अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्गिओ गोर यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सात महिन्यानंतर अमेरिकेला जाग आली. यापूर्वीचे राजदूत एरीक गारसेटी जानेवारीत मायदेशी परतल्यानंतर सात महिने ही नियुक्ती लोंबकळलेली होती. भारत आणि अमेरिकेत सध्या मोठा तणाव निर्माण झालेला असताना ट्रम्प यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू मुत्सद्दयाची भारतात नियुक्ती केलेली आहे. ट्रुथ सोशलवर काल केलेल्या पोस्टमध्ये या नियुक्तीबाबत त्यांनी घोषणा केली. त्यांच्या पोस्टमध्ये भारताबाबत त्यांनी एकच शब्द वापरलेला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. बाकी सगळी गोर यांचीच भलामण आहे.
टेरीफ लादून भारत गुडग्यावर येईल या आशेवर ट्रम्प होते. तशी काही चिन्हे दिसत नाहीत. उलट भारत आणि चीनची जवळीक वाढताना दिसते आहे. त्यातून अमेरिकेचा गोंधळ प्रचंड वाढला आहे. नेमके करायचे काय, वागायचे कसे याबाबत हा गोंधळ आहे. हा गोंधळ किती आहे, याचे दर्शन व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नोवारोव्ह यांनी अलिकडेच घडवले आहे. फायनान्शिअल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी आधी भारताच्या विरोधात गरळ ओकली. भारताला शिकवणी देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘आय लव्ह इंडिया’, ‘मोदी इज द ग्रेट लीडर’ अशा भलामण केली. त्यानंतर पुन्हा मळमळ बाहेर काढली. ‘गरज नसताना भारत रशियाकडून तेल विकत घेतो. क्रेमलिनसाठी मनी लाँडरिंगग करतो. भारत चीनच्या जवळ जातो आहे.’ अशी विधाने केली. या विधानांची चर्चा इथे अशासाठी केली जाते आहे, कारण नोव्हेरोव्ह हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत. ट्रम्प यांच्याशी जवळीक असलेले सल्लागार त्यांचा मेंदू चालवत नाहीत, ते ट्रम्प यांना हवे तेच बोलतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जुमानत नाहीत. झुकण्याची दूर दूरपर्यंत शक्यता नाही, उलट ते चीनच्या जवळ जातायत. रशियन तेल खरेदीवरूनअमेरिकेने भारतावर ५० टक्के टेरीफ लादण्याची धमकी दिली. त्यानंतर रशियाकडून होणाऱी तेल खरेदी भारताने प्रचंड वाढवली आहे. ऑगस्टमध्ये भारताने प्रतिदिन २ लक्ष बॅरल तेल खरेदी सुरू केली आहे. आधी ती १.६ दशलक्ष बॅरल होती. म्हणजे रशियाकडून होणारी तेल खरेदी ३० टक्क्यांनी वाढलेली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्गिओ गोर भारतात राजदूत म्हणून येत आहेत. हे महाशय मुळचे रशियन. ताश्कंदमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव सर्गी गोरोखोवस्की. सर्गिओ गोर हे त्याचे अमेरीकीकरण आहे. १९९९ मध्ये त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. ज्युनिअर ट्रम्प यांच्यासोबत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अवर जर्नी टूगेदर’, ‘लेटर्स टू ट्रम्प’, या पुस्तकांचे प्रकाशन केले. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर व्हाईट हाऊस प्रेसिडेन्शिअल पर्सनल ऑफीसचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
गोर यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केल्यानंत ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात सगळी भलामण गोर यांची आहे. भारताबाबत फक्त एक वाक्य आहे. ‘भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.’ अशा देशात ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हा माझा एजेंडा राबवण्यासाठी माझा पूर्ण विश्वास असलेली व्यक्ति असणे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. सर्गिओ हे उत्तम काम करतील.’
साधारणपणे एखाद्या देशात राजदूत म्हणून काम करणारी व्यक्ति दोन्ही देशांचे संबंध उत्तम ठेवताना आपल्या देशाचे हित जपण्याचे काम करत असते. भारताचा उल्लेख ट्रम्प यांना अधिक चांगल्या प्रकारे करता आला असता. आशियातील मित्र देश, जगातील उभरती आर्थिक सत्ता, अशा प्रकारे मांडणी करता आली असती. परंतु, ते न करता जगातील सर्वाधित लोकसंख्या असलेल्या एकादेशात राजदूताची नियुक्ती करताना आपला अजेंडा राबवणे हेच त्याचे काम आहे, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांचा अजेंडा काय आहे, हे एव्हाना जगाच्या लक्षात आलेले आहे.
गोर यांच्याकडे फक्त भारतात अमेरिकेचे राजदूत एवढीच जबाबदारी नाही. दक्षिण आणि मध्य आशियासाठी ट्रम्प यांचे विशेष दूत म्हणून काम कऱणार आहेत. यापूर्वी असे घडले नव्हते. कधीही घडलेले नाही ते ट्रम्प यांच्या कारकीर्दीत घडताना दिसत आहे. कझाकस्तान, किरीगिझस्तान, ताजिकीस्तान, उझबेकीस्तान, तुर्कमेनिस्तान हे मध्य आशियातील देश. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, भूतान हे दक्षिण आशियातील देश. या सगळ्या देशांचे विशेष दूत म्हणून गोर काम करणार आहेत.
थोडक्यात या सगळ्या छुटपुट देशांच्या रांगेत भारताला उभे करण्याचे काम ट्रम्प यांनी केलेले आहे. ट्रम्प यांचे वागणे हे मित्रासारखे नाही. भारताला हिणवून भारताचे महत्व कमी होईल असे त्यांना वाटते आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशाला भारताच्या रांगेत उभे केले म्हणून या देशांची लायकी वाढत नाही आणि भारताची कमी होत नाही. ट्रम्प यांना आपला कंड शमवल्याचे सुख मिळत असेल तर त्यांनी तो शमवून घ्यावा. भारत आणि पाकिस्तान सारखे असते तर अमेरिकेच्या नासाने इस्त्रोसोबत काम केले नसते. पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था स्पेस एण्ड अप्पर एटमॉस्फिअर रिसर्च कमिशन (SUPARCO) सोबत काम केले असते. मुनीर यांच्या खांद्यावर हात ठेवून पाकिस्तानची क्षमताही वाढत नाही आणि किंमतही वाढत नाही.
भारतावर दडपण वाढवण्यासाठी ट्रम्प प्रशासन आता टेरीफकडून सॅंक्शनकडे सरकताना दिसते आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या केरोलिना लेव्हीट यांच्या तोंडून हा शब्द बाहेर पडलेला आहे. सर्गिओ गोर यांच्या पाठोपाठ हे निर्बंध भारतावर येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्या राजवटीत काहीही पाहण्याची मानसिकता भारताने ठेवली आहे. अमेरिकेने हे यापूर्वीही केले आहे. १९९८ च्या पोखरण अणुस्फोटानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. जुलै १९९८ मध्ये निर्बंध लादण्यात आले. सुमारे दीड वर्ष हे निर्बंध सुरू राहिले. नोव्हेंबर १९९९ मध्ये आर्थिक निर्बंध उठवण्यात आले. मार्च २००० मध्ये बिल क्लिंटन भारत भेटीवर आले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा हा सर्वात मोठा भारत दौरा होता. तब्बल पाच दिवसांचा.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातला भारत कसा होता, याची कल्पना करा. नरेंद्र मोदी यांचे सरकारही अल्पमतातील आहे. परंतु, त्यांना फक्त दोन पक्षांवर अवलंबून राहावे लागते. वाजपेयींच्या काळात देशात २६ पक्षांचे आघाडी सरकार होते. क्लिंटन भारतात आले तेव्हा देशाचा जीडीपी ४७६.६१ अब्ज डॉलर्स होता. आज आपला जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर पार आहे. तेव्हा भारत शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. आज आपण लढाऊ विमाने, त्यांची इंजिन, आण्विक पाणबुड्या आदी बाबतीत अन्य देशांवर अवलंबून असलो तरी ह अवलंबित्व कमी झालेले आहे. २५ वर्षांपूर्वीचा भारत जर अमेरिकेसमोर झुकला नाही तर आजचा कसा झुकेल?
ट्रम्प यांच्या मुत्सद्द्यांबाबत एक मोठी समस्या आहे. ट्रम्प यांचे आखातील राष्ट्रातील विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे ट्रम्प यांचे गोल्फ पार्टनर होते. म्हणजे दोघेही एकत्र गोल्फ खेळायचे. त्यांना राजकीय अनुभव नाही. गोर यांच्याबाबतही तसेच आहे. ते ट्रम्प यांचे प्रकाशक होते, निवडणूक काळात प्रचारक होते. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पॅराशूट लँडीग केले. एखाद्या राजदूताकडे भूराजकीय घडामोडींची अचूक माहिती असावी लागते, ती गोर यांच्याकडे असण्याची शक्यता कमीच. खरे तर अशी अचूक माहिती ट्रम्प यांच्याकडेही नाही. आफ्रीकेत काँगो नावाचा देश आहे हेही त्यांना माहिती नव्हते. भारत आणि पाकिस्तान हजार वर्ष काश्मीरच्या मुद्द्यावरून भांडतायत, अशी भन्नाट विधाने त्यांना यापूर्वी केलेली आहेत. त्यामुळे त्यांनी भारतात नव्याने नियुक्त केलेले राजदूत भारतासोबत संबंध सुधारण्यापेक्षा ट्रम्प यांच्यासारखे उडाणटप्पू आणि बेभरवशाचे राजकारण कऱण्याची शक्यता आहे.







