29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरसंपादकीयकाँग्रेसला रिजिम चेंज हवाय....हा घ्या पुरावा!

काँग्रेसला रिजिम चेंज हवाय….हा घ्या पुरावा!

Google News Follow

रिजिम चेंज हा शब्द गेले अनेक दिवस चर्चेत आहे. विरोधकांना सतत सत्तापालट, सत्ता उलथवून टाकण्याची स्वप्ने पडत आहेत. त्यातून रिजिम चेंजवर त्यांचा अफाट विश्वास बसला आहे. आता थेट निवडणुकीच्या माध्यमातून लढणे अशक्य आहे, आपल्याकडे कार्यकर्ते नाहीत, लोकांचा पाठिंबा नाही, सत्ताधारी भाजपा, एनडीएच्या ताकदीपुढे आपण थिटे पडतो आहोत, अशा सगळ्या परिस्थितीत सत्ता उलथवून टाकणे, लोकांच्या मनात भ्रम निर्माण करून त्यांना सत्तापालटासाठी उद्युक्त करणे असे उद्योग विरोधकांना करण्याशिवाय आता पर्याय नाही, असे चित्र उभे केले जात आहे. त्याचे प्रतिबिंब आपण गेल्या काही महिन्यातील विविध आंदोलनातून पाहिले. केवळ एवढेच नव्हे तर विरोधकांमधील नेत्यांच्या तोंडीही रिजिम चेंजची भाषा आपण ऐकलेली आहे. नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण ही सगळी मंडळी रिजिम चेंजसाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत.

काँग्रेससारख्या गेली ७० वर्षे देशातली सत्ता उपभोगलेल्या पक्षालाही निवडणुकीतून आपण काही करू शकतो, यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हेदेखील आंदोलनातून व्यवस्थांवर चिखलफेक करत आहेत. कधी न्यायालयावर ते मोर्चा काढतात तर निवडणूक आयोगाला कठड्यात उभे करतात आणि निवडणूक आयुक्तांचा राजीनामा मागतात. त्यामुळे काँग्रेसच्या मनातही रिजिम चेंजचा विचार ठासून भरलेला आहे, असे म्हणता येईल. पण ही भूमिका राहुल गांधींनी थेट मांडलेली नाही. मात्र झारखंडमधील त्यांचे एक मंत्री इरफान अन्सारी यांनी ही भाषा थेट वापरली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जे पोटात आहे, ते अन्सारींच्या ओठावर दिसून आले.

इरफान अन्सारी हे झारखंडमधील काँग्रेसचे मंत्री आहेत. तिथे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आहे. काँग्रेस हा त्यातला एक भाग आहे. अन्सारी यांचा सदर व्हीडिओ हा चार दिवसांपूर्वीचा आहे. १ नोव्हेंबरला राहुल गांधींची सभा होती त्यावेळचा. मात्र तो आता व्हायरल झाला आहे. तरीही अन्सारी यांची भूमिका ही देशात आग लावण्याची आहे, हे काही लपलेले नाही.
झारखंड सरकारमधील हे मंत्रीमहोदय म्हणतात की, देश कोसळून पडण्याच्या मार्गावर आहे. मी दिल्लीला विद्यार्थ्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या मनात संताप होता. भारतात बांगलादेश, नेपाळसारखी स्थिती होणार आहे. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची इच्छा आहे. जर ४० लाख लोक रस्त्यावर उतरले तर त्यांना रोखणे कठीण जाईल. राहुल गांधी यांनी या तरुणांना थांबवून ठेवलेले आहे. अन्यथा ते रस्त्यावर येण्यास तयार आहेत. हे महोदय एवढे बोलून थांबत नाहीत तर ते म्हणतात की, या तरुणांना थांबवणे कोणत्याही सुरक्षा दलांनाच काय सेनेलाही कठीण जाईल. इथे बांगलादेश, नेपाळपेक्षाही भयानक स्थिती होईल.

अन्सारी यांची ही आगीत तेल ओतणारी विधाने म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामाच असल्याचे दिसते. भलेही काँग्रेसचे नेते थेट असे म्हणताना दिसत नसले तरी त्यांचे इरादे हे रिजिम चेंजचेच आहेत. आपला नेता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना आता अराजक हाच एकमेव मार्ग त्यांना दिसत असेल तर ते त्यांच्या एकंदरीत निराशाजनक, हतबल मनस्थितीचे दर्शन घडवते.

यासंदर्भात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांने खंडन केलेले नाही, हे विशेष. याचा अर्थ काँग्रेसलाही हीच भूमिका मान्य आहे. पण केवळ रिजिम चेंज एवढीच भूमिका नाही तर देशाच्या लष्करालाही आव्हान देण्याची भाषा अन्सारी करत आहेत, हे जास्त निंदनीय, भयंकर आहे. देशाचे लष्करही रस्त्यावर उतरणाऱ्या तरुणांना थांबवू शकणार नाही, अशी भाषा अन्सारी वापरतात तेव्हा त्यांच्या मनात किती मोठे षडयंत्र शिजत असेल याची कल्पना येते.
अर्थात, ४० लाख तरुण रस्त्यावर उतरतील एवढी काँग्रेसची ताकद नाही हेदेखील खरे आहे. पण भडकावण्याची भाषा करायला काय जाते. त्यातून काही वाईट घडले, देशात अराजक निर्माण झाले तर आपल्याला सोयीचेच आहे, अशी काँग्रेसच्या या नेत्यांची धारणा झालेली आहे.

विशेष म्हणजे जिथे लोकशाही मार्गाने सत्ता आली त्या काँग्रेस राज्यातले लोकही रिजिम चेंजची भाषा करतात म्हणजे त्यांची जी संविधानाबद्दलची विधाने आहेत, ती किती पोकळ आहेत, याची खात्री पटते. १ नोव्हेंबरला दिल्लीत १० लाख लोक जमतील अशी राणा भीमदेवी थाटात काँग्रेसने गर्जना केली होती, प्रत्यक्षात ३० हजारापलिकडे गर्दी गेली नाही. त्याचे खोटे व्हीडिओ, फोटो टाकून गर्दी झाली, गर्दी झाली म्हणून प्रचार केला गेला खरा पण लोकांना पुरते ठाऊक होते, की, किती गर्दी झाली ते. त्यामुळे जे १० लाख लोक जमवू शकत नाहीत, ते ४० लाख लोक जमवतील का हा प्रश्न आहेच. तरीही अशावेळी बेसावध राहून चालणार नाही.

देशाची सुरू असलेली प्रगती, विकास, स्थिर सरकार ही अनेकांच्या डोळ्यात खुपणारी बाब आहे, अनेकांची ती पोटदुखी आहे. विशेष म्हणजे भारतातील तथाकथित पुरोगामी, विचारवंत, लेखक, पत्रकार यांना गेली १२ वर्षे या पोटदुखीने बेजार केले आहे. त्यांना २०१९लाच सरकार जाईल आणि आपले साम्राज्य पुन्हा एकदा येईल अशी वेडी आशा होती, पण तसे काहीही झाले नाही. शिवाय, केवळ केंद्रातच सरकार आहे, असे नाही तर अनेक राज्यांत भाजपा, एनडीएची भक्कम सरकारे तयार झाली आहेत. प्रामुख्याने बंगालमध्ये जो मोठा बदल झाला तो विरोधकांच्या चिंधडया उडवणारा ठरला. त्यामुळे सगळे विरोधक पुरते बिथरले आहेत. ममतांसारख्या नेत्या जर पराभूत होऊ शकतात, तर आपले काय.

ज्या राज्यात कधीही भाजपाचे सरकार नव्हते तिथे भाजपा, एनडीएचे सरकार आलेच कसे या विचाराने विरोधकांना पुरते भंडावून सोडले आहे. त्यामुळे आताच पावले उचलली नाहीत तर आपले काही खरे नाही, या विचाराने त्यांना पछाडले आहे.
कॉक्रोच जनता पार्टी हे अशाच विचारातून निपजलेले एक बायप्रॉडक्ट आहे. त्यांच्या पाठीशी म्हणूनच विरोधक आहेत की, या माध्यमातून आपल्याला कदाचित आज ना उद्या खुर्ची मिळेल. नेहा बोराच्या खांदयावर हात ठेवून राहुल गांधी दिल्लीतील मोर्चात चालताना दिसले त्याचा प्रतिकात्मक अर्थ हाच होता की, डाव्यांच्या खांद्यावर बसून आता राहुल गांधींना हा रिजिम चेंजचा खेळ खेळायचा आहे.

अन्सारी यांनी केलेले विधान ही काँग्रेस आणि विरोधकांची मानसिकता बनली आहे, हे स्पष्टपणे दाखवते. फ्रान्स, इटली, बेल्जियमसारखे आपल्याइथेही काहीतरी घडावे, अराजक माजावे, लोक रस्त्यावर उतरावेत अशी त्यांची जबर इच्छा आहे. अमेरिकेत डोनाल्ट ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकीत जो तडाखा बसला आहे, त्यामुळेही विरोधकांमध्ये आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र ट्रम्प यांच्या हेकेखोर स्वभावामुळे त्यांनी जे इराण युद्ध छेडले त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीतून पाहायला मिळाले आहेत. ट्रम्प यांना बसलेला दणका याचा भारताशी संबंध जोडणे मूर्खपणाचे ठरेल. मात्र तरीही त्यावर स्वार होऊन भारतातही नागरीक काहीतरी करतील असे विरोधकांना वाटते.

हे ही वाचा:

फटाक्यांचे अनधिकृत स्टॉल,दादरच्या सुरक्षेशी खेळ!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शरद पवारांची रुग्णालयात भेट

दिवाळीपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाचा विळखा

‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

राहुल गांधी हे लवकरच अमेरिकेला जाणार आहेत. त्यामागे कारणे काय हे शोधले जात आहे. पण अन्सारी यांच्या विधानातून तर काही संकेत मिळत नाहीत ना. राहुल गांधी नेहमी परदेशात जातात आणि काहीतरी मसाला घेऊन येतात. जो त्यांना संसदेच्या अधिवेशनात उपयोगी ठरतो. यावेळी अधिवेशनाच्या आधी ते भारतात परतणार आहेत. त्यावेळी देशात रिजिम चेंजसाठी वेगळे काही घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा उपयोग अधिवेशनात चिखलफेक करण्यासाठी केला जाऊ शकतो. फक्त तो कोणता विषय राहुल गांधींच्या हाती असणार हे लवकरच स्पष्ट होईल.

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकात जो दणका ट्रम्प यांना बसला आहे, त्यामुळे तेलाचे दर खाली आलेत, भारताचा शेअर बाजारही उसळला आहे. इराण युद्धाच्या काळात ८० हजारच्या खाली गेलेला सेन्सेक्स आता पुन्हा ८० हजारांवर आला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत प्रचंड उत्साह दिसतो आहे. हे विरोधकांच्या पचनी पडणारे नाही, इतके विरोधी चित्र भारतात आहे. ट्रम्प यांनी गेल्या काही काळात भारतविरोधी एकप्रकारे भूमिका घेतली. भारताविरोधात वेगवेगळे दावे करणे, भारतावर टॅरिफ लावण्याच्या धमक्या देणे, भारताला गुडघ्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्योग त्यांनी केल्यानंतर आता तेथील जनतेनेच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे तिथे मध्यावधी निवडणुकांत निवडून आलेले अनेक भारतीय आहेत.

या भारतीयांनाच दबावाखाली आणण्याचा इरादा व्हिसा वगैरेच्या माध्यमातून ट्रम्प यांनी बाळगला होता. पण आता त्यांचीच गठडी मतदारांनी वळली आहे. त्यामुळे भारताला आव्हान देणारे गेल्या काही काळात चांगलेच नरमल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारताच्या प्रगतीपुढे अनेकांना नतमस्तक व्हावे लागले आहे. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक झालेले आहे. त्यामुळे भारताचे शत्रू कमी आणि मित्र जास्त अशी सध्याची स्थिती आहे. या परिस्थितीत रिजिम चेंज करण्याची भाषा मूर्खपणा ठरणार आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे. राहुल गांधी अमेरिकेला गेले तरी त्यांच्या पदरात अमेरिका विद्यमान स्थितीत काही टाकू शकेल अशी स्थिती अजिबात नाही. विस्कटले आहे तेच सावरण्याची वेळ अमेरिकेवर सध्या आली आहे. पण भारतातील काही देशविरोधी हे दंश करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या मनात हे रिजिम चेंजचे कारस्थान रुंजी घालत आहे, त्याचाच पुरावा अन्सारी यांनी दिला आहे. बाकी विरोधकांना कितपत हे विचार पटतील माहीत नाही, पण सध्या राहुल गांधींच्या मागे फटफटत जाण्याशिवाय, त्यांना पर्याय नसल्यामुळे ते अळीमिळी गुपचिळी भूमिकेत शिरले आहेत एवढेच.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा