पश्चिम बंगालची निवडणूक झाली, ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळले तेव्हापासून देशातील राजकारणात प्रचंड घुसळण सुरू झाली आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही उधाण आले आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमध्ये आता विलीन व्हावे, असा एक प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे. ममतांचे तसेही आता पश्चिम बंगालमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. आमदार, खासदारही त्यांचे राहिलेले नाहीत. सगळे विस्कटून गेले आहे. मार्ग आहे तो काँग्रेससोबत जाण्याचा.
इकडे महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षानेही काँग्रेसची वाट धरावी असा सूर उमटताना दिसत आहे. अर्थात, शरद पवारांकडून असे कोणतेही संकेत मिळत नाहीत पण शरद पवारांचे अत्यंत लाडके असे उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र शरद पवारांनी काँग्रेसच्या मूळ वाटेवरून आता चालायला हरकत नाही, असे म्हणत आहेत. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस आता मजबूत केली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा विचार संजय राऊत यांच्याएवढा कुणीच करताना दिसत नाही. सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी राऊत यांनी जी धावपळ केली, सिल्व्हर ओकवर ज्या बैठकांत ते सहभागी झाले ते पाहता शरद पवारांवर त्यांचा जीव आहे हे काही लपून राहिलेले नाही. शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन धावत जाणारे संजय राऊतांचे छायाचित्र विसरता येणारे नाही. त्यामुळेच कदाचित ते शरद पवारांना ही सूचना करत असावेत, की त्यांनी आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, त्यामुळे काँग्रेस अधिक मजबूत, ताकदवान होईल.
पण मनात प्रश्न येतो तो हा की, ही संजय राऊत यांची वैयक्तिक भूमिका आहे की उबाठा शिवसेनेलाही असेच वाटते की, आता काँग्रेसला मजबूत करण्याशिवाय तरणोपाय नाही? आधीच उबाठा शिवसेनेची अवस्था तोळामासा झालेली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ आमदार निवडून आणले, तिथे उबाठाच्या खात्यात २० आमदार जमा झाले. महानगरपालिकांच्या निवडणुकातही उबाठा पक्षाला मुंबई महानगरपालिका गमवावी लागली, इतर पालिकांमध्येही त्यांच्या हाती फार काही लागले नाही. अशा परिस्थितीत आपण लटपटत असताना शरद पवारांना विलीन होण्याची सूचना करत काँग्रेसला मजबूत करण्याची एवढी घाई उबाठाला का लागली आहे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
खरे तर, २०१९ला उद्धव ठाकरे यांनी जनाधार गमावलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचे काम केलेच. त्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले तर आपले अस्तित्व शिल्लक राहील असे त्यांना वाटत असेलही. संजय राऊत म्हणालेसुद्धा की शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन झाले आणि त्यामुळे काँग्रेस बळकट झाली तर त्याचा आमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना फायदा होईल, आमचा हुरूप वाढेल. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाच्या तोंडून ही वाक्ये खरे तर शोभत नाहीत. कुणीतरी मजबूत व्हावे जेणेकरून आम्हाला आधार मिळेल असे खऱ्या शिवसेनेने कधीही म्हटले नसते. पण संजय राऊत मात्र तसे म्हणत आहेत. यावरून उबाठा पक्षाची हतबलता लक्षात येते. संजय राऊत जी भूमिका मांडत आहेत, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असेही उबाठा शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही उबाठाची अधिकृत भूमिका असेल असे मानायला हरकत नाही.
एकेकाळी आमच्या शिवसेनेची काँग्रेस झाली तर पक्षाला टाळे लावीन असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. पण आता काँग्रेस मजबूत करण्यासाठी उबाठा शिवसेना पक्ष प्रयत्नशील आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. पण याला तेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी २०१९ला जनतेचा कौल झुगारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी शिवसेनेचा बाणा सोडला. त्याचे परिणाम पुढच्या काळात या पक्षाला भोगावे लागले आहेत हे सर्वांना चांगले ठाऊक आहे. अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवले खरे पण त्यानंतर त्यांचा पक्ष फुटला, अनेक कार्यकर्ते निघून गेले, चिन्ह, पक्षाचे नावही त्यांनी गमावले. आता भाजपाकडे जाण्याचा मार्गही बंद झालेला आहे. या परिणामांची पर्वा न करता अजूनही काँग्रेस मजबूत करण्याचा विचार उबाठा शिवसेना करत आहे.
हे ही वाचा:
पुण्यातून १.३६ कोटी रुपयांची संशयित बनावट दारू जप्त
कच्च्या तेलाच्या दरघसरणीनंतर सोने-चांदीची झेप
तेल खरेदीत राजकारण नाही, राष्ट्रीय हितालाच प्राधान्य!
अणुऊर्जा आयातीवरील सीमा शुल्क माफ
संजय राऊत यांना काहीही वाटले तरी शरद पवार असे पाऊल उचलतील का हादेखील प्रश्न आहे. अर्थात, तो पर्याय पूर्णपणे नाकारता येणार नाही. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीची जबाबदारी वाहात आहेत. त्यांनी पक्षाचा कारभार हाती घेतल्यावर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हायला हवे यासाठी बातम्या पेरणे तेव्हा सुरू होते. पण सुनेत्रा पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात पक्ष चालवायचा असेल तर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे पाऊल उचलणे काही चुकीचे ठरणार नाही. मात्र सध्या तरी पवारांना त्याची गरज नाही. कारण निवडणुका अद्याप खूप लांब आहेत, पण भविष्यात आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसचा पर्याय त्यांना योग्य वाटू शकतो.
मात्र संजय राऊत यांना शरद पवारांच्या विलिनीकरणाविषयी एवढा उमाळा का, असा प्रश्नही विचारता येऊ शकतो? मागे राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांचे नाव आधीच जाहीर करून संजय राऊत यांनी आपण शरद पवारांचे किती लाडके आहोत आणि शरद पवार हे आपलेही नेते आहेत, याची चुणूक दाखविली होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा शब्द खाली पडला. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवारांना ही सूचना देण्यामागे संजय राऊत यांचा काहीतरी नवा प्लॅन असू शकतो. त्यावेळी शरद पवारांचे नाव घेताना २०२८च्या आपल्या खासदारकीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी कदाचित अटकळ त्यांनी बांधली असावी. त्यासाठीच त्यांनी शरद पवारांचे नाव घेतले आणि त्यांची राज्यसभा लढविण्याची कशी इच्छा आहे, हेदेखील जाहीर केले. शरद पवारांचे नाव आल्यामुळे भाजपानेही मग त्या जागेसाठी आढेवेढे घेतले नाहीत. आता शरद पवारांच्या पक्षाची झालेली अवस्था पाहता त्यांनीही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार केला तर संजय राऊतांना त्या मार्गाने आपला खासदारकीचा मार्ग कदाचित प्रशस्त करता येईल, अशी शक्यता वाटते.
त्यासाठी ते राहुल गांधी यांच्या स्तुतीतही मग्न आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कोणतीही शंका नाही, असे ते वारंवार म्हणत आलेले आहेत. शिवाय, राहुल गांधींशी त्यांचे वैयक्तिक अत्यंत चांगले संबंध आहेत. महाविकास आघाडीत गेल्यापासून संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याप्रती आपली आदरभावना वारंवार व्यक्त केली आहे. ज्या सामनात कधी काँग्रेसची एक बातमीही प्रसिद्ध होत नव्हती त्या मुखपत्रात राहुल गांधींच्या बातम्या छापून येऊ लागल्या, हेच सगळे काही स्पष्ट करणारे आहे. त्यामागे एक कारण असू शकते ते म्हणजे राऊत यांनी स्वतःसाठी एक पर्यायी मार्ग शोधून ठेवला असला पाहिजे. २०२८मध्ये त्यांना पुन्हा खासदारकीची संधी उबाठाकडून मिळेल अशी शक्यता कमीच वाटते. शरद पवार यांचे नाव राज्यसभेवर निश्चित झाले तेव्हा ही जागा उबाठा पक्षाची आहे, असा दावा आदित्य ठाकरे वारंवार करत होते, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यातून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात बिनसल्याचे बोलले जाते. शिवाय, आता उबाठाकडे आवश्यक तेवढे आमदारही नाहीत. ज्यांनी संजय राऊत यांना २०२२ला निवडून आणले ते सगळे आता एनडीएसोबत आहेत.
अशा परिस्थितीत शरद पवारांना लवकर काँग्रेसमध्ये विलीन करून आपला मार्ग प्रशस्त करण्याचा विचार संजय राऊत करत असतील तर तसे राजकारण करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण एक मात्र खरे की, ज्या शिवसेनेने एकेकाळी काँग्रेसचा कठोर विरोध केला. अगदी २०१९च्या निवडणुकी आधीपर्यंत ज्या काँग्रेसविरोधात तिखट प्रचार केला, त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आज मात्र दुर्दैवाने काँग्रेसला मजबूत करण्याचा विचार करावा लागतो आहे. काँग्रेससोबत गेलो नाही तर आपल्या अस्तित्वालाच नख लागेल अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसवर कठोर प्रहार केले, त्या पक्षाच्या मजबुतीसाठी, बळकटीसाठी उबाठा पक्ष आता मेहनत घेण्याचा विचार करतो हे मात्र काळाचा महीमा दाखविणारे आहे. राज ठाकरेंशी युती करण्याचा प्रयत्न तर पालिका निवडणुकीत फसला. अर्थात, उबाठाने आपला फायदा करून घेतला पण मुंबई महानगरपालिकेवर मशालीचे चिन्ह लावण्यात उबाठाला यश आले नाही. भाजपाचे दरवाजे केव्हाच बंद झालेले आहेत. राहिला प्रश्न तर तो काँग्रेसचाच आहे. त्यांच्याशी जुळवण्यापलिकडे, इंडी आघाडीचे सदस्य राहण्यापलिकडे आता उबाठाच्या हाती काहीही राहिलेले नाही, हेच खरे.
