१९५० च्या दशकात भारताने चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नेहरू सरकारने ‘पंचशील’ धोरण जाहीर केले. गळ्यात गळे घालून ‘हिंदी‑चीनी भाई‑भाई’ च्या घोषणा दिल्या. परंतु १९६२ मध्ये चीनने लडाख व अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. ६४ वर्षांनंतर पंचशीलचा सिझन-२ आलेला आहे. ‘हिंदी चीनी भाई भाई’चेही रिपॅकेजिंग झाले आहे. चीनी त्याला ‘ड्रॅगन-एलिफंट टॅंगो’ म्हणजे नृत्य म्हणतात. या नव्या भाईचाऱ्याचे निर्माते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ते नसते ते हे दिवस पाहायला मिळाले नसते. पूर्वी आणि आताची स्थिती यात फरक एवढाच गळ्यात गळे घालत असताना भारत चांदीपूरमध्ये नियमितपणे क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करतोय. १६ जुलैला लडाखमध्ये आकाश प्राईम क्षेपणास्त्राचीचाचणी करण्यात आली.
एका बाजूला चीनशी चर्चा सुरू असताना भारताने १६ जुलै २०२५ रोजी लडाखमध्ये १५ हजार फूट उंचीवर यशस्वीरीत्या ‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी केली. भारत नेहमीच क्षेपणास्त्र चाचणी ओडीशातील चांदीपूरमध्ये घेतो. यावेळी लडाखमध्ये चाचणी झाली, त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘आकाश प्राईम’ हे पर्वतीय क्षेत्रात शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा वेध घेणारे क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे त्याची चाचणी घेण्यासाठी लडाखचा इलाखाच उपयुक्त होता. लडाखमध्ये घेतलेली चाचणी हा चीनला दिलेला संकेत आहे. हा १९५० चा भारत नाही. नवा भारत आहे. शांती आणि सहअस्तित्वाची चर्चा करताना कबुतरे उडवणारा हा भारत नाही, तर युद्ध सज्जतेसाठी क्षेपणास्त्र उडवणारा भारत आहे, हे या चाचणीने पुन्हा दाखवून दिले. युद्धसज्जता हिच शांतीची पूर्व अट असते याची जाणीव असलेला हा भारत आहे. ‘आकाश प्राईम’ हे समुद्र सपाटीपासून १५ हजार फूटांच्या उंचीवर, कमी तापमानात कार्यक्षम असलेले, एकाच वेळी दोन लक्षांवर मारा करणारे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी निवडण्यात आलेली वेळ खूपच महत्वाची आहे. ‘ड्रॅगन एण्ड एलिफंट टॅंगो’ ची भाषा चीनी नेतृत्व करते आहे, त्यावेळी भारताने ही चाचणी केलेली आहे. भारताने चीनला दाखवून दिलेले आहे, आम्ही ना १९६२ विसरलो ना तुमची भूमीपिपासा. लडाखमध्ये आकाशची चाचणी झाल्यानंतर पुढच्याच दिवशी ओडीशातील चांदीपूरमध्ये आपण पृथ्वी-२ आणि अग्नि-१ क्षेपणास्त्राची चाचणी केली. गेल्या काही महिन्यांती बातम्यांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, दर चार दिवसांनी संरक्षण सज्जतेत भर पडल्याची एखादी तरी बातमी आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळते.
भारत‑चीन संबंध हे कायमच गुंतागुंतीचे राहिले आहेत. भारत आणि चीनमध्ये दरवर्षी ११८.४ अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. अर्थात भारताच्या दृष्टीने हा आतबट्टयाचा आहे. भारताकडून चीनला २०२३-२४ या आर्थिक वर्षांत झालेली निर्यात १६.६७ अब्ज डॉलर्स तर आयात १०१.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारताला या व्यपारात सुमारे ८५ अब्ज डॉलर्सची तूट आहे. चीनकडून आपण आय़ात करत असलेल्या सामानसुमानात भारतीय उद्योगांकडून वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे प्रमाण मोठे आहे. चीनवर फक्त आपण रेअर अर्थ मिनरल्ससाठीच नाही तर ऑरगॅनिक केमिकल्स, लोह, पोलाद, इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग, खते अशा अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
चीनची नजर फक्त भारताच्या बाजारपेठेवर असती तर मामला वेगळा असता. त्यांची नजर भारताच्या भूभागावर आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना जमीन गिळायची असते तेव्हा पंचशील आणि मैत्रीचा खुळखुळा ते बाजूला ठेवतात. जमिनीचा कब्जा घेतल्यानंतर पुन्हा वाजवायला लागतात. डोनाल्ड ट्रम्प सध्या सगळ्या जगाला टेरीफच्या नावाखाली रगडण्याचे काम करतायत. त्याची सुरूवातच चीनपासून झाली होती. दोन्ही देशांमध्ये आता ट्रेड डील झाले असले तरी चीनला खड्ड्यात घालणे हा ट्रम्प यांचा इरादा आहे, याची जाणीव चीनी नेतृत्वाला आहे.
