भाजपा आमदार नितेश राणे यांनी ६ ऑक्टोबरला एक ट्वीट केले होते. …मग दिशा सालियनबद्दलही बोला, ८ जूनच्या पार्टीमध्ये आणलेली लहान मुलं पण कोणाची तरी नातवंड होती. तेही तुमच्या आदित्य कार्ट्याला विचारा, असा ट्वीट नीतेश राणे यांनी केला होती. ट्वीटमध्ये नावे स्पष्टपणे घेतलेली नाहीत. परंतु शिल्लक सेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांशला टार्गेट केल्यानंतर केलेल्या या ट्वीटचा रोख उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, असे सकृतदर्शनी तरी वाटते. या ट्वीटचा आशय अत्यंत गंभीर आहे.
दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे सुरूवातीपासून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करीत आहेत. त्याचा पुनरुच्चार करताना या ट्वीटमधून त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.
८ जूनला नेमकं काय घडलं होतं? मालाड पश्चिमेतील एका टॉवरच्या १४ व्या मजल्यावरून दिशाने पहाटे ३ वाजता आत्महत्या केली. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा दावा नितेश राणे आणि त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
अमरावती पालिकेच्या करवाढीला स्थगिती
आणि पेटलेले सिलेंडर रॉकेटसारखे हवेत झेपावले
सी लिंक अपघातातील SUV च्या डोक्यावर ३७ हजारांचा दंड
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी घातलेल्या छाप्यात एक कोटी जप्त
‘दिशावर सामुहीक बलात्कार झाला होता. त्यातूनच तिला आत्महत्या करणे भाग पडले’, असा आरोप नितेश राणे यांनी केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर काय चक्र फिरली कोण जाणे? दिशाच्या मृत्यूबाबत अनाकलनीय मौन बाळगणाऱ्या सालियन कुटुंबियांनी राणे पिता-पुत्रांच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्या आधारावर त्यांच्याविरुद्ध बदनामीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
रोहन रॉय हा दिशाचा प्रियकर. त्याच्या मालाडमधील घरी ही पार्टी झाली होती. पार्टीमध्ये एकून पाचजण होती आणि ते दिशा आणि रोहनचे जवळचे मित्र असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु त्या पार्टीत महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेला युवा मंत्री उपस्थित होता, असा नितेश राणेंचा आरोप आहे. हा आरोप अजून सिद्ध झालेला नाही. याप्रकरणातील अनेक महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले असून पोलिसांवर दिशाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना प्रचंड दबाव होता, असा दावा नितेश यांनी अनेकदा केला आहे.
दिशाच्या हत्येनंतर तिचा प्रियकर आणि इमारतीच्या वॉचमनचे गायब होणे, त्या दिवशी इमारतीच्या एण्ट्री रजिस्टरमधील पान फाडले जाणे, दिशाच्या पालकांचे याप्रकरणातील अनाकलनीय मौन या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असे नितेश यांचे म्हणणे आहे. सकृतदर्शनी त्यात तथ्यही वाटते. परंतु ६ ऑक्टोबरला त्यांनी ट्वीटरवर केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. ८ जूनला झालेल्या पार्टीत लहान मुलं होती, असा आरोप नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये केला आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. त्यामुळे या आरोपांची चौकशी होण्याची गरज आहे.
रोहन रॉयच्या पार्टीमध्ये लहान मुलं कशासाठी आणण्यात आली होती? आणि त्याबद्दल कार्ट्या आदित्यला विचारा असे नितेश राणे का म्हणतायत? बॉलिवुडच्या पार्ट्या आणि त्यातल्या गलिच्छ शौकांच्या चर्चा आता दूरवर पसरल्या आहेत. वासनांधतेच्या चिखलात लहान मुलांचे शोषण केले जाते. मधुर भंडारकरच्या पेज-३ या सिनेमात हे वास्तव दाखवण्यात आले आहे. परंतु सत्य हे कल्पितापेक्षा भंयकर असू शकते.
नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये ज्या मुद्याकडे अंगुलीनिर्देश केलाय, तो अत्यंत गंभीर आहे. त्या पार्टीमध्ये महाविकास आघाडीचा युवा मंत्री असला काय आणि नसला काय या आरोपाचे गांभीर्य अजिबात कमी होत नाही. नितेश राणे या प्रकरणात सातत्याने आरोप करतायत, आरोप केल्यामुळे त्यांच्यापाठी पोलिसांचा ससेमीरा लागला तरी ते माघार घ्यायला तयार नाहीत. दिशा सालियनप्रकरणी पोलिसांच्या तपासात अजून काही निष्पन्न झालेले नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिस दल सचिन वाझेच्या इशाऱ्यावर चालत होते. वाझेला मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त होता. राजकीय दबावामुळे वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामीला कशी अटक करण्यात आली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या प्रकरणात पोलिसांचा दबाव नव्हता असा दावा कोणी ठामपणे करू शकत नाही.
दिशा प्रकरणात ज्यांनी आरोप केले आहेत, त्यात राणे पिता – पुत्र आघाडीवर आहेत. राज्यात आता महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात नाही. त्यांनी याप्रकरणात नव्याने तपास करण्याची गरज आहे. दिशा सालियनच्या पार्टीत कोण हजर होते? त्या दिवशी पार्टीत नेमके काय झाले? पालकांच्या म्हणण्यानुसार व्यावसायिक अपयशामुळे दिशा जर डिप्रेशनमध्ये होती, तर ती पार्टीत सहभागी का झाली होती? पार्टीत असे अचानक काय घडले की तिला आत्महत्या करणे भाग पडले. तिचा प्रियकर आत्महत्येनंतर गायब का होता? इमारतीचा वॉचनम गायब का झाला? या प्रश्नांची उकल नव्या सरकारच्या काळात तरी व्हायला हवी.
या पार्टीमध्ये लहान मुलं कोणी आणली होती? कशासाठी आणली होती? त्याचा ज्या आदित्यशी संबंध जोडला आहे, ते आदित्य ठाकरेच आहेत का? यांच्याशी संबंध काय ? महाराष्ट्रात देशभरात मुलं बेपत्ता होण्याच्या, बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने वाढतायत. या मुलांचा व्यापार करणाऱ्या टोळ्या आहेत. मुलांचा वापर भीक मागण्यासाठी होतो. अनेकदा त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येते. अनेक उच्चभ्रू या कांडात सामील असल्यामुळे याबाबत फार चर्चा होताना दिसत नाही. नितेश राणे यांचा ट्वीट जर या मुद्याकडे अंगुलीनिर्देश करत असेल तर महिला आयोग आणि पोलिसांनी याची स्यू मोटो धर्तीवर दखल घेऊन याचा उचित तपास करण्याची गरज आहे. राणे यांच्या आरोपातील सत्य बाहेर आलेच पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी झालेच पाहिजे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







