रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या देशांनी सचेत राहा, ब्लादमीर पुतीन यांना फोन करून युद्धबंदी गंभीरपणे घ्यायला सांगा, अन्यथा १०० टक्के दुहेरी प्रतिबंधांसाठी तयार राहा, अशी धमकी नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी भारत, चीन, ब्राझिल या देशांना दिली आहे. भारताने या धमकीला तितक्याचे टेचात उत्तर दिले आहे. या सगळ्या घटनाक्रमामुळे युरोपियन देशांची डबलढोलकी उघड केली आहे. युरोपियन देशांचा हाच खाक्या रशियाच्या पथ्यावर पडतो आहे. भारताचा खजिना भरण्याचे काम करतो आहे. या दांभिकपणाला तोड नाही. एखाद्याला हे आश्चर्यकारक वाटेल, परंतु यात एकाही पैशाची अतिशयोक्ती नाही.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अवघा युरोप हादरला आहे. आपला नंबर कधी येणार अशी धास्ती अनेक नाटो देशांनी घेतली आहे. नाटो अर्थात नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन. युरोपातील लोकसंख्या आणि आकाराने मूठभर असलेले देश अवाढव्य पसरलेल्या रशियाचा मुकाबला करू शकत नाहीत, म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या आशीर्वादाने नाटोची स्थापना झाली.
अमेरिकी परराष्ट्र धोरणाची री ओढणे एवढे काम हे देश इमाने इतबारे करत असतात. रशियाकडून भारत स्वस्तात तेल खरेदी करतो ही अमेरिकेची पोटदुखी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ती नाटो देशांचीही पोटदुखी झालेली आहे. स्वत: दोन्ही हातांनी शेण ओरपायचे आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचा, हाच या देशांचा इतिहास आहे. कधी काळी या देशांच्या अर्थकारणाला असलेली चमक आता पूर्णपणे झाकोळली आहे, तरीही जुना माज जात नाही. आजही वसाहतवादाचा माज या देशांच्या वागण्याबोलण्यातून डोकावत असतो. कधी काळी यांच्या गुलामीत असलेले भारत, चीनसारखे देश या छुटपुट देशांना खिशात घालून फिरण्या इतपत मोठे झाले आहेत, याचे यांना भानही नाही. त्यातूनच नाटोच्या सरचिटणीसांनी भारत, चीनला भिववण्याच्या उद्देशाने गर्जना केलेली आहे. माकडाने सिंहाच्या मिशांना पिळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा:
आमदार रोहित पवारांची पोलिसांशी अरेरावी
संभाजी ब्रिगेड : विद्वेष, ब्राह्मणविरोध, इतिहासाच्या विकृतीकरणाचा प्रवास
गुरूपौर्णिमेविरुद्ध डाव्यांचा कांगावा
भारताने मार्क रुट यांच्या आचरटपणाला दिलेले उत्तर झोंबणारे आहे. ‘आमच्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणे हा आमच्यासाठी प्राधान्यक्रम आहे. बाजारात असलेली उपलब्धता आणि जागतिक परीस्थिती लक्षात घेऊन आम्ही या संदर्भात निर्णय घेतो. या संदर्भात सर्वप्रकारच्या दुटप्पी निकषांपासून आम्ही सावध आहोत.’ असे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाची भाषा नेहमीच साजूक तुपात घोळलेली आणि साखरेच्या पाकात बुडवल्यासारखी असते.
जैस्वाल जे म्हणालेत त्याचा बोली भाषेतला अर्थ एवढाच की, ‘आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला जे परवडते ते आम्ही जिथे मिळेल तिथू घेणार. आम्हाला तुमच्या दुटप्पी आणि दांभिक सल्ल्यांची गरज नाही.’
नाटो देशांचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठीच मार्क रुट यांना भारत, चीन आणि ब्राझिलला धमकावण्याचा मोह झाला की काय ? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यांनी धमकी दिली नसती तर नाटो देशांनी युक्रेनला युद्धासाठी दिलेल्या मदती पेक्षा खूप जास्त तेल आणि गॅस त्यांनी रशियाकडून विकत घेतला हे उघड झाले नसते.
युक्रेन युद्धाच्या तिसऱ्या वर्षी भारताने रशियाकडून ४९ अब्ज युरोचे तेल विकत घेतले. चीनने ७८ अब्ज युरोचा धंदा रशियाला दिला. या दोन्ही देशांकडून रशियन तेलाचा धंदा बरकतीला आलेला आहे. परंतु त्यावर बोलायचा नैतिक अधिकार युरोपिय देशांना आहे का? या प्रश्नाचे उत्तर अजिबात नाही, असेच आहे. युक्रेनच्या गळ्यात गळे घालणारे हे देशच युक्रेनचा कडेलोट करतायत. एका बाजूला मिठी मारून पाठून खंजीर खुपसतायत.
२०२४ मध्ये युरोपातील देशांनी रशियाकडून २२ अब्ज युरो किमतीचे तेल आणि गॅस रशियाकडून विकत घेतले. त्या तुलनेत युक्रेनला १९ अब्ज युरोची मदत दिली. हे ‘द गार्डीयन’ या वर्तमानपत्राने फेब्रुवारी २०२५ मध्ये दिलेले आकडे आहेत. म्हणजे भारताला धमकावणाऱ्या युरोपने युक्रेनपेक्षा रशियालाच जास्त मदत केलेली आहे. यात तुर्कीयेची ३४ अब्ज युरोची खरेदी समाविष्ट नाही. तुर्कीये हा सुद्धा युरोपियन देश असून नाटोचा सदस्यही आहे.
सगळ्यात कहर मार्क रुट यांनी केलेला आहे. ते नेदरलॅंडचे माजी पंतप्रधान आहेत. २०१० ते २०२४ असा प्रदीर्घ काळ ते नेदरलॅंडचे पंतप्रधान राहीलेले आहे. सध्या नाटोचे सरचिटणीस आहेत. या नेदरलॅंडने युक्रेनच्या विरोधात रशियाची किती मदत केली याची कथा वेगळीच आहे. त्या कथेचा संबंध भारताशी आहे. भारत हा तेल उत्पादक देश आहे. आपल्या एकूण गरजेच्या १२-१३ टक्के तेल आपण भारतात उत्पादीत करतो. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा आयातदार देश आहे. याची चर्चा अनेकदा होते. परंतु भारत या जगातील सातव्या क्रमांकाचा पेट्रोलियम उत्पादकांचा निर्यातदार आहे, हे फार कमी जणांना माहित असेल.
भारत जिथे स्वस्त मिळते तिथून तेल घेतो. जगातील ४२ देशांकडून भारत तेल विकत घेतो. ते फक्त देशी गरजेसाठी वापरत नाही. आपल्या रिफायनरीमध्ये क्रुड तेलावर प्रक्रिया करून निर्माण होणारे, पेट्रोल, डीझेल, अन्य पेट्रोलियम पदार्थ भारत जगभरातील अनेक देशांना निर्यात करतो. युरोपातील अनेक देश भारताचे ग्राहक आहे. भारताच्या व्यापारी शहाणपणाची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने १५२ अब्ज डॉलर किमतीच्या तेल आणि गॅसची आय़ात केली. तर ८४.२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली. म्हणजे भारत आयात खर्चाच्या ५० टक्के रक्कम निर्यात करून परत मिळवतो. तेल ही खरे तर आपली कमजोरी, परंतु भारताने या कमजोरीला आपली ताकद बनवले आहे. हा शहाणपणाच युरोपला खूपतो आहे.
या निर्यातीचा एक मोठा ग्राहक युरोप आहे.
मिटंने दिलेल्या आकडेवारीनुसार नेदरलॅंड हा देश भारताच्या पेट्रोलियम उत्पादनाचा सगळ्यात मोठा आयातदार आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या पहील्या दोन महिन्यात नेदरलॅंडने भारताकडून ३.९ अब्ज डॉलर्सच्या पेट्रोलियम उत्पादनाची आयात केली आहे. एवढेच नाही, युरोपातील हा भारताचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात भारताने दररोज ३३५००० बॅरल पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली. सप्टेंबरमध्ये हा आकडा २१०००० बॅरल प्रतिदिवस इतका होता.
रणधीर जैस्वाल यांनी युरोपच्या ज्या दुटप्पीपणावर बोट ठेवले तो हाच आहे. युरोपिय देश थेट रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करतात. भारत हा तेल उत्पादक देश नाही, भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करतो, त्यावर प्रक्रीया करतो आणि तोच माल युरोपला विकतो हेही जगजाहीर आहे. म्हणजे सर्वसामान्य लोक जेवताना हात सरळ तोंडात नेतात, युरोपातील देश हात कानामागून फिरवून नंतर तोंडात नेतात.
चीनने सुद्धा नाटोला हाणले आहे. युक्रेनचे सार्वभौमत्व जसे महत्वाचे तसे नाटोचा पसारा वाढल्यामुळे रशियाला सुरक्षेबाबत असलेली चिंताही महत्वाची आहे. चुकीची माहिती पसरवून आगीत तेल ओतण्याचे धंदे नाटोने बंद केले पाहीजे, अशा खरमरीत शब्दात चीनने नाटोची खरडपट्टी काढली आहे. ड्रॅगन आणि हत्ती एकत्र यावेत यासाठी अमेरिका आणि युरोपातील देश ताकदीने काम करतायत. मार्क रुट यांच्या ताज्या विधानामुळे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.







