21.6 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरसंपादकीयनाटो विरुद्ध नाटो : जगात संघर्षाचा आगडोंब, मोदींनी हाती घेतला त्रिशूल

नाटो विरुद्ध नाटो : जगात संघर्षाचा आगडोंब, मोदींनी हाती घेतला त्रिशूल

Google News Follow

Related

जगात महत्वाच्या घटना घडतायत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नाटोचे बुरुज कोसळायला लागले आहेत. इस्लामी नाटोची जुळवा जुळव सुरू आहे. जगात सुरु असलेल्या संघर्षाचे स्वरुप अमेरिका विरुद्ध जग असे आहे, दुसऱ्या बाजूला ख्रिस्ती देश विरुद्ध इस्लामी देश असे चित्र ही दिसू लागले आहे. भारत या सगळ्या घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहे. जगाचे जंगल बनले आहे, बळी तो कान पिळी हाच एकमेव नियम पाळला जातो आहे, अशा परिस्थितीत भारत जुन्या चुकांपासून शिकण्याचा प्रय़त्न करतो आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारताची मानसिकता काय यावर प्रकाश टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वेगळे रुप जगाने पाहीले आहे.

जग काय म्हणेल? युरोप काय म्हणेल? असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पडतच नाही. ग्रीनलॅंडचा ताबा घेण्याच्या बाता ट्रम्प करतात, त्याचे कारण हेच आहे. युरोपचे नेतेही आता जशास तशेच्या मूडमध्ये आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी नाटो गटातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युरोपने रशियाशी थेट बोलले पाहिजे, असे मत मांडले आहे. रशियाला रोखण्यासाठी नाटोची स्थापना झाली होती. युरोपला आता जाणीव होते आहे की, धोका ब्लादमीर पुतीन यांच्याकडून नसून डोनाल्ड ट्रम्प यांचाकडून आहे. एका बाजूला युरोपात नाटो कोसळणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फेडरीकसेन यांनी ठणकावले आहे. ‘अमेरिकेने ग्रीनलॅंड घेण्याचा प्रय़त्न केला तर नाटोचे अस्तित्व संपुष्टात येईल.’ फ्रान्स, जर्मनी, युके, इटाली, पोलंड, स्पेन आणि डेन्मार्कच्या जनतेने एक संयुक्त पत्रक काढून अमेरिकेला बजावले आहे की, ‘ग्रीनलँडचे काय करायचे याचा निर्णय डेन्मार्क आणि ग्रीनलँडची जनता घेईल.’

फ्रान्स अमेरिकेच्या विरोधात सर्वाधिक आक्रमक झाला आहे. युरोप आणि अमेरिकेत  अमेरिका मित्रराष्ट्रांपासून दूर जातो आहे, आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवतो आहे, अशी टीका मॅक्रॉन यांनी केलेली आहे. जे मॅक्रॉन म्हणाले ते ट्रम्प यांनी स्वत: न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलेले आहे.  ‘मी आंतरराष्ट्रीय कायदे मानत नाही. मी आंतरराष्ट्रीय कायद्यांना बांधील असू शकलो असतो, परंतु तुम्ही या कायद्यांची व्याख्या कशी करता यावर ते अवलंबून आहे. माझी स्वत:ची नैतिक मूल्य आणि माझे मन जे काही सांगते तसा मी वागतो.’ ट्रम्प स्पष्ट सांगतायत, मी मनाला वाटेल तसा वागणार. युरोपातील नेत्यांना त्याचा अर्थ कळतो आहे.

रशियाने युरोप गिळू नये म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर ‘नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘नाटो’ गटाची स्थापना झाली. अमेरिकेच्या पुढाकाराने हा गट स्थापन झाला होता. तोच अमेरिका आज युरोपचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने उत्तर सिरीयातून फौजा मागे घेतल्यानंतर मॅक्रॉन यांनी विधान केले होते. ‘नाटो ब्रेनडेड झाली आहे. अमेरीकेने सिरीयातून फौजा मागे घेताना नाटो देशांशी चर्चा केली नाही.’

हे ही वाचा:

धुरंधरची चर्चा असताना ‘रहमान डकैत’ला पकडले

जर्मन चान्सलरांनी भारताला ‘पसंतीचा भागीदार’ म्हटले

‘संक्रमण काळात’ मोदी जाणार नव्या कार्यालयात

भारतीय ग्रंथपरंपरेत शिक्षणाला समाज, नैतिक जीवनाच्या केंद्रस्थानी स्थान

नाटोच्या आर्टीकल ५ मध्ये एक महत्वाची तरतूद आहे. एका देशावर हल्ला झाल्यास तो सर्व देशांवर झालेला हल्ला मानण्यात येईल. हे आजही कायम आहे का? असा सवाल जेव्हा त्यांना विचारला तेव्हा, ‘मला माहित नाही’, असे उत्तर त्यांनी दिले होते. सहा वर्षांपूर्वी मॅक्रॉन यांनी केलेले भाकीत आज खरे ठरते आहे.

ग्रीनलॅंडच्या मुद्द्यावर मॅक्रॉन जे काही म्हणाले त्याचे इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही समर्थन केले आहे. आपण थेट रशियाशी संवाद साधला पाहिजे, असे त्यांनी सुचवले आहे. ग्रीनलँड प्रकरणानंतर इटाली अमेरिकेपासून अंतर ठेवून राहणार काय? असा सवाल जेव्हा मेलोनी यांना विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘अंतर ठेवायचे म्हणजे काय? नाटोमधून बाहेर पडायचे, युरोपातील अमेरिकेचे सैन्य तळ बंद करायचे, व्यापारी संबंध तोडून टाकायचे आणि मॅकडोनाल्डच्या शॉप्सवर हल्ले करायचे काय?’ प्रश्नाचे उत्तर मेलोनी यांनी प्रश्नानेच दिलेले आहे.

नाटो देशातील नेत्यांच्या मनात कसली उलथापालथ सुरू आहे, याची ही छोटीशी झलक. या सगळ्या घडामोडी घडत असताना जर्मनीचे चॅन्सेलर फेडरीक मर्ज भारतात दाखल झालेले आहे.  संरक्षण, तंत्रज्ञान, रेअर अर्थ, ऊर्जा आदी क्षेत्रात सहभाग वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. एका बाजूला युरोपमधील देशांचा नाटोबाबत मोहभंग झालेला आहे.

तुर्कीये हा नाटोचा सदस्य आहे. देशाचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तान आणि सौदीमध्ये झालेल्या संरक्षण करारात सहभागी होण्याची शक्यता आहे. एका बाजूला युरोपातील ख्रिस्ती देशांमध्ये झालेला नाटो करार कोसळत असताना इस्लामी नाटो उदयाला येतो आहे. कतारमध्ये हमासच्या दहशतवाद्यांवर इस्त्रालयने हल्ला केल्यानंतर इस्लामी देशांमध्ये घबराट माजली आहे. कतारमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ असताना हा हल्ला झालेला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा हमीवर फार काळ अवलंबून राहता येणार नाही, हे या देशांच्या लक्षात आले आहे. इस्त्रायलचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकी सुरक्षा कवच उपयुक्त नाही, हे त्यांना उमगले आहे. सौदी आणि पाकिस्तानचा करार या हल्ल्यानंतर झालाय हे लक्षात घेण्याची गरज आहे. तुर्कीये त्यात सहभागी होतो आहे. इराणमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे सुद्धा या देशांच्या उरात धडकी भरली आहे. मुल्लांचा कट्टरवाद कतार, सौदी अरेबिया, युएई या देशांतही काही कमी नाही. इराण हा शिया देश आहे, सौदी अरेबियाचा हाडवैरी आहे. परंतु तिथे जे घडवले जात आहे, ते उद्या आपल्या देशात घडू शकेल याचा त्यांना अंदाज आला आहे. ख्रिस्ती देश विरुद्ध मुस्लीम देश अशी जगाची विभागणी येत्या काळात उघड दिसते.

