29 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरसंपादकीयचांदी कोसळण्याचे तीन दिवस आधी केलेले ते गूढ भाकीत...

चांदी कोसळण्याचे तीन दिवस आधी केलेले ते गूढ भाकीत…

Google News Follow

Related

२०२६ या वर्षात चांदी ५० टक्क्यांनी कोसळेल, असे भाकीत २६ जानेवारी रोजी कऱण्यात आले होते. दोन दिवसांत जागतिक बाजारपेठेत चांदी कोसळायला सुरूवात झाली. आज २ फेब्रुवारी उजाडला, परंतु चांदी कोसळतेच आहे. मार्को कोलानोविक हे या भाकीतकर्त्याचे नाव. हे भाकीत नव्हे भविष्यवाणी ठरली. एखाद्याच्या तोंडून काही तरी शब्द बाहेर पडावेत आणि ते प्रत्यक्षात यावेत असा चमत्कार जगाने पाहीला. प्रत्येकाला माहित असायला मार्को कोलानोविक हा काही जागतिक किर्तिचा इसम नाही. परंतु तो दुर्लक्षित सर्वसामान्यही नाही. हा इसम कधी काळी जे.पी.मॉर्गनचा क्वांट चीफ होता. जे.पी.मॉर्गन ही वित्तसंस्था कोसळलेल्या चांदीची सर्वात मोठी लाभार्थी ठरली आहे.

वधारणारा बाजार सतत वधारत राहील असे वाटणारे भाबडे गुंतवणूकदार बाजार कोसळल्यानंतर सगळ्यात जास्त दु:खी होतात. खरे तर २९ जानेवारी पूर्वी चांदीबाबत जगात जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे. मागणी पुरवठ्याच्या गणितात कुठेही बदल झालेला नाही. मागणीच्या तुलनेत अजूनही पुरवठा कमी आहे. चांदीचे उत्पादन वाढलेले नाही. सोलार, ईव्ही आदी उद्योगांमध्ये चांदीची मागणी घटलेली नाही. एकच गोष्ट बदललेली आहे, बाजारात मोठ्या संख्येन पैसा गुंतवणारा सामान्य गुंतवणूकदार मागे हटला आहे.
गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा फायदा किंवा तोटा आभासी असतो. भाव कमी असताना तुम्ही प्रत्यक्ष विक्री केली तर तोटा, भाव जास्त असताना माल विकलात तर फायदा. फायदा होत नाही तोपर्यंत माल विकणार नाही, असा निश्चय केलेला, प्रदीर्घ काळासाठी गुंतवणूक करणारा कधीही बुडत नाही. तो कायम फायदा कमावतो. कोसळत्या बाजारात फायदा करणारे फक्त बाजारातील बडे शार्क असतात. चांदी भरधाव पळत असल्यामुळे हे शार्क वायदा बाजारात अडकले होते.

समजा आज चांदीचा भाव चार लाख रुपये किलो आहे. तीन महिन्याने तो ३ लाख होईल असा अंदाज बांधून मी वायदा बाजारात १० किलो चांदी विकत घेतो. सौदा एकूण ३० लाखांचा झाला. सौदा घेताना तुम्हाला हे सगळे पैसे भरावे लागत नाही. सौद्याच्या काही टक्के पैसे डिपॉझिट म्हणून भरावे लागतात. त्याला मार्जिन मनी म्हणतात. मार्जिन मनी म्हणून तुम्ही ३० लाखासाठी दहा टक्के रक्कम म्हणजे तीन लाख भरलेत, याचा अर्थ तुम्ही तुम्ही ३ लाखात १० पट सौदा घेतला. इथे तुम्हाला दहा पट लेव्हरेज मिळाले असे म्हणतात.

हे ही वाचा:

विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात असे आहे तरी काय?

“आत्मनिर्भर भारताचे स्वप्न वेगाने पूर्ण करणारा अर्थसंकल्प”

ठाकूर-जायसवाल पुनरागमनाने मुंबई सज्ज!

तीन महिन्यांनी भाव तीन लाख किंवा त्या खाली आला तर आज स्वस्त दराने चांदी विकत घेतल्याचा मला फायदा. भाव वधारला तर तीन लाखांपासून पुढे जो भाव असेल त्यातला फरक मला भरावा लागेल. हा असतो वायदा बाजार. या वायदा बाजारात काही बड्यांनी बाजारात कमी दरात सौदे विकत घेतले होते. बाजार पळत राहीला असता तर ते गाळात गेले असते. २९ जानेवारीपासून सुरू झालेली घसरण त्यांच्या पथ्यावर पडली. पळापळ झाली सामान्य गुंतवणुकदारांची.
मार्केट कोसळल्यानंतर जे.पी.मॉर्गनने अगदी तळाच्या भावात म्हणजे ७८.२९ डॉलर प्रति ट्रॉय औंस दराने ३.१६ दशलक्ष औंस चांदीची खरेदी केली. चांदीच्या बाजारात जगभरात पळापळ होत असताना ही खरेदी झाली. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोच की मार्कोने केले ते भाकीत होते की त्याच्याकडे इनसाईड इन्फॉर्मेशन होती. काही लोकांनी वायदा बाजारात कमी दराने केलेल्या कॉण्ट्रॅकच्या पूर्ततेसाठी चांदी कोसळवण्यात आली होती, या थिअरीला जे.पी.मॉर्गनने बळ दिलेले आहे.
भारतात इटीएफ मार्केटमध्ये जी धुळधाण झालेली आहे ती अभूतपूर्व आहे. एसबीआय सिल्व्हर २२.४ टक्के, आयसीआय प्रुडन्शिअल सिल्व्हर २१ टक्के, निप्पॉन इंडीया सिल्व्हर १९.५ टक्क्यांनी कोसळल्याची इकोनॉमिक टाईम्सची ३० जानेवारीची बातमी आहे.

शेअर बाजार असो वा कमोडीटीचा बाजार ज्याच्याकडे वेळेवर माहिती येते आणि जो त्याचा वेळेवर वापर करतो तो खरा बादशहा. २८ जानेवारी रोजी चांदीचा दर भारतात ४,२०,०४८ प्रति किलो होता, जागतिक बाजारात म्हणजे हा दर १२१.६२ डॉलर प्रति औंस होता. त्या दिवशी मार्को ही भविष्यवाणी करतो की चांदीचा दर ५० टक्क्यांवर येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी भाव कोसळायला सुरूवात होते. पेपर सिल्व्हर, प्रत्यक्ष खरेदीचे भाव कोसळतात. आजचा चांदीचा दर पाहीला की हा दर सर्वोच्च दरावरून सुमारे सव्वा लाखपर्यंत खाली आलेला दिसतो.

शुक्रवारी बाजार कोसळल्यानंतर सराफा बाजारात चांदी विकली जात नव्हती. जो दर बाजारात दिसतो आहे, त्या दराला चांदी बाजारात मिळत नव्हती. सोन्या चांदीत पैसे गुंतवणाऱ्यांची अशी ही गोची असते. जेव्हा भाव वधारलेला असतो तेव्हा बाजारभावा पेक्षा जास्त भावाने प्रिमिअमवर माल विकला जातो. भाव कोसळतात तेव्हा मात्र सर्वसामान्य माणसाला त्या दरात चांदी किंवा सोने मिळत नाही. माल नाही किंवा माल संपला अशी उत्तरे मिळतात.

पेपर मार्केट आणि फिजिकल मार्केटमध्ये असलेले अंतर शुक्रवारी शनिवार पुन्हा लोकांनी अनुभवलेले असेल. वायदा बाजारात कमी भावात चांदी विकून दर नियंत्रणात ठेवायचे, चांदीची किंमत वाढू द्यायची नाही आणि स्वत:कडे चांदीचे साठे निर्माण करत राहायचे हा खेळ बड्या वित्तसंस्था गेली अनेक दशके खेळत आहेत. जेव्हा औद्योगिक वापरासाठी चांदीचा प्रत्यक्ष खप वाढला तेव्हा वायदा बाजारात कमी दरात केलेले सौदे बुडाशी येऊ लागले. यामुळे अडचणीत आलेल्या वित्तसंस्थांसाठी चांदी कोसळवण्यात आली अशी थिअरी बाजारात चर्चेत आहे.

२९ जानेवारीपासून सुरू झालेली घसरण आज सोमवारीही सुरू आहे. चांदीचे दर भरधाव होते. अभूतपूर्व तेजी चांदीमध्ये आली होती. जानेवारी २०२४ मध्ये चांदीचा दर सुमारे ८० हजार रुपये किलो होता. २८ जानेवारी २०२६ पर्यंत हा भाव ४२००४८ पर्यंत झाला. दोन वर्षात झालेल्या वाढीचे आकडे डोळे पांढरे करणारे होते. भावांची चढती कमान पाहून उशीरा ज्यांनी एण्ट्री घेतली, त्यांची परिस्थिती आज वाईट झालेली आहे.

बाजारात बुडबुडा निर्माण झालेला आहे, भाव कधीही कोसळू शकतील, असा इशारा बाजारातील अनेक दिग्गज सतत देत होते. परंतु त्यांचा इशारा आणि मार्को कोलान्विक याचा इशारा यात काही ठसठशीत फरक आहेत. मार्को याचा इशारा ४८ तासांत खरा ठरला, त्याने सांगितलेला घसरणीचा आकडाही बरोबर ठरतो आहे. हे २०२६ मध्ये घडले असे ते म्हणाले होते, परंतु ते काही तासात घडले, पाच दिवसांनीही ते थांबलेले नाही. मार्को यांनी कधी काळी जे.पी.मॉर्गनमध्ये क्वांट चीफ म्हणून काम केले आहे, ही बाब विसरता येत नाही.

बाजारात चार्ट पाहून भाकीतं करणारे बरेच लोक आहेत. आकडेवारी आणि पॅटर्नचा अभ्यास करून ही मंडळी भाकीते करत असतात. काही लोकांकडे इनसाईड इन्फॉर्मेशन असतात. अमुक कंपनीचे विक्री, नफ्याचे आकडे पाहून एखाद्याने शेअऱचा भाव वधारणार असे सांगितले हा एक प्रकार, दुसऱ्याला माहिती मिळाली की ही कंपनी बोनस शेअर जाहीर करणार असल्यामुळे शेअरचा भाव वधारणार, हा दुसरा प्रकार. पहील्याचे भाकीत अभ्यासावर आधारलेले, दुसऱ्याचे भाकीत माहितीवर आधारलेले. मार्को यांनी केलेले भाकीत नेमके कुठल्या प्रकारात मोडते हे त्यांचे त्यांना ठाऊक.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा