रिसर्च एण्ड एनालिसिस विंग, इंटेलिजन्स ब्युरो या गुप्तचर यंत्रणा म्हणजे केंद्र सरकारचे कान, नाक आणि डोळे. यांचे प्रमुख पंतप्रधानांना रोज ब्रीफिंग करतात. देशात, जगात काय घडते आहे, त्याची माहिती देतात. अलिकडे ही मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाजूला ठेवून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रिपोर्ट करातायत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचाही यात समावेश आहे. देशातील जनतेचा यावर विश्वास बसणे कठीण आहे, परंतु राहुल गांधी यांनी हा ताजा दावा केला आहे. पक्षाच्या आदीवासी आघाडीच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत.
आदीवासी आघाडीच्या कार्यक्रमात राहुल गांधी आदीवासी या विषयावर मीठापुरते बोलले. बाकी त्यांनी आर्थिक संकटापासून कोसळडणाऱ्या अर्थकारणाबाबत भरपूर वक्तव्ये केली. मोदींचे पंतप्रधान पद जाणार ही भविष्यवाणी पुन्हा एकदा केली. एखादे कर्ण पिशाच्छ राहुल गांधी यांना वश झाले आहे का, असा संशय येण्या इतपत राहुल गांधी आत्मविश्वासाने बोलत होते. कदाचित कर्ण पिशाच्छही थापा मारून राहुल गांधींसोबत टाईमपास करत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.
राहुल गांधी काय म्हणाले हे समजून घेण्याआधी काँग्रेस पोषित इको सिस्टीमचा अविभाज्य घटक असलेले डावे इतिहासकार रामचंद्र गुहा हे करण थापरच्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांच्या बद्दल काय म्हणाले ते जाणून घेणे महत्वाचे आहे. वायरवर ही मुलाखत झाली. थापर काय किंवा गुहा काय, हे दोघेही मोदींचे घनघोर विरोधक. थापर यांनी मोठ्या आशेने गुहा यांना मुलाखतीसाठी बोलावले असणार. गुहा मोदींच्या विरोधात काही तरी बोलतील, त्यांचा आणि आपला मोदीविरोधी कंड शमवतील अशी त्यांची अपेक्षा असावी. परंतु झाले भलतेच. ‘सध्या देशावर आलेल्या ऊर्जा संकटाचा आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, तसा मुकाबला करण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यात नाही. त्याच्याकडे पंतप्रधान पदाला योग्य असा कोणताही गुण नाही.’ असे धक्कादायक विधान गुहा यांनी केले. गुहा सत्य तेच बोलले, परंतु हे सत्य काँग्रेस पोषित गुहा यांच्या तोंडून आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. गुहांची मुलाखत सोनिया मातोश्री यांच्यापर्यंत पोहोचली असेल तर त्या तर शोकव्याकूळ झाल्या असतील. पोरामुळे काय काय ऐकावे लागणार, असा विचार त्यांच्या मनात पुन्हा एकदा आला असणार.
गुहा म्हणजे गांधी परीवाराचे दरबारी चाटुकार, ते सुद्धा राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. उतारवयात बहुधा त्यांना सद्बुद्धी आलेली असावी. त्यांनी राहुल गांधी यांची लायकी काढलेली आहे. काँग्रेसी गुलामांना गुहांची स्पष्टोक्ती मान्य होणार नाही. राहुल गांधी यांना मान्य होणे शक्यच नाही. कारण आपला जन्म पंतप्रधान बनण्यासाठी झाला आहे, ही त्यांची भावना ९५ पराभवानंतरही आटलेली नाही. गेली २२ वर्षे ते एकच गाणे गात आहेत, हम होंगे कामियाब एक दिन.
याच आत्मविश्वासातून त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात दावा केला आहे की, अलिकडे न्यायपालिकेतून, मुख्य निवडणूक आय़ुक्तांकडून, गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांकडून त्यांना निरोप येत आहेत. काय आहेत, ते मात्र त्यांनी सांगितले नाही.
‘सरकारी यंत्रणेवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियंत्रण आता हळूहळू नष्ट होते आहे. यंत्रणा कोसळू लागली असून लवकरच बंडाची शक्यता आहे. देशात आर्थिक त्सुनामी येणार असून महागाईचा विस्फोट होणार आहे. सरकारची परिस्थिती इतकी वाईट आहे की न्यायपालिका, गुप्तचर यंत्रणातील दिग्गजांचे मला रोज मेसेज येत आहेत. हे मेसेज पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, त्यांचा मुलगा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबद्दल आहेत. जनतेत असंतोष आहे, सरकारमध्ये अस्वस्थता. हा उद्रेक दाबण्यासाठी मोदी देशावर आणीबाणी लादू शकतील. कदाचित वर्षभराने मोदी पंतप्रधान पदी नसतील.’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गेले वर्षेभर राहुल गांधी चिखलफेक करीत आहेत. त्यांना वाट्टेल ते बोलत आहेत. ते ज्ञानेश कुमार राहुल गांधी यांना मोदी, शहांबद्दल, अजित डोवाल यांच्याबद्दल मेसेज करायत, असे राहुल गांधी सांगतायत. तीन वर्षांपूर्वी म्हणे निवडणूक आय़ोगावर मोदींचे नियंत्रण होते, आता ते राहीलेले नाही. हे खरे असेल तर निवडणूक आय़ोगाच्या विरोधात राहुल गांधी वोट चोरीचे आरोप कशाला करत होते? ज्ञानेश कुमार यांच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन या उपक्रमाविरुध्द खडे का फोडत होते?
रॉचे चीफ पराग जैन, आयबी चीफ तपन कुमार डेका राहुल गांधी यांना मेसेज करत असतील यावर कोण विश्वास ठेवेल? रामचंद्र गुहा यांच्या सारखा काँग्रेस इकोसिस्टीममधला माणूस राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवत नाही, तो विश्वास पराग जैन आणि तपन डेका ठेवतील?
सगळ्यात धक्कादायक दावा मोदी सरकार देशात आणीबाणी लावेल हा आहे. इंदीरा गांधी यांनी राहुल गांधी यांच्या स्वप्नात येऊन हा दृष्टांत दिला असावा.
आर्थिक संकटावर राहुल गांधी वरचे वर बोलतायत. भारतात आर्थिक संकट आहे, अशी वातावरण निर्मिती विदेशातही सुरू आहे. ब्लूमबर्गने बातमी दिली की भारताने १२ अब्ज डॉलरचे सोने विकले. म्हणजे साधारण ८० टन. रिझर्व्ह बॅंकेने हे बातमी बिनबुडाची असल्याचा खुलासा केला आहे. भारताकडे आजही ८८० टन सोने शाबूत असल्याचे ठणकावून सांगितले. आर्थिक संकट सगळ्या जगात आहे. रोमानिया, स्वीडनमध्ये आर्थिक मंदी दाखल झाली आहे. फ्रान्स त्याच दिशेने वाटचाल करतो आहे. भारतात तशी अजिबात चिन्हे नाहीत. क्रुड तेलाच्या किमती वाढल्यामुळे विदेशी चलन कमी झाले असले तरीही आजही आपल्या तिजोरीत ६९८ अब्जची गंगाजळी आहे.
तुमच्याकडे विश्वासार्हता असेल तर राजकीय भाकीते करताना पुरावे देण्याची गरज नसते, तपशील जाहीर कऱण्याचीही गरज नसते. परंतु भाकीत करणारा जर राहुल गांधी असेल तर मात्र ही गरज असते. कारण राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात फारसा फरक नाही. ठाकरे सरकार २५ वर्षे टीकेल. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, ही भाकीते संजय राऊत यांनीही केली होती. आज चित्र पाहीले तर उद्धव ठाकरे यांचे सरकार फक्त मातोश्रीच्या चार भिंतींपुरते आणि टेरेस पुरते मर्यादीत राहीले आहे.
राहुल गांधी यांनी एकाच कार्यक्रमात अनेक भाकीते केलेली आहेत. सरकारी यंत्रणा कोसळेल, अर्थकारण कोसळेल, देशात आणीबाणी लागू होईल, मोदी वर्षभरानंतर पंतप्रधान नसतील. ही भाकीते कशाच्या आधारावर केली, हे सांगण्याची गरज राहुल गांधींना वाटली नाही. राहुल गांधी यांची विश्वासार्हता इतकी रसातळाला गेली आहे की यातून लोकांचे मनोरंजन होण्यापलिकडे फारसा लाभ होणार नाही. याला भाकीतांपेक्षा विश फूल थिंकिंग म्हणता येईल, मराठीत ज्याला मनातले मांडे म्हणतात. हे मांडे राहुल गांधी २२ वर्षे नियमितपणे खात आहेत. पुढे किती वर्षे खात राहतील हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
