25 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरसंपादकीयशेखचिल्ली कामाला लागले

शेखचिल्ली कामाला लागले

सतत खोटे बोलून देशातील लोकशाहीला सतत हादरे देणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत जनतेत प्रचंड चीड

Google News Follow

Related

नेपाळमध्ये आंदोलकांनी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता भारतातही तसे होऊ शकेल, असे मत इंडी आघाडीचे नेते व्यक्त करताना दिसतायत. जगातील कोणत्याही मुद्द्यावर विठू विठू करणारे महाराष्ट्रातील पोपटराव उर्फ सकाळचा भोंगाही तसाच बरळला आहे. जनतेत संताप आहे, याबाबत आम्ही ही सहमत आहोत. प्रचंड खदखद आहे. त्याचा भडका कधीही होऊ शकतो. जे चित्र नेपाळमध्ये दिसले ते भारतही दिसू शकते.

एक गोष्ट स्पष्ट आहे की, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळमध्ये जे काही घडले त्या मागे परकीय हात असला तरी भ्रष्टाचार आणि बेबंदशाहीमुळे आधी जनता धुमसत होतीच. परकीय हाताने फक्त त्यात पेट्रोल ओतण्याचे काम केले. त्यानंतर जे काही घडले ते सर्वांसमोर आहे.

बांगलादेशात जे काही घडले त्यानंतर अनेकांना उकळ्या फुटल्या होत्या. जनता लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधान निवासाच्या बाहेर हातात मशाली घेऊन उभी आहे, नरेंद्र मोदींना बाहेर हुसकावण्यात येते आहे. अशी स्वप्ने अनेकांना पडायला लागली. खरे तर हा स्वप्नदोष होता. सोशल मीडियावरही अनेकांनी हाच धागा धरून सेलिब्रेशन करून घेतले. ते अजूनही संपलेले नाही.

मुळात नेपाळसह भारतीय उपखंडातील चारही देशात जे काही घडले त्याचे कारण काय होते? सर्वात मोठे कारण होते भ्रष्टाचार. या भ्रष्टाचाराच्या पैशातून नेत्यांच्या पोराबाळांची सुरू असलेली चैन. ही चैन भारतातील कोणत्या नेत्यांची मुले-बाळे करताना दिसतायत?  जनतेची उपासमार सुरू असताना जेव्हा राजा-राणी राजा राणी राजप्रासादात हनीमून कऱण्यात मश्गुल असतात. जनता जेव्हा उपासमारीची व्यथा घेऊन त्यांच्या दारी जाते आणि त्यांना ‘रोटी नसेल तर केक खा’ असे सल्ले दिले जातात तेव्हा राजप्रासाद जाळले जातात. हा इतिहास फ्रान्सचा असला तरी जनतेची ती मानसिकता मात्र जागतिक आहे. उपासमार, बेरोजगारीने पोळलेली जनता नेते मंडळींची अय्याशी सहन करू शकत नाही.

ही अय्याशी म्हणजे काय असते?  निवडणुकीच्या धामधूमीतील उनाचा कडाका, धूळ-माती सहन झाली नाही की लगेच परदेशात जाऊन श्रम परिहार करणे, खाजगी कंपन्या काढून पक्षाची मालमत्ता बापाचा माल असल्यासारखी घशात घालणे, कोणताही काम धंदा नसताना पिताश्री १, पिताश्री २ अशा इमारती ठोकणे, रोजगार देऊ शकतील अशा प्रकल्पांना, विमानतळ, मेट्रो अशा विकास प्रकल्पांना विरोध करणे, जिथे तिथे अडवाअडव करून खंडणीखोरी करणे, बिल्डरशी हातमिळवणी करून लोकांना राहत्या घरातून बेघर करणे. हे सगळे प्रताप देशात कोणाच्या नावावर आहेत? भ्रष्टाचाराचे खटले कोणावर सुरू आहेत? कोणत्या पक्षाच्या नेत्यांच्या घरात कोट्यवधींची रोकड सापडे आहे? जनतेला हे सगळे माहिती आहे. त्या बाबत त्यांच्या मनात खदखदही आहे.

२०२४ च्या निवडणुकीत जनतेने तिसऱ्यांदा मोदींच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. २०१९ च्या तुलनेत जागा कमी आल्या असतील, परंतु जनादेश मोदींनाच होता. सत्ता स्थापन करून त्यांनी ते सिद्धही केले. भारतात अशा प्रकारे दंगेधोपे होऊन मोदींना सत्तेवरून उखडून टाकावे असे ज्यांना वाटते, त्याचे कारण ही मंडळी त्यांना निवडणुकीच्या राजकारणात हरवू शकत नाही. राहुल गांधी सांगतायत की, ‘ मोदी वोट चोरी करून सत्तेत आले’. परंतु स्वत:चा आरोप सिद्ध कऱण्यासाठी जेव्हा त्यांना निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले तेव्हा ते मागे हटले. आरोप करायचे, बोटभर पुरावाही सादर करायचा नाही. जनमताचा अपमान करायचा, देशातील घटनात्मक संस्थांचा अपमान करायचा. देशात अराजक निर्माण करण्याचा प्रय़त्न करायचा. त्यासाठी दुसऱ्या देशांना मदतीचे आवाहन करायचे. हिंदूंना बदनाम करायचे, सनातन धर्माला उखडून फेकण्याची भाषा करायची. हे धंदे  भारतात कोण करतो आहे?  हे धंदे जनतेला पसंत नाहीत. हे धंदे करणारे संसदेत गेली ११ वर्षे विरोधी बाकांवर बसलेले आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेतील तरुण नेते कर्क यांच्या हत्येनंतर क्रिकेटपटू डुप्लेसिसची टीका

मुंबईत बॉम्बची धमकी, पोलिस अलर्ट

राहुल गांधी परदेश दौऱ्यात प्रोटोकॉल मोडतात… सीआरपीएफ हतबल

विरोधक आत्तापासूनच हरायची कारणे शोधताहेत

जनतेचा विश्वास गमावलेले विरोधक ज्या मोदींना ते उखडून फेकण्याची भाषा करतायत, त्या मोदींवर नेपाळ, पाकिस्तानातील जनता फिदा आहे. या जनतेने कॅमेरावर शंभरवेळा सांगितले आहे की, आम्हाला मोदींसारखा पंतप्रधान हवा आहे.

नेपाळमध्ये ज्यांच्याकडे सत्तेची सूत्र बहाल केली जातील अशा ज्या लोकांचे नाव घेतले जात आहे, त्यापैकी एक असलेल्या नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की असे म्हणतायत की, आय ग्रीट मोदी जी, आय हॅव अ गुड इम्प्रेशन अबाऊट मोदीची! माझ्यावर मोदींचा प्रभाव आहे, असे त्या म्हणतायत. नेपाळच्या उद्रेकानंतर विरोधकांनी सोशल मीडियावर बरेच पैसे खर्च करून जे नरेटीव्ह मोदींच्या विरोधात उभे कऱण्याचा प्रयत्न केला. ते अशा दोन चार विधानांनीच उद्ध्वस्त झाले आहे.

फक्त विधाने नाहीत, आकडेही बोलतायत. जे धान्य कधी काळी देशाच्या गोदामात सडून जायचे, उंदरांचे पोट भरण्याचे आणि त्यांची संख्या वाढवण्याचे काम करायचे, त्याच धान्याचा वापर मोदींनी देशातील गोरगरीबांची पोटं भरण्यासाठी केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहील्या तिमाहीत देशाच्या जीडीपीचा आकडा ७.८ टक्क्यांनी वधारला. देशात फक्त २ टक्के बेरोजगारी शिल्लक असून हा आकडा जी-२० देशांच्या गटात सर्वात कमी असल्याचा अहवाल वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने जारी केलेला आहे.

देशात २०१५ पासून मोठ्या संख्येने स्टार्टअप्स सुरू झाली. यापैकी १२४ स्टार्टअप्सने युनिकॉर्नचा दर्जा मिळवला. म्हणजे ज्यांचे बाजार मूल्य १ अब्ज डॉलर्स अर्थात सुमारे साडे आठ हजार कोटी रुपये आहे. देशातील दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचा टक्का सातत्याने कमी होतो आहे. २०२२ मध्ये देशात दारीद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचा आकडा ७५ दशलक्ष होता. २०११ मध्ये हाच आकडा ३४४ दशलक्ष होता. म्हणजे काँग्रेसवाले गरीबी हटावची घोषणा द्यायचे, जी प्रत्यक्षात आली मोदी यांच्या राजवटीत.

मोदी हे सगळे करतायत म्हणून जनता त्यांना त्यांच्या पदावरून उखाडून फेकणार, त्यासाठी गरज पडल्यास जाळपोळ करणार, देशात अराजक माजवणार असे विरोधकांच्या मनातील मांडे आहेत. देशातील गरीबांना अन्न देणे, घरे, शौचालये, वीज, पाणी देऊन त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावणे, देशाचा विकास रथ वेगाने पुढे नेणे, जीएसटी लागू करून एक देश एक कर ही घोषणा प्रयत्यक्षात आणणे, अर्थ व्यवस्थेची भरभराट करणे, देशाला संरक्षण क्षेत्रातील ताकद बनवणे, अंतराळ क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करणे ही काय कामे झाली?

त्या पेक्षा त्यांनी राहुल गांधी यांच्या सारखी थायलंड, मलेशियात जाऊन तपश्चर्या  करायची. पक्षाची मालकी असलेल्या नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपली पाहिजे होती. महाराष्ट्रातील बेस्ट माजी मुख्यमंत्र्याप्रमाणे पिताश्री २, पिताश्री ३ अशा इमारतींची मालिका उभी करायची, लंडनमध्ये दुबईत प्रॉपर्ट्या बनवल्या पाहिजे होत्या. पत्राचाळीचा विकास करायचा. तळघरात कोट्यवधीच्या नोटा ठेवायच्या हा खरा जनतेचा विकास. आणि हा विकास पुन्हा जोरात सुरू व्हावा म्हणून जनता रस्त्यावर उतरणार आणि जाळपोळ करणार.

या नेत्यांचे कारनामे कोणाचे भले करीत आहेत? ना जनतेचे, ना देशाचे, ना समाजाचे. सततच्या नकारात्मकतेला, त्यांच्या भ्रष्टाचाराला, चैनीला जनता वैतागली आहे. सतत खोटे बोलून देशातील लोकशाहीला सतत हादरे देणाऱ्या तमाम राजकीय नेत्यांबाबत जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. राग आहे. या रागाचा भडका कधीही उडू शकतो. नेपाळप्रमाणे भारताची जनताही अशा नेत्यांना तिसरा डोळा उघडून दाखवू शकते. नेपाळच्या उदाहरणावरून या नेते मंडळींनी एवढा धडा तर घेतलाच पाहिजे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा