काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वोटचोरी’ नावाचे नवे शस्त्र परजलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत काल झालेल्या सुनावणीत बऱ्याच प्रमाणात त्यांचा प्रचार उताणा पडला आहे. राहुल गांधी यांनी गेल्या ११ वर्षांत असे काही मुद्दे सातत्याने उपस्थित करत आले आहेत. एखादा मुद्दा उत्पन्न करायचा, देशभरात वातावरण निर्मिती करायची. जनतेमध्ये उद्रेक निर्माण करण्याचा प्रय़त्न करायचा. नव्या मुद्द्याचे काय होणार याबाबत चर्चा करताना जुन्या मुद्द्यांचे काय झाले याचा यावेळी तरी विचार व्हायला हवा.
काँग्रेस पक्ष गेली ११ वर्षे सत्तेपासून वंचित आहे. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सरकारचे वाभाडे काढण्याचा हक्क त्यांना लोकशाही व्यवस्थेनेच प्रदान केलेला आहे. परंतु राहुल गांधी जे मुद्दे उपस्थित करून सरकारच्या विरोधात राळ उडवण्याचा प्रयत्न करतात, ते तमाम मुद्दे तकलादू ठरले आहेत. राफेल खरेदीच्या मुद्द्यावरून त्यांनी चौकीदार चौर है… ही प्रचार मोहीम राबवली. देशात इतकी वर्ष काँग्रेसचे सरकार होते. भाजपा आणि त्यापूर्वी जनसंघ विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. परंतु कधीही विरोधाची पातळी इतकी घसरली नव्हती. यूपीएच्या काळात देशाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. तेव्हाही भाजपाने डॉ.मनमोहन सिंह यांच्याविरोधात ही भाषा वापरली नाही. या प्रचाराची अखेर राहुल गांधी यांनी न्यायालयासमोर माफी मागून झाली. ते त्यांचे आरोप सिद्ध करू शकले नाहीत.
२०२४ च्या निवडणुकीत संविधान बदलण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तोही खोटा ठरला. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आपली आपली किती विमाने पाकिस्तानने पाडली, असा सवाल विचारून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रय़त्न झाला. राफेल विमाने पाकिस्तानने पाडली असतील तर ही विमाने तकलादू होती, असा प्रचार करण्याचीही सोय होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्यापाराच्या संदर्भात आम्ही काही डील दिली आणि युद्धबंदी घडवली अशी थाप मारली. राहुल गांधी यांना तात्काळ त्यावरही विश्वास ठेवला आणि देशात वातावरण बिघडवण्यासाठी त्याचा वापर झाला.
हे तमाम दावे तोंडावर पडलेले आहेत. राफेल विमाने पाडल्याचा दावा राहुल गांधी यांच्यासोबत पाकिस्तानच्या नेत्यांनीही केला होता. अलिकडेच आपले एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी यातली हवा काढली. भारतानेच पाकिस्तानची विमाने पाडली असे स्पष्ट केले. ट्रम्प यांच्यासोबत व्यापार करारावरून जो तंटा सुरू आहे, तो पाहाता, मी भारताला डिल दिले, त्यामुळे युद्धबंदी झाली, हा ट्रम्प यांचा दावाही सपशेल आपटला आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
देशाच्या संसदेत उभे राहून राहुल गांधी यांनी हे खोटे दावे केले. संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या कामकाजात गेली अनेक वर्षे सातत्याने खोडा घालण्यात येत आहे. देशहिताची, जनहिताची जी कामे संसदेच्या माध्यमातून मार्गी लावली जातात, त्यावर बोळा फिरवण्यात आला. वेळेचे, पैशाचे नुकसान झाले. म्हणजे सरते शेवढी नुकसान केले जनतेचे. जे खोटेनाटे आरोप करून राहुल गांधी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी देशाला भ्रमित कऱण्याचे काम केले, ते खोटे ठरले. त्यामुळे आता या आरोपांचे भांडवल करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना, संसदेचे काम बंद पाडणाऱ्यांना आणि देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांना काय शिक्षा होणार यावर चर्चा होण्याची गरज आहे. त्यानंतर खरे तर त्यांच्या नव्या आरोपांबाबत चर्चा व्हायला हवी.
राहुल गांधी यांनी जे ताजे मतचोरीचे आरोप केले आहेत, त्याबाबत बोलू. मतदानाच्या प्रक्रियेत एखादी संशयास्पद व्यक्ति मतदान करीत आहे का, हे तपासण्यासाठी मतदान केंद्रात जिथे मतदान होते, तिथे सर्व पक्षाचे पोलिंग बूथ असतात. राहुल गांधी ज्या कर्नाटकात मतचोरी बाबत पत्रकार परिषद घेतली होती, तिथे मतदानाच्या दरम्यान असे कोणतेही आक्षेप नोंदवले गेले नाहीत. ना पराभूत झालेल्या उमेदवारांनी निकालाबाबत निवडणूक आयोगाकडे काही तक्रार केली. मग राहुल गांधी यांना जाग आता अचानक जाग का आली? ते जे मुद्दे उपस्थित करतायत ते मुळात मतचोरीचे मुद्देच नाहीत. त्यांचे मुद्दे काय, बिहारच्या मिंतादेवीचे वय १२४ आहे, असा एक आक्षेप काँग्रेसने नोंदवला. तिचे फोटो छापलेले टी शर्ट घालून काँग्रेस नेते फिरू लागले. जन्मतारखेचे वर्षे चुकीचे नोंदवल्यामुळे हे घडल्याचे तिनेच कबूल केले आहे. काँग्रेसवाल्यांना याबाबत बोलण्याची गरज काय, असे सडेतोड शब्दात सुनावले आहे. वाराणसीत ५० मतदारांच्या वडिलांचे एकच नाव, असा एक मुद्दा त्यांनी काढला. तोही मुद्दा निकाली लागला, कारण हे सगळे लोक एका गुरुकुलाशी संबंधित आहेत. ज्या व्यक्तिचे नाव त्यांनी लावले आहे, तो त्यांचा गुरु आहे. गुरू हा पित्यासमान असतो म्हणून त्याचे नाव लावण्याची मुभा देशाच्या कायद्यानेच दिली आहे.
थोडक्यात सांगायचे तर या सगळ्या मतदार यादीतील चुका आहेत, ज्या भाजपाची सत्ता नसताना सुद्धा अस्तित्वात होत्या. त्याचे कारण निवडणूक आयोगाकडे असलेला मर्यादीत कर्मचारी वर्ग. १४० कोटींचा देश आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ४०० च्या जवळपास आहे. निवडणुकीच्या काळात नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना कामाला लावण्याची गरजच नव्हती. ही समस्या आहे, हे निवडणूक आयोगालाही मान्य आहे. त्यातूनच बिहारमध्ये मतदार यादीची साफसफाई सुरू झाली. त्यावर काँग्रेसने हो हल्ला केला. कर्नाटकमध्ये हाच विषय घेऊन ते केंद्र सरकारवर हल्ला करीत आहेत. राहुल गांधी आणि त्यांचा पक्षाने उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा निकाली निघाला आहे. के.राजण्णा हा त्यांच्याच पक्षाचा नेता याबाबत खरे बोलला म्हणून त्याला कर्नाटकच्या मंत्रीमंडळातून नारळ देण्यात आला. आता कर्नाटकमधील आणखी एक काँग्रेस नेता आणि माजी केंदीय मंत्री सी.एम. इब्राहीम म्हणालाय की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बी.बी.चिमनकट्टी आणि मला बदामी मतदार संघातील विजयासाठी तीन हजार मतांची खरेदी कऱण्यासाठी सांगितले होते. राहुल गांधी यांच्या दाव्यातील हवा काँग्रेस नेते आणि जनताच काढत आहे.
आता वळूया सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीकडे. निवडणूक आय़ोगाने जी कागदपत्रे मागितली ती बिहारी जनतेकडे नाहीत. निवडणूक आय़ोग आधारकार्ड आणि रेशनकार्डला पुरावा मानायला तयार नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केले. न्या. सुर्यकांत यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले बिहार हा भारताचा अविभाज्य भाग आहे, जर बिहारी जनतेकडे ही कागदपत्रे नसतील तर अन्य राज्यातही नसणार. जी कागदपत्र निवडणूक आय़ोगाने मागितली आहे, तिच कागदपत्रे सिमकार्ड खरेदीसाठी किंवा जातीच्या दाखल्यासाठी मागितली जातात. देशाचे नागरीकत्व सिद्ध करणारी कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवीत.
न्यायालयाने काँग्रेसच्या मूळ आक्षेपालाच केराची टोपली दाखवली. काँग्रेसचा गेमप्लान उधळला. कारण बिहारमध्ये मोठ्या संख्येन बांगलादेशी घुसलेले आहेत. निवडणूक आय़ोगाची साफसफाई काँग्रेसच्या हक्काच्या या मतांवर गंडांतर आणते आहे. म्हणून ती काँग्रेसला ती नको आहे. परंतु ही कारवाई किती आवश्यक आहे, हे सिद्ध करण्यासाठीच राहुल गांधी यांना कर्नाटकमध्ये वोटचोरी प्रकरणी पत्रकार परिषद घेण्याची बुद्धी झाली.
हे ही वाचा:
‘पाकिस्तानने मुर्खासारखे बोलू नये, आमच्याकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे’
राहुल आणि तेजस्वी काहीही नाटक करू शकतात!
चाकरमान्यांनू गणपतीक गावाक जावचा हा ना.. चला “मोदी एक्सप्रेस”ने
एफपीओ व सहकारी संस्थांना का मिळणार अनुदान?
राहुल गांधी यांच्या आरोपातील हवा राहुल गांधी यांनीच काढली. सर्वोच्च न्यायालयात जे ज्येष्ठ वकील बिहारमध्ये सुरू असलेल्या निवडणूक आयोगाच्या मोहीमेविरुद्ध खटला लढवतायत, ते सगळे काँग्रेसचे पाळीव आहेत. अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल. राहुल गांधी पत्रकार परीषदेत जे कागदपत्र फडफडवतात, त्यापैकी चार कागद यांना दिले असते, ते न्यायालयाने त्यांची इतकी अब्रू काढली नसती.
राज्यात उबाठाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनाभवनमध्ये एक ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेची मराठी मीडियाने अशी काही हवा केली होती की ज्याचे नावे ते. राऊत घरातून निघाले, ते आता इथे पोहोचले, आता अमुक वाजता ते मातोश्रीत दाखल होतील, असा सगळा वृत्तांत टायमर लावून मराठी जनांच्या समोर वाढण्याचे काम मीडियाने केले होते. त्या पत्रकार परिषदेतही राऊत असेच पेपर फडफडवत होते. त्यातला एक तुकडाही कधी संबंधित तपास यंत्रणा किंवा न्यायालयासमोर सादर करण्यात आला नाही. याचा अर्थ हाच की हे इंडी आघाडीतील सगळे नमुने वर पाहूस खालपर्यंत एक सारखे आहेत. हे सतत खोटे बोलतात, जनतेची दिशाभूल करतात. त्यांचे खोटे उघड झाल्यानंतर त्यांना काही शिक्षा होत नाही, त्यामुळे ते आधीच्या मुद्द्यावर उत्तर न देता नव्या थापा मारायला तयार होतात.
एखाद्याचे नाव जर मतदार यादीत नसले तर ते अर्ज करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंतची मुदत निवडणूक आयोगाने दिलेली आहे. राहुल गांधी यांनी अन्याय झालेल्या मतदारांकडून हे अर्ज भरून घ्यावे, त्यांना योग्य ती कागदपत्र सादर करायला सांगावी, विषय संपेल. परंतु आडात नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार, असा मामला आहे.
राहुल गांधी यांची समस्या एकच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची तिजोरी गच्च भरली आहे. राहुल गांधी यांनी ज्या ज्या सरकारी उपक्रमाबाबत ते बुडाले बुडाले म्हणून ओरड केली ते सगळे नफ्यात धंदा करतायत. एलआयसी असो एचएएल असो किंवा स्टेट बँक असो. सगळीकडे पैसा दिसतोय, परंतु हा पैसा लुटण्यासाठी जी सत्ता त्यांना हवी आहे, ती दूर दूर पर्यंत दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केले होते माझी कोंबडी मला सन्मानाने खाऊ द्या… मविआच्या बैठकीत त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीला बाहेर बसवले जायचे. त्या संदर्भात त्यांनी हे विधान केले होते. आंबेडकर उघडपणे बोलतात, राहुल गांधी बोलत नाहीत. कोंबडी खायला मिळाली नाही, हेच राहुल आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांचे दु:ख आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







