26 C
Mumbai
Wednesday, March 18, 2026
घरसंपादकीयचीनच्या उरात भरली धडकी बीएआरसीचे पाणबुड्यांना टॉनिक

चीनच्या उरात भरली धडकी बीएआरसीचे पाणबुड्यांना टॉनिक

गेल्या दशकभराच्या काळात आपण आपल्या नौदल क्षमतेमध्ये बरीच भर घातली.

Google News Follow

Related

ज्यांच्या नौदलाचा उल्लेख ब्लू वॉटर नेव्ही असा केला जातो असे जगात फक्त सहा देश आहेत. हे असे नौदल असते ज्याचा वावर जगातील प्रत्येक महासागरात आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन मोहीम राबवण्याची क्षमता, या नौदलाकडे असते. गेल्या काही वर्षात भारतीय नौदलाने हिंद महासागराच्या सीमा ओलांडल्या. जगभरात आपल्या युद्धनौका गस्त घालत असतात. संशोधकांनी ही क्षमता अनेक पटीने वाढवलेली आहे. भारतीय नौदलाची ही ताकद शत्रूच्या उरात धडकी भरवणारी आहे.

गेल्या काही काळात आपण पाहिले असेल तर दर आठवड्याला आपण सैन्यदलाशी संबंधित काहीना काही नवे करत असतो. एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी, कधी नव्या स्टेल्थ किंवा कामिकाझे ड्रोनची, तर कधी लेसर हत्याराची चाचणी आपण करत असतो. काहीना काही सुरू असते. देशाची सुरक्षा आणि मारक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने व्यापक प्रमाणात प्रय़त्न सुरू आहेत.

ऑगस्ट २०२५ च्या अखेरच्या आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या स्टेल्थ फ्रिगेटचे लोकार्पण करत असताना भारतीय नौदलाच्या ताकदीबद्दल काही आश्वासक विधाने केली. भारत आपल्या सागरी हद्दीचे रक्षण करण्यास आणि कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता ठेवतो. उदयगिरी आणि हिमगिरीमुळे भारताची ब्लू वॉटर नेव्ही म्हणून असलेली क्षमता आणखी वाढणार आहे.

जगभरातील महासागरात तुमचा वापर वाढवण्यासाठी तुमच्याकडे विमानवाहू नौका हव्या, पाणबुड्या हव्या, फ्रिगेट्स आणि विनाशिका हव्या. अमेरिकेकडे आण्विक नौदलाचा मोठा ताफा आहे. नौदलात पाणबुड्यांचे महत्व मोठे. कुणाच्याही नजरेत न येता या पाणबुड्या देशाच्या सरहद्दीचे रक्षण करीत असतात. दुसऱ्या देशाच्या सरहद्दीत डोकावत असतात, आंतरराष्ट्रीय पाण्यात वावरत असतात. अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटनकडे असलेल्या आण्विक पाणबुड्या मोठ्या संख्येने आहेत. तीन ते चार महिने पाण्याखाली सहजपणे राहू शकतात. पाणबुड्यांची ही जास्तीत जास्त काळ पाण्याखाली लपून राहण्याची क्षमता तुमच्या नौदलाची ताकद सांगणारी असते. या दृष्टीने  भाभा अणु संशोधन केंद्राने अर्थात बीएआरसीने केलेले नवे संशोधन महत्वपूर्ण आहे. सध्या आपल्याकडे ज्या आयएनएस अरीहंत, आयएनएस अरीघात या अरीहंत श्रेणीच्या आण्विक पाणबुड्या आहेत, त्यात वापरण्यात येणारे न्यूक्लिअर रिएक्टर बीएआरसीने विकसित केले आहेत. त्यांची क्षमता ८३ मेगावॅट आहे. यापेक्षा जास्त क्षमतेचे रिएक्टर असलेल्या पाणबुड्या आपल्याकडे आहेत. परंतु त्या विदेशी आहेत.

रशियन बनावटीच्या अकूला श्रेणीच्या पाणबुड्यांमध्ये १९० मेगावॅट क्षमतेचे रिएक्टर वापरले जातात. यापुढे भारतात प्रोजेक्ट ७७ अंतर्गत ज्या एस-५ श्रेणीच्या पाणबुड्या बनवल्या जातील त्यासाठी बीएआरसी निर्मित २०० मेगावॅट क्षमतेचे न्यूक्लिअर रिएक्टर वापरले जातील ही बाब महत्वपूर्ण आहे. जास्त क्षमतेच्या रिएक्टरमुळे पाणबुड्यांची पाण्याखाली राहण्याची क्षमता दुप्पट होणार आहे. भारतीय बनावटीच्या अरीहंत श्रेणीच्या पाणबुड्या साधारण पन्नास दिवस पाण्याखाली राहतात. २०० मेगावॅटचे रिएक्टर वापरल्यानंतर ही क्षमता साधारण २०० दिवस होऊ शकेल. या पाणबुड्या ही नौदलाची मोठी ताकद असते.

