बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार, तिथे झालेली दिपू चंद्रा दासची निर्घृण हत्या आणि चीन-अमेरिकेत सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईचा काही संबंध आहे, का? वरकरणी या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी वाटू शकेल. प्रत्यक्षात याचा घट्ट संबंध आहे. जागतिक कीर्तिचे गुंतवणूकदार रे डेलिओ यांच्या ताज्या विधानातून हे स्पष्ट होऊ शकते. तसे नाही. चीन आणि अमेरिकेत तंत्रज्ञान वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हा संघर्ष सुरू असताना भारत आर्थिक क्षेत्रातील मजबूत शक्ती म्हणून पुढे येऊ शकतो. हेच नको असल्यामुळे भारतात आणि भारताच्या शेजारात आग लावण्याचे प्रयत्न चीन सातत्याने करतो आहे.
भारतीय उद्योगपती, झिरोधाचे सर्वेसर्वा निखिल कामत यांनी रे डेलियो यांची मुलाखत घेतली. जागतिक अर्थकारणात सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेबाबत, भारताच्या प्रगतीबाबत ते सविस्तर बोलले.
डॅलिओ यांनी भविष्यातील सत्ता परिवर्तनाच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञान युद्धाला ठेवले आहे. ते म्हणाले, “जो कोणी तंत्रज्ञान युद्ध जिंकेल, तोच विजयी ठरेल. वर्चस्वाची ही लढाई फक्त आर्थिक नाही, ही लष्करी आणि त्याचा संबंध सुरक्षेशीही आहे. वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देश भांडवल आणि व्यापारातील पुरवठा साखळी आणि परस्परावलंबित्व संपवण्याचा प्रयत्न करतायत. एखाद्या गोष्टीसाठी दुसरा देश अवलंबून असेल तर त्याची कोंडी केली जाते आहे.
अमेरिका चिप्सच्या संशोधनात आघाडीवर आहे एआयच्या प्रांतात चीन आघाडीवर आहे.” भारत या लढाईतील अनपेक्षित पण शक्तिशाली घटक आहे. डॅलिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना चीनचे सुधारणावादी नेते डेंग झिओपिंग यांच्याशी केली, ज्यांना २० व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनच्या आर्थिक प्रगतीचा पाया रचण्याचे श्रेय दिले जाते.
डॅलिओ म्हणतात, “मला वाटते की भारत प्रगतीच्या एका अद्भुत वळणावर आहे… आणि मोदी हे भारताचे डेंग झिओपिंग बनले आहेत. डेलिओ भारताचे कौतूक करतायत, मोदींची तुलना डेंग झिओपिंग यांच्याशी करतायत. त्याच वेळी ते स्पष्ट करतायत की, भारताची आजची परीस्थिती ३० वर्षा पूर्वीच्या चीनसारखी आहे. दुसऱ्या बाजूला भारतात झालेल्या सुधारणा, मोठी लोकसंख्या आणि टॅलेंट हे भारताचे शक्तिस्थान आहे, हेही ते ठामपणे सांगतात.
हे ही वाचा:
अमेरिकेत इस्लामी तत्त्व लादली जातायत!
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे आयडीएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधन
भारताचे ५ युवा क्रिकेटपटू, ज्यांनी वर्ष गाजवले
बांगलादेश: हिंदू व्यक्तीच्या हत्येचा अल्पसंख्याकांकडून निषेध
चीन आणि अमेरिकेची स्पर्धा फक्त आर्थिक नाही, ती लष्करी आणि सुरक्षा वर्चस्वाची स्पर्धा आहे. हे डेलियो यांचे म्हणणे समजून घेणे कठीण नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांचा विजय झाला कारण त्यांच्याकडे अणुबॉम्बचे तंत्रज्ञान होते. जपानच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर झाल्यामुळे शक्तीचे संतुलन कोणाच्या बाजूने झुकले आहे, हे उघड झाले आणि दोस्तांचा निर्विवाद विजय झाला. तंत्रज्ञान जगाला कोणत्या दिशेने घेऊन जाते आहे, याचा उलगडा करायचा असेल तर टेस्लाचा पॅटर्न समजून घेण्याची गरज आहे.
टेस्लाच्या चालक रहीत कार जगभरात चालतात. परंतु टेस्ला ही फक्त कार निर्मिती करणारी कंपनी नाही. चालक विरहीत कारच्या माध्यमातून टेस्ला कंपनी एआयची प्रयोगशाळा बनली आहे. चालका शिवाय कार चालवणारे एआय पाहू शकते, रहदारीचा पॅटर्न समजून घेऊ शकते. अपघात होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर कार थांबवू शकते. सिग्नलवर कार थांबवणे आणि कोणी अचानक समोर आले तर कार थांबवणे यातला फरक या मशीनला कळतो. मानवी मेंदूच्या माध्यमातून केले जाणारे निरीक्षण, माहितीचे विश्लेषण, निर्णय अशा सगळ्या प्रक्रीया ही मानव रहीत कार पार पाडत असते. टेस्लाच्या माध्यमातून अब्जावधी किलोमीटर चाललेल्या या कारकडे प्रत्यक्ष अनुभवाचा प्रचंड डेटा जमा झालेला आहे. मानवी विचार क्षमता, विश्लेषण क्षमता याबाबतचा हा डेटा रोबोटीक्सच्या क्षेत्रात वापरला जाणार आहे. हेच रोबोट भविष्यातील कामगार बनणार आहेत. सीमेवर लढणारे सैनिक बनणार आहेत.
ऑपरेशन सिंदूर असो किंवा युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध असो. यात ड्रोनची कामगिरी जगाने पाहीली. ही कामगिरी थक्क करणारी आहे. ही ड्रोन आज हल्ला करू शकतात. हेरगिरी करू शकतात. सध्या खूप मोठ्या क्षेपणास्त्राचा मारा करण्याची ड्रोनची क्षमता मर्यादीत आहे. ती भविष्यात ती मोठ्या संख्येने वापरात येणार याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही.
चीनने कॅमेरा, सेंसर आणि शस्त्रांनी सज्ज असलेल्या यांत्रिक कुत्र्यांची फौज उभारली आहे. लढण्यासाठी, साधन सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी, टेहळणीसाठी मानव रहित वाहनांची निर्मिती केली आहे. सीमेवर जवानांना रसद पुरवठा करणारे रोबोट बनवले आहेत. समुद्रातील युद्धासाठी सुद्धा पाण्यावर आणि पाण्याखाली वावर करतील अशी साधने विकसित केलेली आहेत. रेल्वे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चीनची भरारी मोठी आहे.
जे विकसित करण्यासाठी चीनला ३० वर्षांचा काळ लागला. त्या उंचीवर यायला भारताला फार काळ लागणार नाही. कारण आजचा जमाना एआयचा आहे. प्रचंड अनुभव गाठीशी असलेला एखादा आर्कीटेक्ट भव्य इमारतीचे डीझाईन या कुशलतेने बनवू शकतो, त्याच कुशलतेने काल आर्कीटेक्ट बनलेला तरुणही बनवू शकतो, कारण त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे.
आजचा भारत हा ३० वर्षापूर्वी असलेल्या चीनसारखा आहे, हे रे डेलिओ यांचे मत अगदी बरोबर आहे. परंतु चीनशी बरोबरी करण्यासाठी भारताला तीन दशके वाट पाहावी लागणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. भारताकडे आज टॅलेंट आहे आणि या टॅलेंटला दिशा देणारे नेतृत्वही. गेल्या तीन दशकातील चीनच्या प्रगतीची दोन प्रमुख कारणे आहेत, युरोप आणि अमेरिकेच्या कंपन्यांनी चीनमध्ये सुरू केलेले घाऊक उत्पादन आणि चीनने जगभरातील देशांकडून चोरलेले तंत्रज्ञान. भारताचे तसे नाही. चीनमध्ये असलेले कारखाने आता बाहेर पडतायत, त्यातले बरेच भारतात दाखल होत आहेत. भारतात निर्माण झालेले तंत्रज्ञान भारताचे स्वत:चे आहे. चीनसारखे तंत्रज्ञान चोरण्याची भारताला गरज नाही.
तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची क्षमता पाहायची असेल तर अणुबॉम्बचे उदाहरण लक्षात घ्यावे लागेल. सर्वात आधी अमेरिकेने बनवला. परंतु अणुतंत्रज्ञान अमेरिकेला मिळाले जर्मनीतून पळून आलेल्या शास्त्रज्ञांकडून, त्यातले काही संशोधन ब्रिटनमध्ये झाले होते. रशियाने अमेरिकी तंत्रज्ञान चोरी केले. अमेरिकेच्या मॅनहटन प्रोजेक्टचे फॉर्म्यूले, डीझाईन हेरगिरीच्या मार्गाने रशियाने लांबवले. चीनला रशियाने सुरूवातीच्या काळात मदत केली. भारत हा जगातील एकमेव असा देश असा आहे, ज्याने स्वबळावर अणुबॉम्बची निर्मिती केली. अणुभौतिकी, अणुभट्ट्यांची रचना, प्युटोनियमची निर्मिती, बॉम्बची रचना भारताने स्वत:च विकसित केली.
भारताचे हे टॅलेंट जगाला माहिती आहे. क्रायोजेनिक इंजिनाबाबत हेच झाले. रशिया या प्रकल्पासाठी भारताला मदत करणार होता. परंतु अमेरिकेच्या दबावामुळे रशिया मागे हटला, हे इंजिन भारताने निर्माण केले.
रे डेलियो जेव्हा म्हणतात, अमेरिका आणि चीनच्या वर्चस्वाच्या संघर्षात भारत एक महत्वाची शक्ती म्हणून उदयाला येईल त्याचे कारण हेच आहे. फक्त डेलियो नाही, तर उघड्या डोळ्याने पाहू शकणाऱ्या प्रत्येक दृष्ट्याला हे माहित आहे. भारताकडे असलेले जबरदस्त टॅलेंटची जादू जगाने पाहीली आहे. चीनलाही ते ठाऊक आहे.
चीन नेहमी पाकिस्तानची तळी का उचलतो? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा का देतो ? पाकिस्तानी दहशतवाद्यांवर जेव्हा जागतिक स्तरावर कारवाई होते, तेव्हा त्यांचे कवच बनवून का उभा ठाकतो? याचे कारण चीनला भारताच्या क्षमतेचे भय आहे.
बांगलादेशमध्ये जेव्हा २०२४ मध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर जो हिंसाचार झाला. त्यात पाकिस्तानसोबत चीन आणि अमेरिका या देशांचाही सहभाग होता. आजही बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहमद युनस यांना चीन आणि पाकिस्तानची फूस आहे. तिथले हिंदूंवर होणारे हल्ले हे या दोन देशांनी प्रायोजित केलेले हल्ले आहेत. हे हल्ले भारताला चिथावणी देण्यासाठीच करण्यात आले आहेत. बांगलादेशात आग लागली तर त्याच्या झळा भारतातही पसरणार असा त्यांचा होरा आहे. भारताची प्रगती जशीजशी वेगाने होईल तस तसे भारताला घेरण्याचे प्रयत्न अधिक ताकदीने केले जातील, त्यात चीनसोबत अमेरीकाही सामील असेल. कारण जर अमेरिकेला चीनचे वर्चस्व सहन होत नसेल तर भविष्यातील स्पर्धक म्हणून भारतही नको आहे. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने रे डेलियो यांची विधाने नीट समजून घेण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







