पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जनतेच्या मनात जो संताप धगधगत होता, त्याची सुरूवात आर.जी.कार मेडीकल कॉलेजमध्ये झालेले सामुहीत बलात्कार प्रकरणापासून झाली. संदेशखाली प्रकरणामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले. दोन्ही प्रकरणे महीला सुरक्षेशी, महिलांच्या आत्मसन्मानाशी संबंधित होती. या आगीत ममता यांचे सरकार खाक झाले. शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार ९ मे २०२६ रोजी राज्यात सत्तारुढ झाले. अवघ्या दोन महिन्यात राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह लागले. अधिकारी यांनी ते अवघ्या चार दिवसात पुसून टाकले. पिडीतेच्या कुटुंबाला चार दिवसात न्याय मिळवून दिला, तोही अगदी योगी स्टाईल.
मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या कानावर हे बारुईपूरचे सामुहीक बलात्कार प्रकरण आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे संवेदनशीलता दाखवली. मुलीच्या वडीलांशी फोनवर संपर्क साधला. नंतर त्यांची व्यक्तिगत भेट घेऊन सांत्वन केले. त्यांना दिलासा दिला. ‘आरोपींना फासावर लटकवू’, असे आश्वासन दिले. पोलिसांना ७२ तासात कारवाईचे आदेश दिले. कोणतीही हयगय झाली तर एकाही चुकार पोलिसाला सोडणार नाही, असा दम भरला. त्याचे परिणाम समोर दिसतायत. प.बंगालमध्ये फक्त सत्ता बदल झालेला नाही, सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेतही बदल झाला आहे, हे शुभेंदु यांनी दाखवून दिले.
सरकार तुम्हारी सिस्टीम हमारी हे आपण बऱ्याचदा ऐकत असतो. १५ वर्षांच्या तृणमूल सरकारच्या कार्यकाळात पोलिस दलाचे पूर्णपणे तृणमूलीकरण झाले होते. पोलिस ठाण्यांची पक्ष कार्यालये बनली होती. हे चित्र बदलणे शुभेंदु यांच्या सरकारच्या समोर असलेले सगळ्यात मोठे आव्हान होते. एक सरकार गेल्यानंतर दुसरे सरकार येते. आधीच्या सरकारच्या काळातील राजकिय गुंड पक्षाचा झेंडा बदलतात आणि सत्ताधारी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत नव्याने गुंडगिरी करतात, हे प.बंगालमध्ये अनेक वर्षे सुरू होते. भाजपाच्या राज्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती.
मुस्लीम बहुल २४ परगणातील बारुईपूर येथे ४ जुलै रोजी १२ वर्षांची शाळकरी मुलगी बेपत्ता झाली. मैत्रीणीसाठी वाढदिवसाचे गिफ्ट घ्यायला घराबाहेर पडली ती परतलीच नाही. ५ जुलै रोजी सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह सापडला. यामुळे प्रचंड जनक्षोभ उसळला. संतप्त स्थानिक जमावाने बारुईपूर जयनगर रस्ता आणि रेल्वेमार्ग रोखून धरला. टायर जाळले, पोलिस वाहनांची तोडफोड केली. इंद्रजीत मोंडल या तरुणावर संशय असल्यामुळे त्याला बेदम मारहाण करून ठार करण्यात आले. प्रत्यक्षात याचा बलात्कार प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता, असे नंतर उघड झाले.
६ जुलै रोजी शवविच्छेदनाचा अहवाल आला. मुलीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला होता. कुकर्म केल्यानंतर जिवंत असतानाच तिला पोत्यात घालून तलावात फेकण्यात आल्याचे उघड झाले. माणूसकीवर कलंक असलेले हे संपूर्ण प्रकरण. फुफ्फुसात पाणी गेल्याने तसेच अति रक्तस्त्रावाने तिचा मृत्यू झाल्याचे निदान शवविच्छेदन अहवालात करण्यात आले.
पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या. आजूबाजूच्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फूटेजमध्ये निळी टोपी घातलेल्या एका व्यक्तिसोबत ती मुलगी दिसली. त्याचे नाव प्रभास मोंडल असल्याचे उघड झाले. पोलिसांनी प्रभासचा ताबा घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा तपशीलही त्याने दिला.
हे ही वाचा:
दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात मोठा भूकंप
शोपियान मध्ये ‘लष्कर’च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या
गुजरातवरून चरफडणाऱ्यांना चपराक, महाराष्ट्रात येणार नर्मदेचे १० टीएमसी पाणी
आनंद सरदार आणि दिवाकर सरदार या आणखी दोन आरोपींची नावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे त्यांचा छडा लावला. आनंद सरदार हा रिक्षा चालक आहे. पीडित मुलीच्या परिवाराच्या परीचयाचा आहे. त्याच्यामुळेच ती मुलगी सोबत जायला तयार झाली असावी. गुन्हा घडल्यानंतर ४८ तासात पोलिसांनी कारवाई केली.