‘नाटो’ अर्थात ‘नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे सदस्य असलेले देश आता चीन आणि भारताच्या मागे लागले आहे. रशियाकडून तेल विकत घेत असलेले तेल बंद करा ही त्यांची मागणी आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी त्यासाठी दुहेरी प्रतिबंधाची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे तर नित्यनियमाने ब्रिक्स देशांना धमकी देत असतात. त्यांना अशी ठाम खात्री आहे ही ब्रिक्स गट जगात नवे चलन आणून डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न करते आहे.
रशिया-भारत आणि चीन अर्थात RIC हा गट पुर्नस्थापित करण्याचा प्रय़त्न सुरू झालेला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जि लारोलोव्ह यांनी याचे सूतोवाच केले होते. मार्क रूट यांच्या धमकीनंतर चीनने याचा पुनरुच्चार केला. भारताची याबाबत अजून तरी कोणतीही प्रतिक्रीया नाही.
भारत यावेळ किती सजग आहे, पाहा. गलवान संघर्षानंतर भारत तीन बाबींचे कसोशीने पालन करतो आहे. चीनवर विश्वास ठेवायचा नाही, संवाद सुरू ठेवायचा आणि लष्करी सज्जता सुरू ठेवायची. ब्रिक्सच्या माध्यमातून चीनने आपले चलन म्हणजे युवान रेटण्याचा प्रय़त्न केला. म्हणजे डॉलरच्या ऐवजी चीनी चलन युवानमध्ये व्यवहार सुरू व्हावा असे चीनचे प्रयत्न होते. भारताने हा प्रयत्न हाणून पाडला. भारताने सतत मल्टीपोलर वर्ल्ड अर्थात बहुध्रुवीय जगाची संपल्पना मांडली आहे. चीन आणि रशिया सुद्धा जाहीरपणे याच संकल्पनेची पाठराखण करतात. परंतु, चीनचा हेतू मात्र अमेरिकेला बाजूला करून अमेरिकेची जागा घेणे, जगाची रचना एकध्रुवीय ठेवणे हाच आहे. ज्या दिवशी चीन अमेरिकेची जागा घेईल त्यावेळी अमेरिकेपेक्षा जास्त दादागिरी करेल हे भारताला चांगलेच ठाऊक आहे.
त्यामुळे भारत संरक्षण सिद्धता, सीमेवरील पायाभूत सुविधा यासाठी सढळ हस्ते खर्च करतोय. डीआरडीओ, एचएएल, बीईएल मार्फत मोठ्या संख्येने संरक्षण उत्पादने सज्ज करतो आहे. खासगी कंपन्यांनाही संरक्षण क्षेत्र खुले करून भारताने हा पसारा वाढवलेला आहे. स्वदेशीवर आपला भर असला तरी जे उपलब्ध नाही, ते बाहेरुन पैसे फेकून विकत घेण्याची आपली तयारी आहे. लडाख, अरुणाचलमध्ये आपण आधुनिक बंकर बनवले आहे. मोठ्या संख्येने अत्याधुनिक रडार यंत्रणा तैनात केली आहे. ड्रोनच्या माध्यमातून आपली चौफेर नजर असते. विपरीत हवामानात राहणाऱ्या जवानांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून आपण स्मार्ट किट्स बनवल्या आहेत. त्यांना जमेल तेवढ्या सुविधा आणि उपयुक्त साधने पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा:
संघ पदाधिकाऱ्याचा वेश घेवून वावरायचा छंगूर बाबा!
बदमाशांनी मुलीवर टाकले ‘ज्वलनशील पदार्थ’
मुख्यमंत्री धामींचा वृक्षारोपण उपक्रम
श्रावण महिन्यात मांसाहारी पदार्थांची विक्री, केएफसी आणि नझीर रेस्टॉरंटसमोर निदर्शने!
मोदी सरकारने सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सत्तेवर आल्या आल्या हाती घेतले. आजमितीला इथे १० हजार किमीवर रस्त्यांची निर्मिती झालेली आहे. अलिकडेच लोकार्पण झालेला चिनाब पूल, अटल टनेल, असे अभियांत्रिकीचे चमत्कार या भागात केंद्र सरकारने साकारले आहेत. युद्धजन्य परिस्थितीत सीमेवर विनाविलंब कुमक पाठवणे शक्य होईल असा हा चमत्कार आहे.
भारताला शेजारी देशांसोबत सहअस्तित्व मान्य आहे, परंतु आपल्या भूमीचे दान देऊन नाही. स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर शक्ती उपासना अनिवार्य आहे, याचे भान असलेले नेतृत्व सुदैवाने भारताला लाभले आहेत. शांतता कबुतरे उडवून निर्माण होत नाही, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमानांचे जत्थे हीच शांततेची हमी देणारी आय़ुधे आहेत. भारताच्या नव्या पंचशीलात कबुतरांना स्थान नाही. उलट रोगनिर्मिती कऱणारे हे कबुतर खाने आणि कबुतरे उडवणारी ती पोकळ विचारधारा नष्ट करणे हेच भारताचे नवे पंचशील आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







