27 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरसंपादकीयहे आंदोलन की, भाजपाला मारलेली शिट्टी?

हे आंदोलन की, भाजपाला मारलेली शिट्टी?

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध कऱण्यासाठी उबाठा शिवसेनेने छत्रपती संभाजी नगर येथील क्रांतिचौकात जोरदार आंदोलन केले. बांगलादेशचा झेंडा जाळला. भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशीना त्तात्काळ
हाकला, अशी मागणी करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बांगलादेशात खांदेपालट झाल्यापासून तिथे
हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. तेव्हा मोदींना सांगा हे अत्याचार थांबवायला, असे उपहासात्मक विधान करून उद्धव ठाकरें यांचा पक्ष हिंदूंच्या रोषास पात्र ठरला होता. तोच पक्ष हे आंदोलन करीत असल्याचे पाहून ठाकरे पुन्हा कोलांटी मारण्याच्या तयारीत आहेत की काय, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजी नगरातील क्रांतिचौकात दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनाचा प्रचंड गवगवा झाला. लक्षात घ्या संभाजी नगर हा सुमारे ४० टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. तिथे उबाठा शिवसेनेने हे आंदोलन केले आहे. एका आंदोलनावरून ठाकरेंबाबत कशी काय टिप्पणी करता येईल, असा सवाल अनेकांच्या मनात येईल. त्यांचे समाधान करण्यासाठी एक छोटेसे उदाहरण पुरेसे आहे. ठाकरेंचा पक्ष काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मविआमध्ये दाखल झाला तेव्हा दक्षिण मुंबईत अजान स्पर्धांचे आयोजन केले होते. हा ठाकरेंनी त्यांच्या मतदारांना, समर्थकांना दिलेला एक मोठा सांस्कृतिक झटका होता. मशिदीवरचे भोंगे उतरवा अशी डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांमध्ये झालेला हा वैचारिक कायापालट अभूतपूर्व होता. ज्वलंत हिंदुत्ववाल्या पक्षाकडून अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. अजान ऐकून मन:शांती मिळते हे शिवसेना नेते पांडुरंग सपकाळ यांचे विधान म्हणजे एकूणच शिवसेनेच्या विचारधारेचा कडेलोट होता. काही लोकांनी एकांडी घटना म्हणून या स्पर्धेला फार महत्व दिले नाही.

परंतु ही ठाकरेंच्या वैचारिक यू-टर्नची सुरूवात होती. पुढे उर्दू कॅलेंडर, जनाब बाळासाहेब, टिपू जयंती अशी टप्प्याटप्प्याने प्रगती होत राहिली. उद्धव ठाकरे मुस्लिमांचे मसीहा बनले ते या प्रगतीचे सर्वोच्च शिखर. थोडक्यात सांगायचे तर अजान स्पर्धा ही ठाकरेंच्या हिरवट राजकारणाची नांदी होती. या स्पर्धेतून त्यांनी त्या बदलाचे संकेत दिले होते. राहुल गांधी, सोनिया
गांधी, शरद पवारांना ठाकरेंनी आश्वस्त केले होते की, आम्ही तुमच्या सारखेच आहोत. एका मुलाखतीत शरद पवारांनी ठाकरेंनी प्रशस्ती पत्रकही देऊन टाकले की ठाकरेंची विचारधारा आमच्यासारखीच आहे. जे संकेत अजानस्पर्धेतून ठाकरेंनी दिले, तसेच संकेत ते आता संभाजीनगरात झालेल्या आंदोलनातून देतायत का? शक्यता नाकारता येत नाही. कारण
विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने मविआचा निकाल लावला. दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेत जुंपलेली दिसते. भाजपाला १३२ जागांवर विजय मिळाल्यामुळे येणारे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. त्यात आधी मुख्यमंत्री पदावरून आणि आता गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष सुरू आहे, अशा बातम्यांचे पीक आलेले आहे. यात कितपत तथ्य आहे, ही बाब बाजूला ठेवली तरी उबाठा शिवसेनेला यात संधी दिसते आहे.

हे ही वाचा:

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

दलित कुटुंबाला मुस्लीम समाजातील व्यक्तींकडून धमक्या

मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: नामको बँकेच्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

दोघांमध्ये काही बिनसलेच तर उद्धव ठाकरे एका पायावर सरकार सोबत यायला तयार होतील. आज तशी शक्यता दूरदूर पर्यंत दिसत नसली तरी उद्या कदाचित राजकारण बदलू शकते. तशी वेळ आलीच तर उगाच मुस्लीम तुष्टीकरणामुळे अडचण नको, असा विचार करून उबाठा शिवसेनेने संभाजी नगरचे आंदोलन घेतले, असण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होते आहे, हरियाणाच्या पाठोपाठ काँग्रेसने महाराष्ट्र गमावला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरत्या ओवाळून यापुढे हाती फारसे लागायचे नाही, याची जाणीव झाल्यामुळे ठाकरे नव्या कोलांटीच्या तयारीत आहेत. नवी समीकरणे निश्चितपणे त्यांच्या डोक्यात आहेत.

वक्फ सुधारणा विधेयकावर काम करणाऱ्या संसदीय समितीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संसदेत समान नागरी कायदा, वक्फ आदी विधेयकांच्या मुद्द्यावर उबाठा शिवसेनेच्या
भूमिकेवर लक्ष ठेवले तर त्यांचा लोलक नेमका कुठे झुकतोय हे लक्षात येऊ शकेल. पाकिस्तान आणि बांगलादेशचे कौतिक असलेले लाखो लोक भारतात आहेत. पाकिस्तान किंबा बांगदादेशचा झेंडा जाळणे ही त्यांची मने दुखावणारी कृती आहे.
ती संभाजी नगरमध्ये उबाठा शिवसेनेने केलेली आहे. त्यामुळे ठाकरे भाजपासोबत येणार की नाही, भाजपा त्यांना सोबत घेणार की नाही, हा नंतरचा विषय. तूर्तास ते काँग्रेसचा हात आणि त्यांच्या राजकारणाचा आत्मा असलेले तुष्टीकरण सोडण्याच्या मानसिकतेत आहेत, हे संभाजी नगरच्या आंदोलनातून समोर आलेले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा