रशिया-युक्रेन युद्धाला पूर्ण विराम देण्यासाठी युरोपिय नेत्यांच्या वरातीसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादीमीर झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारात रुजू झाले. या तमाम नेत्यांना मार्गदर्शन करत असताना ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांना फोन केला आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले. याच पुतीन महाशयांनी अलास्का येथे ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पहिला फोन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला होता. या सगळ्या घटनाक्रमाचे दोन अर्थ काढता येतील. सध्याच्या भूराजकीय घडामोडींमध्ये मोदींना बाजूला ठेवून कोणालाच पुढे सरकता येणार नाही. तेच बॉस आहेत. दुसरा अर्थ ट्रम्प हे चेंबरलेन होण्याच्या मार्गावर आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचा अपमान केला नाही. त्याची दोन कारणे. एक तर झेलेन्स्की कोट घालून आले होते. दुसरे त्यांच्या पत्नीने ट्रम्प यांच्या पत्नी मेलोनी यांची प्रशंसा करणारे पत्र बैठकीच्या सुरूवातीलाच ट्रम्प यांना दिले. त्यामुळे ट्रम्प सुखावले होते.
जी काही चर्चा झाली त्यात रशियाने जिंकलेला युक्रेनचा पूर्व भाग, काही वर्षांपूर्वी रशियाने कब्जा घेतलेला क्रिमिया या शिवाय डोनेट्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीजझिया या भागावर पुतीन यांना नियंत्रण हवे आहे. या भूभागावरील रशियाची मालकीवर युरोपिय राष्ट्र आणि अमेरिकेचे शिक्कामोर्तब हवे आहे. युक्रेन नाटो किंवा युरोपियन युनियनचा सदस्य बनू नये ही पुतीन यांची अट आहे. त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या सूचनेनुसार युक्रेनमध्ये नाटो फौजा ठेवण्यासही त्यांचा नकार आहे. म्हणजे झेलेन्स्की यांना जे हवे आहे, ते सगळेच पुतीन यांना द्यायचे नाही. याला ट्रम्प यांचीही मान्यता आहे.
इथेच गाडे अडले आहे. ट्रम्प यांना पटवण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आरत्या ओवाळण्याची युरोपियन देशांची तयारी आहे. युरोपिय देशांनी युक्रेनसाठी ९० अब्ज डॉलरची शस्त्रखरेदी कऱण्याची तयारी दाखवली आहे. ही खरेदी अर्थातच अमेरिकेकडून होणार आहे. म्हणजे अर्ध्या युक्रेनचा बळी देण्याची, वर ९० बिलियन डॉलरचा नैवेद्य दाखवण्याची युरोपिय देशांची तयारी आहे. कारण त्यांना माहिती आहे. युक्रेन सुपात आणि आपण जात्यात आहोत. रशियासोबत लढण्याची मानसिकता या देशांकडे किंचितही नाही. रशियाचे भय दाखवून आपली तिजोरी भरण्याचे काम ट्रम्प करत आहेत. एवढे करूनही उरलेला युक्रेन शाबूत राहिल. रशिया पुन्हा काही वर्षांनी युक्रेनवर आक्रमण करणार नाही, याची गॅरेंटी या देशांना मिळताना दिसत नाही. ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूअल मॅक्रॉन, इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मनीचे चॅन्सेलर फ्रीडरीच मर्ज, फिनलॅंडचे राष्ट्राध्यक्ष एलेक्झांडर स्टब, नाटोचे सरचिटणीस मार्क रट, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सूला वॉन डर लियेन यांच्या मनासारखे काहीच झाले नाही.
ट्रम्प यांचा हा व्यवहार दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन हुकूमशहा एडॉल्फ हिटलर याच्या समोर लोटांगण घालणाऱे ब्रिटनचे पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांच्यासारखा आहे. चेंबरलेन यांनाही दुसऱ्या महायुद्धाच्या आधी हे युद्ध टाळण्याचे क्रेडीट हवे होते. त्यासाठी ते झेकोस्लाव्हाकीयाचा बळी द्यायला तयार होते. हिटलरने झेकोस्लाव्हाकीयाच्या सुडेटन प्रांतावर दावा सांगितला होता. त्या आधी त्याने रक्ताचा एकही थेंब न सांडता ऑस्ट्रीयाचा ताबा घेतला होता. सुडेटन प्रांत एकदा हिटलरला बहाल केला की दुसरे महायुद्ध होणार नाही, असा समज चेंबरलेन यांनी करून घेतला होता. त्यासाठी ते जर्मनीत गेले. १९३८ साली त्यांनी हिटलर सोबत म्युनिच करार केला. ब्रिटन आणि फ्रान्सने या कराराला पाठिंबा दिला होता. कमजोर देशाचा बळी देऊन, त्याचा तुकडा शक्तिशाली देशाला बहाल करून जगात शांतता निर्माण कऱण्याचा चेंबरलेन यांचा प्रयत्न अपयशी ठरला होता. तोच प्रयत्न ट्रम्प करतायत. दोघांमध्ये प्रचंड साम्य आहे. दोघांना जगात शांतता निर्माण कऱण्याचे क्रेडीट हवे होते. ट्रम्प यांना चेंबरलेन यांच्या पुढे जाऊन नोबेल हवे आहे, एवढाच काय तो फरक.
युरोपिय देश युद्धबंदी साठी आग्रही आहेत, ट्रम्प यांना शांतता करार हवा आहे. ही सगळी बोलणी सुरू असताना रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला होता. हा हल्ला सुरू असताना झेलेन्स्की आणि पुतीन यांची भेट ठरवण्याचा आटापिटा ट्रम्प आणि युरोपिय देशांचे नेते करीत होते. अलास्का येथे पुतीन यांची भेट घेण्यापूर्वी, भेट झाल्यानंतर आणि व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प आणि त्यांचे सहकारी भारताला दमदाटी कऱण्याचा प्रयत्न करतायत. ट्रम्प अध्यक्षपदी आल्यानंतर अमेरिका रशियाच्या व्यापारात २० टक्के वाढ झाल्याची कबुली स्वत: पुतीन यांनी अलास्का येथे बोलताना दिली. चीन रशियाकडून सर्वाधिक तेल विकत घेत असताना चीनवर कोणत्याही प्रकारचे टेरीफ लादले जात नाही. मात्र भारताविरोधात अमेरिकेने आपले धोरण अधिक कठोर केलेले दिसते. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना मोदींनी ट्रम्प यांना तिखट शब्दात ऐकवलेल्या तीन गोष्टी याला कारणीभूत आहेत. शेतकरी, पशूपालकांच्या हिताशी, लघु उद्योगांच्या हिताशी तडजोड नाही. स्वदेशीचा पुरस्कार आणि भारताकडे भारताचा सोशल मीडिया हवा, भारतीय लढाऊ विमानांमध्ये भारतीय इंजिन हवे.
याच भाषणानंतर २५ ऑगस्ट रोजी व्यापारी वाटाघाटींसाठी येणाऱ्या अमेरिकी शिष्टमंडळाने आपला दौरा रद्द केला. अमेरिकेने सामरिक कराराबाबत फेरविचार कऱण्याचा इशारा दिला. क्वाड बैठकीसाठी ट्रम्प सप्टेंबरमध्ये येण्याची कोणतीही शक्यता शिल्लक राहीलेली नाही. भारत आपल्याला जुमानत नाही, मोदी आपली खुशामत करत नाही, टेरीफची धमकी दाखवून सुद्धा भारताला आपल्याला झुकवता आलेले नाही, हे ट्रम्प यांच्या खदखदीचे कारण आहे. ही खदखद माहिती असताना सुद्धा अलास्का येथील भेट आटोपल्यानंतर पुतीन यांनी मोदींना फोन केला. झेलेन्स्की यांना चेपून ट्रम्प ज्या पुतीन यांना खूष कऱण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत असलेली बैठक बाजूला ठेवून मध्येच पुतीन यांना फोन करतात. ते पुतीन ट्रम्प यांचा मोदींवर असलेला खुन्नस माहित असूनही अलास्का भेटीनंतर मोदींना फोन करतात. बैठकीचा तपशीलवार वृत्तांत ट्रम्प यांना देतात. हिच मोदींची ताकद आहे. पुतीन ट्रम्प यांच्यासमोर वाकले नाहीत, म्हणून ट्रम्प यांना वाकावे लागले. तिच वेळ मोदीही त्यांच्यावर आणणार याबाबत शंका बाळगू नका. मोदी इज द बॉस.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ युद्धाच्या संदर्भात “भारत हा नवीन चीन आहे” अशी टिप्पणी केली. अमेरिकेच्या काही धोरणकर्त्यांनीही भारताच्या वाढत्या सामर्थ्याला आव्हान म्हणून पाहिले. पण ट्रम्प यांची भूमिका वास्तवापासून खूप दूर आहे. फॉरिन अफेअर या अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे की, “ट्रम्प मोदींवर रागावले असतील, पण पुतिनपासून झेलेन्स्कीपर्यंत प्रत्येक नेता भारताशी थेट संवाद साधतो. हीच खरी ताकद आहे.” मॉस्को विद्यापीठातील तज्ज्ञ प्रो. अलेक्सी बारानोव म्हणतात : “भारताशिवाय रशियाची आशियाई धोरणे अपुरी राहतील. मोदी हे आजच्या घडीला सर्वात विश्वसनीय भागीदार ठरत आहेत.”
ब्रुसेल्सस्थित युरोपियन स्ट्रेटेजिक फोरमचा अहवाल म्हणतो,
“भारत हा रशिया व पाश्चिमात्य यांच्यातील संभाव्य पूल आहे. त्याशिवाय शांततेचा मार्ग शोधणे अशक्य आहे.” आंतरराष्ट्रीय विश्लेषक एडवर्ड ल्यूक यांनी नमूद केले, “भारत हा फक्त ‘उभरता बाजार’ राहिलेला नाही. तो आता जागतिक सामर्थ्याचा ध्रुव आहे. मोदींना टाळणे कुणालाही शक्य नाही.”
ट्रम्प यांना पुतिन यांना झुकवायचे होते. जेव्हा तेव्हा ते जमले नाही तेव्हा ट्रम्प स्वतःच त्यांच्यासमोर वाकले. आता मोदींवर ट्रम्प पुन्हा तोच प्रयोग करताहेत. भारतावर वरवंटा चालवून मोदींना भीववण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. हे सगळे बाण जेव्हा मोदी निकामी करतील तेव्हा ट्रम्प यांना मोदींशी जुळवून घ्यावेच लागेल. कारण ते मान्य करो वा ना करो अमेरिकेला असलेला चीनचा धोका त्यांना नजरेआड करता नाही आणि त्यासाठी भारताला सोबत घ्यावेच लागेल. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या भूराजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी नरेंद्र मोदी हेच असतील.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