जिथे गुन्हा घडला त्या ठिकाणी प्रभासला नेताना त्याने एका पोलिसाचे रिवॉल्व्हर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, अशी कथा पोलिसांनी सांगितली आहे. ती खरी असण्याची शक्यता कमी. परंतु मुलीच्या पालकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहेत. हा गुन्हा उघड झाल्यानंतर मुलीच्या पालकांना मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी भेटले होते. गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले होते. ते इतक्या लवकर पूर्ण होईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती.
हे प्रकरण घडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बारुईपूरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना मुलीच्या पालकांची भेट घ्यायची होती. ५ जुलै रोजी त्यांनी एक्सवर पोस्ट केली की, त्यांना स्थानबद्ध करण्यात आले असून बाहेर पडण्यापासून रोखण्यात आले आहे. ज्यांच्या कार्यकाळात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते कॉलेजातील हॉस्टेलमध्ये घुसखोरी करून कॉलेज तरुणींना खुलेआम वासनेचे शिकार बनवत होते. ज्यांच्या कार्यकाळात आर.जे.कार प्रकरण घडले, संदेशखाली घडले आणि मुख्यमंत्री म्हणून ममतांनी ही प्रकरणे सतत दडपण्याचा प्रयत्न केला, त्या पाषाणहृदयी ममता बॅनर्जी बारुईपूर सामुहीक बलात्कार प्रकरणानंतर अचानक संवेदनशील झाल्या. अलिकडे सुप्रिया सुळे प्रचंड श्रद्धाळू झालेल्या आहेत, तशाच. सत्ता गमावलेल्या ममता बॅनर्जी यांना शुभेंदू यांच्या सरकारच्या विरोधात कोलीत मिळाल्याचा आनंद झाला असावा, परंतु शुभेंदू यांनी तो टिकू दिला नाही.
पोलिसांनी प्रभास मोंडलचे एन्काऊंटर केल्यानंतर आता महुआ मोईत्रा यांना कंठ फुटला. काय चालले आहे काय? प.बंगालचा उत्तर प्रदेश होतो. इथे जंगल राज अवतरले आहे, अशी पोस्ट केलेली आहे.
महुआ यांना काय वाटते आहे हे महत्वाचे नाही. त्या दुर्दैवी मुलीच्या पालकांच्या काळजात जी आग लागली होती, ती काही प्रमाणात थंड झाली आहे हे महत्वाचे. प्रभास मोंडलचे पोलिसांनी एन्काऊंटर केले याचे दु:ख महुआ आणि ममता यांना होणे स्वाभाविक आहे, त्यांना या दुर्दैवी घटनेचे जे राजकारण करणे अपेक्षित होते, ते करता आले नाही.
प.बंगालचा उत्तर प्रदेश होतो आहे, ही महुआ यांच्या दृष्टीने चिंतेची बाब असली तरी जनतेला हेच अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी ममता यांना बाजूला सारुन इथे भाजपाचे सरकार आणले. इथे यापुढे शाहजहान शेख, जहांगीर खान यांच्यासारख्या गुंडपुंडाना ठेचले जाईल याची व्यवस्था केली. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार येण्यापूर्वी हीच परिस्थिती होती. छेडछाड, बलात्कार आदी घटनांचा पूर आला होता. सुरक्षित राहायचे असेल तर घरी बसायचे, अगदीच बाहेर पडायचे असेल तर सातच्या आत घरी परतायचे, असा अलिखित नियम तिथल्या महिलांना अंगिकारला होता.
योगी राज आल्यानंतर तिथे एन्काऊंट, हाफ इन्काऊंटरचा सिलसिला सुरू झाला. त्याचा परिणाम असा की, मध्यरात्रीही महिला बाहेर पडली तरी तिला भय वाटत नाही. यूपी पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१७ ते २०२५ या काळात पोलिस आणि गुंडांच्या १४,९७३ चकमकी झाल्या असून त्यापैकी ९४६७ प्रकरणे हाफ एन्काऊंटरची आहेत. म्हणजे छेडछाड करणाऱ्याच्या पायावर गोळी घालायची आणि आयुष्यभर तो लंगडत चालेल याची व्यवस्था करायची. द्रौपदीच्या पदराला हात घालणाऱ्या प्रत्येक दुर्योधनाची मांडी फोडली जाईल आणि दु:शासनाचा हात उखडला जाईल, तेव्हाच इतरा महिलांच्या वाटेला जाण्याचे धाडस कोणी करणार नाही. प.बंगालमध्ये हा ट्रेण्ड सुरू झाला तर महुआ मोईत्रा सारख्यांना त्रास होईल. जनता मात्र खूष राहील. सामुहिक बलात्कार प्रकरणातील उरलेल्या आरोपींचा हिशोब झाला अशी बातमी कधीही येईल.
आता राहिला मुद्दा त्या दुर्दैवी तरुणाचा, ज्याचे लिंचिंग झाले. इंद्रजीत मोंडल असे त्याचे नाव. त्यालाही न्याय देण्यासाठी अधिकारी दक्ष आहेत. दंगल आणि लिंचिंग करणाऱ्या लोकांची धरपकड सुरू आहे. कायदा सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला दहशत हवी याची काळजी प.बंगालचे सरकार घेत आहे. सरकारचा दरारा असेल तर निम्मे काम त्यातूनच होते. शुभेंदू नेमके तेच करतायत. त्यांचे मनापासून अभिनंदन.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