जगाची जुनी रचना कोसळते आहे, नवी रचना निर्माण होते आहे. अशा परिस्थितीत भारत काय करतो आहे, भारत या सगळ्या घडामोडींकडे कसा पाहतो आहे, जगाचा ढाचा बदलत असताना भारतावर त्याचा नेमका काय परिणाम होतो आहे, हे पाहणे महत्वाचे. भारताची दशा आणि दिशा स्पष्ट करणारे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे एक भाषण प्रचंड गाजते आहे. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ या कार्यक्रमात ते तरुणांना संबोधित करत होते. ते यावेळी जे काही म्हणाले तीच भारताची भूमिका आहे, असे मानायला वाव आहे. ‘देश २०४७ मध्ये विकसित राष्ट्र होणार यात कोणालाच संशय बाळगण्याचे कारण नाही, परंतु या विकसित भारताचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न महत्वाचा आहे.

आपण एकेकाळी विकसित होतो, त्या काळातही आपण कोणावर आक्रमण केले नाही, कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत, परंतु आपण आपल्या सुरक्षेबाबत उदासिन राहिलो, त्यामुळेच इतिहासाने आपल्याला धडा शिकवला. परंतु सवाल हा आहे की हा धडा आपण शिकलो आहोत काय?’  डोवाल यांचा हा सवाल खूप महत्वाचा आहे. सूड हा शब्द फार चांगला नाही, परंतु सूड ही शक्ती आहे. आपल्याला इतिहासात जे काही घडले त्याचा सूड घ्यायचा आहे.

सुरक्षेबाबत भारताच्या उदासिनतेमुळे काय घडले ते कोणी केले, कोणाच्या सूडाबाबत डोवाल बोलले हे समजण्यासाठी फार मोठा तज्ज्ञ असण्याची गरज नाही. इतिहासात आम्ही कोणाची मंदीर तोडली नाहीत, असे डोवाल म्हणत होते. पाकिस्तानात डोवाल यांचे हे भाषण प्रचंड व्हायरल झाले. भारतात या भाषणाकडे किती जणांचे लक्ष गेले हा प्रश्न महत्वाचा आहे.

शनिवारी डोवाल यांचे भाषण झाले. रविवारी गुजरातमध्ये सोमनाथ मंदीराच्या ध्वजारोहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. सोमनाथ मंदीर हे भारताच्या उत्थानाचे प्रतीक आहे. भारत जेव्हा जेव्हा कमजोर झाला तेव्हा या मंदिरावर आक्रमकांनी घणाचे घाव घातले. या हजार वर्षांच्या संघर्षाचे स्मरण या सोहळ्यानिमित्त करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेत सहभागी झालेल्या मोदींचा हातात त्रिशुल आणि डमरू घेतलेला अवतार नव्या भारताचे प्रतिनिधीत्व करणारा होता. आमच्या हातात डमरूही आहे आणि त्रिशुलही. एका बाजूला डोवाल सांगत होते की, आपण इतिहास काळात आपल्या सुरक्षेबाबत उदासीन राहिलो आणि दुसऱ्या बाजूला मोदी सोमनाथ महादेवाचे जागरण करत होते. देशाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की, सुरक्षा कवच निखळलेल्या भारतात आक्रमकांनी मांडलेल्या उच्छादाचे उदाहरण म्हणजे सोमनाथ आहे. हे मंदीर वाचवण्यासाठी बलिदान देणाऱ्या वेगडाजी भिल यांच्या पराक्रमाचे मोदी यांनी यावेळी गौरवगान केले.

युरोप कोसळतो आहे, पाकिस्तानसोबत इस्लामी राष्ट्र एकत्र येत आहेत. चीन दबा धरून बसलेला आहे. अमेरिका हाती खंजीर घेऊन वाट पाहते आहे. अशा परिस्थितीत भारत इतिहासाच्या चुकातून शिकणाऱ्या आणि सामर्थ्याच्या मंत्राचा उद्घोष करणाऱ्या भारताचे दर्शन सगळ्या जगाला होते आहे.  तेच मोदी आज अहमदाबादमध्ये जर्मनीचे चॅन्सेलर फेडरीक मर्ज यांच्यासोबत पतंग उडवत होते.  नाटोला खिंडार पडत असताना या इमारतीचा सगळ्यात बुलंद खांब भारताच्या बाजूने कललेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा