जी-७ परीषदेत सहभागी व्हायला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर ३५ मिनिटे चर्चा केली. काँग्रेस आणि त्यांच्या तैनाती फौजेच्या नेत्यांना अचानक भारताचे परराष्ट्र धोरण कमकुमवत झाल्याचा भास व्हायला लागला. त्यांना पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल आसिफ मुनीर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सोबत शाही खाना घेणार असल्याचे कौतुक वाटते आहे. घरगडी मालकाच्या जवळच असतात. त्यांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था मालक करत असतो. कॅनडाहून परतताना अमेरिकेत येऊन जा हे, ट्रम्प यांचे आमंत्रण मोदींनी नाकारले, हे काँग्रेसला महत्वाचे वाटत नाही. जोडे पुसण्यासाठी आणि ते उचलण्यासाठी ताकद लागत नाही, समोरच्याला नाही म्हणायला ताकद लागते. मोदींनी ती ताकद दाखवली आहे.
जी-७ परिषदेनिमित्त ट्रम्प आणि मोदी यांची भेट होणे अपेक्षित होते. ऐनवेळी काही तरी महत्वाचे घडते आहे, असे दाखवून ट्रम्प यांनी तिथून काढता पाय घेतला. ते बहुधा इराण-इस्त्रायलमध्ये युद्धबंदी घडवायला गेले असावेत, या शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांना टपली दिली. या टिप्पणीवर ट्रम्प उखडले. ट्रुथ सोशलवर उत्तर देताना ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांचा प्रसिद्धीसाठी वखवखलेले असा उल्लेख केला. मी वॉशिंग्टनला का निघालोय हे त्यांना माहित नाही. काही तरी मोठे घडते आहे. स्टे ट्यून्ड.
ट्रम्प काही तरी मोठे होणार आहे, असा दावा करत निघाले असले तरी मोदींना टाळण्यासाठी त्यांनी तिथून काढता पाय घेतला असे मानायला वाव आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर ट्रम्प यांनी ज्या वाट्टेल त्या थापा आणि उलटसुलट विधाने केली होती, त्यानंतर मोदींचा सामना करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. आपल्याला मोदींशी बोलायचे आहे, असा निरोप आल्यानंतर मोदींनी त्यांच्याशी बोलणे केले. तब्बल ३५ मिनिटे हे बोलणे झाले. भारत पाकिस्तानमध्ये ट्रेड वगैरे कोणत्याही कारणासाठी ही मध्यस्थी स्वीकारलेली नव्हती, भविष्यातही स्वीकारणार नाही, असे मोदींनी या फोन संवादाच्या वेळी ठणकावून सांगितले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे राहुल गांधी यांच्या कानात सांगायला गेले नव्हते. त्यांनी ते अगदी जाहीरपणे, नि:संदिग्ध शब्दात, खणखणीत आवाजात जगाला सांगितले. हा आवाज अमेरिकेपर्यंतही पोहोचलेला आहे. तरीही काँग्रेस नेते जयराम रमेश यांना हा ट्रीपल झटका वाटतो आहे. हे तेच काँग्रेसवाले आहे, जे मोदींना जी-७ परीषदेचे निमंत्रण नाही, असे गृहित धरून बरीच बडबड करत होते. आमंत्रण मिळाल्यानंतर तोंडात मारल्यासारखे गप्प झाले.
हे ही वाचा:
विकेट घेण्याबाबत भारताची कटिबद्धता – गिलसाठी पहिली खरी कसोटी!
फक्त दोन फलंदाज – ज्यांनी भारत-इंग्लंड कसोटीत ठोकलं ‘तिहेरी शतक’!
भारतीय संरक्षण कंपन्यांचे उत्पन्न १५-१७ टक्क्यांनी वाढेल
श्री मनकामेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू
मुळात काँग्रेसच्या नेत्यांनी मान वर करून परराष्ट्र धोरणावर बोलणे हा मोठा विनोद आहे, जवाहरलाल नेहरु यांच्या भोंगळ परराष्ट्र धोरणामुळे अर्धा काश्मीर गमावला, चीनने हजारो एकर जमीन घशात घातली. इंदीरा गांधीनी १९७१ च्या बांगलादेश युद्धात लष्कराने कमावलेले वाटाघाटीच्या टेबलवर गमावले. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, जनरल जे.एफ.आर जेकब इंदिरा गांधींचे वाभाडे काढले होते. झुल्फीकार भुत्तो यांनी इंदीरां गांधी यांना अगदीच मूर्ख बनवलं, असे मत एका मुलाखतीत व्यक्त केले होते.
भारताने जिंकलेली भूमी परत करून विजयावर पाणी फिरवले. ही भूमी भविष्यातील वाटाघाटींसाठी प्रभावी शस्त्र ठरू शकली असती, भारताला अधिक अनुकूल असे राजकीय आणि सामरीक लाभ मिळवता आले असते, असे जनरल जेकब म्हणाले होते. राजीव गांधींच्या चुकीच्या निर्णयाची मालिका सांगता येईल. अमेरिकेच्या दबावामुळे भोपाळ वायूगळती कांडाचा मुख्य आरोपी युनियन कार्बाईड कंपनीचा सीईओ वॉरेन एण्डरसन यांना रातोरात देशाबाहेर पळवले. ही काँग्रेसची परराष्ट्र नीती होती. ते आता मोदींना धडे देत आहेत.
ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी पाकिस्तानला चांगलेच चेपले होते. त्यामुळे भारताने स्वाभाविकपणे त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले होते. ज्याची ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये माती केली. मोदी ट्रम्प यांच्या आगाऊपणासमोर झुकत नाही. टेरीफ युद्ध छेडल्यानंतर ट्रम्प यांनी भारताला टेक इट ऑर लिव्ह इट प्रस्ताव दिला होता. आहे तसा स्वीकारा, नाही तर सोडून द्या असा हा प्रस्ताव होता. भारताने आहे तसा स्वीकारता येत नाही, असे म्हणत प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे ट्रम्प पिसाळले आहेत. आसिफ मुनीर यांना अमेरिकेने इराणमध्ये बोलावले ते इराणची सुपारी देण्यासाठी. इराणमध्ये तख्तापलट करण्यासाठी त्यांना पाकिस्तानच्या भूमीची गरज आहे. परंतु मुनीर यांना बोलावण्यापूर्वी आधी त्यांचे नाक कापण्याची व्यवस्थाही अमेरिकेने केली.
आर्मी डेच्या सोहळ्यात मुनीर येणार येणार अशी चर्चा होती. काँग्रेसने तेव्हाही या मुद्द्यावर ओरडा केला होता. परंतु व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, आर्मी डेच्या सोहळ्यात कोणालाही निमंत्रण नाही. पाकिस्तानात मुनीर यांची प्रचंड नाचक्की झाली. आता त्यांना ट्रम्प यांनी शाही भोजनाचे निमंत्रण दिले म्हणून काँग्रेसला मुनीर हे आभाळाएवढे मोठे वाटू लागले. ट्रम्प यांना सुनावणारे मोदी त्यांना कमकुवत वाटतायत. काँग्रेसला असलेले हे पाकिस्तानचे कौतुक नवे नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ डॉ.मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान असताना त्यांना देहाती औरत म्हणायचे, तेव्हाही हे कौतूक कमी झाले नव्हते. काँग्रेसचे परराष्ट्र धोरण हे असे होते.
विक्रम मिस्री यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यात काय संभाषण झाले हे जगाला सांगितले. नियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे कॅनडातून परतताना ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार अमेरिकेत येता येणार नाही, असे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले. त्यांनाच क्वाड बैठकी निमित्त भारतात बोलावले. तरीही मोदी कमकुवत. काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या उबाठाचे नेते संजय राऊत म्हणतात की, भारत-पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केली नव्हीत हे मोदींनी सांगून काय उपयोग, ते ट्रम्प यांनी सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या बगलबच्च्यांची ही समस्या आहे. त्यांचा बापापेक्षा शेजारच्या काकांवर जास्त विश्वास आहे.
भारत आज अमेरिकेच्या गुडबुकमध्ये नाही. हजारो एकर जमीन चीनला देऊन आणि अर्धा काश्मीर पाकिस्तानला बहाल करून नेहरुंनी या दोन्ही देशांना गुडबुकमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ही दर्यादिली इंदिरा गांधींनी दाखवली. चरणवंदना करून असे कोणत्याही देशाच्या गुडबुकमध्ये राहता येत नाही. काही काळ संबंध बरे असले तरी ते निरर्थक असतात.
भारत आज स्वत:च्या शर्तीवर पुढे जाण्याचा प्रय़त्न करतो आहे. हे जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला, युरोपिन देशांना कसे काय आवडेल. भारताने जेव्हा मिशन मार्स जाहीर केले, तेव्हा न्यूयॉर्क टाइम्सने एक कार्टून छापून आपली पोटदुखी जाहीर केली होती. एका केबिनमध्ये विकसित देशांचे प्रतिनिधी आले होते. बाहेर धोतर घातलेला शेतकरी आणि गाय दाखवली आहे. हा शेतकरी काचेच्या दरवाजातून डोकावतो आहे. हा कार्टूनवरून प्रचंड गदारोळ माजल्यावर न्यूयॉर्क टाईम्सने माफी मागितली. विकसित देश भारताकडे कोणत्या नजरेने पाहातात, आणि भारताचा विकास त्यांना किती खटकतो हे स्पष्ट करणारे हे उदाहरण. हा भारत ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्र बनवतो, स्टेल्थ विमान बनवण्याची तयारी करतो, अवकाशात उपग्रहांचे जाळे निर्माण करतो, हे अमेरिका किंवा युरोपिय देशांना सहन होणार आहे का? याल तर तुमच्या सोबत, न याल तर तुमच्या शिवाय आणि आडवे याल तर तुमचा कार्यक्रम करून भारत पुढे जाणार आहे. स्वत:च्या शर्तीवर पुढे जाण्याची किंमतही चुकवावी लागते. भारत त्यासाठी तयार आहे. शक्तिशाली बनण्याच्या वाटचालीत अनेकदा शक्तिशाली गोतावळ्याकडून उपेक्षा आणि उपहास वाट्याला येतो. त्यांची पोटदुखी ही तुमच्या प्रगतीची पावती असते.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







