31 C
Mumbai
Friday, April 3, 2026
घरसंपादकीयपाकिस्तानला सगळेच घोडा लावतायत...

पाकिस्तानला सगळेच घोडा लावतायत…

Google News Follow

Related

चतुर कोल्ह्याला एकदा गाढवाची मस्करी कऱण्याचा मोह झाला. गाढव जोर जोराने रेकत होते, तेव्हा कोल्हा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, ‘गाढव महाराज तुम्ही किती चांगले गाता. परंतु इथे माळरानात गाऊन काय उपयोग, जेव्हा शेतात काम करायला बरेच लोक येतील तेव्हा तुम्ही तुमच्या आवाजाची जादू सगळ्यांना दाखवा’. गाढवाने मनावर घेतले. शेतात लोक जमा झाल्यावर तो  जोर जोरात ओरडू लागला. लोक चिडले आणि त्या गाढवाला बदड बदड बदडले. कोल्हा दुरून मजा बघत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची परीस्थिती त्या गाढवा सारखी केली आहे. परंतु पाकिस्तानला घोडा लावणारे ते एकटेच नाही, सगळे जग पाकिस्तानच्या मागे लागले आहे.

मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते, अशी एक म्हण आहे. भारताचे पंतप्रधान मोदी, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांना भेटतात. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसून पजशिक्यान यांच्यासोबत फोनवर चर्चा करतात. ट्रम्प मोदींना फोन करून त्यांच्याशी संवाद साधतात, हे पाहील्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही तसेच काही करण्याचा मोह झाला.

बहुधा भारतातील काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली स्तुती त्यांच्या कानावर गेली असावी. ट्रम्प आपली स्तुती करतात, भारतात काँग्रेस पक्षाचे नेते आपल्या आरत्या ओवाळतात त्यामुळे आपल्यात काही तरी विशेष असणारच, अशी खात्री झाल्यामुळे जगात शांतता निर्माण करण्याचा भार आपल्याच खांद्यावर आहे, याची त्यांना खात्री झाली. ते पंतप्रधान मोदींसारखे सगळ्यांशी संवाद साधू लागले. इराण आणि अमेरिकेत समेट घडावा म्हणून शरीफ जोरात कामाला लागले. त्यांच्यात शांतीदूत संचारला होता. तेही शांततेची कबुतरे उडवायला लागले.

आखातातील देशांशी त्यांनी फोनवर संवाद साधला. ते इराणशी बोलणे करत होते. ट्रम्प यांचा १५ कलमी प्रस्ताव इराणकडे सरकवत होते. याचा परीणाम व्हायचा तोच झाला. कोल्ह्याची स्तुती मनावर घेणाऱ्या गाढवाची जी अवस्था झाली तीच अवस्था आता शाहबाज यांची होताना दिसते आहे.

गुरुवारी रात्री इस्त्रायलच्या हवाई दलाने तेहरानमध्ये क्षेपणास्त्राचे भीषण हल्ले केले, यापैकी एक हल्ला पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासाच्या अगदीच जवळ झाला. त्यानंतर शाहबाज यांचा भ्रमनिरास झाला असावा. इस्त्रायलकडे अचूक मारा करण्याची क्षमता आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. इमारतीतील घराच्या खिडकीतून बेडरुममध्ये बसलेल्या व्यक्तिला टिपण्याची क्षमता इस्त्रायलने सिद्ध केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दूतावासानजीक झालेला हल्ला चुकून माकून झाला असण्याची शक्यता नाही.

पाकिस्तान सरकारशी संबंधित असलेल्या पाकिस्तान स्ट्रेटेजिक फोरम या संस्थेने या हल्ल्याचा निषेध केला, ‘पाकिस्तान म्हणजे कतार नाही, आमच्या मुत्सद्द्यांवर जगाच्या पाठिवर कुठेही हल्ला झाला तर आम्ही चोख प्रत्यूत्तर देऊ’, असा दम इस्त्रायलला दिला आहे. इस्त्रायल इराणशी युद्धात गुंतला आहे, त्यामुळे आपल्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळणार नाही, अशी खूणगाठ बांधत ही दमदाटी झाली असावी. शिवाय ती थेट सरकारतर्फे न करता, सरकारशी संलग्न असलेल्या पीएसएफ सारख्या एखाद्या निमसरकारी संस्थेच्या माध्यमातून ती करण्यात आली.

इराण युद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेची दलाली करतो आहे ही बाब उघड आहे. या दलालाची नाल ठोकण्याचे काम स्वत: ट्रम्प यांनी केलेले आहे. ‘होर्मुजमधून अमेरिकेचे तेल आणणारी दहा जहाजे पाकिस्तानचा झेंडा लावून सुखरूप बाहेर पडली’, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. दुटप्पी भूमिकेमुळे इराणमध्ये पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप होताच. त्याचा आता भडका उडाला आहे. अमेरिकेच्या दलालीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानविरुद्ध इराण मीडियाने राळ उठवायला सुरूवात केली आहे.

हे ही वाचा:

राजस्थानच्या जोधपुरमध्ये मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक

देश माओवादमुक्त करण्याच्या दिशेने शेवटचे पाऊल

नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आवश्यक

इराणकडून मित्र देश भारतासाठी मोठा दिलासा

तेहरान टाईम्स या वृत्तपत्राने इराणने पाकिस्तानला होणारी तेल विक्री बंद करावी. सौदी कतारकडून येणाऱ्या इंधन पुरवठ्यातही अडथळे आणावे, असा जाहीर सल्ला दिला आहे.

कट्टरतावादी भूमिका मांडणाऱ्या कैहान या वृत्तपत्राने इराणमधून पाकिस्तानला होणारी इंधनाची तस्करी पूर्ण बंद करावी आणि पाकिस्तानबरोबरचा तेल करारही रद्द करावा जेणे करून पाकिस्तानला तटस्थतेची किंमत कळेल, अशी भूमिका मांडली आहे.

आयरीबही इराणची सरकारी वाहिनी आहे. या वाहिनीवरून पाकिस्तानला व्यवस्थित ठोकले जात आहे. पाकिस्तानने जेव्हा अमेरिकेचा प्रस्ताव इराणकडे सरकवला तेव्हा, वॉशिंग्टन स्वत:शी चर्चा करीत आहे, पाकिस्तान त्यांना मदत करीत आहे, अशी टीका केली होती. एकूणच पाकिस्ताची परीस्थिती धोब्याच्या गाढवासारखी झालेली आहे. ना घर का, ना घाटका. दिवसभर मालकाची ओझी उचलायची आणि काम झाल्यावर पोट भरण्यासाठी उकीरडे फुंकायचे.

पाकिस्तान हा आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करीत आहे, याचा अमेरिकेला धोका आहे, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी अलिकडेच दिला आहे. अमेरिकेला धोका असलेल्या पाच राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचाही त्यांनी समावेश केला आहे. अन्य देशांमध्ये रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरीया हे देश आहेत. अमेरिकेच्या अन्यूअल थ्रेट असेसमेंट अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. पाकिस्तानचा अमेरिकेने यापूर्वी अनेकदा वापर केला आहे. अनेक वर्षे सोबत काम केल्यामुळे पाकिस्तानची विश्वासघाती वृत्ती अमेरिकेला ठाऊक आहे.

अशा देशांच्या यादीत पाकिस्तानसोबत गाजावाजा करत संरक्षण करार करणाऱ्या सौदी अरेबियाचाही समावेश आहे. इराण सौदीवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा मारा करत असताना पाकिस्तान ढिम्म बसून होता. त्यावेळी पाकिस्तानने कराराचे पालन करावे. ठरल्याप्रमाणे आमच्यावर हल्ला झाला तर तो तुमच्यावरही हल्ला आहे, असे मानून इराणवर आक्रमण करावे, असा ओरडा केला. पाकिस्तानने या इशाऱ्याकडेही साफ दुर्लक्ष केले.

एका बाजूला इराण दुसऱ्या बाजूला इस्त्रायल आणि अमेरिका एकमेकांशी लढतायत. परंतु हे तिघे मिळून पाकिस्तानला तिंबून काढतायत, असे चित्र दिसते आहे. शाहबाज सगळ्यांशी संवाद ठेवायला गेले, परंतु यांचे वागणेच असे आहे की, प्रत्येकाच्या मनात यांच्या हेतूबाबत शंका आहे. पाकिस्तानी नेता जेव्हा हस्तांदोलन करायला एक हात पुढे करतो, तेव्हा त्यांच्या एका अदृश्य हातात खंजीर असतो, याचा जगाला अनुभव आहे. हा खंजीर आपल्या पाठिस खुपसला जाण्याआधी प्रत्येकाला पाकिस्तानचा हिशोब चुकता करायचा आहे. कौवा चला हंस की चाल… या उक्ती प्रमाणे शाहबाज यांची अवस्था झाली आहे.

आखातातील युद्धाबाबत या घडामोडी सुरू असताना भारताने उचललेल्या एका दमदार पावलामुळे पाकिस्तानला आणखीनच घाम फुटला आहे. भारतीय सेनादलांनी ८०० किमीचा पल्ला असलेल्या सुधारीत ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी मागणी नोंदवली आहे. या क्षेपणास्त्राची भारताने यापूर्वी यशस्वी चाचणी घेतली आहे.

ऑपरेशन सिंदुरच्या काळात ब्रह्मोसने पाकिस्तानला जबर दणका दिला होता. ८०० किमीचा टप्पा असलेल्या सुधारीत ब्रह्मोसचा वापर करून दिल्लीतूनही इस्लामाबादचा वेध घेणे शक्य आहे. पूर्वी त्यासाठी अगदीच सीमा भागात लढाऊ विमाने तैनात करून मारा करावा लागत होता. त्यामुळे लढाऊ विमाने पाकिस्तानच्या टप्प्यात येत होती. निम्म्या क्षमतेच्या ब्रह्मोसने पाकिस्तानला गुढग्यावर आणले होते. आता सुधारीत ब्रह्मोस काय करू शकतील याचा पाकिस्तानलाही अंदाज आहे.

सध्याच्या काळात परिस्थिती अशी आहे की, रणगाडे आणि विमानांमध्ये तेल टाकण्या इतकीही पाकिस्तानची क्षमता उरलेली नाही. चुकून माकून ऑपरेशन सिंदूर सुरू झाले, तर मार खाण्या शिवाय पाकिस्तानकडे पर्याय नसेल. चीनची शस्त्र आणि हवाई संरक्षण यंत्रणा इराणलाही वाचवू शकलेली नाहीत. त्यामुळे चीन कडून मिळालेल्या रसदही फारशी उपयोगी ठरणार नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा