28 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरसंपादकीयटिपूला आता कायमचे हद्दपार करा!

टिपूला आता कायमचे हद्दपार करा!

Google News Follow

Related

मालेगावातील उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या कार्यालयात लावलेला टिपू सुलतानचा फोटो एवढा उच्छाद मांडेल अशी अपेक्षा नसावी. पण ते घडले. त्यानंतर महाराष्ट्रात जे गेले दोन दिवस झाले हे आपण पाहिलेच आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. आंदोलने झाली, डोकी फुटली. यावर राजकारणही तापले आहे. भाजपा, काँग्रेस, उबाठा असे सगळेच एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. हे निव्वळ राजकीय आरोप आहेत. टिपूच्या नावाने घेण्यात आलेले जुने निर्णय, प्रस्ताव अशा सगळ्यांची माहिती खोदून खोदून काढली जात आहे. पण प्रश्न आहे तो हे घडले का?

टिपू सुलतानचा फोटो मालेगावातील उपमहापौरांच्या कार्यालयात लावण्यातच का आला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. काँग्रेस त्यावर मूग गिळून गप्प आहे. त्याऐवजी सपकाळ यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याचे धारिष्ट्य दाखवले. सपकाळांनीही हे न बोलता उपमहापौरांच्या त्या भूमिकेवर टीका करायला हवी होती. पण ते न करता ते मतपेटीवर लक्ष ठेवूनच बोलले. आज सपकाळ हे कितीही शिवाजी महाराज कसे महान होते हे सांगत असले तरी टिपू हा महान नाही हे बोलण्याची धमक त्यांनी दाखवलेली नाही. मूळ प्रश्न आहे तो टिपू सुलतानची तस्बीर एका उपमहापौराच्या केबिनमध्ये लागतेच का? हे होण्यामागे एक विचारधारा आहे. इथे प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाही तर टिपू सुलतानचा फोटो लावून त्या माध्यमातून एक संदेश देण्याचा आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजारात जोरदार उसळी

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: हरियाणातून मुख्य शूटरसह चौघे गजाआड

मुंबई लक्झरी हौसिंग मार्केटचा नवा विक्रम

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

उपमहापौर शान ए हिंद या समाजवादी पक्षाच्या आहेत. त्या महानगरपालिकेत सत्ता आहे ती इस्लाम पक्षाची. इस्लाम पक्षाचे इथे ३५ नगरसेवक निवडून आले आहेत तर त्याखालोखाल एमआयएम या पक्षे २१ नगरसेवक आलेले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचे १८ नगरसेवक आहेत. स्वाभाविकच मुस्लिमांचा पक्ष असलेल्या इस्लामने इथे सत्ता मिळविली आहे. इथे भाजपाचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. हा मुस्लिम बहुल भाग आहे हे ओघाने आलेच. या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा ३८३१ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघातील धुळे ग्रामीण, शिंदखेडा , बाह्य मालेगाव, बागलन आणि धुळे शहर या ५ विधानसभा क्षेत्रातून भाजपला १,९०,४९६ मतांची आघाडी मिळाली, परंतु सहाव्या मालेगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला तब्बल १,९८,८६९ मते तर भाजपला केवळ ४,५४२ मते मिळाली. मालेगाव सेंट्रलची लोकसंख्या ७६ टक्क्यांहुन अधिक मुस्लिम असल्याने भाजपाचे सुभाष भामरे यांचा अत्यल्प म्हणजे केवळ ३८३१ मतांनी पराभव करण्यात या भागातील लोकसंख्येची भूमिका महत्त्वाची राहिली.

हा भाग मुस्लिम बहुल असल्यामुळेच तिथे टिपू सुलतानचा फोटो लावण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले तर त्यात गैर काही नाही. त्यामागे काहीतरी नक्कीच राजकारण आहे. टिपूला स्वातंत्र्यसैनिक दाखवून त्याचा फोटो लावण्यात गैर काय असा सवाल उपस्थित केला जातो. मुळात महाराष्ट्रात महापुरुषांची कमी नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुषांच्या यादीत अग्रणी आहेत. त्यांचा फोटो लावण्याचा विचारही या उपमहापौर करत नाहीत, पण टिपूचा फोटो मात्र आवर्जून लावला जातो. कारण आम्ही आमचे महापुरुष निवडू, त्यांचे फोटो लावू असे सांगण्याचा प्रयत्न असला पाहिजे. त्या उपमहापौरांच्या कार्यालयातील भिंतीवर अन्य महापुरुषांचे फोटो असते आणि त्यात टिपूचा फोटोही लावला असता तर ती वेगळी गोष्ट असती. त्यावरही टीका झालीच असती पण इथे तर फक्त टिपू सुलतानचा फोटोच लावण्यात आलेला दिसतो. त्यामुळे यामागील कारण वेगळे आहे हे लक्षात येते. हा हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न आहे का याचीही शहानिशा केली गेली पाहिजे. कारण टिपूबद्दल कोणत्याही अस्सल हिंदूच्या मनात कधीही आपुलकीचा भाव नाही. तुमचे महापुरुष वेगळे असतील आमचा महापुरुष टिपू आहे, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे का, याचाही विचार केला गेला पाहिजे.

खरेतर या परिसराची डेमोग्राफी लक्षात घेता तिथे टिपू सुलतानलाच आपला आदर्श मानणाऱ्यांची संख्या जास्त असण्याची अधिक शक्यता आहे. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. आता यावर जे राजकारण चालले आहे ते राजकीय भांडण आहे. त्यात पडण्याची आवश्यकता नाही. ज्या टिपूचा महाराष्ट्राशी, महाराष्ट्रातल्या राजकारणाशी, इथल्या समाजव्यवस्थेशी संबंध नाही, त्याचा फोटो महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात असो की, संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या कार्यालयात असो. तो लागतोच कसा हा प्रश्न आहे. त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले हा काय टिपूचा फोटो भिंतीवर लावण्याचा निकष असू शकत नाही. तर केवळ तो मुस्लिम राजा होता आणि त्याने इंग्रजांशी युद्ध केल्याचा संदर्भ असल्यामुळे त्याला स्वातंत्र्यसैनिक ठरवून त्याचे उदात्तीकरण करणे हाच त्यामागील हेतू आहे का? हेही तपासले पाहिजे.

टिपू सुलतानसह इतिहासातील अनेकांचा खरा इतिहास समोर आला नाही. डाव्या इतिहासकारांनी तो इतिहास समोर येऊ दिला नाही, त्याला आपल्याला हवी तशी दिशा दिली. कालांतराने इतिहास संशोधन झाल्यावर इतिहासातील अनेक संदर्भ कसे चुकीचे होते, हे कळायला लागले. अशा चुकीच्या संदर्भातून त्यामुळेच टिपूला स्वातंत्र्यसैनिक ठरवण्यात आले. फातिमा शेख नावाची महिला पहिली मुस्लिम शिक्षिका होती, हा जसा बनाव रचण्यात आला आणि ज्याने तो रचला त्यानेच नंतर ते मान्य केले. तसाच आता टिपू स्वातंत्र्यसैनिक होता, हा बनाव रचण्यात येतो आहे. पाकिस्तानात हाच टिपू लोकप्रिय आहे, आदर्श आहे. मग भारतातील मुस्लिमांना तो आदर्श का वाटावा, हा प्रश्न आहे. टिपूने इंग्रजांविरुद्ध अनेक युद्धे लढली आणि जिंकली पण ती इंग्रजांचे भारतावर राज्य येऊ नये यासाठी नाही तर स्वतःचे राज्य वाचविण्यासाठीच. त्याने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केलेले आहेत हे वास्तव आहे. धर्मांतरे, देवळे उद्ध्वस्त करणे, हिंदूंची कत्तल करणे हेही त्याच्या देखरेखीखाली घडलेले आहे. त्यामुळे त्याला कोणत्या अंगाने आपला आदर्श मानता येईल याचा विचार व्हायला नको?

जे कुणी टिपू सुलतानची बाजू घेत असतील तेही हिंदूंवरील या अत्याचारांचे समर्थक आहेत, असे म्हणायला हवे. आज या मुद्द्यावर भाजपा, शिवसेना, उबाठानेही विरोधात भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसनेही मुस्लिमांना हा सल्ला द्यायला हवा की, टिपूचे महाराष्ट्रात कोणतेही स्थान नाही. पण काँग्रेस मतांच्या लाचारीपुढे असे बोलण्यास धजावत नाहीत. त्यामुळे आता भाजपाने कसे कुठल्यातरी रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यासाठी पुढाकार घेतला हे सांगून त्याचे राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर येते.

या प्रकरणाचा खरे तर आता सोक्षमोक्ष लागायलाच हवा. आज हे प्रकरण उद्भवले म्हणून त्यावरून इतके दिवस राजकारण सुरू आहे. पुन्हा कधीतरी असाच टिपू सुलतानचा फोटो कुणीतरी नाचवेल, कुणीतरी भिंतीवर लावेल किंवा कुणीतरी महाराष्ट्रातली टिपू जयंती करण्याचा घाटही घालेल. त्यातून हा वाद निर्माण होऊ शकेल. राज्य सरकार यासंदर्भात काही कठोर भूमिका घेणार आहे का? एकतर टिपू सुलतानचे सगळे कारनामे सरकारने जाहीर करायला हवेत. खऱ्या इतिहासाचे संदर्भ द्यावेत. त्यातून महाराष्ट्रात असलेल्या टिपू समर्थकांना हा खरा इतिहास कळू शकेल. शिवाय, महानगरपालिका असो की मंत्रालय की जिल्हा परिषद कुठल्याही कार्यालयात टिपूचा फोटो लावता येणार नाही, यासंदर्भातही सरकारने काही पाऊल उचलायला हवे. हा वाद एकदाचा मिटविण्यात आला पाहिजे. नाहीतर पुढच्या वेळेस पुन्हा एकदा असाच वाद निर्माण होईल, आणि त्याचे राजकीय भांडवल केले जाईल. त्यापलिकडे जाऊन काहीही होणार नाही.

टिपू सुलतान हा महाराष्ट्राचा आदर्श आहे का, महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या पंक्तीत त्याचे स्थान आहे का, याचे सरकारने एकदा उत्तर द्यायला हवे. हा कुण्या हिंदुत्ववादी सरकारचा, हिंदुत्ववादी संघटनेचा मुद्दा नाही हा महाराष्ट्रातील मराठी, हिंदू समाजाचा मुद्दा आहे. त्यांना दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असेल तर त्याला विरोध केला गेलाच पाहिजे. याआधीही अनेक ठिकाणी मिरवणुकात टिपूचे फोटो नाचविण्यावरून वाद निर्माण झालेले आहेत. आता तर सदर उपमहापौर म्हणाल्यात की, दालनात सध्या काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा टिपूचा फोटो भिंतीवर लावला जाईल. याचा अर्थ सदर उपमहापौरांना हा वाद वारंवार निर्माण करायचा आहे का, याचीही विचारणा व्हायला हवी. हा राजकीय पक्षांचा प्रश्न नसून समाजाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील हिंदूंच्या भावनांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकार या भावनांची कदर करणार आहे का?

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा