24 C
Mumbai
Friday, January 2, 2026
घरसंपादकीयईव्ही, सोलार पॅनल, डेटा सेंटरमुळे तांब्याला सोन्याची चमक

ईव्ही, सोलार पॅनल, डेटा सेंटरमुळे तांब्याला सोन्याची चमक

Google News Follow

Related

अर्थकारणात एआय, डेटा सेंटर, इव्ही, सोलार हे परवलीचे शब्द झाल्यानंतर जगाच्या बाजारपेठेत तांब्याला सोन्याची चमक आलेली आहे. हिंदुस्तान कॉपर ही देशातील तांब्याच्या खनिजाचे उत्खनन करणारी एकमेव सरकारी कंपनी. डेटा सेंटर, इव्हीमुळे येत्या काळात तांब्याची गरज प्रचंड वाढणार आहे. वायझाग येथे गुगलचे डेटा सेंटर उभारण्यात येते आहे. केवळ या डेटा सेंटरसाठी ६५ हजार टन तांब्याची गरज लागणार आहे. जगभरात तांबे कडाडते आहे. येत्या काळात तरी तांब्याला कोणताही पर्याय दिसत नाही. २०२५ मध्ये हिंदुस्तान कॉपर या सरकारी कंपनीचा शेअर १८४ रुपयावरून ५२२ पर्यंत गेला आहे.

भारताचा डेटा भारतातच असला पाहीजे हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे गुगल, मायक्रोसॉफ्ट, एमेझॉन अशा सगळ्या बड्या कंपन्या भारतात डेटा सेंटर उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करतायत. ही गरज सतत वाढत जाणार. डेटा सेंटरला चोवीस तास वीज लागते. वातानुकूलन लागते, त्यामुळे डेटा सेंटरच्या उभारणीसाठी प्रचंड प्रमाणात तांबे लागते. सोलार पॅनल, इव्ही, डेटा सेंटर हे सगळेच गेल्या दहा वर्षात वाढलेले आहे. हे फक्त भारतात नाही तर जगभरात होते आहे. विकसित देशांत वीजेचा खप वाढतो तशी तांब्याची गरजही वाढते आहे. अलिकडेच चीनने घोषणा केली की त्यांच्या पावरग्रीडचे आधुनिकीकरण करण्यात येईल. चीनसारख्या अवाढव्य देशातील पावरग्रीडचा विषय असल्यामुळे मुळातच तांब्याचा प्रचंड वापर असलेल्या चीनमध्ये तांब्याचा खप किती वाढणार आहे, हे लक्षात घ्या. देशातील प्रत्येक बडी कार निर्माण करणारी कंपनी इव्ही कारची निर्मिती करते आहे. सोलार क्षेत्रात अनेक कंपन्या काम करतायत. डेटा सेंटरच्या क्षेत्रात आपणही मोठी आघाडी घेत आहोत. एप्रिल २०२५ पर्यंत देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता सात प्रमुख शहरांमध्ये १२६३ मेगावॅट क्षमतेची डेटा सेंटर कार्यरत होती. २०३० पर्यंत हे प्रमाण तिपटीपेक्षा जास्त म्हणजे ४५०० मेगावॅट होण्याची शक्यता आहे. जर डेटा सेंटरची क्षमता तिप्पट होणार असेल तर तांब्याचा वापर वाढणार हे उघड आहे.

सध्या डेटा सेंटरसाठी वापरली जाणारी जागा १५.९ दशलक्ष चौ.फू. इतकी आहे. त्यावरून डेटा सेंटरचा पसारा किती वाढला आहे, याची कल्पना येऊ शकते. येत्या काळात हे अनेक पटीने वाढणार आहे. कोलिअर्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. एक मेगावॅट क्षमतेच्या डेटा सेंटरसाठी साधारण २५ टन तांबे लागते. एक गिगावॅट क्षमतेच्या डेटा सेंटरसाठी २५००० टन तांबे लागते. एका इलेक्ट्रीक एसयूव्हीसाठी ९० ते १२० किलो तांबे लागते. एक मेगावॅट सोलार पॅनलसाठी ४ ते ५ मेट्रीक टन तांबे लागते. यावरून तांब्याची गरज किती वाढते आहे, हे लक्षात येऊ शकेल.

इव्ही कारची आता कुठे आपल्याकडे सुरूवात झालेली आहे. सध्या आपल्याकडे जेवढ्या इव्ही कार आहेत, त्याच्या किती तरी पट असेल. बिझनेस स्टॅंडर्डमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार २०३० पर्यंत भारतात सर्वप्रकारच्या इलेक्ट्रीक व्हेहीकलची संख्या २८ दशलक्ष होईल. सध्या ती केवळ ७ दशलक्ष आहे. भारतात तांब्याचा खप वाढतो आहे. परंतु तुलनेने उत्पादन कमी आहे. आपण आयातीवर अवलंबून आहोत. आपल्याकडे खाणींबाबत अत्यंत कठोर असे पर्यावरण नियम असल्यामुळेही आपल्या उत्पादनावर परीणाम होतो आहे. जगात तांब्याच्या खाणीतून जेवढे खनिज निघते, त्यातुलने फक्त २ टक्के तांबे भारताच्या खाणीत मिळते. भविष्यातही हे वाढेल, परंतु ते आपल्या गरजेच्या तुलनेत फुटकळच असेल. हिंदुस्तान कॉपर ही भारतात तांब्याच्या खनिजाचे उत्खनन करणारी एकमेव सरकारी कंपनी. मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थानमध्ये ही कंपनी तांब्याच्या खनिजाचे उत्खनन करते आहे. मध्यप्रदेशातील मलंजखंड, राजस्थानातील खेत्री तसेच झारखंड येथील खाणींवर २०३० पर्यंत सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च कऱण्यात येणार आहे. कंपनीची संध्याची क्षमता दरसाल ४ दशलक्ष खनिज काढण्याची आहे. २०३० पर्यंत ती १२ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष कंपनीने ठेवले आहे.
देशात तांब्याच्या खाणी मर्यादीत आहेत. त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. विदेशातील काही खाणी ताब्यात घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोल इंडीया, एनटीपीसी या सरकारी कंपन्यांच्या सोबत हिंदुस्तान कॉपर संयुक्तपणे प्रयत्न करते आहे. तांब्याच्या खनिजासह, रेअर अर्थ मिनरल्स, प्लॅटीनम सगळी महत्वाची खनिजे ताब्यात घेण्याचे प्रय़त्न सुरू आहेत.

चिली हा जगातील तांब्याच्या सर्वाधिक खाणी आणि सर्वाधित तांबे निर्माण करणारा देश. चिलीच्या कोडेल्को या कंपनीसोबत हिंदुस्तान कॉपरने करार केलेला आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरीट फॉण्ट एप्रिल २०२५ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी तांब्याच्या उत्खनानाबाबत दोन्ही देशांमध्ये महत्वपूर्ण करार झाले.
जगात तांब्याची मागणी प्रचंड वाढलेली असताना दुसऱ्या बाजूला चिली, इंडोनेशिया येथील दोन मोठ्या खाणींचे काम ठप्प झाले आहे. कांगोतील सगळ्यात मोठ्या डीसीआर खाणीत पूराचे पाणी शिरल्यामुळे ही खाणही सध्या बंद आहेत. या जगातील तीन मोठ्या खाणी आहेत. तिथे समस्या आल्यामुळे तांब्याच्या उत्खननावर परीणाम झालेला आहे. तांब्याची उलब्धता कमी झाली आहे. भारताने तांब्याचा अजून तरी क्रिटिकल मिनरलच्या यादीत समावेश केलेला नसला तरी भविष्यात हीच परिस्थिती असेल असे दिसत नाही.

जगाच्या अर्थकारणाचा पॅटर्न बदलत असल्यामुळे काही गोष्टींचे महत्व वाढते आहे. काही गोष्टींचे घटते आहे. जगाचा भर स्वच्छ उर्जेवर आहे. सोलार पॅनलच्या माध्यमातून होणारी उर्जा, पवन ऊर्जा यावर जगातील बरेच देश भर देत आहेत. अलिकडेच गुगलने अमेरिकेतील इंटरसेक्ट पावर ही कंपनी ताब्यात घेतली. ही कंपनी सौर आणि पवन उर्जेच्या क्षेत्रात आहे. जगातील अनेक बड्या शहरांचा प्राण प्रदुषणामुळे घुसमटत चालला आहे. आपल्या प्रत्येक मोठ्या शहरातील हवा दुषित झालेली आहे. त्यामुळे प्रदुषण टाळण्यासाठी ईव्हीच्या वापरावर जगातील अनेक देश जोर देतायत. हे सगळे असे घटक आहेत ज्यामुळे तांब्याचे भाव कडाडतायत.

हेही वाचा..

बाबा महाकालांचा अद्भुत शृंगार

शेअर बाजारात नववर्षची सुरुवात उत्तम

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा!

पुतिन यांनी ठरवले सैनिकांना ‘नायक’

संजीव कुमार सिंह हे हिंदुस्तान कॉपरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक. अलिकडेच सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी तांब्याचे महत्व अधोरेखित केले. तांब्याचे उत्पादन वाढवण्यासाठी काय प्रय़त्न सुरू आहेत, याचीही त्यांनी माहिती दिली. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी एक विधान केले ते खूप महत्वाचे आहे. ते म्हणाले, तांब्याचा पर्याय येत्या काही वर्षात तरी समोर दिसत नाही. थोडक्यात तांब्याला पर्याय नाही. अर्थकारणाला गती देण्यासाठी तांब्याची प्रचंड गरज आहे. त्यामुळे तांब्याची चमक येत्या काही वर्षात वाढत जाण्याची शक्यता आहे.

गेल्या १० वर्षात तांब्याच्या उत्पादनात फार मोठी भर पडलेली नाही. एकही मोठी खाण सापडलेली नाही. असलेल्या खाणी बंद पडल्याच्या किंवा उत्पादन कमी झाल्याची उदाहरणे बरीच आहेत. येत्या वर्षात काही नव्या खाणींचा शोध लागला तर ठिक नाही तर चांदी प्रमाणे तांबेही रडवणार असे चित्र दिसते आहे. २०२५ हे वर्ष चांदी, सोने, प्लॅटीनम, तांबे या सगळ्या धातूंसाठी चांगले वर्षे होते. संबंधित कंपन्यांचे शेअर किंवा किमती घसघशीत वाढल्या. मागणी, पुरवठ्याचे एकूण गणित पाहाता येत्या काळात हे समीकरण कायम राहण्याची शक्यता आहे. तांब्याला आलेली सोन्याची चमक येती काही वर्षे तरी टीकणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा