26 C
Mumbai
Monday, January 12, 2026
घरसंपादकीयपवारांनी आता कादंबऱ्या लिहाव्यात...

पवारांनी आता कादंबऱ्या लिहाव्यात…

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात गौप्यस्फोट आणि भूकंपांचा इतका अतिरेक झालाय की इतके भूकंप जपानमध्ये सुद्धा होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी एक नवा गौप्यस्फोट केलेला आहे. ‘विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन लोक भेटले त्यांनी २८८ पैकी १६० जागांची गॅरींटी दिली’. हे ऐकल्यानंतर पवारांनी आता फक्त आत्मचरीत्रापुरतं मर्यादीत न राहता, कादंबरी लिखाणाकडे वळावं असा सल्ला आम्हाला द्यावासा वाटतो. पवारांचा धनंजय झालेला आहे. हा महाभारतातला धनंजय नाही, विद्यमान युगातीलच आहे.

जुन्या हिंदी सिनेमात स्मरणशक्ती गमावलेल्या एखाद्या नायकाला किंवा नायकाच्या आईच्या डोक्यावर अचानक कसला तरी फटका बसतो, आणि त्यांना पूर्वीचे सर्व काही आठवायला लागते, तसा काहीसा प्रकार पवारांबाबत झालेला दिसतो. २०२४ च्या जून महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला घसघशीत मतं मिळाली, त्यांची सत्ता आली. नंतर ‘मारकडवाडी पॅटर्न’ची चर्चा झाली. तेव्हा पवारांना जे काही आठवलं नाही, ते त्यांना आज अचानक कसं काय आठवलं असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

मारकडवाडीतील तथाकथित मतदान घपल्याबाबत बोलताना पवारांनी ईव्हीएमवर आरोप केले, परंतु आपल्याकडे काहीही पुरावे नसल्याचेही जाहीर केले. याला म्हणतात धाडस, पुरावे नसताना वाट्टेल ते आरोप करायचे.

जानेवारी महीन्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना पवारांनी विधानसभा निवडणुकीतील रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांच्या वैचारीक निष्ठेचे आणि प्रतिबद्धतेचे कौतूक केले. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कार्यकर्त्यांची अशा प्रकारची बांधणी केली पाहीजे, असे मत व्यक्त केले होते. पवार बहुधा हे विसरलेले दिसतात.

त्यामुळे अचानक त्यांना नवी कथा आठवली. दोन लोक त्यांना भेटले आणि त्यांना सांगितले की आम्ही तुम्हाला १६० जागांची गॅरेंटी देतो. हा विषय मी राहुल गांधी यांच्याकडे घेऊन गेलो. ते म्हणाले, ‘आपण जनतेतच जाऊया, जनता जो काही निर्णय देईल तेच खरे.’

म्हणजे एक राजा हरीश्चंद्र आणि दुसरा धर्मराज युधिष्टीर. अरे जो काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायला ‘तुम्ही आमची मदत करा’, असे साकडे पाकिस्तानला घालतो. लंडनमध्ये राहुल गांधी जाऊन सांगतात, ‘भारतात लोकशाही धोक्यात असताना लोकशाहीचे रक्षक म्हणवले जाणारे युरोप आणि अमेरिका काहीही करताना दिसत नाहीत.’  म्हणजे या आणि आमच्या देशात हस्तक्षेप करा, असे खुले आमंत्रण त्यांना देतात. ते राहुल गांधी अचानक धर्मराजाच्या भूमिकेत आल्याचा दावा शरद पवार करतायत. लोक या भाकडकथांवर विश्वास ठेवणार नाहीत.

शरद पवारांचे हे वैशिष्ट्य आहे की, ते थेट बोलत नाहीत, ते कायम आडून बोलतात. भाजपाने निवडणूक आय़ोगाच्या माध्यमातून घोटाळा केला आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या प्रत्येक विधानाची कशी पिसं काढली जात आहेत, हे पवारांना दिसते आहे. त्यामुळे ते थेट आऱोप न करता, सुचवतायत, की जनता मूर्ख आहे. लोकांना सत्तावाटप करणारे दोघे फिरत होते, त्यांनीच महाराष्ट्राच्या सत्तेवर महायुतीला बसवलेले आहे, असा अर्थ काढण्याची सोय काही लोकांना होईल. लोक सोशल मीडियावर व्हायरल करतील, ट्रेंडींग करतील म्हणून हा सगळा उपद्व्याप.

