काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दक्षिण अमेरिका दौरा सध्या सुरू आहे. विदेश दौऱ्या दरम्यान त्यांच्या मुलाखती, भाषणे वगैरे होत असतात. ज्याची चर्चा भारतात होते. राहुल गांधी यांच्या कोलंबिया दौऱ्या दरम्यान त्यांनी केलेली विधाने म्हणजे मटणाच्या रांगेत उभे राहून शाकाहारावर केलेली चर्चा, असा प्रकार आहे. समोर सोललेले बोकड उलटे टांगलेले आहे. हातात पिशवी घेऊन कसायाच्या दुकानासमोर राहुल गांधी आपला नंबर कधी येणार, मटण कधी मिळणार, असा विचार करत रांगेत उभे आहेत. त्याच वेळी शाकाहार शरीरासाठी किती फायदेशीर असतो, यावर रसभरित चर्चा करत आहेत.
कोलंबियात जाऊन राहुल गांधी संघावर का बोलले याचे अनेकांना कोडे आहे. भाजपाने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे, संघ ही भाजपाची ताकद आहे, त्यामुळेच असे असेल बहुधा. राहुल गांधी अलीकडे भाजपापेक्षा संघावर टीकेचे बाण सोडताना दिसतात. जिथे जातात तिथे संघाबाबत बोलतात. परंतु कोलंबियात संघाच्या विरोधात बोलून उपयोग काय? संघाला विरोध करणे नेहरु- गांधी परिवाराची परंपरा आहे. ती राहुल जपत आहेत इतकेच.
देशात संघाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यांची धामधूम सुरू असताना राहुल गांधी यांनी संघावर शरसंधान केलेले आहे. ‘संघाच्या विचारधारेच्या केंद्र स्थानी भेकडपणा आहे,’ असे राहुल गांधी कोलंबियातील ‘इआयए’ युनिवर्सिटीत झालेल्या एका मुलाखती दरम्यान म्हणाले. संघाला लोकशाही मान्य नाही, असा दावा त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. संघाच्या विचारधारेत इतका भेकडपणा आहे, मग राहुल गांधींना संघाचे इतके भय का वाटते? त्यांना संघाबाबत पोटशूळ आहे, हे समजू शकतो. परंतु जर ही विचारधारा इतकी भेकड आहे, तर ती राहुल यांना रोखता का आली नाही? जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात संघावर बंदी लादून त्यांना ही विचारधारा चिरडता का आली नाही? या भेकड विचारधारेच्या पाठीशी देशातील इतके मोठे जनसमर्थन कसे?
कोलंबियात जाऊन खरे तर त्यांनी ड्रग्ज आणि ड्रग्ज माफीयांच्या कारवायांवर बोलले पाहिजे होते. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. ते भेकड नाहीत, हेही त्यांना दाखवता आले असते. देशात गेल्या काही महिन्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. पहेलगामचा दहशतवादी हल्ला झाला. राहुल गांधी यांना हा हल्ला देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला असे वाटत नाही. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचा वचपा काढला, त्याबाबतही ते परदेश दौऱ्यात तोंड उघडत नाहीत. ना ते पाकिस्तानचा निषेध करतात ना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा करतात. ते हल्ला करतात संघावर, याचे नेमके कारण काय आहे?
देशाच्या लोकशाहीवर होलसेल हल्ला होतो आहे, हे त्यांचे विधान आहे. ज्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले, त्याच मुलाखतीत ते म्हणतात की, ‘चीनमध्ये ज्या प्रमाणे जनतेला दडपले जाते, ते आम्ही करू शकत नाही. आमच्या रचनेत ते बसत नाही.’ जर देशात लोकांना दडपले जात नसेल, तर लोकशाही वर घाऊक हल्ला कसा होतो? हा प्रश्न मुलाखत कर्त्याने त्यांना विचारला नाही, हे त्यांचे नशीब. देशातील जनतेला दडपण्याचा प्रयत्न देशावर आणीबाणी लादून करण्यात आला होता. तो यशस्वी झाला नाही, हे राहुल गांधी यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे जनतेला दडपणे आमच्या देशाच्या रचनेत बसू शकत नाही, असे त्यांना म्हणावे लागते. तो त्यांचा स्वानुभव आहे.
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूर: एफ- १६, जेएफ- १७ विमानांसह पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली!
पाक पोलिसांचा नॅशनल प्रेस क्लबवर हल्ला; पत्रकारांना मारहाण
राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात!
जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप: मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले!
राहुल गांधी जे काही बोलतात, त्याच्या मागे काही ठोस विचार असतो, असे नाही. डोनाल्ड ट्रम्प भारताला बदनाम करण्यासाठी म्हणाले होते की,‘इंडीया इज डेड इकोनॉमी!’ राहुल गांधी यांनी त्याची ‘री’ ओढली होती. कोलंबियात जाऊन, आमच्याकडे आर्थिक प्रगती होते आहे, परंतु रोजगार निर्मिती मात्र होत नाही. आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगवर भर नाही. त्यामुळे रोजगार निर्माण होत नाहीत, असे ते म्हणतात. अर्थात ते यूपीएच्या काळातून बाहेर आलेले दिसत नाहीत. भारतात आर्थिक वाढ होत नाही, असे म्हणणे राहुल गांधी यांना जड गेले असते. भारताने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये जगातील सर्वाधिक ७.८% वाढ नोंदवली आहे. जगभरातील वित्तसंस्थांनी चमकदार अर्थकारणाच्या मुद्द्यावर भारतावर कौतुकाची सुमने उधळली आहेत. अशा परिस्थिती त्यांनी ‘इंडिया इज डेड इकोनॉमी’ या विधानाचा पुनरोच्चार केला असता, तर उपस्थितांनी त्यांच्या बौद्धिक कुवतीबाबत शंका घेतली असती. जी शंका भारतात अनेकांना आहे. म्हणून ते बेरोजगारीबाबत बोलले असावेत. आर्थिक वाढ होते आहे, परंतु तरुणांना रोजगार नाही, हेसुद्धा साफ खोटे आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा सप्टेंबर २०२५ चा ताजा अहवाल सांगतो की जी-२० देशांच्या समूहात भारताचा बेरोजगारीचा दर सर्वात कमी आहे. हा दर फक्त दोन टक्के आहे. राहुल गांधी किती बेधडक खोटे बोलतात, हे सर्वश्रुत आहे. ते देशात खोटे बोलतात, विदेशातही तेच करतात. परदेशात जाऊन भारताची बदनामी हा त्यांचा अजेंडा असतो.
यात सगळ्यात गमतीचा भाग वेगळाच आहे. एखाद्याने कसायाच्या दुकानासमोर मटणासाठी रांग लावायची आणि रांगेत शाकाहाराबाबत चर्चा करायची अशा प्रकारचा तो आहे. राहुल गांधी लोकशाहीवर हल्ला या विषयी कुठे चर्चा करतात? कोलंबियामध्ये जिथे २०२५ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या मिगेल उरीबे तुर्बे या ३९ वर्षांच्या उमेदवाराची हत्या झाली. जिथे १९८० ते १९९० या काळात अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार असलेल्या लुईस कार्लो गलान, वर्नार्डो जारोमिलो ओसा, कोर्लोस पिझारो लॅंगोमेझ, यांची हत्या झाली. कोलंबियातील राजकारण, तिथली लोकशाही ड्रग्ज माफीयांनी ग्रासलेली आहे. तिथे विरोधात बोलणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण मानले, जाते. तिथे जाऊन राहुल गांधी मोदींवर टीका करतात! भारतातल्या बेरोजगारीची चर्चा करतात. जिथे बेरोजगारीचा ताजा टक्का ७.८ टक्के आहे, २०२६ मध्ये तो ८.२ टक्के होण्याची शक्यता आहे. कोविडच्या काळात तिथली बेरोजगारी १९ टक्क्यांपर्यंत गेली होती. जीडीपी १६ टक्के घसरला होता. गरीबांचा आकडा २७ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर गेला होता. वित्तिय तूट ७.१ टक्के झाली होती. आजही या सगळ्यातून कोलंबियन अर्थकारण सावरलेले नाही. त्यांचा जीडीपी ४.५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान फिरतोय. कोलंबियाचे अर्थकारण हे ड्रग्जचे अर्थकारण आहे. त्या देशाचा जीडीपी आपल्या केवळ दहा टक्के आहे. फक्त ४२८ अब्ज डॉलर. आपण चार ट्रिलियन डॉलरचा आकडा कधीच पार केलेला आहे. म्हणजे आपण काय बोलतो हे राहुल गांधी यांना कळत नाही. कुठे बोलतो याचेही त्यांना तारतम्य नाही. ड्रग्ज माफियांच्या देशात जाऊन ते लोकशाहीची चर्चा करतात. जिथे विरोधकांचे मुडदे पाडले जातात, तिथे उभे राहून जेव्हा राहुल गांधी आमच्या देशात लोकशाहीवर होलसेल हल्ला होतोय, असे म्हणतात, तेव्हा अनेकांना हसू आले असेल. अर्थव्यवस्थेला घरघर लागल्यामुळे बेहाल झालेल्या कोलंबियन तरुणाईचे राहुल गांधी यांच्यामुळे चार घटका मनोरंजन झाले असेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