अमेरिकेकडे अशा आण्विक पाणबुड्यांचे जत्थे आहेत. व्हर्जिनिया-क्लास पाणबुड्या (२१० मेगावॅट) ओहायो-क्लास (२२० मेगावॅट), लॉस एंजेलिस-क्लास (१५० मेगावॅट ) या पाणबुड्यांचा वावर जगभरातील महासागरात असतो. चीनकडे ०९६ श्रेणीच्या पाणबुड्या याच क्षमतेच्या आहेत. लांब पल्ल्याच्या मिशनसाठी त्या उपयुक्त असतात. त्यांचा वावर शत्रूच्या लक्षात येणे कठीण असते. भारत आता त्याच पंक्तित उतरला आहे. चीनला धडकी भरेल अशी क्षमता आपण निर्माण करीत आहोत. ज्या वेगाने आपण हे साध्य करतोय तो वेग महत्वाचा आहे.

गेल्या दशकभराच्या काळात आपण आपल्या नौदल क्षमतेमध्ये बरीच भर घातली. आता ८० हजार कोटी रुपये खर्चून आपण ४ एम्फिबियन असॉल्ट शिप्स साठी लवकरच निविदा काढणार आहोत. माझगाव डॉक्स, एलएण्डटी, गार्डन शिपयार्ड सारख्या स्वदेशी कंपन्यांसोबत विदेशी कंपन्याही यात उतरणार आहेत. ही जहाजे म्हणजे चालतील फिरती बेटं असतील. यांचा वापर एका बाजूला युद्ध नौकांसारखा होईलच शिवाय मोठ्या संख्येने तुम्हाला सैन्य, रणगाडे, ट्रक्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचे असतील तर ही जहाजे उपयुक्त ठरतील. २०१४ पर्यंत आपण इतर देशांवर अवलंबून होतो. २०२५ पर्यंत फ्रिगेट्स असो वा पाणबुड्या आपली आत्मनिर्भरता सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढली. हिंदी महासागर, लाल समुद्र, पॅसिफीक मध्ये भारतीय नौदलाचा वावर वाढला आहे. देशाला मजबूती देण्यासाठी अर्थकारणाला मजबूती हवी. देशादेशांतील व्यापार सागरी मार्गाने चालतो. तुमच्या व्यापारी जहाजांना संरक्षण पुरवण्यासाठी तुमच्याकडे मजबूत नौदल असणे गरजेचे आहे. समुद्री चाचे असो वा दहशतवादी भारतीय नौदलाशी पंगा घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. इतरांचे पंगे सोडवण्याचे काम भारतीय नौदल करीत असते .

हे ही वाचा:

आसाममधून ३७ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले!

सुर्याकडे झेपावलेला माणूस…

पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार नाही!

 

स्वदेशी क्षमतेमुळे भारताचा ब्लू वॉटर नेव्ही म्हणून दबदबा वाढलेला आहे. भारतीय नौदलाची पूर्वी उपस्थिती क्षेत्रीय होती. २०२५ पर्यंत ती जागतिक झालेली दिसते. आपल्या युद्धनौकांची संख्या १२४ वरून १४५ झाली आहे. इंडो-पॅसिफीकमध्ये आपली उपस्थिती वाढली आहे. २०३५ पर्यंत १७५+ युद्धनौका आणि २०३७ पर्यंत २३० चे ध्येय. ही वाटचाल ‘आत्मनिर्भर बनवण्याचे प्रय़त्न सुरू आहेत.  जगभरातील आपले तळ निर्माण करण्याचा आपण प्रय़त्न करतो आहे. २०१४ पर्यंत आपण येमन आणि जिबूती दरम्यान असलेल्या ऍडनच्या आखातापर्यंत पेट्रोलिंग करायचो, मलेशिया, फिलिपाईन्सपर्यंत आपली जहाजे वर्षातून एक दोनदा भेटी देत. आपला वावर मुख्यत्वे हिंदी महासागरात होता.

२०२५ पर्यंत हे चित्र पूर्ण बदलले आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये मनीला, मलाक्का, भूमध्य सागरात सायप्रसपर्यंत, दक्षिणेकडे आफ्रिकेच्या अगदी जवळ असलेला सेशेल्स, गल्फ ऑफ गिनी असा आपला राबता सुरू  झालेला आहे. महत्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर आपल्या नौदलाची उपस्थिती जाणवण्या इतकी आहे. देशात शक्तिच्या उपासनेचे पर्व अर्थात नवरात्रोत्सव सुरू असताना भारताने गेल्या दशकभराच्या काळात कशा प्रकारे शक्तीची उपासना केली. नौदलाने आत्मनिर्भरतेची पारायणे कशी केली, त्याचा हा थोडक्यात लेखाजोखा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा