भारतीयांना झालेय तरी काय? गुकेश डोम्माराजू, रमेशबाबू प्रज्ञानंद, मराठमोळी दिव्या देशमुख ही सगळी तरुण मुलं बुद्धीबळाच्या प्रांतात जगभरात भारताचा झेंडा फडकावतायत. भारतीयांची ही डोक्यालिटी फक्त बुद्धीबळापुरती मर्यादित नाही. अनेक क्षेत्रात सुखद धक्का देणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडतायत. हैदराबादेत आणखी दोन तरुणांनी जगाला चक्रावणारी कामगिरी केली आहे. हॉस्टेलमध्ये लष्कराला अत्यंत उपयुक्त असलेले ड्रोन बनवले. कामिकाझे ड्रोन, शत्रूवर वार करणारे, टेहळणीसाठी उपयुक्त. भारताची ही विशेषता राहिलेली आहे. जे निर्माण करण्यासाठी अमेरिका कोट्यवधी रुपये संशोधनावर खर्च करते ते भारतात मूठभर पैशात होऊन जाते.
हैदराबादेतील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एण्ड सायन्सचे विद्यार्थी असलेल्या शौर्य चौधरी आणि जयंत खत्री यांच्या मैत्रीची ही कहाणी. बरेच दिवस हे दोघे एका प्रयोगात गुंतलेले. इतके की अनेकदा अभ्यासाकडेही त्यांचे दुर्लक्ष व्हायचे. परंतु त्यांना बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एण्ड सायन्सकडून संस्थेच्या प्राध्यापकांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठींबा मिळाला. थ्री इडीयट या सिनेमात असेच ड्रोन तयार करणाऱ्या जॉय लोबो या बुद्धीमान विद्यार्थ्याला प्राध्यपकांचा पाठींबा न मिळाल्यामुळे आत्महत्या करावी लागते, असा एक सीन आहे. त्याच्या विपरीत बिट्समध्ये घडत होते. एका इतिहास आकाराला येत होता. काही दशकापूर्वीची दिल, दोस्ती आणि दुनियादारी वेगळी होती. तेव्हा तरुणाईचे जिव्हाळ्याचे विषय वेगळे होते. रमायचे विषय वेगळे होते. महत्वाकांक्षेचे विषय वेगळे होते. आजची तरुणाई वेगळी आहे. त्यांचे रमायचे, गुंतायचे विषय वेगळे आहेत. बिट्सचे कुलगुरु, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्यासमोरही शौर्य आणि जयंतने या ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनीही दोघांच्या या प्रयत्नांचे तोंड भरून कौतूक केले.
शौर्य आणि जयंत दोघांना ठाऊक होते की आपण काय करतोय. त्या दोघांनी चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात अपोलियन डायनॅमिक्स या नावाने स्टार्टअप सुरू केला. रोबोटीक्स आणि ड्रोन निर्मितीचे क्षेत्र त्यांनी निवडले. हे दोघांचे लाडके विषय, त्यातच काही तरी मोठे करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. फक्त जे काही करायचे आहे, ते बोलून दाखवायचे नाही, तर करून दाखवायचे असा चंग दोघांनी बांधला होता. हॉस्टेलच्या खोलीतच जुळवाजुळव सुरू झाली. आराखड्याबाबत चर्चा झाली. तो कागदावर उतरवण्यात आला. डीझाईन तयार झाल्यावर, सुटे भाग बनवण्याची सुरूवात झाली. अडचणी अनेक होत्या. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकताना जे खडतर अनुभव येतात, ते शौर्य आणि जयंत या दोघांनाही आले. परंतु कोशिश करनेवालो की हार नही होती… हे दोघांनाही ठाऊक होते. अखंड आणि अथक परीश्रमानंतर जे काही तयार झाले, ते अदभूत होते. जे काही तयार झाले होते ते पाहून दोघे अक्षरश: नाचले.
त्या दोघांनी एक किलो पेलोड वाहून नेणारे आत्मघाती ड्रोन बनवले होते. त्याची चाचणी घेण्यात आली. त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांनी लिंक्डीन सारख्या माध्यमांचा वापर करून सेनाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू केला. पहीली शुभवार्ता त्यांना मिळाली चंदीगढ मधून. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर देश बदलतो आहे, असे सर्रास म्हटले जाते. म्हणजे नेमके काय होते आहे. रस्ते, पूल बांधले जातायत, उत्पादन वाढते आहे, खजिना भरलेला आहे, एवढेच असते का? एवढे बदल पुरेसे नसतात. देशातील सर्वसामान्य माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत देश बदललाय असे म्हणता येत नाही. ही मानसिकता बदलताना दिसते आहे. ती सर्वसामान्य माणसापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून उद्योगपतींपर्यंत हा बदल दिसतो आहे. कोण्या अज्ञात प्रेरणेतून सगळे एका दिशेने जाताना दिसतायत. ही प्रेरणा सकारात्मक आहे, ऊर्जा देणारी आहे. मंत्रिमंडळातील मंत्री, अधिकारी, सेनाधिकारी सर्वांना या बदलाचा स्पर्श झालेला दिसतो आहे. अगदी सोशल मीडियावरून संपर्क केला तरी मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच प्रतिसाद देताना, मदत करताना दिसतात. लालफीत कारभार इतिहास जमा झालेला आहे.
