चीनचे परराष्ट्र मंत्री सन वुईडोंग हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी त्यांची चर्चा झाली. परस्पर हितांच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी सहमतीने काही निर्णय घेतले. पाच वर्षांपूर्वी भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आज दोन्ही देशांना एकमेकांची गरज भासते आहे. हे घडावे ही रशियाची इच्छा होती. ती प्रत्यक्षात आणली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी.
जून २०२० मध्ये गलवान येथे भारत आणि चीनच्या फौजांमध्ये संघर्ष झाला. आपले काही जवान धारातीर्थी पडले, चीनचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये चीनने मोठ्या संख्येने फौज आणून उभी केली. भारतानेही चीनला कळेल या भाषेत प्रत्युत्तर दिले. चार वर्षे दोन्ही देशांच्या सेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. दबाव टाकून भारत झुकत नाही, बधत नाही हे चीनच्या लक्षात आल्यानंतर अखेर गेल्या वर्षी वाटाघाटीनंतर हा पेच सुटला. डीसेंबर २०२४ मध्ये दोन्ही देशांच्या फौजा मागे हटल्या.
चीनची आक्रमकता हा काही नवा मुद्दा नाही. १९६२ पासून भारताला हा अनुभव आहे. दोन्ही देशांमध्ये हा जो तणाव आहे, त्यात अमेरिकेला तेल ओतायचे होते, हात सुद्धा शेकायचे होते.‘क्वाड्रीलॅटरल सेक्युरीटी डायलॉग’ अर्थात ‘क्वाड’च्या माध्यमातून भारताला आपल्या गोटात खेचण्याचा आणि चीनसमोर झुंजायला उभे करण्याचा प्रयत्न अमेरिकेने सातत्याने केला. परंतु भारत दक्ष होता. ‘क्वाड म्हणजे एशियन नेटो नाही. ही शीतयुद्धाची मानसिकता आम्हाला मान्य नाही’, अशी स्पष्टोक्ती करून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी अमेरिकेची हवा काढली होती. त्यांनी स्पष्ट केले होते, की चीनविरोधी गटबाजीमध्ये आम्हाला रस नाही.
सर्जी लाव्हरोव्ह यांनी काही दिवसांपूर्वी भारत, चीन आणि रशिया एकत्र येण्याबद्दल भाष्य केले होते. ते म्हणाले, ‘अमेरिका आणि पश्चिमी देशांना भारताला चीनसोबत भिडवण्यात रस आहे.’
देशातील पहिल्या एनडीए सरकारमध्ये संरक्षण मंत्री असलेले जॉर्ज फर्नांडीस १९९८ मध्ये म्हणाले होते, की,‘चीन हा भारताचा शत्रू क्रमांक एक आहे’. फर्नांडीस यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली होती. भारत आपल्याकडे शत्रू म्हणून पाहतो हे चीनलाही माहिती आहे. ‘चीन भारताकडे शत्रू म्हणून नाही तर भागीदान म्हणून पाहातो’. या आशयाचा लेख चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या मुखपत्रात नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यात भारताला चीन विरुद्ध उभे करण्याच्या प्रयत्नांचा समाचार घेण्यात आला होता. ग्लोबल टाईम्स हे चीनी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
चीन काहीही म्हणत असला तरी, भारताला चीनचा धोका आहे हे सत्य आहे. भारताच्या जमिनीवर चीनचा डोळा आहे हेही सत्य आहे. जवाहरलाल नेहरु यांच्या कृपेने चीनने आपली हजारो एकर जमीन बळकावली आहे. तरीही सध्याच्या भूराजकीय घडामोडी पाहता, चीनशी असलेला तणाव काही काळ आवरता घ्यावा असे भारताला वाटणे स्वाभाविक आहे. चीनलाही तसेच वाटते आहे हे महत्वाचे.
दोन्ही देशांना एकत्र येणे आवश्यक वाटावे अशी वातावरण निर्मिती करण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका महत्वाची आहे. टेरीफच्या नावावर आधी त्यांनी चीनला रगडण्याचा प्रयत्न केला. चीन बधला नाही. त्यांनी रेअर अर्थ मटेरिअलचा चाबूक ओढल्यानंतर ट्रम्प ताळ्यावर आले. त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवर बोलणे केले. त्यांना विनंती केली. त्यानंतर कुठे हा तणाव निवळला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ट्रम्प यांनी भारताशी उघड वाकडे घेतले आहे. ते सध्या पाकिस्तानच्या प्रेमात आहेत. हा माणूस सनकी आहे. जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, तो पर्यंत अन्य देशांशी त्यांचे संबंध ‘कधी घोड्यावर कधी गाढवावर’ अशाच प्रकारचे असतील, याची भारत आणि चीनला जाणीव झाली आहे. त्यामुळे रशियाने सुतोवाच केल्याप्रमाणे भारत आणि चीनने वाटाघाटीतून मार्ग काढण्याचे निश्चित केले.
नवी दिल्लीत सन वुईडोंग यांच्यासोबत मिस्त्री यांची सविस्तर चर्चा झाली. त्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करणे, पासपोर्टबाबत नियमांमध्ये सुटसुटीतपणा, दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांचा अमृत महोत्सव साजरा कऱणे आदी विषयांबाबत चर्चा झाली. नद्यांच्या पाण्यांचा डेटाची एकमेकांसोबत देवाण घेवाण करण्याचेही ठरले आहे.
भारताने थेट विमानसेवा सुरू करावी अशी विनंती चीनने अनेकदा केली होती. परंतु, भारताने हा विषय टांगून ठेवला होता. आता भारताने याबाबत हिरवा कंदिल दाखवल्यामुळे रेअर अर्थ मिनरल्सच्या पुरवठ्याबाबत चीनने घेतलेली आडमुठी भुमिका थोडी सैल होणार हे निश्चित आहे. चीनने या मटेरिअलच्या निर्यातीबाबत जटील निर्बंध लादले होते. त्यामुळेच ट्रम्प यांना नाक मुठीत घेऊन शी जिनपिंग यांच्याशी बोलावे लागले. भारताच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे प्राणही चीनी निर्बंधांमुळे कंठाशी आले होते.
भारत आणि चीन जवळ येण्यामागे फक्त ट्रम्प यांचा सनकीपणा नाही. पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेकडे कलंडल्यामुळेही चीनचा भडका उडाला आहे. पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना अमेरिकेच्या आर्मी डे चे निमंत्रण आल्याच्या बातम्यांमुळे चीनचा पारा वाढला होता. परंतु आता व्हाईट हाऊसने खुलासा केला आहे की, असे कोणतेही आमंत्रण मुनीर यांना दिलेले नाही. अमेरिकेच्या खुलाशानंतरही चीनचा संताप कमी झालेला नाही. गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर ओतले आहेत. तरीही पाकिस्तानची अमेरिका निष्ठा ढळत नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर ती वाढत चालली आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने पॉज केले. त्याचे श्रेय पाकिस्तानने अमेरिकेच्या पदरात टाकले. त्यामुळे चीनी राज्यकर्ते चांगलेच उखडले होते. नूर खान हवाईतळाचा अमेरिका वापर करत होती, हे उघड झाल्यामुळेही चीनला पाकिस्तान-अमेरिका संबंधांचे अंतरंग दिसून आले आहेत
पाकिस्तानवर भरोसा ठेवता येत नाही हे चीनला कळून चुकले आहे. भारताला फार दुखावणे म्हणजे त्याला अमेरिकेच्या दिशेने ढकलण्यासारखे आहे, हे चीनच्या लक्षात आले आहे. सद्यस्थितीत चीनला हे परवडणार नाही. चीनशी बोलणी करण्यासाठी ट्रम्प यांनी स्वत: पुढाकार घेतला असला तरी आधी त्यांनीच चीनला रगडण्याचा प्रयत्न केला होता, हे चीनला विसरता येणार नाही.
चीनला महासत्ता व्हायचे आहे, अमेरिकेला महासत्ता हे बिरुद टीकवायचे आहे. त्यामुळे स्पर्धा या दोघांमध्ये आहे. ट्रम्प यांनी चीनसोबत केलेला तह हा तात्पुरता आहे. जेव्हा केव्हा अमेरिकेला रेअर अर्थ मटेरिअलसाठी चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही, त्यावेळी अमेरिका चीनला पुन्हा एकदा रगडण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष पेटणार.
भारतानेही चीनशी तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तेही फार काळ टीकणार नाही. हडपलेली जमीन आपल्याला चीनच्या कब्जातून सोडवायची आहे. चीनला आपली आणखी जमीन हडपायची आहे. त्यामुळे कधी ना कधी संघर्ष होणार हे निश्चित. कारणे बरीच आहेत. चीन भारताला सतत घेरण्याचा प्रयत्न करतो आहे. हिंद महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढतो आहे. हे सगळे असे मुद्दे आहेत ज्यामुळे भविष्यात भारत चीन संघर्ष अटळ आहे. तरीही तुर्तास झालेल्या तहाचे स्वागत करायला हवे. कारण हा तह ट्रम्प नावाच्या सनकी राष्ट्राध्यक्षाविरोधात आहे. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या शत्रूंनी असे तह केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने रशियाशी करार केला होता. पुढे हा करार तुटला आणि रशियाने जर्मनीच्या विरोधात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली. तिथेच हे युद्ध फिरले. भारत चीनचे एकत्र येणे हा ट्रम्प यांना निश्चितपणे धक्का आहे. हे संबंध म्हणजे अमेरिकेला ताळ्यावर आणण्याची हमी आहेत.







