जोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा आहेच. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची हाळी देत ट्रम्प महासत्तेच्या सर्वोच्च आणि जगातील सर्वशक्तीशाली पदावर विराजमान झाले. दहा महिने ते सत्तेवर आहेत. या काळात अमेरिका अधिक गाळात गेल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांचे व्यवसाय मात्र या काळात बहरले, विस्तारले. २.३ अब्ज डॉलरवरून एका वर्षात ट्रम्प यांची मालमत्ता ५.१ अब्ज डॉलर म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाली. ट्रम्प यांच्या वैयक्तिक अजेंड्यामुळे न्यूयॉर्क निवडणुकीच्या निमित्ताने अमेरिकेत गाझा निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. जेव्हा नेते विचार सोडून खाबूगिरीकडे वळतात, तेव्हा निर्णायक लढाईत उदासीन झालेल्या हक्काच्या मतदारांमुळे असे पराभव वाट्याला येतात. न्यूयॉर्क निवडणुकीचा हा धडा आहे.
जोहरान ममदानी याला न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते पडली. अमेरिकेत लॉक डाऊनचा चौथा आठवडा सुरू असताना हे मतदान झाले. मुळातच मतदानाचा टक्का कमी होता. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मुस्लीम आणि स्थलांतरीतांनी एकगठ्ठा मतदान करून ममदानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
ममदानीला विजयी करणारे घटक आपण जर पाहिले, तर भारताच्या राजकारणात यापूर्वी अनेकदा वापरले गेलेले मॉडेल जसेच्या तसे न्यूयॉर्कच्या निवडणुकीत वापरल्याचे आपल्याला लक्षात येईल. एनजीओंचा वापर, त्यांना जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनकडून मिळालेली आर्थिक रसद, मुस्लीम कट्टरतावादी, पॅलेस्टाईन समर्थक संघटनांची भूमिका, अब्जाधीशांच्या विरोधात आणि गरीबांची कड घेणारी तोंडदेखली धोरणे राबवताना अब्जाधीशांकडून मागील दाराने घेतलेला पैसा, हे सगळे न्यूयॉर्क महापौर पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळते.
महापौर निवडणुकीचा अधिकृत निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर झाला तरी त्याची झलक जूनपासूनच दिसत होती. द गार्डीयन या ब्रिटीश वृत्तपत्राने २४ ऑक्टोबर रोजी मुस्तफा बयूमी याचा लेख प्रसिध्द केला होता. बयूमी या लेखात म्हणतात, २००१ मध्ये अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला. मुस्लीमांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट होती. मोठ्या प्रमाणात मुस्लीमांची धरपकड होत होती. त्यांच्यावर हल्ले होत होते. आज २४ वर्षांनंतर त्याच अमेरिकेच्या सर्वात महत्वाच्या शहरात एक मुस्लीम व्यक्ति महापौर झाला. बयूमी पुढे म्हणतात की, न्यूयॉर्कमध्ये मुस्लिमांची संख्या वाढते आहे. आज अशी परिस्थिती आहे. ज्याला निवडणूक जिंकायची आहे, त्याला मुस्लीम मतदारांना नजरेआड करता येणार नाही. हा लेख प्रसिध्द झाला तेव्हा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झालेले नव्हते.
फर्स्टपोस्टमध्ये प्रसिध्द झालेल्या लेखात असे म्हटले आहे की ममदानी यांच्या प्रचारासाठी विविध एनजीओचे २० हजार कार्यकर्ते राबत होते. ‘वर्कींग फॅमिली पार्टी’, ‘युनायटेड ऑटो वर्कर्स’ या संस्थांचा यात समावेश आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका लेखात असे म्हटले आहे की, जॉर्ज सोरोस याच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ने या ‘वर्कींग फॅमिली पार्टी’ला २३.७ दशलक्ष डॉलर इतका निधी पुरवलेला आहे.
लिंडा सारसोअर या पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनजीवी महिलेच्या ‘एमपावर’ आणि ‘एमगेज’ या संस्थाना सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ने अडीच लाख डॉलर दिले. ही महिला आणि तिचे एनजीओचे जाळे या निवडणुकीत ताकदीने ममदानीच्या प्रचारासाठी उतरले होते. सोरोसचा मुलगा एलेक्सला ममदानीच्या विजयानंतर आनंदाचे भरते आले. त्याने ‘सो प्राऊड टू बी न्यूयॉर्कर. कॉन्ग्रेच्युलेशन जोहरान ममदानी’, अशी पोस्ट केली. एलेक्सच्या पेण्टहाऊसमध्ये ममदानीच्या त्याच्या सोबत फोटोही झळकला. ममदानीवर टीका झाली. गरीबांचा मसिहा श्रीमंताच्या पैशाने जिंकला.
हे ही वाचा:
‘निफ्टी मिडकॅप १५०, ‘निफ्टी ५०’ ठरले टॉप परफॉर्मर
धर्मेंद्र प्रधानांची राहुल गांधींवर सडकून टीका
कुलगाम, डोडामध्ये दहशतवादी नेटवर्कवर प्रहार
अनंतनागमधील माजी सरकारी डॉक्टरकडे सापडली एके- ४७
सोरोस याने ममदानीच्या निवडणुकीत रस घेण्याचे कारण उघड होते. ममदानी ट्रम्प यांच्या धोरणांवर उभी आडवी टीका करत होता. तो ट्रम्प यांना थेट आव्हान देत होता. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर सोरोस यांचे दुकान त्यांनी बंद केले. त्यामुळे ममदानी यांना पाठिंबा देऊन सोरोस यांनी ट्रम्प यांचा हिशोब चुकता केला. परंतु इथे हा सवाल निर्माण होतो की सोरोस हे तर अमेरिकेच्या डिप स्टेटच्या हातचे बाहुले होते, सीआयए त्याला वापरत होती. मग सोरोस यांनी ममदानी यांना रसद पुरवली असेल तर सीआयए आणि अमेरिकेच्या डीपस्टेटचा त्यांना पाठिंबा होता काय? हे जर सत्य असेल तर ट्रम्प यांना येणारा काळ कठीण आहे. अमेरिकी डीप स्टेटने भारताच्या राजकारणात मोदी यांना मात देण्यासाठी जे मॉडेल वापरले तेच मॉडेल न्यूयॉर्कमध्ये वापरले गेले आहे.
ममदानीने या निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने ऐकली तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ज्यांच्या पाठिशी डीप स्टेट प्रायोजित ‘फोर्ड फाऊंडेशन’ने आर्थिक बळ उभे केले होते. मोफत बस प्रवास, मोफत रेशन, बालकांसाठी मोफत सेवा, घरभाड्यावर नियंत्रण, डीपार्टमेंट ऑफ कम्युनिटी सेफ्टी २०३० पर्यंत किमान वेतन ३० डॉलर. श्रीमंतांचा पैसा घेऊन गरीबांना वाटण्याचे सुतोवाच काँग्रेस पक्षाने केले होते. त्याच धर्तीवर ‘बिलियनर्सके पास सबकुछ है आपका समय भी आयेगा’, असे आश्वासन त्याने दिले होते.
तो उघड इस्त्रालय विरोधी आहे. ‘बायकॉट, डिसइन्वेस्ट, सॅंक्शन’ या इस्त्रायल विरोधी मोहिमेला त्याचा पाठींबा आहे. गाझामध्ये इस्त्रायलने केलेल्या अनधिकृत वस्त्या उठवण्याची मागणी ममदानी करत असतो. ‘द इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका’, ‘मुस्लीम एक्शन कोअलेशन’, ‘येमनी अमेरिकन मर्चंट असोसिएशन’, ‘बांगलादेशी अमेरिकन एडव्होकेसी ग्रुप’, ‘देसीज राईझिंग अप एण्ड मुव्हींग’ हे सगळे मुस्लीम गट ममदानीच्या विजयासाठी राबत होते.
ममदानीच्या विजयानंतर भारतात अनेकांना आनंदाचे भरते आले, त्याचे कारण तो मीरा नायर या सिने निर्मातीचा मुलगा आहे, हे नसून तो कट्टर मोदीविरोधक आहे, हे आहे. ममदानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा उल्लेख वॉर क्रिमिनल असा केला आहे. गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदींना क्लीनचिट दिलेली आहे. परंतु देशातील संविधान बचाओवाले काही बाबतीत सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवत नाहीत. ममदानी त्यांचा हिरो ठरला तर त्यात आश्चर्य ते काय? याच ममदानीने जेएनयूतील देशद्रोही उमर खालिदबद्दल ममत्व व्यक्त केले होते. यावरून त्याचा भारताबाबत एजेंडा काय ते लक्षात यावे.
ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला देशाची आर्थिक गाडी रुळावर आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भारतासारख्या मित्र देशांना चेपण्याचा प्रयत्न केला. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारखे देश सुद्धा याच पद्धतीने हाताळले गेले. त्यामुळे अमेरिकेचे भले होण्यापेक्षा नुकसान झाले. आर्थिक आघाडीवर नापास झालेल्या ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकेत सुरू असलेला शटडाऊन म्हणजे दुष्काळात तेरावा ठरला. पाकिस्तानातील भ्रष्ट नेतृत्वाशी हातमिळवणी करून ट्रम्प यांनी आपला क्रिप्टोचा धंदा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकाबाजूला विरोधक एकवटत असताना ट्रम्प यांचा हक्काचा मतदार त्यांच्या विजयासाठी ताकदीने मैदानात उतरला नाही. त्यामुळे न्यूयॉर्क, न्यू जर्सी, व्हर्जिनिया अशा अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षाला निवडणुकीत माती खावी लागली. डेमोक्रॅट्सची कामगिरी चमकदार होती. मतदार तुमचे विचार ऐकून मतदान करतात. सत्तेवर आल्यानंतर हे विचार बाजूला ठेवून अनेकदा सत्ताधारी स्वत:ची तुंबडी भरण्यात मश्गूल होतात. महाराष्ट्राचे राजकारण पाहिले जर याचा आपल्याला अंदाज येईल. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे महाराष्ट्रात सत्ता मिळाली. परंतु सत्ताधारी सध्या हिंदुत्व बाजूला ठेवून भूखंड ओरपणे, एसआरए योजना अशा महत्वाच्या कामात गुंतलेले आहेत. स्वत:ला सर्वशक्तिमान म्हणणाऱ्या ट्रम्प यांचे अमेरिकेत झालेले हाल लक्षात घेऊन या खाबूगिरीवर नियंत्रण आले तर तर ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही हिताचे ठरू शकेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