पैसे घेऊन दोन लोक जर १६० जागांचा जुगाड करू शकत असले तर हो दोन लोक अदाणी किंवा अंबानीकडे जातील. एकाचा मुंबईमध्ये एवढा मोठा प्रकल्प सुरू आहे, दुसऱ्याच्या घराखाली मविआ सरकारच्या काळात स्फोटके ठेवली होती. ते पवारांकडे कशाला येतील? अदाणी आणि अंबानी यांच्यापेक्षा जास्त पैसा पवारांकडे आहे, असा त्यांचा समज झाला होता का?

२६ जून रोजी सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे निकाल आले, या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी २१ पैकी २० जागा जिंकल्या. बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही शरद पवारांच्या पॅनलचा सफाया झाला. एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले पवार चार वर्षांपूर्वी वाचनालयाच्या निवडणुकीत उतरले होते. ही तुमची परीस्थिती. तुम्हाला साखर कारखान्यांच्या निवडणुकीत विजय मिळत नाही, इतकी वाईट तुमची परीस्थिती झालेली आहे. खरे तर तुम्ही राज्याचे राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आलेली आहे. परंतु सत्तेचा मोह अजून सोडवत नाही.

‘इथेही राहायचे आणि तिथेही’ हा पवारांचा खाक्या आहे, कालच प्रकाश आंबेडकर यांनी बोंब ठोकली होती की, ‘पवार हा भाजपाचा माणूस आहे’. सत्ता स्थापनेसाठी पवारांनी कितीवेळा भाजपासोबत गुटूर्गू केली हे एव्हाना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. काल त्यांचे कन्यारत्न संसदरत्न सुप्रिया सुळे या सोनिया गांधींना पैठणी भेट देऊन आल्या. म्हणजे सत्ता कोणाचीही असो आपल्या डोक्याला शॉट नको असे यांचे धोरण आहे.

पवारांना हे जादूचे प्रयोग कऱण्याची सवय आहे. लोकांना मूर्ख बनवण्यात त्यांची हयात गेली. आता ते कादंबरीकाराच्या भूमिकेत शिरलेत कि काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. पवारांनी ज्या दोन जणांना उल्लेख केला, त्यांना बहुधा आता राहुल गांधी शोधत फिरतील. कारण कधी भारतात त्यांची सत्ता येते आणि कधी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, निवडणूक आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना,  तुरुंगात टाकतो असे त्यांचे झालेले आहे. मोदींच्या विरोधात आंदोलने करून डोक्यावरचे केस पिकले, दाढी पांढरी झाली, तरीही मोदी सत्तेवरून हलत नाहीत, म्हणून ते आधीच भैसाटले आहेत. दर दोन वर्षांनी एक नवा फॉर्म्यूला ते वापरून बघतात. उपयोग होत नाही. ‘आलू से सोना’ बनवायचा एक सरळसोपा उपाय हाती आलेला असताना राहुल गांधी तो नाकारतील अशी सुतराम शक्यता नाही.

प्रत्येकाची मैदान गाजवायची एक वेळ असते. पवारांची ती वेळ निघून गेली. २६ जून रोजी आलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या निकालावरून ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे. जनतेला जे कळायचे ते कळलेले आहे. आता हे वास्तवही पवार स्वीकारायला तयार नसतील, तर कोण काय करू शकतो? २०२१ मध्ये त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्राहालयाची निवडणूक स्वबळावर जिंकली होती. या निवडणुकीत ३४ मतं पडली होती. त्यापैकी २९ पवारांच्या पॅनलला आणि २ धनंजय शिंदे यांच्या पॅनलला मिळाली होती. ‘ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली नव्हती’, असा आरोप, फक्त दोन मतं मिळालेले त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय शिंदे यांनी केलेला होता. या सगळ्याचा भावार्थ असा कि तेव्हा शिंदेंना पराभव पचवता आलेला नव्हता, आता पवारांचेही तेच झालेले आहे. पवारांचा धनंजय शिंदे झालेला आहे.  काय ही मानसिकता, यांना पराभव पचवता येत नाही. जनतेने आपल्याला झिडकारले हे मान्य करता येत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा