30 C
Mumbai
Thursday, April 2, 2026
घरसंपादकीयथाळी वाजवणारे हात, ढोल वाजवणार का?

थाळी वाजवणारे हात, ढोल वाजवणार का?

तर ट्रम्प याना दणका बसेल

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यात ‘स्वदेशी विका, स्वदेशी खरेदी करा’, असे आवाहन देशवासियांना केले. पंतप्रधानांनी यापूर्वी केलेले प्रत्येक आवाहन जनतेने शिरसावंद्य मानले आहे. कोविडच्या काळातील स्वयंसेवकांना मानवंदना देण्यासाठी थाळी वाजवण्याचे आवाहन असो, वा दिवे लावण्याचे. ज्या देशवासियांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत थाळ्या वाजवल्या ते स्वदेशीचा वापर करून चीन आणि अमेरिकेचा ढोल वाजवतील का? खरे तर मोदींच्या घोषणेमुळे अमेरीकेपेक्षा चीनचा ढोल वाजण्याची शक्यता जास्त आहे.  ग्लोबलायझेशनच्या काळात स्वदेशीचा मंत्र प्रभावी ठरेल का? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर फक्त भारताच्या जनतेकडे आहे.

दोन दिवसांच्या दौऱ्यावर मोदी गुजरातमध्ये होते. लाल किल्ल्यावरून त्यांनी स्वदेशीचे आवाहन केले होते. त्यानंतर अहमदाबादेतील सभेत त्यांनी स्वदेशीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. ‘सणावारांचा काळ सुरू झाला आहे. सणवार हे संस्कृतीचे उत्सव आहेतच, परंतु हे आत्मनिर्भरतेचे उत्सवही झाले पाहिजेत. या काळात आपण जे काही विकत घेऊ ते मेड इन इंडीया असेल. स्वदेशी असेल. घर सजवण्याचे, भेट वस्तूंचे जे काही सामान असेल ते भारतात बनलेले असेल.’ व्यापाऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले, ‘विदेशी माल विकणार नाही, असा संकल्प करा. दुकानांवर आमच्या येथे स्वदेशी वस्तू मिळतात, अशा पाट्या लावा. आपले उत्सव हे देशाच्या समृद्धीचे उत्सव बनले पाहीजेत’, असे आवाहन मोदींनी केले.

याच भाषणात ट्रम्प यांनाही फटकारे लावले. जगात स्वार्थी अर्थकारणाचे राजकारण सुरू आहे. भारत हे सगळे पाहतो आहे. मोदी जे काही बोलले ते स्पष्ट आहे. कोणालाही अंगावर घेण्याची त्यांची तयारी आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मलहोत्रा, देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. कापड, ज्वेलरी, कोळंबी, काही प्रमाणात एमएसएमई क्षेत्राला याचा फटका बसेल. परंतु आम्ही देशात पैसा खेळता राहावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. ज्या क्षेत्रांना फटका पडतोय, त्यांच्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते करीत आहोत, असे सांगितलेले आहे.

ट्रम्प यांच्या धमक्यानंतरही फार मोठी पडझड झालेली नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह मान्यवर वित्तसंस्थांनी भारताची आर्थिक आगेकूच सुरू राहील असे अहवाल दिलेले आहेत. एका बाजूला अर्थकारण सावरण्याच्या सगळ्या उपाययोजना करताना भारतात व्यवसाय करणाऱ्या अमेरीकी कंपन्यांना दणका देण्याची तयारी मोदी करीत आहेत. देशातील जनतेला सोबत घेऊन मोदी हे करणार आहेत. हे प्रत्यक्षात आले तर त्याचा फटका कोणाला बसणार हा मुद्दा मात्र अत्यंत वेगळा आहे. अमेरिकी उत्पादनांना झटका बसेलच, चीनी माल सुद्धा यात भरडला जाणार.

भारतात सणवारांच्या काळात नेमके काय होते हे लक्षात घ्या. चीनचा माल रस्त्यावर दिसतो. दुसऱ्या बाजूला एमेझॉनवर सेल जाहीर होतात. कोट्यवधीची विक्री होते. मोदींनी जे काही आवाहन केले आहे ते जर जनतेने मनावर घेतले या दोन्ही प्रकारच्या विक्रीला फटका बसणार. गणेशोत्सवात चीनमध्ये बनलेल्या गणेश मूर्तींनी बाजाराचा कब्जा घेतला आहे. श्रीगणेश हा आपल्या दृष्टीने परमेश्वर परंतु  चीनच्या दृष्टीने ही मूर्ति केवळ एक वस्तू आहे, त्यामुळे बनवताना आपले मुर्तिकार जी पथ्य पाळतात ती चीनमध्ये पाळली जाण्याची शक्यता शून्य. या मूर्ति आपल्याकडे बनणाऱ्या मूर्तिच्या तुलनेत स्वस्तही असतात. डेकोरेशनसाठी लागणारी तोरणे, लायटींग, बल्ब, कंदील, पणत्या हा सगळा माल चीनमधून येतो. हे सगळं काही मेड इन चायना असते. मोदी गेली काही वर्षे व्होकल फॉर लोकलची घोषणा देतायत. त्याचा थोडा फार फटका या विक्रीला बसलेला आहे. लोकांनी जास्त मनावर घेतले तर लोक चार पैसे जास्त मोजून भारतीय सामान घेतील, चीनी सामान बाजूला ठेवतील.

कोलगेट पामोलिव्ह, हिंदुस्तान लिव्हर, पेप्सीको, कोकाकोला, प्रॉक्टर एण्ड गॅम्बल या कंपन्या घरगुती वापराच्या वस्तूंची निर्मिती करतात, तर मायक्रोसॉफ्ट, गुगल, एडोब, एमेझॉन या कंपन्या आहेत. आयफोनची भारतात मोठी विक्री होते. परंतु मोदींची स्वदेशीची व्याख्या वेगळी आहे. ज्या वस्तू भारतात बनतात, त्या जर अमेरिकी कंपन्यांनी बनवल्या तरी त्यांच्या दृष्टीने या स्वदेशी आहेत. कारण त्या इथे बनलेल्या आहेत. इथल्या कामगारांनी बनवल्या आहेत. भारतीयांनी त्यासाठी घाम गाळलेला आहे. त्यामुळे आयफोन हा सुद्धा स्वदेशीच आहे.

अर्थात मोदींच्या घोषणेचा सर्वाधिक फटका सुरूवातीला चीनला बसणार. अमेरिकेने ५० टक्के अतिरिक्त टेरीफ लादण्यासाठी जी डेडलाईन दिली आहे ती फक्त काही तासांवर आलेली आहे. २७ ऑगस्टपासून हे नवे टेरीफ दर लागू होतील. अमेरिकेने हे केलेच तर त्याचा फटका अमेरिकी कंपन्यांनाही बसू शकतो. ग्रेट इंडीयन फेस्टीवल २०२४ मध्ये म्हणजे गेल्या वर्षी एमेझॉनला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या १.४ अब्ज होती. २ आणि ३ टायर सिटीमध्ये एमेझॉनच्या प्राईम मेंबरमध्ये ७० टक्के वाढ झाली.

भारताला जर अमेरिकेचे पेकाट मोडायचे असेल तर आम्ही एक तर आजूबाजूच्या दुकानातून माल खरेदी करू आणि एमेझॉनवर खरेदी केली तर फक्त भारतीय ब्रॅंडची खरेदी करू. एमेझॉन कमीत कमी पैसा कमावेल असे पाहू.

मायक्रोसॉफ्ट, गुगल हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत. व्हॉट्सएप शिवाय तर आपले पान हलत नाही. परंतु त्याला पर्याय शोधण्याची नक्कीच सुरूवात होईल. व्हाट्सएप बाजूला ठेवून आम्ही टेलिग्राम वापरू. रशियामध्ये पावेल आणि निकोलाई डुरोव्ह यांनी हे एप तयार केले होते. जगात अशा पर्यायांची कमी नाही.

पेप्सी, कोक, कोलगेट, सारख्या वस्तूंचा बाजार मात्र उठू शकतो. पातंजलीने या कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. रिलायन्स कॅम्पाकोलाच्या माध्यमातून शीतपेयांच्या बाजारात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीयांकडे कोक, पेप्सीचा पर्याय आहेत.

हे ही वाचा:

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी!

‘ते आम्हाला चोर म्हणतील अशी अपेक्षा नव्हती’

कुशीनगरात हायकोर्टाच्या आदेशावर बुलडोझर

राहुल-प्रियंका यांच्या बिहार दौऱ्याचा काही फरक पडणार नाही

उद्या ही बाब स्पष्ट होईलच की अमेरिका भारतावर खरोखरच ५० टक्के टेरीफ आकारणार की आणखी काही दिवसांची सवलत जाहीर कऱणार. ट्रम्प हे अत्यंत बेभरवशाचे आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात. अमेरिकी अर्थकारणाला लागलेला टेरीफचा झटका लक्षात घेतला तर त्यांनी हा तंटा मिटवला पाहीजे. परंतु भारत त्यांचा अहंकार गोंजारत नसल्यामुळे हे घडण्याची शक्यता कमीच वाटते.

ज्या कारणामुळे अमेरिका भारतावर कारवाई करण्याचा दावा करते आहे, ते कारण अत्यंत तकलादू आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, जगभरात विकतो आणि पैसा कमावतो, असा दावा व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नरोव्हा यांनी केला होता. त्यावर आपले परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी दिलेले उत्तर ट्रम्प यांना आवडणारे निश्चितच नाही. आमच्या तेलाबाबत तुम्हाला काही समस्या असेल तर विकत घेऊ नका असे जयशंकर म्हणाले. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहील्या तिमाहीचे म्हणजे एप्रिल २०२५ पासूनचे आकडे पाहीले तर पहील्या तिमाहीत पेट्रोलियम उत्पादन खरेदीचे आकडे दुप्पटीपेक्षा वाढलेले आहेत. ही वाढ ११४ टक्के आहे. २०२४-२५ मध्ये अमेरिकेने भारताकडून १.७३ अब्ज डॉलरची पेट्रोलियम उत्पादने विकत घेतली, चालू आर्थिक वर्षाच्या पहील्या तिमाहीत हा आकडा ३.७ अब्ज डॉलर झाला. जून २०२५ च्या तुलनेत जुलै २०२५ मध्ये ही खरेदी आणखी २३ टक्क्यांनी वाढली. ट्रम्प यांनी लादलेले टेरीफ युद्ध रंगात आलेले असतानाचे हे आकडे आहेत. ट्रम्प काहीही बोलले तरी अर्थकारण त्यांच्या लहरीनुसार चालत नाही हेच हे आकडे सांगतायत.

या सगळ्याचा निचोड हा आहे की ट्रम्प यांनी उद्यापासून भारतावर टेरीफ लादले तर भारताचा थोडा तोटा होईल. परंतु भारतात अमेरिकेबाबत जो संताप निर्माण होईल, त्याचा फटका अमेरिकी उत्पादनांना बसेलच. मोदी अजून फक्त त्यांच्या भाषणात स्वदेशीचा उल्लेख करतायत. त्यांनी स्वदेशी सोशल मीडियाची चर्चा सुद्धा छेडली आहे. एकूणच ते त्यांची तयारी करतायत. अजून ही लढाई लुटुपुटूची आहे. अमेरिकेत भारतातून होणारी निर्यात वाढते आहे, त्यावरून ही बाब स्पष्ट आहे. उद्या भारताला ट्रम्प यांच्या बडबडीचा खरोखरच फटका बसला तर मोदी कधी तरी आठ वाजता टीव्हीवर अवतरतील. स्वदेशी वापराची हाक देतील, तेव्हा खरी लढाई सुरू झाल्याचे संकेत देशवासियांना मिळतील. त्यानंतर जे काही होईल ती जबाबदारी ट्रम्प यांची असेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा