पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांच्या नावे देशात स्वच्छता अभियान सुरू केले, त्यावरून हा निष्कर्ष काढता येईल. परंतु गांधींचा प्रभाव असून देखील ते गांधी हत्येचा आरोप असलेल्या नथुराम गोडसे यांच्या अस्थि विसर्जनासाठी प्रयत्नशील आहेत असे दिसते. फासावर जाण्यापूर्वी गोडसे यांनी आपल्या मृत्यूपत्रात अखेरची इच्छा व्यक्त केली होती. ‘सिंधू अखंड हिंदुस्तानात प्रवाही होईपर्यंत माझ्या अस्थिंचे विसर्जन करू नका.’ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिंध भारतात दाखल होऊ शकतो, असे सूतोवाच केलेले आहे.
भारत गेल्या दहा वर्षात बदललेला आहे. भारताचा दृष्टीकोन आणि रणनीतीच नाही तर भारताची अनेक वर्षे कवटाळून ठेवलेली धोरणेही बदललेली आहेत. ही धोरणे एकतर गुंडाळून ठेवली जात आहेत किंवा सरळ सरळ त्याचे दहन होत आहे. पाकिस्तानसारख्या उपद्रवी शेजारी राष्ट्राला हा बदल असह्य होताना दिसतो आहे. या बदलात पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या आपल्या देशाची मृत्यूघंटा ऐकू येते आहे.
सत्ताकाळात काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानचा भूभाग घेण्याचा विचार स्वप्नात सुद्धा केला नसेल. त्यांच्या कार्यकाळात फक्त देशाच्या जमिनीचे दानपत्र वाटले जात होते. बांगलादेश, श्रीलंका, चीन, पाकिस्तान सगळ्यांनी भारताची जमीन ओरबाडली होती. त्यामुळे ‘आहे ते टिकवा’, एवढीच जनतेची अपेक्षा होती. काँग्रेसचे नेते पाकिस्तानची जमीन घेण्याचा विचार कऱतील हा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण तेच पाकिस्तानचे जन्मदाते होते. परंतु मोदी राज्यात पाकिस्तानला असे इशारे जाहीरपणे दिले जात आहेत.
भारताच्या संसदेने २२ फेब्रुवारी १९९४ मध्ये पाकव्याप्त काश्मीर हा हिंदुस्तानचा अविभाज्य हिस्सा आहे, हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. स्वातंत्र्योत्तर भारताच्या दृष्टीने अखंड हिंदुस्तानची निर्मितीचा अर्थ ‘पाकव्याप्त काश्मीरचा ताबा’ घेणे, एवढाच होता. म्हणजे त्यात पाकिस्तानच्या त्या भूमीचा विचारच नव्हता, जी भूमी फाळणीमुळे देशाने गमावली. ही भूमीही भारतात सामील झाली पाहिजे, कारण ‘सिंधू शिवाय हिंदूचा विचार शक्य नाही’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे. ‘सारे जग जर आमचा द्वेष करू लागले, किंवा साऱ्या जगाचा आम्हास द्वेष करावा लागला तरी सिंधूचा संबंध आम्ही सोडणार नाही. तोडणार नाही. सिंधूस आम्ही विसरू? सिंधू वाचून हिंदू म्हणजे अर्थाविना शब्द, प्राणाविना कुडी.’
सावरकरांचा तो विश्वास प्रत्यक्षात येईल. गोडसेंच्या अस्थि अखेर सिंधूमध्ये प्रवाहीत होतील, सिंध भारतात येईल, असे संकेत मिळू लागले आहेत. सिंधबाबत राजनाथ जे काही म्हणाले ते अभूतपूर्व आहे. देशात सत्ता राबवणाऱ्या पक्षाच्या संरक्षण मंत्र्याने अशा प्रकारचे विधान कधीही केले नव्हते. सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमात राजनाथ म्हणाले की, ‘सिंध हा भले आज भारताचा भूभाग नसेल, परंतु हा कायमच भारतीय सभ्यतेचा हिस्सा राहिलेला आहे. देशाच्या सीमा बदलत असतात, कोण जाणे उद्या सिंध भारताचा हिस्सा बनू शकेल.’
हे ही वाचा:
ममता बॅनर्जी फक्त संविधानाच्या गप्पा मारतात
केंद्राकडून मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
अंतर्गत भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी
हे विधान राजनाथ यांच्या तोंडून दुसऱ्यांदा आलेला आहे. २ ऑक्टोबरला ते म्हणाले होते, ‘कराचीला जाणारा एक रस्ता सर क्रिकमधून जातो.’ हे विधान सुद्धा सिंधशी संबंधित होते, कारण कराची हे बंदर सिंधमध्येच आहे. कच्छमध्ये २ ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी एका शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राजनाथ यांनी हे विधान केले होते. पाकिस्तानचा भूगोल बदलून टाकू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत ज्या वेगाने शस्त्रसज्ज होतो आहे, ते पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, आपण खूप मोठ्या युद्धाची तयारी करीत आहोत. अमेरिकी काँग्रेसने भारताला ९२.८ दशलक्ष डॉलर्सची शस्त्र विक्री करण्यास मंजूरी दिली, यात रणगाडा विरोधी जावलिन क्षेपणास्त्राचाही समावेश आहे. युक्रेन युद्धात या क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या रणगाड्यांचा निकाल लागला होता. युक्रेनने रशियाची मोठी हानी केली होती. ही क्षेपणास्त्रे भारत मोठ्या संख्येने विकत घेत आहे, याचा अर्थ पाकिस्तानसोबतची लढाई आता जमिनीवर लढण्याच्या दृष्टीने आपण तयारी करीत आहोत.
भारताने गेल्या दोन महिन्यांत आपल्या सर्व सीमांवर आणि विविध देशांच्यासोबत युद्धाभ्यास केला आहे. या युद्धाभ्यासासाठी आपण काही कोटी रुपये खच केलेले आहेत.
अनेक देशांसोबत आपले युदधाभ्यास सुरू आहेत. युकेसोबत उत्तरी अरबी समुद्रात पाणबुडीविरोधी युद्धाभ्यास कऱण्यात आला. मंगोलियामध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्ससोबत युद्धाभ्यास करण्यात आला. उत्तर भारतात अमेरिकेच्या स्पेशल फोर्स सोबत ‘टायगर क्लॉ’ नावाचा युद्धाभ्यास आपण केला. कोट्यवधी रुपये खर्चून तिन्ही दलांच्या सरावासाठी ‘त्रिशुल’ हा युद्धाभ्यास करण्यात आला. सिलिगुडी कॉरीडोअर येथे ‘तिस्ता प्रहार’ या युद्धाभ्यासात तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. गंगेच्या किनारी हरीद्वार येथे सुरू असलेल्या वेस्टर्न कमांडच्या ‘रामप्रहर’ कवायतीच्या दरम्यान आपल्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख ले.जन.मनोज कुमार कटीयार यांनी जी विधाने केली ती पाकिस्तानला हादरा देणारी आहेत.
‘पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केली तर यावेळी प्रत्युत्तर भयंकर असेल. लढाई अंतराळात होईल, सायबर युद्ध होईल, परंतु ही लढाई जिंकली जाईल जमिनीवरच. जोपर्यंत आपण जमिनीवर कब्जा करत नाही, तोपर्यंत आपण जिंकलो आहोत, यावर पाकिस्तानचा विश्वास बसणार नाही.’ ले.जन. कटीयार यांनी जी विधाने केली ती अत्यंत महत्वाची आहेत. देशाची मानसिकता स्पष्ट करणारी आहेत.
‘वेस्टर्न कमांड खड्ग कोअरच्या या कवायतीमध्ये शत्रूच्या प्रदेशात घुसणे, तो बर्बाद करून कब्जा करणे, याचा समावेश असून ही प्रत्यक्ष लढाईची तयारी आम्ही करीत आहोत. भूभागावरून पाकिस्तानमध्ये शिरताना मध्ये अनेक नद्या आणि दलदलीचे प्रदेश येतात. त्यातून या नद्या पार कशा करायच्या याचा अभ्यासही आम्ही करीत आहोत.’
राजकारणी वातावरण बघून विधाने करत असतात. लष्करी अधिकारी मात्र शब्द तोलून मापून वापरत असतात. त्यामुळे पाकिस्तानने ही विधाने गंभीरपणे घेतलेली आहेत. तिथे खळबळ माजली आहे.
केंद्राच्या सत्तेत एक अत्यंत महत्वाच्या पदावर असलेले राजनाथ यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री सिंध घेण्याची भाषा करतात. ‘कराचीला जाणारा रस्ता सर क्रिकमधून जातो’, असे विधान करतात आणि ले.जन. कटीयार यांच्यासारखा एक वरीष्ठ सेनाधिकारी जमीन ताब्यात घेतल्याशिवाय पाकिस्तानचा विश्वास बसणार आहे, असे सांगतो.
‘आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही, आम्हाला कोणाची जमीन नको’, ही सद्गुण विकृती भारताने अनेक वर्षे कवटाळली. शेजारी देश आमची जमीन लाटत असताना, आमच्या जमिनीवर डोळा ठेवत असताना, जमिनीवर दावा करत असताना आम्ही मात्र कोणाची जमीन घेणार नाही, हे पालूपद किती काळ आळवायचे ? असा प्रश्न देशाच्या प्रत्येक जागरुक नागरीकांच्या मनात होता. या सद्गुण विकृतीला तिलांजली देण्याच्या मानसिकतेत भारत आहे, हे स्पष्ट करणारी विधाने गेल्या काही दिवसापासून अशा व्यक्तिंकडून येतायत, ज्या व्यक्तिंकडे ही विधाने खरी करून दाखविण्याची क्षमता आहे.
जगात देशाची मान जर उंचावायची असेल तर फक्त चांगुलपणा असून उपयोगी नाही. सामर्थ्य नसताना पंचशीलाची पुंगी पोकळ ठरते. शक्तीचा दरारा आणि वचक असेल तरच जग मान तुकवते. नवा भारत हाच धडा गिरवतो आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







