मुस्लीम आमदार, बांगलादेशी, बांगलादेश सगळेच सोडून गेले…

मुस्लीम आमदार, बांगलादेशी, बांगलादेश सगळेच सोडून गेले…

तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून मुस्लीमांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचा विरोध हे ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचे सूत्र राहीलेले आहे. ज्या मंचावरून त्यांनी हिजाब घालून आयता म्हणण्याची नौटंकी केली, त्याच मंचावरून त्यांनी हिंदू धर्म गंदा असल्याची मुक्ताफळे उधळली. हिंदू मतदारांनी त्यांच्या कर्माचे फळ निवडणुकीत त्यांच्या पदरात टाकले. परंतु ज्या मुस्लीमांची त्यांनी इतका काळ चाटुकारीता केली, त्यांनीही त्यांना लाथा घातल्या आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या तृणमूलच्या ३० मुस्लीम आमदारांपैकी १७ आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. चाटुकारीता अगदीच वाया गेली. मतदार, आमदार सोडून गेले. बांगलादेशी पळतायत. ओस्मान हादी हत्या प्रकरणी बांगलादेशची सहानुभूती मिळवण्याचा ताजा प्रयत्नही वाया गेला.

प.बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. त्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्याच्या काळात जे काही घडले आहे, ते अभूतपूर्व आहे. बुलंद असलेला एखादा किल्ला लोण्याच्या गोळ्यासारखा विरघळावा असे चित्र दिसते आहे. ममता बॅनर्जी यांचा उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसची उबाठा होताना दिसते आहे. निवडणूक प्रचारात डरकाळ्या फोडणारे अभिषेक बॅनर्जी अटक टाळण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात धडपड करताना दिसत आहेत.

पक्षाच्या ८० पैकी ५९ आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे.

ममता बॅनर्जी यांना सोभान चट्टोपाध्याय यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ घालायची होती. त्यासाठी त्यांनी आमदारांची बैठक बोलावली. जेमतेम २० आमदार बैठकीसाठी आले. बाकी फिरकलेही नाहीत. जे आले नव्हते त्यांच्या बनावट सह्या करून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. रथींद्र बोस हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. गैरहजर आमदारांनी पत्रावरील सह्या आमच्या नाहीत, अशी बोंब ठोकली. बोगस सह्या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे बोट दाखवण्यात आले. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात तुरुंगात जाणार याची खात्री झाल्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनी अटक टाळण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रितब्रत बॅनर्जी यांच्याकडे ५८ आमदार असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्यांची नियुक्ती विरोधी पक्ष नेतेपदी केली. त्यांना विधी मंडळात स्वतंत्र दालनही दिले. त्यामुळे ममता प्रचंड बिथरल्या आहेत. त्यांच्या संतापाचे आणखी महत्वाचे कारण म्हणजे रितब्रत यांना समर्थन देणाऱ्या आमदारांपैकी १७ आमदार मुस्लीम आहेत. ज्यांना खूष करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सत्ताकाळातील १५ वर्षे खर्च केली. मुस्लीमांवर राज्यांचा सगळा खजिना लुटवला. विकास कार्य बाजूला ठेवून इमामांना पगार दिले. कायदा धाब्यावर बसवून मुस्लीमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले.

हिंदूवर वरवंटा चालवण्याची त्यांना पूर्ण मुभा दिली. जहांगीर खान सारखे गुंड पोसले, त्यांना एकेक क्षेत्र आंदण म्हणून दिले. तिथे हिंदूंचे जीवित, वित्त आणि अब्रु सगळ्याचेच शोषण होत होते, ममता तुष्टीकरणाच्या राजकारणापायी या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत होत्या. इतके सगळे केल्यानंतरही वाईट काळात मुस्लीम ममता यांच्यासोबत राहीले नाहीत. तृणमूलच्या तिकीटावर जिंकून आलेल्या मुस्लीम आमदारांची संख्या ३० आहे. त्यापैकी रितब्रत यांच्यासोबत १७ आमदार आहेत. म्हणजे अल्पसंख्यकातील बहुसंख्य ममता यांच्या विरोधात गेले आहेत. जेमतेम १३ त्यांच्यासोबत राहीले आहेत.

मुख्यमंत्री पदाची शपथ अल्लाच्या नावाने घेऊनही त्यांना अल्ला पावलेला दिसत नाही. ममता पायउतार झाल्यानंतर बांगलादेशी त्यांच्या देशी परतू लागले आहेत. ‘ममता परत सत्तेवर आल्यावर पुन्हा परतू’ अशा भावना मीडियाच्या कॅमेरासमोर व्यक्त करताना दिसत आहेत. देशात सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे ममतांनी शेजारच्या बांगलादेशकडे पाहायला सुरूवात केलेली दिसते. एकाकी झालेल्या ममतांना बांगलादेशची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंत तिथूनही त्यांना सणसणीत चपराक बसलेली आहे.

पराभवाला बाप नसतो, पराभूतांना साथ नसते, हे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झालेले आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार तथाकथित जेन झी क्रांतिने गिळले. त्यानंतर मोहमद यूनस यांचे हंगामी सरकार सुमारे दिड वर्षे सत्तेत होते. यूनस यांनी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्यानंतर विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान बिन हादी याची भरदिवसा हत्या झाली. शेख हसीना यांच्याविरोधात जे आंदोलन झाले होते, त्यात हादीची भूमिका महत्वाची होती. यूनस सत्तेवर आल्यानंतर हादीने इन्किलाब मंच नावाची संघटना स्थापन केली होती. ढाका-८ या मतदार संघातून तो निवडणुकीच्या मैदानात उतरणार होता. हत्येच्या काही दिवस आधी त्याने भारताच्या इशान्येचा भाग बांगलादेश दाखवणारा ग्रेटर बांगलादेशचा नकाशा बनवण्याचा आगाऊपणा केला होता. तो सतत भारतविरोधी विधाने करत होता.

१२ डिसेंबर २०२५ रोजी हादी रिक्षात बसून घरी परतत असताना मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. एअर एम्ब्यूलन्सने त्याला उपचारासाठी सिंगापूरमध्ये पाठवण्यात आले होते. उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. हादीच्या दोन हल्लेखोरांना प.बंगालच्या पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने भारत बांगलादेश सीमेवरील बोनगाव येथे अटक केली होती. त्यानंतर त्यांना अधिक तपासासाठी एनआयएकडे सोपण्यात आले होते. आजही हे हल्लेखोर एनआयएच्या कोठडीत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी एक ताजा गौप्यस्फोट करून खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हादीच्या हत्येशी संबंधित आरोपींची ओळख जाहीर करू नये म्हणून गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्यावर दबाव आणला होता’, असा दावा ममता यांनी केला आहे. ‘हादीच्या हत्येमागे कोण आहे, हेही आपल्याला माहित आहे’, असे पिल्लूही त्यांनी सोडून दिले.

ममता यांच्या या गौप्यस्फोटामागे असलेला हेतू लपलेला नाही. सध्या त्यांच्या पाठीशी कोणीही नाही. आधी मतदार सोडून गेल्यामुळे सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर ममतांनी पोसलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी पळ काढायला सुरूवात केली. १७ मुस्लीम आमदारांसह ५८ आमदारांनी पक्ष सोडला. धरणे आंदोलनाचा तमाशा करण्याचा प्रय़त्न केला तर शंभर लोक सुद्धा जमले नाही. सोबत कोणीही नसल्यामुळे किमान बांगलादेशची तरी सहानुभूती मिळवावी, या उद्देशाने त्यांनी हादीच्या हत्येच्या शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला. किमान बांगलादेशी तरी आपल्याबाजूने काही तरी बरे बोलतील असा हिशोब होता. ही खेळीही ममतांवर उलटलेली आहे. बांगलादेशनेही ममतांना सणसणीत चपराक हाणलेली आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी ममतांना झोंबणारी प्रतिक्रीया दिली आहे. ‘दुसऱ्या देशातील पराभूत राजकारण्याने केलेल्या विधानावर आम्हाला व्यक्त होण्याची गरज नाही. हादी हत्याप्रकरणात आमचे गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय भारत सरकारसोबत काम करीत आहे. त्यात बऱ्यापैकी प्रगतीही झाली आहे. हादीप्रकरणात अटक झालेले आरोपी सध्या भारताच्या कोठडीत आहेत. लवकरच त्यांना आमच्या स्वाधीन केले जाईल अशी अपेक्षा आहे’, असेही त्यांनी सांगितले.

बांगलादेशात ममता यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. निवडणुकीत जर खांदे पालट झाला तर तिथे घुसलेल्या बांगलादेशींचे लोंढे बांगलादेशात शिरतील अशी भीती बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान आणि परराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी व्यक्त केली होती. याचा अर्थ स्पष्ट होता. ममता यांचे सरकार नाही तर तिथे बांगलादेशींना आश्रय मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. बांगलादेशींवर केलेल्या उपकाराची जाण ठेवून बांगलादेशातील नेते तरी आपल्याबद्दल काही सहानुभूती व्यक्त करतील, आपल्याला डोक्यावर घेतील, असे ममतांना वाटले होते. इथेही त्यांचा अपेक्षा भंग झाला. वाईट काळात सावली सुद्धा सोडून जाते असे म्हणतात. ममता यांचे तसेच झालेले आहे. बांगलादेशी, बांगलादेश कोणीही कामी येताना दिसत नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version