क्वांटम तंत्रज्ञानामुळे येत्या काही वर्षांत सगळे जग बदलणार आहे. सध्या आपण वापरत असलेले संगणक केवळ खेळणी वाटतील, असे ‘क्वांटम कॉम्प्युटर’ येत्या काही वर्षांत आपल्या हाती येणार आहेत. हे सध्याच्या सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत प्रचंड वेगवान असल्यामुळे, तुमच्या सिस्टीमचे पासवर्ड कितीही गुंतागुंतीचे असले तरीही ते सेकंदांत क्रॅक करणे शक्य होईल. परिणामी, इंटरनेटवरून होणारा तुमचा संवाद सुरक्षित राहणार नाही. देशाची सुरक्षा, अर्थकारण आणि तुमची गोपनीयता धोक्यात येईल. ‘क्वांटम कम्युनिकेशन’ हे यावरचे प्रभावी उत्तर आहे. अमेरिका आणि चीनने या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे; भारताने जरी उशिरा सुरुवात केली असली, तरी आपला वेग कौतुकास्पद आहे. १००० किमी पर्यंतच्या अंतरावर क्वांटम कम्युनिकेशनचा प्रयोग आपण यशस्वी केला आहे.
जर तुमच्याकडे क्वांटम कम्युनिकेशनचे तंत्र नसेल, तर तुमच्या देशाची श्रीमंती, भक्कम सुरक्षा आणि प्रगती तकलादू व तात्पुरती ठरू शकते. तुमचा देश अशा एका किल्ल्यासारखा बनेल ज्याला सुरक्षा भिंती नाहीत, बुरूज नाहीत आणि भक्कम दरवाजेही नाहीत. क्वांटम कम्युनिकेशनच्या प्रांतात एक महत्त्वाचे पाऊल टाकत आपण ही तटबंदी आता मजबूत केली आहे.
‘नॅशनल क्वांटम मिशन’च्या अंतर्गत ‘क्यूएनयू लॅब्स’ (QNu Labs) या स्टार्टअपने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून १००० किमीच्या क्वांटम कम्युनिकेशनचा प्रयोग यशस्वी केला. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे डॉ. अभय करंदीकर यांनी हे यश म्हणजे क्वांटम मेसेजिंगच्या क्षेत्रातील मैलाचा दगड असल्याचे स्पष्ट केले आहे. या यशामुळे २००० किमीच्या क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्कचे भारताने जे लक्ष्य ठेवले आहे, त्या मार्गावर आपण अग्रेसर झालो आहोत, असेही ते म्हणाले.
डीआरडीओ (DRDO) आणि आयआयटी (IIT) दिल्लीने २०२० पासून या उपक्रमाला सुरुवात करून याचा भक्कम पाया निर्माण केला. हे अत्यंत गरजेचे होते.
हे ही वाचा:
‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या साम्राज्यावर ईडीचा हातोडा
आशाताईंची ती अखेरची पोस्ट खूप काही सांगून गेली!
अयोध्या राम जन्मभूमी मंदिरातील ‘ज्योती स्वरूप’वरून वाद
झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक
आजच्या जगात क्वांटम मेसेजिंगवर तुमचा वरचष्मा नसणे म्हणजे युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये तुम्ही रथहीन आणि शस्त्रहीन असल्यासारखे आहे. कारण तुमचे एआय (AI), क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि उपग्रह या सर्वांसाठी ‘डिजिटल कम्युनिकेशन’ आवश्यक असेल; आणि जर हा संवादच सुरक्षित नसेल, तर तुमच्या सुरक्षेची हमी कोण आणि कशी देऊ शकेल? यातला धोका तेव्हा जास्त वाढतो, जेव्हा चीनसारखा देश तुमचा शेजारी आहे आणि तो आज या क्षेत्रातील ‘दादा’ आहे. अमेरिकेच्या आयबीएम, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या क्वांटम चिप्सच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत आणि क्वांटम मेसेजिंगमध्येही त्यांचे काम वेगाने सुरू आहे.
हा प्रयोग महत्त्वाचा आहे कारण गेल्या काही वर्षांत हॅकिंगचा धोका वाढला आहे. हॅकिंगचा उपद्रव गंभीर आहे आणि भारतात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे प्रचंड वाढली आहेत. तुमच्या बँक खात्यात लाखो रुपये आहेत आणि त्याचा पासवर्ड चोरण्यात एखाद्याला यश आले, तर ते तुमच्यासाठी किती गंभीर असेल याचा विचार करा. म्हणजेच, एका क्षणी तुमच्या बँक खात्यात लाखो रुपये असतील आणि दुसऱ्या क्षणी ते ‘होते’ असे म्हणण्याची वेळ येईल. हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून संस्था, कंपन्या आणि सरकारलाही लागू होते.
भारताच्या पॉवर ग्रीड, बँकिंग, संरक्षण यंत्रणा, इस्रो (ISRO) आणि डीआरडीओ सारख्या संस्थांवर सायबर हल्ले झालेले आहेत. सायबर हेरगिरीमुळे तुमचा डेटा कधी नव्हे इतका असुरक्षित बनला आहे. सायबर अटॅक करून हा डेटा चोरणे किंवा तो नष्ट किंवा भ्रष्ट करणे हे शत्रूंचे लक्ष्य असते. सध्या आपण आपल्या सिस्टीमच्या सुरक्षेसाठी जी सांकेतिक भाषा वापरतो, तिचा आधार अल्गोरिदम आणि गणित आहे. परंतु, क्वांटम कम्युनिकेशनमध्ये जो संवाद किंवा पासवर्ड ‘क्वांटम की’ने (Quantum Key) सुरक्षित केला जातो, त्याचा आधार गणित नसून ‘भौतिकशास्त्र’ (Physics) असतो. भविष्यात येऊ घातलेल्या क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे सध्याचे इनक्रिप्शन (सांकेतिक भाषा) काही सेकंदांत तोडता येईल. सध्याच्या सुपर कॉम्प्युटरला जो कोड क्रॅक करायला हजारो वर्षे लागली असती, तो क्वांटम कॉम्प्युटरमुळे काही मिनिटांत क्रॅक होईल.
क्वांटमची दुनिया वेगळी आहे; तिथे मानकं आणि निकषच वेगळे आहेत. जिथे ‘छापा’ किंवा ‘काटा’ असे एकच उत्तर नसते, तिथे एकाच वेळी छापाही असू शकतो आणि काटाही!
सध्या आपण जी संगणक प्रणाली वापरतो, त्यातही डेटाला इतका धोका निर्माण झाला आहे; अशा परिस्थितीत क्वांटम कॉम्प्युटर आले तर काय होईल, याची आपण कल्पना करू शकतो. ही एक अशी ‘चावी’ बनेल ज्यामुळे कोणताही इंटरनेट संवाद, मग तो मेसेज असो वा पासवर्ड, सुरक्षित राहणार नाही. तुमच्याकडे कितीही किमती माल किंवा पैसा असला आणि तो ठेवण्यासाठी भक्कम लॉकर व चावी असली, तरीही क्वांटम कॉम्प्युटरने ते टाळे मिनिटांत नाही तर सेकंदांत उघडता येईल. म्हणजेच काहीच आणि कुठेच सुरक्षित नाही, अशी परिस्थिती ओढवू शकते.
तुम्ही तुमच्या सुरक्षित ईमेल पत्त्यावरून पाठवलेले निरोप आजही कुशल हॅकर हॅक करू शकतो; क्वांटममुळे तर हे खूप सोपे होईल. सगळी दारे सताड उघडली जातील. कल्पना करा, यामुळे तुमच्या सुरक्षेवर किती मोठे गंडांतर येऊ शकते! हे रोखण्यासाठी अशा प्रणालीची आवश्यकता होती जी ‘हॅकिंग प्रुफ’ असेल आणि जिला सायबर हल्ल्याचा धोका नसेल. त्यातूनच क्वांटम मेसेजिंगचा प्रयोग झाला. यात थेट डेटा पाठवला जात नाही; तर ‘फोटॉन्स’चा वापर करून आधी ‘क्वांटम की’ तयार केली जाते आणि त्यात मेसेज इनक्रिप्ट (कूटबद्ध) केला जातो. प्रकाशाचा सर्वात छोटा भाग म्हणजे ‘फोटॉन’. एकाच पदार्थाच्या फोटॉन्समध्ये असलेले नाते जुळ्या मुलांसारखे असते; एकाला धक्का लागला तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यांच्यात कितीही अंतर असले तरीही हे नाते कायम राहते, याला वैज्ञानिक भाषेत ‘इंटँगलमेंट’ (Entanglement) म्हणतात. या डेटामध्ये थोडीही छेडछाड झाली की दोन्ही बाजूंना त्वरित ‘अलर्ट’ मिळतो आणि मेसेज चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येते.
२०१९-२० मध्ये डीआरडीओ आणि आयआयटी दिल्लीने एकत्रितपणे १ किमी अंतरापर्यंत क्वांटम मेसेजिंगचा प्रयोग यशस्वी केला. २०२२ मध्ये आपण १०० किमी, तर २०२३ मध्ये ३०० किमीपर्यंत दोनपेक्षा अधिक ठिकाणी हा प्रयोग यशस्वी केला. इस्रोने उपग्रह-आधारित क्वांटम मेसेजिंगचा प्रयोगही यशस्वी केला आहे. हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता आपण १००० किमीच्या क्वांटम मेसेजिंगचा यशस्वी प्रयोग केला आहे.
जेव्हा युद्ध पेटते किंवा दोन देशांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होतो, तेव्हा ‘माहिती’ (Information) अत्यंत महत्त्वाची ठरते. तुमच्या क्षेपणास्त्रांचे कोड, लष्करी हालचालींचा तपशील, तुमचे ड्रोन्स आणि तुमची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या माहितीची सुरक्षा सर्वोच्च ठरते. माहितीची गळती तुमच्या देशाच्या विनाशाचे कारण होऊ शकते. ही माहिती शत्रूच्या हाती लागली, तर युद्ध सुरू होण्याआधीच तुमचा पराभव होऊ शकतो.
सायबर हल्ल्याद्वारे रिझर्व्ह बँक, शेअर बाजार आणि यूपीआय (UPI) यंत्रणा एका क्षणात उद्ध्वस्त केली जाऊ शकते. तुमची पॉवर ग्रीड, तेल आणि गॅसच्या पाईपलाईन्स, टेलिकॉम यंत्रणा आणि उपग्रह निकामी केले जाऊ शकतात. तुमच्या गुप्तचर यंत्रणांच्या संदेशांची देवाणघेवाण शत्रूच्या ताब्यात जाऊ शकते. अलीकडे सर्वत्र ‘डिजिटायझेशन’ झाल्यामुळे कोणतीही सिस्टीम हॅक करून एखाद्या देशाला गुडघ्यावर आणणे सोपे झाले आहे. सायबर युद्ध हे असे युद्ध आहे जे दिसत नाही आणि ज्याचे हादरे लगेच जाणवत नाहीत; परंतु त्याचे परिणाम अणुयुद्धाच्या तुलनेत कमी नसतात.
हे जास्त घातक तेव्हा ठरते जेव्हा अमेरिका, युरोप आणि चीनकडे ही ताकद असते आणि आपल्याकडे नसते. चीनची या क्षेत्रातील प्रगती थक्क करणारी आहे. २०१६ मध्ये चीनने पहिला क्वांटम उपग्रह अवकाशात पाठवला आणि शांघाय ते बीजिंग दरम्यान २००० किमीची क्वांटम फायबर लिंक तयार केली. २०३० पर्यंत त्यांचा क्वांटम आधारित इंटरनेटचा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मात्र, भारताकडेही तल्लख बुद्धिमत्तेची कमतरता नाही आणि या संशोधनासाठी खर्च करण्याची तयारी असलेले सरकारही आहे. भविष्यात आपली स्थिती व्हेनेझुएला किंवा इराणसारखी होऊ नये, यासाठी भारत सर्वच क्षेत्रांत शक्ती संपादन करत आहे. क्वांटम कम्युनिकेशन हा त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







