सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोरगरीबाला पकडायचे, मराठी बोल म्हणून सांगायचे, येत नसेल तर ठोकायचे, असे मराठी प्रेमाचे सोहळे ठिकठिकाणी सुरू आहेत. यात बॉलिवुडच्या सेलिब्रिटींसह काही सन्माननीय अपवाद आहेत. मराठी माणसांला ठगणाऱ्या, लुबाडणाऱ्या एकालाही हे मराठीचे दुकानदार कधी हात लावत नाहीत. वसई विरारचे माजी महापालिका आय़ुक्त अनिलकुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराची सध्या ईडीचे अधिकारी चौकशी करतायत. नालासोपाऱ्यातील ४१ बेकायदा इमारती तोडल्यानंतर नगर रचना विभागाचा उपसंचालक वाय.एस. रेड्डी याच्यापासून ही कारवाई सुरू झाली. आणखी एक शाह नावाची व्यक्ती ईडीच्या रडारवर आली आहे. हा शहा गेली २५ वर्षे इथे सक्रीय आहे. अनधिकृत इमारती ठोकायच्या, मराठी माणसाला घरे विकायची, त्यांना ठगायचे, असे हजार गुन्हे करणारे हे लोक, परंतु त्यांना हात लावण्याची कुणाची टाप नसते. ते मराठी बोलतात की नाही बोलत याकडेही मराठीच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांचे लक्ष नसते.
असे अनेक पवार, रेड्डी आले आणि आपापला माल कमवून गेले. शहा नावाचा माणूस या भ्रष्टाचाराच्या खेळातील तो पोपट आहे, ज्यात राक्षसाचा जीव अडकलेला आहे. ईडीची नजर आता त्याच्याकडे वळलेली आहे. नालासोपाऱ्यात ४१ अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या. हजारो लोक बेघर झाले. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. ईडीची कारवाई सुरू झाली. बिल्डरांना पैसे मोजून ज्यांनी ही घरे विकत घेतली, चौकशी न करता बँकांनी ज्यांना कर्ज दिली, त्यात सातारा, सांगली, जळगाव, कोकणातील मराठी लोकही होते. ज्यांनी त्यांना ठगले ते मराठीद्रोही या व्याख्यात बसत नाहीत का? अशा गोरगरीबांची फसवणूक करणाऱ्यांना ना कोणी जाब विचारत, ना महाराष्ट्रद्रोही म्हणत, ना कोणी झुंडीने मारायला जात. कारण या शाह आणि रेड्डींच्या खिशात, घरात, तिजोरीत, बाथरुममध्ये पैसा असतो, हा फेकून तोंड बंद करण्याची यांची ताकद असते. त्यांना बडवणे गरीबाला बडवण्या इतके सोपे नसते.
वसई विरारचा नगर रचना विभागाचा उपसंचालक वाय.एस.रेड्डी याच्यापासून ही कारवाई सुरू झाली. कारवाईच्या दिवसापर्यंत तो त्याच्या कार्यालयात हजर होता. तिथून तो हैदराबादला रवाना झाला. तिथेच अचानक त्याच्या हृदयात बिघाड झाला. सध्या तो हैदराबादेतील एका पंचतारांकीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तुमच्याकडे वारेमाप पैसा असल्याचे हे फायदे आहेत. तुम्ही चौकटीच्या कचाट्यात असतानाही मौजमजा करू शकता. चौकशीचे हे प्रकरण थंड होऊन डीप फ्रिजरमध्ये जाईपर्यंत रेड्डीचे हृदय बरे होण्याची शक्यता नाही. तीन वर्षांनी निवृत्त झाल्यावर त्याला कोण हात लावणार? हा भारताच्या बाहेर पळण्याची शक्यता असताना त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आलेला नाही. मॉलमध्ये काम करणारा सुरक्षा रक्षक मराठी बोलू शकला नाही तर महाराष्ट्र द्रोही, परंतु रेड्डी मात्र मराठी द्रोही ठरत नाही.
वसई विरारमध्ये तुम्हाला इमारत बांधायची असेल वा ठोकायची असेल. चौरस फूटाला १५० रुपये मोजल्या शिवाय अदाणी सुद्धा इथे इमारत बांधू शकत नाहीत. ही परंपरा अनिल कुमार पवार यांनी सुरू केलेली नाही. हे आधीही होत होते, त्यामुळे पवारांच्या पूर्वसुरींच्या संपत्तीचीही चौकशी व्हायला हवी. अनिलकुमार यांना चौरस फूटामागे १२ रुपये मिळत असतील, तर बाकीचे कोणाच्या खिशात जातात, याचा शोध ईडीचे अधिकारी घेत आहेत. हे काम कठीण आहे. हा हिशोब देणार कोण? कोणी किती घेतले, हे कोणाला माहिती असणार? या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे, त्याचा मार्ग बहुधा ईडीला सापडला आहे. त्या दिशेला एक महत्वाचे पाऊल ईडीने टाकलेले आहे. राक्षसाचा जीव ज्याच्यामध्ये आहे, असा पोपट ईडीला सापडला आहे. त्या पोपटाचे नाव शाह आहे. वसई विरारमध्ये शाहला ओळखत नाही, शाहला ज्याने पैशाच्या थैल्या दिल्या नाहीत, असा एकही बिल्डर नाही. एकही महापालिकेचा अधिकारी नाही. अनिलकुमार पवारांसारखे अनेक आयुक्त त्याने पाहिले. गेली २५ वर्षे हा माणूस पैसे जमवण्याचे काम करतो आहे. हे पैसे तो कुणासाठी जमा करतो हे काही गुपित नाही. हा माणूस ईडीच्या रडारवर आलेला आहे. या शाहमध्ये कोणाचा जीव अडकला आहे, हेही ईडीच्या अधिकाऱ्यांना समजले आहे. ज्या दिवशी ईडीची मजबूत पकड या पोपटावर असेल तेव्हा त्या रावणाचा श्वास कोंडणार आहे. कारण हा त्याचा राईट हॅंड आहे. याची गाठभेट घ्यायची असेल तर साहेबांच्या मालकीच्या कॉलेजमध्ये जाऊन याला भेटावे लागते.
याला पैसे मोजल्याशिवाय ना तुमच्या इमारतीला सीसी मिळत ना ओसी. बाकी अटी शर्ती सुद्धा लागू आहेत. इमारतीसाठी लागणारे सिमेंट, रेती, वीटा सगळ्या यांच्या माणसाकडूनच घ्याव्या लागतात. वसई विरार महापालिका झाली, तेव्हा पासून इथे अनेक महापालिका आय़ुक्त आले. कित्येक अधिकारी, महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आले गेले, परंतु हा माणूस मात्र कायम आहे. त्याच्याकडे असलेले वसूलीचे काम कायम आहे. याची किंवा याच्या पाठिशी असलेल्याची ताकद एवढी मोठी आहे की हा बिल्डरच्या ऑफीसमध्ये गेला की बिल्डरच्या खुर्चीवर हा शाह बसतो, बिल्डर याच्या समोर उभा राहतो. शाहच्या विरोधात कारवाई सुरू झाली तर त्याचा अर्थ एवढाच असेल की राक्षसाची आता खैर नाही. परंतु हा राक्षस सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त मिळवण्यात पटाईत आहे. दरवेळी त्याला हे जमून जाते. यावेळी काय होईल, हे सांगता येत नाही.
याला धरला तर वसई-विरारमध्ये आले गेलेले अधिकारी, आयुक्त, नेते, सगळ्यांना किती मिळाले, प्रति चौरस फूट कोणाचा दर किती आहे, हे सगळेच उघड होऊ शकेल. या शहा, रेड्डींचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी कितीही मराठी माणसांचा बाजार उठवला, त्यांना बेघर केले तरी झुंडीने जाऊन त्यांना कोणीही बडवत नाही. त्यांना कोणी महाराष्ट्र द्रोहीही म्हणत नाही. मराठी बोलून दाखवा असा लाडीक हट्टही कोणी त्यांच्याकडे करीत नाही. मग ते उत्तर भारतीय असो, गुजराती असो.
हे ही वाचा:
मोदी-शहांची राष्ट्रपतींसोबत भेट, ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार?
इंडी आघाडी राम, सनातन आणि हिंदू विरोधी
डेंग्यूमधून बरे झाल्यानंतरही जाणवतेय कमजोरी?
निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशी द्या!
मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखाडायचे आहे ते उखाडा हे संजय राऊतांचे विधान म्हणजे निव्वळ बकवास आहे. मनसेपेक्षा उबाठा जास्त आक्रमक असल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. महापालिकेने नालासोपाऱ्यात केलेल्या कारवाईत ज्या ४१ इमारती तोडल्या, त्यात मराठी माणूस होता, तुम्ही काय उखाडले शाह आणि रेड्डीचे? किती लोकांनी घर गमावलेल्या या लोकांसाठी आंदोलन केले. त्या शाह आणि रेड्डींच्या विरोधात, त्या अमराठी बिल्डरच्या विरोधात आंदोलन केले. तुम्ही केले नाहीत, आणि करणार नाहीत, कारण भ्रष्टाचारी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कधी लढू शकत नाहीत. पत्राचाळीचा बाजार मांडणारे, मराठी माणसाला न्याय कसा देतील. शाह, रेड्डींच्या विरोधात कसे बोलतील. सगळे आम्हीच करायचे, तुम्ही फक्त पंखा हलवणार, असे संदीप देशपांडे नीतेश राणे यांना म्हणाले होते. कारण राणे यांनी मदरशांचा मुद्दा उपस्थित केला होता. रेड्डी आणि शहा यांच्या विरोधात सुद्धा अशीच उत्तरे ऐकायला तयार राहा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