अधिकार पदावर असलेल्यांमध्ये पूर्वीचा माज आता कमी झालेला दिसतो. शौर्य आणि जयंत यांना सुद्धा हा अनुभव आला. त्यांनी केलेल्या विनंतीला चंदीगढमधून एका कर्नलने प्रतिसाद दिला, त्यांना बोलावून घेतले. चंदीगढमध्ये प्रात्यक्षिक द्यायला सांगितले. दोघांनी तयारी दर्शविली. जे काही त्या दोघांनी दाखवले ते पाहून सेनाधिकारीही चक्रावले. हे काम नवशिक्यांचे नव्हते. सराईतांना मागे टाकणारी सफाई शौर्य आणि जयंत यांनी आपल्या कामातून दाखवली होती.
प्रति तास ३०० किमी वेगाने उड्डाण करणारे कामिकाझे ड्रोन, एक किलो पेलोड वाहून नेण्याची क्षमता असलेले, शत्रूवर अचूक मारा करणारे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या ड्रोनला शत्रूच्या रडारची भीती नाही. ते शत्रूच्या रडारला पकडता येत नाही. त्यामुळे ही भारताची अदृश्य मारक शक्ती आहे. चंदीगढ पाठोपाठ, जम्मू, हरीयाणा, पश्चिम बंगालमधील पानगढ, अरुणाचल प्रदेशात या ड्रोनची लष्करासमोर प्रात्यक्षिके झाली. शौर्य आणि जयंत या दोघांनी लष्करी जवानांना याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा तयार केलेला आहे. हे ड्रोन तयार केल्यानंतर शौर्य आणि जयंत यांच्या कंपनीला ऑर्डर मिळायलाही सुरूवात झाली. काम वाढले, त्यामुळे टीम वाढवणे गरजेचे होते. कॅम्पसमधील आणखी काही विद्यार्थी त्यांना सामील झाले. आता एकूण संख्या १० झाली.
हे ही वाचा:
ऋषभ पंतची क्षमता जबरदस्त आहे, त्याचा जोश अतुलनीय आहे: शार्दुल ठाकूर
पोर्तुगालचा वर्किंग व्हिसा कमी फीमध्ये कसा मिळवायचा ?
शिवलिंग असलेले प्राचीन हिंदू मंदिर आणि थायलंड-कंबोडिया युद्ध!
माधवराव पेशव्यांच्या निजामावरील विजयाचा उत्सव १० ऑगस्टला
ड्रोनमुळे आधुनिक युद्धाचे गणितच बदलून गेले आहे. ज्याच्याकडे अधिक सक्षम अशी ड्रोन आहेत, त्याची टेहळणीची क्षमता जास्त, मारक क्षमता जास्त. भारतात ड्रोन निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या क्षेत्रात उतरलेल्या स्टार्टअप्सची संख्या मोठी आहे. त्यातही कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसलेल्या शौर्य आणि जयंत यांच्यासारख्या तरुणांचा भरणा त्यात जास्त आहे. मे २०२५ मध्ये बिझनेस स्टॅंडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे. गेल्या पाच वर्षात ड्रोन निर्मितीच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत ५५० कंपन्या उतरल्या आहेत. हा आकडा गेल्या पाच वर्षातील आहे, ही बाब महत्वाची आहे. या कंपन्यांचे कर्तेधर्ते हे तरुण तुर्क आहेत. ते शौर्य किंवा जयंत यांच्यासारखे आहेत. डोक्यालिटीवाले. असे तरुण ज्यांच्याकडे कल्पनांची कमतरता नाही. त्यांना हात देणाऱ्या लोकांचीही कमतरता नाही. या तरुणांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवून पैसा गुंतवण्यासाठी लोक पुढे येत आहेत, त्यामुळेच त्यांच्या बुद्धीमत्तेला वाव मिळत आहे.
हे जे बदलते चित्र आहे, ते लोभसवाणे आहे. या ड्रोन कंपन्यांची इकोसिस्टीम उभी राहताना दिसते आहे. २६२ अशाही कंपन्या आहेत ज्या ड्रोन्सचे सुटे भाग बनवतात. या एकूण कंपन्यांपैकी १०० कंपन्या डीफेन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या काळात आयडीया फोर्ज, झुप्पा जीओ नॅव्हीगेशन, अल्फा डीझाईन टेक्नोलॉजी, एकोनॉमिक एक्स्पोसिव्ह, आयजी ड्रोन्स आदी अनेक कंपन्या चमकल्या. त्यांचे फक्त भारतात नाही तर जगभरात कौतूक झाले. याचा सकारात्मक परीणाम आपल्या एकूणच डिफेन्स क्षेत्रावर झाला. या यशाने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले की या कंपन्यांचे कर्तेधर्ते हे हवशेगवशे नाहीत. ते तरुण असले, अननुभवी असलेले तरी ते कसलेले आहे. सचिन तेंडूलकर व्या वर्षी मैदानात उतरला होता, तेव्हाही त्याचा वावर जगज्जेत्या फलंदाजासारखा होता. भारताची ही तरुणाई नव्या इतिहासाची निर्मिती करते आहे. भारत खरोखर बदलतो आहे, याची साक्ष देते आहे. शौर्य आणि जयंत यांची कंपनी अपोलियन या कंपनीने त्याचे ताजे पान लिहीले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







