अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी नेत्यांचे कौतूक करतायत. अमेरिकेच्या आर्मी डे परेडमध्ये भारताकडून पिटाई झालेल्या पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेले आहे. अमेरीकेच्या सेंटर कमांडचे कमांडर मायकल कुरीला पाकिस्तानची भलामण करतायत. एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल वगळता अवघी अमेरीकाच पाकिस्तानला घोड्यावर बसवण्यासाठी इतकी उतावीळ झाली आहे. चीनचा पदर सोडून पाकिस्तान अमेरीकेकडे कलंडला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. इराणचा काटा काढायला अमेरिकेला पाकिस्तानची भूमी हवी आहे. पाकिस्तानवरील अमेरिकी प्रेमाचा रंग अधिक गडद झालेला आहे.
जगात स्वत:चे स्थान टिकवणे आणि त्यासाठी कायम स्वत:च्या हिताचे राजकारण करणे हा अमेरिकेचा स्थायी भाव आहे. जगातील कोणत्याही देशावर अमेरिकेचे प्रेम नाही आणि खुन्नसही नाही. ज्याला त्याला आपल्या फायद्यासाठी वापरायचे, वापरून झाले की फेकून द्यायचे, ही अमेरिकेची नीती आहे. ही नीती भारत वापरायला जातो तेव्हा मात्र अमेरिकेला ते सहन होत नाही. अमेरिका स्वत:चे हित जपण्यासाठी निर्णय घेऊ शकते, पाकिस्तानला कुरवाळू शकते, भारताने मात्र सोयीचे निर्णय घेऊ नयेत असे त्यांना वाटते.
अमेरिकेचा विरोध असल्यामुळे रशियाकडून तेल घ्यायचे नाही, एस४०० घ्यायचे नाही, रशियाशी व्यापार करायचा नाही, त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाहीत. ही अमेरिकेची भूमिका आहे. भारताला ती मान्य होणे शक्य नाही. अमेरिकेच्या पायात सध्या इराणचा काटा रुतलेला आहे. तो काढण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली सुरू आहेत. पाकिस्तानच्या कवडीदमडीच्या नेत्यांचे लष्कर शहांचे भाव त्यामुळे वधारले आहेत. अमेरिकेत बोलावून मुनीर यांच्या आरत्या ओवाळल्या जातायत. आपले अच्छे दिन आले आहेत. कमाईचे दिवस आले आहेत, हे लक्षात आल्यामुळे पाकिस्तानी नेते आणि लष्करशहा खूष आहेत.
रशियन फौजांचा काटा काढण्यासाठी अमेरिकेने जेव्हा पाकिस्तानचा एखाद्या तळासारखा वापर केला, ते दिवस पाकिस्तानी नेत्यांसाठी बंपर कमाईचे दिवस होते. ते आता परत येण्याची चिन्ह त्यांना दिसू लागली आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचा खरा चेहरा भारतीयांना दिसला. आपल्या नेतृत्त्वाला मात्र तो आधी पासून माहिती होता. त्यामुळे अमेरिकेने थयथयाट केल्यानंतरही आपण रशियाचा हात सोडला नाही. उलट अधिक घट्ट धरून ठेवला. पेटेगॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की भारताने रशियावर शस्त्रांसाठी अवबंलून राहू नये असे आम्हाला वाटते. या विधानाचा अर्थ असा होती की तुम्ही अमेरिकेवर अबलंबून राहू शकता. असे लोणी लावल्यानंतरही भारत अमेरिकेच्या नादाला लागला नाही, कारण भारताला ठाऊक आहे की अमेरिकेशी मैत्री ही गाजराच्या पुंगीसारखी आहे.
परंतु अमेरिकेची पाकिस्तानशी मैत्री ही कल भी, आज भी, आज भी, कल भी… असा मामला आहे. कारण स्पष्ट आहे. भारत अमेरिकेच्या तालावर नाचू शकत नाही. पाकिस्तान अमेरिकेच्या इशाऱ्यावर वाट्टेल ते करू शकतो. पैसा फेको तमाशा देखो, असा पाकिस्तानी नेत्यांचा सरळ हिशोब आहे. अमेरिका आणि पाकिस्तानमधला गोडवा अचानक वाढलेला दिसतो. ट्रम्प यांचे म्हणाल तर वाट्टेल तेव्हा पाकिस्तानला लाथ मारायची आणि वाट्टेल तेव्हा जवळ करायचे हा त्यांचा इतिहास आहे. अध्यक्ष पदाच्या पहिल्या टर्ममध्ये २०१८ मध्ये त्यांनी एक ट्वीट केला होता. अमेरिकेने आजवर पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर्स देऊ केले, मोबदल्यात अमेरिकेच्या वाट्याला फक्त थापा आणि फसवणूक आली. तेच ट्रम्प आज पाकिस्तानी नेत्यांची स्तुती करतायत. अमेरिकेच्या नीतीमुळे कधी घोड्यावर कधी गाढवावर पाकिस्तानची वरात निघत असते.
अमेरिकेचा २५० वा आर्मी डे अमेरिकेत थाटात साजरा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी ट्रम्प यांचा ७९ वा वाढदिवस असल्यामुळे हा थाट वाढणार आहे. या सोहळ्यात आसिफ मुनीर यांना पाहुणे म्हणून आमंत्रण आहे. अमेरिकेच्या सेन्ट्रल कमांडचे कमांडर मायकल कुरीला यांनी स्पष्ट सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तानबाबत विचार करताना हा किंवा तो असा विचार आम्हाला करता येणार नाही. पाकिस्तानने दहशतवादाच्या लढ्यात मोठे योगदान दिले आहे. खरे तर पाकिस्तान नावाचा काटा अमेरिकेलाही सलतो आहे. पाकिस्तानींचे प्रताप अमेरिकेला चांगलेच ठाऊक आहेत. एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल यांनी काल एक्सवर पोस्ट केली होती. मुहमद शाहजेब नावाच्या एका दहशतवाद्याचे कॅनडातून अमेरिकेत हस्तांतरण करण्यात आले. हा कॅनडामध्ये राहणारा पाकिस्तानी नागरिक आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी, म्हणजे हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्ती निमित्त, न्यूयॉर्क शहरात इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ तो एक कट अमलात आणणार होता. ब्रुकलिन येथील इस्त्रायल सेटरमध्ये यहुदी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करणार होता. सप्टेंबर महीन्यात त्याला कॅनेडामध्ये अटक करण्यात आली.
काश पटेल हे ट्रम्प यांचे विश्वासू आहेत. पाकिस्तानी नागरिक जगभरात काय करतात हे त्यांना कळत असेल तर ते ट्रम्प यांना कळणार नाही हे कसे शक्य आहे? अल कायदाने ९ /११ रोजी अमेरिकेला दिलेल्या दणक्यानंतर अमेरिकेला थोडी जाग आली होती. दहशतवादाचा जो भस्मासूर अमेरिकेने निर्माण केला तो उलटू शकतो हे लक्षात आले. तीच अल कायदा भारताला काश्मीरवरून धमक्या देऊ लागली आहे. अल कायदाचा मध्यपूर्वेतील नव नियुक्त नेता साद बिन अतेफ अल अवलाकी याने एका व्हीडीयोद्वारे ट्रम्प, इलॉन मस्क यांच्या सह अमेरिकेच्या तमाम नेत्यांना गाझावर केल्या जाणाऱ्या इस्त्रायली हल्ल्याच्या मुद्द्यावरून धमक्या दिल्या. अमेरीकेतील मुस्लीमांना जिहाद करण्याचे आवाहन केले. काही दिवसांपूर्वी लष्कर ए तोयबाशी संबंध असलेल्या इस्लाईल रोयार आणि शेख हमजा युसूफ यांची व्हाईट हाऊसच्या सल्लागार टीममध्ये नियुक्ती केली. दहशतवाद्यांना चुचकारून दहशतवादाचा अमेरिकेला असलेला धोका संपलेला नाही, हे त्यांना आता अल अवलाकी याच्या धमकीनंतर समजले असेल.
तरीही जगभरातील दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान अमेरिकेला हवा आहे.पाकिस्तानच्या गळ्यात अमेरिकेचा पट्टा आहेच. अमेरिका सध्या पाकिस्तानला वापरण्याच्या तयारीत आहे. मध्यपूर्वेतील ताज्या घडामोडींकडे नजर टाका. ११ जूनला अमेरिकेच्या स्टेट डीपार्टमेंटने आखातील अमेरिकन नागरीकांना, देशात परतण्यासाठी सुचना जारी केली. ही जागा अमेरिकी नागरीकांसाठी धोकादायक होऊ शकते, असे स्वत: ट्रम्प म्हणाले आहेत. इराणकडे अण्वस्त्र असू नयेत असेही त्यांना बजावले आहेत. याचा अर्थ इराणशी अमेरिकेच्या वाटाघाटी फसल्या आहेत. इस्त्रायल कोणत्याही क्षणी इराणची आण्विक आस्थापने नष्ट करण्यासाठी हल्ला करेल अशी शक्यता आहे.हल्ला झाला तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असा स्पष्ट इशारा इराणचे संरक्षण मंत्री अजीझ नसीरजादे यांनी दिला आहे.
इराण आणि पाकिस्तानच्या सीमा एकमेकांना भिडलेल्या आहेत. उद्या अमेरिकेने इराणचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी पाकिस्तानचे हवाईतळ, उपयोगी पडतील हे अमेरिकेला माहिती आहे. ट्रम्प यांना पाकिस्तानच्या भूमीचा इराणच्या विरोधात वापर करायचा आहे. पाकिस्तानच्या नेत्यांचीही आपल्या देशाचा असा वापर होऊ देण्यास ना नाही. त्यामुळे अमेरिकेचे पाकिस्तानला कुरवाळणे सुरू आहे. पाकिस्तानची भलामण केल्यामुळे काही काळ जर भारत नाराज होत असेल तर तेही अमेरिकेला चालणार आहे.







