परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर चीनमध्ये दाखल झाले आहेत. गलवानमध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पाच वर्षांनी हा संवाद पुन्हा सुरू होतो आहे. आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनमध्ये गेले. त्यानंतर आता एस. जयशंकर चीनी नेत्यांसोबत संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये तणाव वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडल्या. कधी चीनने बाह्या सरसावल्या. कधी आपण. चीन आपला मित्र नाही किंबहुना शत्रूच आहे, हे आपल्याला पक्के ठाऊक आहे. भारत चीनमध्ये असलेले अनेक मुद्दे असे आहेत की, भविष्यात दोन्ही देशांमध्ये युद्ध अटळ आहे. तरीही दोन्ही देश चर्चा चर्चा खेळतायत, याची काही ठोस कारणे आहेत.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य असलेल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला एस.जयशंकर गेले आहेत. १४ आणि १५ जुलै असे दोन दिवस ही बैठक तियानजीन येथे होते आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर उपराष्ट्रपति हान झेंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी या नेत्यांना भेटणार आहेत. गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांचे लष्कर एलएसीवर उभे होते. सतत चर्चा करून यातून मार्ग काढण्यात आला. दोन्ही देशांचे सैन्य मागे हटले. संबंध सुरळीत होत असल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु हे संबंध गेल्या काही दिवसात अचानक ताणले गेले आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. जो पर्यंत प्रत्यक्ष युद्ध होत नाही, तोपर्यंत कितीही तणाव असला तरी संवाद, वाटाघाटी सुरू ठेवायच्या असे भारताचे धोरण या निमित्ताने दिसते आहे.
अलिकडेच तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा ९० वाढदिवस संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री धरमशाला येथे झालेल्या या सोहळ्याला उपस्थित राहीले होते. दलाई लामा यांचा वारस जाहीर करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे, असे रिजिजू यांनी इथे येऊन ठणकावून सांगितले. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केलेले विधान चीनला प्रचंड झोंबले. भारताची सीमा चीनसोबत नाही, तिबेटसोबत भिडलेली आहे, असे ते म्हणाले होते.
भारताच्या या धोरणाबाबत चीनकडून आलेली प्रतिक्रिया अत्यंत तिखट होती. दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्या बाबत रिजिजू यांची विधाने म्हणजे, चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप आहे, भारत चीनी लोकांच्या भावना दुखावण्याचे काम करतोय, अशा प्रकारच्या प्रतिक्रीया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या होत्या.
चीन पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालतो. पाकिस्तानला युद्धसज्ज करतो. पाकिस्तान, बांगलादेशला सोबत घेऊन भारताला घेरण्याचा प्रयत्न करतो. नेपाळ, श्रीलंका, मालदीवसारख्या देशांना कायम चिथावणी देतो, चीनी जहाजे हिंद महासागरात हेरगिरी करत वावरत असतात. तरीही चीन भारतासोबत संबंध सुधारण्याच्या बाता करतो. भारतानेही तिच रणनीती स्वाकारलेली दिसते. या आधी एससीओ परीषदेसाठी गेलेल्या राजनाथ आणि डोवाल यांनी दहशतवादाबाबत चीनच्या दुटप्पी धोरणाला रट्टे दिलेच, शिवाय भारताने संयुक्त जाहीरनाम्यावर सही करण्याचे नाकारले. म्हणेज चीन शेण खात असला, तर तुम्ही शेण खाताय, असे तोंडावर सांगायचे, परंतु चीनशी चर्चा सुरू ठेवायची, असे हे धोरण आहे.
‘जगात मोठी गुंतागुंत निर्माण झालेली असताना या संवादाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. चीन आणि भारतादरम्यान संबंध स्थिर राहील्यास दोन्ही देशांना त्याचा फायदा होऊ शकतो’, असे या भेटी दरम्यान एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. चीनी उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांनी, ‘दोन्ही देशांचे चांगले संबंध स्थिरतेचा आधार बनू शकतील. परस्पर सहकार्याने दोन्ही देशांना फायदा होईल’ असे मत व्यक्त केले.
दोन्ही देशांमध्ये तणाव कमी झाला तर त्याचा फायदा होणार हे सांगण्यासाठी राजकीय पंडीत असण्याची आवश्यकता नाही. भारत आणि चीन या आशियातील नव्हे जगातील दोन आर्थिक महासत्ता आहेत. काही छोट्या मोठ्या गोष्टी दोन्ही देशांनी केल्या तर चांगले संबंध लगेचच टप्प्यात येतील. मानसरोवर यात्रेला मंजूरी देण्यास चीनने तयारी दर्शवली आहे. रेअर अर्थ मिनरल्सचा पुरवठा चीनकडून सुरळीत व्हावा ही भारताची अपेक्षा आहे. त्या मोबदल्यात आपण चीनसाठी हवाई वाहतूक खुली करू शकतो. दलाई लामांच्या उत्तराधिकारी प्रकरणात मात्र चीनला जे हवे आहे, ते आपण करू शकणार नाही. नेहरुंच्या काळात भारताने एकदा तिबेटचा विश्वासघात केला आहे. त्याची पुनरावृत्ती भारत करणार नाही. दोन्ही देश शांत झाले तर एलएसीवर असलेला तणाव शांत होऊ शकतो.
हे ही वाचा:
मोदी, आरएसएस यांच्यावरील अभद्र व्यंगचित्र हटविण्याचे न्यायालयाचे आदेश
शुभांशू शुक्लांचा परतीचा प्रवास सुरु झाला, ड्रॅगन कॅप्सूल केले अनडॉक!
निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी सरकार फारसं काही करू शकत नाही
अरेरे… पाकिस्तानमध्ये नालेही साफ नाहीत
परंतु हे फार काळ चालणार नाही, हे दोन्ही देशांना ठाऊक आहे. फक्त दलाई लामा हा मतभेदाचा एकमेव विषय नाही तर अशी अनेक कारणे आहेत. भविष्यात या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा भडका उडणार ही बाब स्पष्ट आहे. चीनने भारताची भूमी गिळली आहे. चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअर पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. म्हणजे भारताच्या भूमीतून जातो. पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त काश्मीरमधील शक्सकम व्हॅलीचा भूभाग बहाल केलेला आहे. चीन भारताच्या अरुणाचल, उत्तरखंड आणि बिहारपर्यंतच्या भूभागावर दावा करतो. ही सगळी अशी कारणे आहेत, ही ती बळाच्या जोरावरच सोडवावी लागणार आहेत. हे दोन्ही देशांना ठाऊक आहे. तरीही हा संवाद का होतो आहे हे लक्षात घ्या.
भारताने गेल्या काही काळात लष्कराचे दुर्भिक्ष्य बऱ्यापैकी संपवले. तिन्ही दलांना सुसज्ज करण्याचा प्रय़त्न केला. परंतु तरीही आज बऱ्याच गोष्टींबाबत आपण चीनच्या तुलनेत खूप मागे आहोत. हवाईदलाला अपेक्षित असलेल्या स्क्वाड्रनची संख्या ४२ आहे, आपल्याकडे फक्त ३१ स्क्वाड्रन उपलब्ध आहेत. यात मिग २९, जग्वार अशी बरीच जुनी विमाने आहेत जी तात्काळ भंगारात काढण्याची गरज आहे. चीनच्या नौदलाचा, हवाईदलाचा संख्यात्मक पसारा आपल्यापेक्षा जास्त आहे. हे अंतर भरून काढण्यासाठी भारत जोरदार प्रयत्न करतो आहे. हे साध्य होत नाही तोपर्यंत भारताला वेळ मारून नेण्याची गरज आहे.
भारताची जशी मजबूरी आहे तशी चीनचीही आहे. चीनची अर्थव्यवस्था गटांगळ्या खाते आहे. जग आणि चीनमध्ये एक मजबूत पोलादी पडदा असल्यामुळे प्रत्यक्षात काय सुरू आहे, याची बाहेर कल्पना नाही, परंतु जी काही माहिती बाहेर येते आहे, ती चीनच्या दृष्टीने चांगली नाही. रिअल इस्टेट क्षेत्राचा बाजार उठला आहे, बँकीग क्षेत्र बुडीत गेले आहे. कंपन्या बंद पडतायत, बेरोजगारी वाढते आहे, परकीय गुंतवणूकदार चीनमधून काढता पाय घेत आहेत. अमेरिकेसोबत चीनच्या खटपटी वाढल्या आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भवितव्याबाबतही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे चीनला तैवान गिळायचा आहे. अमेरिकेने धमकी दिली आहे, की तैवानचा कब्जा घेतला तर आम्ही बीजिंगवर बी-२ बॉम्बरने हल्ला करू. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले तर ते करून दाखवतील, याबाबत जगात कुणाच्या मनात शंका नाही.
भारतासोबत चीनचा संवाद सुरू असण्याचे एक कारण पाकिस्तानही आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचा कडेलोट केला. त्यानंतर पाकिस्तान अधिकाधिक अमेरिकेकडे झुकला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. फिल्ड मार्शल आसिम मुनीर याच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनी नेते अस्वस्थ आहेत. पाकिस्तानची अण्वस्त्रे अमेरिकेच्या नियंत्रणात असल्याच्या बातम्या आहेत. नूरखान हवाईतळावरही अमेरिकेचा ताबा असल्याच्या बातम्या आहेत. अमेरिका वाईटावर उठलेला असताना पाकिस्तान बेभरवशाचा झालेला असताना चीन भारताच्या थोडा जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, यात फार आश्चर्य नाही.
दोन्ही देशांची भूमिका साधारण अशीच आहे की, युद्ध होईल तेव्हा होईल. तोपर्यंत धंदा करूया. युद्धाचा भडका उडणार नाही, इतपत तणाव कमी करूया. चार पैसे कमावूया. थोडक्यात हा टाईम प्लीजचा प्रकार आहे. डॉ.जयशंकर तिथे गेलेत म्हणजे राजनाथ आणि डोवाल यांच्यासारखे तेही चीनला चार शब्द ऐकवून येणार. चीन पाकिस्तानला चिथावून भारतावर सोडतो हे ठाऊक असून जर भारत चीनसोबत चर्चा करत असेल तर भारताने चार खडे बोल एकवून चीनला रट्टे हाणले तर काय चूक आहे. एस.जयशंकर माजोरड्या युरोपियन राष्ट्रांना सोडत नाहीत, ते चीनचे कशाला ऐकून घेतील?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







