हिंदी सिनेमे असे आहेत, ज्यात नायक हिंदू, नायिका हिंदू, दोघेही गातायत याल्ला याल्ला दिल ले गया किंवा दिल ले गई, हे पाहणारा ऐकणारा हिंदू प्रेक्षक अशी गाणी सुपर हिट करतो, पडद्यावर हे गीत गाणाऱ्यांना सिनेमागृहातील प्रेक्षकांनाही अल्लाचे नाव ऐकल्यामुळे किंवा घेतल्यामुळे आपला धर्म बुडाला असे वाटत नाही. या गीताचे गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन, गायक मन्ना डे आणि लता मंगेशकर, सिनेमाचे नाव उजाला, ज्यांच्यावर हे गाणे चित्रित केले आहे, ते नायक नायिका शम्मी कपूर आणि माला सिन्हा, असे अनेक सिनेमे आहेत, ज्यात माशाअल्ला, इन्शाअल्ला, आमीन असे संवाद हिंदूंच्या तोंडी दाखवले आहेत. मुझे प्यार हुवा, प्यार हुवा अल्लामिया हे अगदी ताजे उदाहरण. जर यामुळे हिंदूंचा धर्म बुडत नसेल, तर मग मुस्लिमांचा धर्म दुर्गा किंवा सरस्वतीचे स्मरण करू कसा काय बुडू शकतो. आमची पूजा पद्धती बदलली असली तरी आमची संस्कृती आमचे पूर्वज हिंदू होते या मानसिकतेतून इंडोनेशियासारखा मुस्लीम देश त्यांच्या चलनावर गणपतीचे चित्र आहे. त्यांच्या विमानसेवेचे नाव गरुडा आहे. तिथे मुस्लीम हे करू शकतात तर भारतीय मुस्लीमांना वंदेमातरमचा स्वीकार आणि गौरव का करू नये.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







